माईंची लेकरं निराधार?

‘यिन’च्या एका कार्यक्रमानिमित्त सिंधुताई सपकाळ ऊर्फ माई यांची मी मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यावर थोड्या वेळानं माईंचा फोन आला.
Sindhutai Sapkal
Sindhutai SapkalSakal

‘यिन’च्या एका कार्यक्रमानिमित्त सिंधुताई सपकाळ ऊर्फ माई यांची मी मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यावर थोड्या वेळानं माईंचा फोन आला.

माई म्हणाल्या : ‘‘किती दिवस झाले, निवांंत भेट नाही. मला कधी भेटायला येणार आहेस? लवकर ये...’’

माईंचा सूर नेहमीपेक्षा वेगळा वाटला. काहीसा चिंताग्रस्त.

विनय सपकाळ यांना फोन करून मी माझी शंका बोलून दाखवली. त्यांनी तिथली परिस्थिती सांगितली. माईंनी सुरू केलेली चळवळ कोरोनामुळे अडचणीत सापडली होती.

विनय म्हणाले : ‘‘माईंचं सर्व काम लोकांनी दिलेल्या मदतीवर चालतं; पण गेल्या वर्षभरापासून ही मदत बंद आहे. कर्ज काढून संस्थेची कामं सुरू आहेत.’’

दोन दिवसांनी मी माईंना भेटायला मांजरीला निघालो. येत असल्याची पूर्वकल्पना विनय यांना दिली.

पुण्याच्या स्वारगेटपासून बारा किलोमीटरवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटजवळ मांजरी (बुद्रुक) हे गाव आहे.

माईंनी पुरस्कारांच्या रकमेतून मांजरीला थोडीशी जमीन विकत घेतली व तिथं ‘सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण’ या संस्थेचं काम सुरू केलं. बाकी शिरूर, सासवड, चिखलदरा या ठिकाणीही माईंच्या संस्थेचा पसारा आहे. या सर्व संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाथ मुलं, निराधार महिला आहेत. माई चालवत असलेला गाईंचा प्रकल्प माळेगाव ठेका या ठिकाणी आहे. कसायाला दिल्या जाणाऱ्या, ज्यांना कुणीही वाली नाही अशा शेकडो गाई तिथं आहेत.

मी माईंच्या घरी पोहोचलो. विनय सपकाळ ( ९०४९४७४५४४) तिथं आलेले होतेच.

स्थिरस्थावर झालो व संस्था, मुलं, निराधार महिला यांच्याविषयी माईंशी गप्पा सुरू झाल्या. माईंचं सर्व काम विनय पाहतात. विनयविषयी सांगताना माई म्हणाल्या : ‘‘दीड महिन्याचा असताना विनय रेल्वेरुळावर आढळला. मीच लहानाचा मोठा केला.’’

विनय मध्येच म्हणाले : ‘‘मला शिकवलं. औरंगाबादच्या सीमाशी माझं लग्न लावून दिलं. लग्नात दोन दिवस माईंच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम झाला.’’

माईंनी आपलं आयुष्य कसं सोनेरी केलं हे विनय यांनी मोठ्या आनंदानं-अभिमानानं सांगितलं.

माईंचा हात सतत हातात घेऊन चालणारी वनिता सपकाळ हिलाही माईंनी आपल्या आईपणाची कूस दिली.

अशी असंख्य मुलं-मुली आहेत...या सगळ्यांना उभं करून माईंनी आपलं सपकाळ हे आडनाव त्यांना दिलं.

ज्या महिलांना समाजानं वाळीत टाकलं आहे, अशा किती तरी निराधार महिलांना माईंनी उभं केलं आहे. पांढरं कपाळ घेऊन वावरणाऱ्या, नवऱ्यानं मारल्याच्या खुणा अंगावर बाळगणाऱ्या, कुणी मुलांना सोबत घेऊन आलेल्या, तर कुणी जवळ नसलेल्या मुलांच्या आठवणीत हरवलेल्या...अशा कितीतरी महिलांचे चेहरे माईंच्या अवतीभवती मला दिसले.

माई मला म्हणाल्या : ‘‘माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या गाईंचं काय होईल, हे प्रश्न मला दिवस-रात्र भेडसावत आहेत. एवढी वाईट परिस्थिती कधीही आली नव्हती. माझं ‘भाषण’ बंद झालं आणि माझ्या मुलांसाठी येणारं ‘राशन’ही बंद झालं. जवळ होती ती पुंजी कोरोनाच्या सुरुवातीच्या चार-सहा महिन्यांत संपली. त्यानंतर अडचणी एकेक करून पुढं उभ्या राहिल्या.’’

एरवी सतत पायाला भिंगरी बांधून फिरणाऱ्या माई कोरोनामुळे सध्या चार भिंतींत बंदिस्त आहेत.

पुन्हा भावुक होत माई म्हणाल्या : ‘‘मुलं, बाई आणि गाई यात माझा जीव फार गुंतला रे बाबा...आणि सहा महिने होऊन गेले. मी माझ्या गाईंच्या पाठीवरून हात फिरवला नाही.’’

मी तिथल्या अनेक मुलांशी, महिलांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. कुणी कचऱ्याच्या डब्यात सापडलं... कुणी देवळात...कुणाचं सगळंच्या सगळं कुटुंब अपघातात मृत्युमुखी पडलेलं...कुणाला नवऱ्यानं टाकून दिलेलं... कुणाला सासू-सासऱ्यांनी घरातून हाकलून दिलेलं...किती तरी दर्दभऱ्या कहाण्या होत्या.

माईंबरोबर परिसरात फेरफटका मारत असताना गप्पा सुरूच होत्या. गाईंचा प्रकल्प जिथं आहे तिथलं काम पाहणारे मनीष यांना मी माझ्या फोनवरून व्हिडिओ कॉल लावला. त्या कॉलवरून माईंनी गाईंना दमदारपणे हाका मारायला सुरुवात केली. ‘ए राधा...ए गोपिका...’ दूर असणाऱ्या गाई पळत आल्या. माईंचा आवाज तर येतोय; पण माई काही दिसेनात! गाई सैरभैर झाल्या. ‘ये, माझी बाय... ये, माझी राणी. किती दिवस झाले गं, तुला भेटले नाही...’ गाईंशी असा संवाद साधता साधताच माईंच्या डोळ्यांत पाणी आलं.

गप्पांच्या ओघात मुलगी ममता, दीपक यांचाही विषय निघाला. दोघांच्या कामाचं माईंनी कौतुक केलं.

माईंच्या कामाबाबत शासनदरबारी किती अनास्था आहे हे तिथल्या फायलींवरून आणि पत्रव्यवहारावरून दिसत होतं.

जे माईंच्या कामावर प्रेम करतात, माईंनी ज्यांना आयुष्यात उभं केलं आहे त्या सर्वांनी आता या बिकट परिस्थितीत

मदतीचा हात पुढं केला पाहिजे असं मला वाटून गेलं.

घरात जिकडं पाहावं तिकडं पुरस्कारांची चिन्हं आणि माईंचे हसरे फोटो दिसत होते; पण सध्या कोरोनानं माईंच्या चेहऱ्यावरचं हसू जणू हिरावून घेतलं आहे...

मी निघालो... ‘होईल सर्व ठीक,’ असा दिलासा माईंना दिला.

माईंनी उभ्या केलेल्या या चळवळीचं काय होणार...माईंच्या शेकडो मुलांच्या दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न कधी सुटेल... ही कोरोनाची महामारी माईंची आणि गाईंची भेट होऊ देणारच नाही का....प्रश्नच प्रश्न होते मनात.

इथल्या भुकेलेल्या प्रत्येकासाठी तुम्ही-आम्ही सामाजिक जबाबदारीपोटी काहीच करू शकत नाही का...

मनात हाही एक प्रश्न उभा राहिलाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com