‘ती’ काळरात्र

रोहित भार्गवचा नागपूरहून फोन आला. म्हणाला : ‘बाबा गेले. आई म्हणते, ‘संदीप जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचे नाहीत.’
Nagpurs Mokshadham cemetery
Nagpurs Mokshadham cemeterySakal

रोहित भार्गवचा नागपूरहून फोन आला.

म्हणाला : ‘बाबा गेले. आई म्हणते, ‘संदीप जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचे नाहीत.’

बाबांविषयीची वार्ता ऐकून मनात धस्स झालं.

मी म्हणालो : ‘काय झालं होतं रे बाबांना?’

तो म्हणाला : ‘कोरोनानं ग्रासलं होतं रे. ते त्यातून पूर्णपणे बरेही झाले होते. रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. चार दिवस घरी आले. सर्वांमध्ये वावरले आणि पाचव्या दिवशी गेले.’

काय बोलावं ते सुचेना.

मी नागपूरला निघायच्या तयारीला लागलो. नागपूरला उतरल्यावर रस्त्यांवरची शांतता मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. पोलिस तपासणीमोहिमेत गर्क होते.

रोहितच्या घरी पोहोचलो. मला पाहताच काकूंच्या - रोहितच्या आईच्या- भावना अनावर झाल्या.

रोहित हा माझा जिवाभावाचा मित्र. औरंगाबादच्या विद्यापीठात शिकायला असल्यापासूनचा. त्याच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. काकू नेहमी म्हणायच्या : ‘मला एकच मुलगा नसून दोन मुलगे आहेत.’

काकांच्या खूप आठवणी मनात तरळत होत्या. ॲम्ब्युलन्स आली आणि आम्ही ‘मोक्षधाम’ स्मशानभूमीकडे निघालो.

स्मशानभूमीच्या जवळ आल्यावर तिथली मोठी रांग पाहून मनात धडकीच भरली. माणसं अंगात पीपीई किट घालून फिरत होती...जणू काही रोबो फिरत असावेत.

हंबरडा फोडणारे, आक्रोश करणारे, अश्रू एकत्रितपणे ढाळणारे आणि मदतही करणारे लोक या स्मशानभूमीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी कधीही पाहिले नसावेत.

एरवी, चार वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची सुविधा तिथं होती; पण सध्याच्या परिस्थितीमुळे जमेल तिथं, जिथं जागा मिळेल तिथं लाकडं रचून अंत्यसंस्कार केले जात होते. स्मशानात गेल्याशिवाय जीवनातलं ‘वास्तव’ समोर येत नाही हे खरंच आहे.

तिथं समोरच असलेल्या एका मुलीशी मी बोललो. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ती आली होती.

खूप अवधी जाऊनही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी नंबर आलेला नव्हता. एकीकडे शहरात भयाण शांतता होती आणि दुसरीकडे स्मशानभूमीत असलेली ही कमालीची लगबग मन हेलावून सोडत होती. त्या मुलीचं नाव होतं संध्या तिवारी. ती वर्ध्याची. वडिलांना खूप त्रास होऊ लागल्यानं नागपूरला हलवलं होतं. उपचारांदरम्यानच ते गेले.

तिकडे आई आणि भाऊ गेले. तिचीही तब्येत ठीक नव्हती.

‘नातेवाईक, मित्र कोरोनामुळे अंत्यसंस्काराला येत नाहीत, कुणी विचारत नाहीत...’’ संध्या रडवेली होऊन सांगत होती. संध्या नागपूरमध्येच वैद्यकीय शिक्षण घेते. डॉक्‍टरी समज असल्यामुळे वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी येण्याचं धाडस तिनं केलं होतं.

तिथं सर्वत्र घाबरलेली, भेदरलेली आणि दुःखी माणसं होती आणि ते साहजिकच होतं. ती माणसं बोलण्याच्या मनःस्थितीत असतील तरी कशी? पण कुणीतरी खांद्यावर हात ठेवावा...मायेनं विचारपूस करावी यासाठी ती माणसं नक्कीच भुकेलेली होती.

मी तिथल्याच एका आजींशीही बोललो. आजींच्या घरात सात माणसं होती. दोन माणसं कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेली आणि तीन माणसं दुसऱ्या लाटेत मरण पावली होती. राहिलेला एक जण दवाखान्यात उपचार घेत होता. आजींचं नाव ताराबाई कर्वे. वय ७५ वर्षं. सीताबर्डी भागातल्या या आजींना मी मनोमन सलाम केला.

अशी कितीतरी कुटुंबच्या कुटुंब या कोरोनानं उद्ध्वस्त केली. त्या स्मशानात कुणाशीही बोला...त्या प्रत्येकाची वेगळी कहाणी होती. आपल्या मृत नातलगाचा अंत्यसंस्कारासाठी नंबर कधी येणार...या स्मशानभूमीतून घरी कधी जाता येणार...याची वाट पाहत, इतर मृतांच्या जळत्या चितेकडे पाहणारा तिथला प्रत्येक जण व्याकुळ होता.

समोरच्या आधीच्या चितेचा अग्नी जळेल, पुन्हा शांत होईल; मग आपण आणलेली लाकडं तिथं रचायची आणि त्या चितेवर आपल्या नातलगाचा मृतदेह ठेवायचा, त्याला अग्नी देऊन तिथून निघायचं...असं सगळं चक्र तिथं सुरू होतं.

त्या स्मशानभूमीमध्ये काम करणारी दोन माणसं अक्षरशः थकून गेली होती. पाणी पिण्यासाठी काहीच क्षण विसावलेल्या त्या दोघांना मी म्हणालो: ‘‘दादा, हे सगळं दुःख पाहून तुमच्या डोळ्यांमधली भीती, अश्रू केव्हाच संपून गेले असतील ना?’’

त्यापैकी एकजण काहीसं हसला आणि म्हणाला : ‘‘आमचं काम आम्ही करतो. दिवसाकाठी तीनशेपेक्षा जास्त माणसं वैकुंठाला पोहोचवणं हे सोपं काम नाही; पण शेवटी आम्हीपण माणसंच ना? आम्हालाही दुःख होतं, वाईट वाटतंच.’’

ते दोघं उठले आणि कामाला लागले.

आता रात्र होऊ लागली होती. महानगरपालिकेच्या बसेसमधून मृतदेह आणले जाऊ लागले होते.

मी रोहितची वाट पाहत होतो. लाकडं भरून आणलेल्या बैलगाडीबरोबर रोहित आला. आम्ही दोघांनी लाकडं उतरवून घेतली. एका कोपऱ्यात काकू एकट्याच बसून सर्व काही शांतपणे पाहत होत्या. चिता रचली गेली आणि थोड्या वेळानं बाबांचा मृतदेह आम्हीच उचलून चितेवर ठेवला आणि अग्नी दिला. रात्र आता गडद होऊ लागली होती आणि त्या स्मशानभूमीत जिकडे नजर टाकावी तिकडे चितांची आगच आग दिसत होती. आतमध्ये सरणावर मृतदेह जळत होते...पण त्यापेक्षाही जास्त मृतदेह बाहेर प्रतीक्षेत होते...

वार्धक्याकडे झुकलेले आई-बाप तरण्याबांड मुलांवर अंत्यसंस्कार करत होते. का आली असेल अशी वेळ, असा प्रश्न मनात वारंवार येत होता. त्या स्मशानात घालवलेली ती आख्खी रात्र मनात आणखीही बरेच प्रश्न निर्माण करून गेली...

सुकलेल्या डोळ्यांना आणि थकलेल्या मनांना परत आशेचे किरण कधी दिसतील कुणास ठाऊक...पण कधीतरी दिसतील एवढं मात्र खरं....ते लवकरात लवकर दिसोत...

आपण सकारात्मक विचार करू या! बरोबर ना...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com