दवा, दुआ आणि प्रेम...

माझे मित्र नयन बाराहाते ज्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपचार घेत होते तिथं पोहोचलो. मी आल्याचं पाहून नयन यांना एकदम भरून आलं.
दवा, दुआ आणि प्रेम...

त्या दिवशी सकाळी नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची धावपळ सुरू होती. मी स्टेशनवर उतरलो.

माझे मित्र नयन बाराहाते ज्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपचार घेत होते तिथं पोहोचलो. मी आल्याचं पाहून नयन यांना एकदम भरून आलं. त्यांच्या शेजारी खुर्चीत बसलेल्या मुलीनं नयन यांना विचारलं : ‘‘ये आप के भाई है क्या?’’

नयन म्हणाले : ‘नही. ये मेरे दोस्त है.’’

त्या मुलीची ओळख करून देताना नयन मला म्हणाले : ‘‘ही सूफिया. डॉक्टर आहे. तिलाही माझ्यासारखंच झालं आहे. तिचीही मानेखाली काहीही हालचाल नाही. तिला जीबीएस नावाचा आजार झालाय.’’

सूफियाची आई रुख्साना पठाण, सूफियाचा भाऊ अजमान असे आम्ही बोलत होतो, तितक्यात तिथं एक मुलगा आला. सूफियाच्या आईनं त्याची माझ्याशी ओळख करून दिली. त्याचं नाव साजिद. सूफिया-साजिद यांच्या वाट्याला आलेल्या स्थितीविषयी सूफियाच्या आईनं जे सांगितलं ते वेदनादायी होतं.

नांदेड शहरात राहणारी सूफिया आणि साजिद शेख यांचं लग्न ठरलं. लग्नाआधीचे सर्व विधी झाले. लग्न आठ दिवसांवर होतं, तेव्हाच सूफियाला एकदम झटका आला आणि तिचे दोन्ही हात-पाय लुळे (पॅरलाईज्ड्) पडले. दोन्हीकडच्या कुटुंबांपुढं मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. आता आपल्या मुलीचं काय होणार या काळजीनं सूफियाची आई साहजिकच खचून गेली.

मात्र, सूफिया अगदी बिनधास्त होती, असं तिच्या आईनं सांगितलं. तिच्या सकारात्मकतेविषयी ऐकून मलाही नवल वाटलं.

गेल्या दोन महिन्यांपासून साजिद हा सूफियाची पूर्ण वेळ काळजी घेतोय.

साजिद सूफियाला भरवत होता.

‘तुझ्या घरचे लग्नासाठी आता परवानगी देतील का?’’ मी साजिदला बिचकत बिचकतच विचारलं.

साजिद म्हणाला : ‘आता परवानगी कशासाठी? आमचं लग्न तर अगोदरच ठरलंय ना...’

‘तसं नाही रे. आता असं झालं आहे म्हणून...’ मी म्हणालो. साजिद हसला. सूफियाचे डोळे पुसत म्हणाला : ‘अहो, लग्नानंतर असं झालं असतं तर मी सूफियाला सोडलं असतं का? आणि जर मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आणि तिलाही सूफियासारखंच काही झालं तर मग काय करायचं? अल्लाहनं ठरवलं तर सर्व काही ठीक होईल. माणसाच्या मनात नेकी पाहिजे. आपल्या प्रेमावर विश्वास पाहिजे.’’

दोघं एकमेकांच्या प्रेमाविषयी बराच वेळ बोलत राहिले...

‘सूफियाचे वडील काय करतात?’ मी सूफियाच्या आईला विचारलं. या प्रश्नावर एकदम शांतता पसरली.

‘ते एका अपघातात वारले,’ दाटून आलेल्या आवाजात सूफियाच्या आईनं सांगितलं.

सूफियाचं सर्व कुटुंब एकत्र होतं. आईच्या स्वप्नानुसार सूफिया डॉक्टर झाली. सादिक इंजिनिअर आहे.

सूफिया म्हणाली : ‘दादा, मला असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आयुष्यात मला कुणावर ओझं होऊन राहायचं नाही. पहिल्यापेक्षा आता माझी तब्येत चांगली आहे.’

अजमान म्हणाला : ‘दवा आणि दुआ तर आहेच, त्यांचा असर किती होतो ते माहीत नाही; पण साजिदच्या प्रेमामुळे सूफिया लवकर बरी होऊ लागली आहे. साजिद आम्हा सर्वांबरोबर आहे म्हणून आम्हीही सन्मानानं उभे आहोत. सूफियाच्या या अवस्थेमुळे साजिदनं जर नकार दिला असता तर सूफियासह आम्हा सर्वांचं काय झालं असतं काय माहीत.’’ हे सर्व सांगत असताना अजमान जरा भावुक झाला होता. त्यांची आई पुन्हा रडायला लागली.

नयन हे सर्व शांतपणे पाहत होते. ते म्हणाले : ‘माणसामाणसातला दृढ विश्‍वास जर कायम असेल तर माणुसकी शाबूत राहील, प्रेम वाढेल. तुम्ही दोघांनी जे ठरवलं आहे, त्याला कुठलाही समाज कितीही विरोध करू पाहत असेल तरी त्याला यश येणारच नाही. तुमचं एकमेकांवरचं प्रेम असंच कायम ठेवा.’

नयन यांचं हे बोलणं ऐकून भावुक झालेल्या त्या सर्व चेहऱ्यांवर समाधानाची छटा दिसत होती.

सादिक माझ्या जवळ आला आणि म्हणाला : ‘तुमच्याशी बोलल्यामुळे मन मोकळं झालं.’

आमच्या गप्पा रंगल्या असतानाच, ज्या ‘शिवांश न्यूरोरिहॅबिलिटेशन सेंटर’मध्ये नयन आणि सूफिया उपचार घेत आहेत, त्या सेंटरच्या प्रमुख अश्विनी धोंडे (९६७३००४१७२) तिथं आल्या.

नयन आणि सूफिया यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. अश्विनी या जर्मनीत होत्या. आपल्या भागासाठी, माणसांसाठी काही तरी केलं पाहिजे, या भावनेतून त्यांनी आपल्या गावाला, नांदेडला, हे सेंटर उभारलं. नांदेड जिल्हा हा तसा मागास भाग. भोवताली आदिवासी जमात असलेला भाग. गरिबी आणि रोगराई हा या जिल्ह्याला लागलेला जूण शापच. अर्धांगवायूसारख्या गंभीर आजारातून बाहेर यायचं असेल तर हैदराबाद किंवा मुंबई गाठल्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. आता अश्विनी यांच्या या सेंटरमुळे हैदराबाद, मुंबईला जाण्याची वेळ येत नाही.

अश्विनी यांनी मला सर्व सेंटर दाखवलं. तिथं उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना मी भेटलो. जे फिजिओथेरपी करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होते, ते सर्व उपचारांबाबत समाधानी होते.

अश्विनी म्हणाल्या, ‘इथल्या लोकांकडे नाममात्र द्यायलाही पैसे नसतात. मीही कधी पैशाचं फारसं कुणालाही विचारत नाही. येणारा प्रत्येक रुग्ण आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं.’

मला आई-वडिलांना भेटण्यासाठी पाटनूरला जायचं होतं. मी सेंटरहून निघालो. नयन यांचा निरोप घेऊन मी सूफियाकडे गेलो. सूफियानं मला जवळ बोलावलं. माझा हात हातात घेऊन सूफिया म्हणाली : ‘दादा, माझ्या लग्नाला येणार ना..!’

‘हो, नक्की’ तिचा हात थोपटत मी म्हणालो.

सतत उदास असणाऱ्या सूफियाच्या आईच्या चेहऱ्यावर आम्हा बहीण-भावाचं हे प्रेम पाहून आनंद झळकू लागला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com