सावलांची सावली

लस घ्यायला मी ‘जेजे’ रुग्णालयात पोहोचलो. मी गेलो तेव्हा डॉक्‍टर आणि नर्सेस दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडल्या होत्या. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी ‘जेजे’च्या आवारात आलो.
Harakhchand Savala
Harakhchand SavalaSakal

लस घ्यायला मी ‘जेजे’ रुग्णालयात पोहोचलो. मी गेलो तेव्हा डॉक्‍टर आणि नर्सेस दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडल्या होत्या. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी ‘जेजे’च्या आवारात आलो. जेवणाची रांग असलेल्या ठिकाणी गेलो. तिथं अनेक कामं चालली होती. सगळी माणसं व्यग्र होती. समोरच्या खुर्चीत बसलेली एक व्यक्ती अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं देत होती. मला पहिल्यांदा वाटलं, हे रुग्णालयाचं ऑफिस असावं. मात्र, नंतर ‘जीवनज्योत कॅन्सर रिलिफ फंड केअर सेंटर ट्रस्ट’ अशी पाटी वाचली आणि ते खासगी ऑफिस असल्याचं लक्षात आलं. मी त्या समोरच्या व्यक्तीला भेटलो. माझी ओळख सांगितली. आमचं बोलणं सुरू झालं.

ती व्यक्ती करत असलेलं काम खूप वेगळं होतं. त्या व्यक्तीनं मला काही नोंदी दाखवल्या आणि सांगितलं :‘‘गेल्या अडतीस वर्षांत दोन लाख लोकांचं दुःख दूर करत माझ्याकडून हे काम असंच सुरू आहे.’’

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो त्या व्यक्तीचं नाव हरखचंद कल्याणजी सावला (९५९४४६४०००). मूळचे गुजरातचे सावला आता मुंबईकरच आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सेवाभावी वसा जपायचा असं ठरवून लोअर परळमध्ये सावला यांनी सुरुवातीच्या काळात मित्रमंडळ स्थापन केलं. नंतर ‘जीवनज्योत’ उभारून कर्करुग्णासाठी आणि अन्य आजारांनी पीडित असलेल्यांसाठी त्यांनी काम सुरू केलं.

लोकांकडून जी मदत येईल ती मदत घ्यायची, पदरमोड करून गरजूंना मदत करायची हा मूलमंत्र घेऊन सावला यांचं काम सुरू आहे. गडचिरोली असो की गुजरात, कोलकता असो की सांगली, कुठूनही आलेल्या आजारी माणसाला सावला मार्ग काढून देतात.

‘हरिओम्’ म्हणत येणाऱ्या प्रत्येक माणसांचं स्वागत सावला करत होते. सतत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फोन करणं, लोकांना पत्रं लिहून देणं, आपल्याकडे असणारी औषधं, कपडे, साधनसामग्री लोकांना देणं अशी कामं तिथं चालली असल्याचं मी गेल्या तीन तासांपासून पाहत होतो. मला लस घ्यायची होती; पण ती आज घेणं काही शक्‍य नव्हतं. मग सावला यांचं सगळं काम समजून घ्यायचं असं मी ठरवलं.

सावला म्हणाले : ‘‘मुंबईमध्ये ‘टाटा’, ‘वाडिया’, ‘जेजे’, ‘सेंट जॉर्ज’, ‘कामा’ या रुग्णालयांमध्ये कुठल्याही आजाराचा रुग्ण आला तर त्याला मी सढळ हातानं मदत करतो. या मदतीत औषधं, रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत, अन्नदान, जुने कपडे, तपासण्या, पीडित मुलांसाठी खेळणी ‘जीवनज्योत’तर्फे दिली जातात. प्रत्येक दवाखान्यात आमचे स्वयंसेवक काम करतात. राज्यात बारा ठिकाणी आमची केंद्रं आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून १५० जण पूर्ण वेळ काम करतात आणि ३५० जण स्वयंसेवक म्हणून माझ्यासोबत अहोरात्र झटतात.’’

सावला पुढं सांगू लागले :‘‘दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. कर्करोगग्रस्त आजोबांना त्यांचे नातेवाईक इथं दाखल करून निघून गेले होते. मी त्या आजोबांना भेटायला गेलो तेव्हा ते आजोबा माझा हात हातात घेऊन म्हणाले : ‘‘मला माझ्या घरी न्या. मला माझ्या मुलांचा चेहरा पाहायचा आहे.’’ त्यांचे ते शब्द कानावर पडल्यावर रडूही आलं आणि कर्तव्याची जाणीवही झाली. त्या आजोबांवर आता औषधोपचार सुरू आहेत. ते बरे झाल्यावर मी त्यांना त्यांच्या घरी सोडणार आहे. अशी कितीतरी उदाहरणं रुग्णालयाच्या परिसरात मला अनुभवायला मिळतात.’’

गप्पा सुरू असतानाच सावला यांना त्यांच्या घरून फोन आला. फोनवरचं बोलणं आटोपल्यावर ते मला म्हणाले : ‘‘कोकणामधून एका शेतकऱ्यानं रुग्णांना वाटण्यासाठी आंबे पाठवले आहेत. ते आंबे आणण्यासाठी मला घरी जावं लागेल.’’

गप्पा मारता मारता मीही त्यांच्याबरोबर निघालो.

सावला यांच्या आई साकरबेन, पत्नी निर्मला यांनी सावला यांच्या सेवाभावी स्वभावाबद्दल भरभरून सांगितलं.

सावला यांची मुलगी डॉ. नेहा आणि इंजिनिअर मुलगा चिंतन या दोघांशीही मी गप्पा मारल्या. चिंतन आता उद्योगक्षेत्रात भरारी मारत वडिलांच्या कामाला हातभार लावत आहे. डॉ. नेहा आणि तिचे यजमान ऊर्मिल शहा यांना सावला यांचा हा सामाजिक उपक्रम पुढं न्यायचा आहे.

सावला यांच्या सूनबाई हिरल मला म्हणाल्या : ‘‘बाबांच्या कामात आम्हा सर्वांचा हातभार असतो, त्यांची आपल्या कामाविषयी असलेली तळमळ आम्ही जाणून आहोत.’’

आम्ही परत ‘जेजे’मध्ये आलो. गरजू रुग्ण सावला यांच्या टीमकडे आणि त्यांच्या संस्थेकडे संपर्क कसा साधतात, त्या लोकांची सावला कशी काळजी घेतात, यावर आमचं बोलणं सुरू होतं. सावला यांना मी विचारलं : ‘‘ जे करायचं राहून गेलंय असं तुमचं कुठलं काम आहे?’’

सावला म्हणाले : ‘‘कर्करुग्णांवर मोफत उपचार करणारं ‘रिसर्च सेंटर’ मला उभारायचं आहे. त्यासाठी मी ‘हाफकिन’च्या समोर छोटीशी जागा घेतली आहे; पण ते उभारण्यासाठीचं आर्थिक बळ माझ्याकडे नाही. ते माझ्या आवाक्‍याबाहेरचं आहे.’’

आपल्या वडिलांच्या संपत्तीतून सावला यांनी हे सामाजिक काम उभं केलं खरं; पण त्यांना स्वतःला जे उभारायचं आहे, त्याची पूर्तता आर्थिक कारणांअभावी अद्याप होऊ शकत, हेही तेवढंच खरं. रोज शंभर-शंभर रुग्ण, त्यांचे नातेवाईक सावला यांच्याकडे येतात. कर्करोगाचं प्रमाण आपल्या देशात किती आहे हे यावरून लक्षात येतं. एकीकडे कर्करोग आणि दुसरीकडे त्यावरच्या उपचारांविषयी काही माहीत नाही, खिशात एक रुपयाही नाही, अशा अवस्थेतले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक...यांच्या हालाला पारावार नसतो. मात्र, सावला यांच्यासारखी एखादी व्यक्ती अशा लोकांची सावली होते.

आपल्या या खडतर काळात आपण अगदीच एकटे नाही आहोत, असा दिलासा ही सावली रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना देत राहते. सावला यांच्यासारखी पाच-दहा माणसं या मोठमोठ्या रुग्णालयांच्या आसपास असली तरी इथं असणारा आक्रोश थोडा का होईना, निश्चितच कमी होईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com