बोलणाऱ्या कॉलेजच्या भिंती..!

सोलापूर, लातूर, नांदेड आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांत असणाऱ्या कार्यक्रमांसाठी मी सोलापूरहून सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीन विभागांतून माझा प्रवास होणार होता.
College
Collegesakal

सोलापूर, लातूर, नांदेड आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांत असणाऱ्या कार्यक्रमांसाठी मी सोलापूरहून सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीन विभागांतून माझा प्रवास होणार होता. सोलापूरजवळ एका महाविद्यालयात परिसंवाद होता. जेमतेम मुलं आली होती. तसाच कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवर चार आणि पुढे चार, उभे चार अशी त्या कार्यक्रमाची अवस्था होती. ज्या मुलांनी त्या कार्यक्रमाचं आखीव-रेखीव नियोजन केलं होतं, ते नियोजन एखाद्या इव्हेंट कंपनीला लाजवेल असं होतं.

कार्यक्रमानंतर मी तिथल्या प्राचार्यांसोबत बोलत होतो. प्राचार्यांनी सांगितलं, ‘सर आपली मी माफी मागतो; पण ही अवस्था माझ्याच महाविद्यालयाची नाही, तर सगळ्याच महाविद्यालयांची आहे. मुलं येतच नाहीत. तुम्ही हे मैदान, हे सर्व वर्ग, हे ग्रंथालय पाहताय, इथं पाच वर्षांपूर्वी इतका किलबिलाट होता की, प्रवेशाचं सर्व मस्टर भरलेलं असायचं. पाय ठेवायला जागा नसायची. आता प्रवेश तेवढेच होतात; पण मुलं महाविद्यालयात येण्याऐवजी कोचिंग क्लासेसना जातात. आता महाविद्यालयाच्या शिकवणीवर पालकांचा, विद्यार्थ्यांचा विश्वास नाही.’

मुलं महाविद्यालयात येत नाहीत, या मुद्याच्या अधिक तपशीलात गेल्यावर मीही थक्क झालो. सोलापूरहून मी लातूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या औसा इथल्या एका कॉलेजमध्ये गेलो. तिथं मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर तीन पुस्तकांची निर्मिती त्याच विद्यार्थांनी केली होती. त्याचं प्रकाशन आम्ही सर्वांनी मिळून केलं. तिथं तर सर्व बाहेरची माणसं दिसत होती. मी तिथल्या प्राध्यापकांना म्हणालो, ‘का हो महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या का?’ ते प्राध्यापक म्हणाले, ‘नाही हो, कशाच्या सुट्ट्या, बाराही महिने बारा मुलं महाविद्यालयात नसतात. परीक्षेला येणं आणि पास होणं एवढंच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं आहे.’

मी त्या महाविद्यालयाचा कार्यक्रम आटोपून नांदेड जिल्ह्यातील लोह्याजवळच्या एका कॉलेजमध्ये गेलो. तिथं एनएसएसच्या माध्यमातून मुलांनी तयार केलेल्या बंधाऱ्याचं पूजन आम्हा सर्वांच्या हस्ते करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला जे विद्यार्थी होते ते कमालीचे उत्साही होते. ज्या युवकांच्या पुढाकारातून ते काम केलं होतं, त्यांमध्ये अप्पाराव जाधव आणि समीर तिरुके हे दोघे बोलण्यात हुशार होते. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही शहरातल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला नाही का?’ अप्पा म्हणाला, ‘सर या महाविद्यालयात कॉप्या चालतात म्हणून मी प्रवेश घेतला. मी अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या अख्ख्या खानदानामध्ये मीच पहिला बारावी पास झालो. आता मी बी.ए. तृतीय वर्षात आहे. आता पास होईन की नाही माहिती नाही; पण मी इथपर्यंत आलो याचा माझ्या घरच्यांना आनंद आहे.’ दुसरा समीर म्हणाला, ‘‘कुठं शिकून नोकरी लागणार आहे, हे ठरलेलं आहे, त्यामुळे लोकांनी मला चांगलं म्हणावं, यासाठी शिकणं सुरू आहे.’’

पुढं प्रवासात यवतमाळ जवळच्या एका महाविद्यालयात मी पोहोचलो. इथं मुलींच्या ग्रुपने एकत्रित येऊन महाविद्यालयापासून जवळ असलेल्या तीन गावांतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी चांगल्या उपक्रमांसाठी पुढाकार घेतला. त्या शाळेसंबंधात असणाऱ्या उपक्रमाचा उद्‍घाटन सोहळा होता. त्या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य म्हणाले, ‘‘आमच्याकडे महाविद्यालयाच्या पटावर मुलं आणि मुली समान आहेत; पण प्रत्यक्षात मुलं फार कमी उपस्थित राहतात.

आता आमच्याकडे प्रवेश घेतलेली अनेक मुलं वेगवेगळ्या क्लासला आहेत का, तर आहेत; पण त्याचं प्रमाण तसं कमी आहे. शेती, उद्योग, मजुरी या कामाला तरुण मुलांना पालक लावतात हे जास्त खरं आहे. त्यापेक्षाही खरं आहे ते म्हणजे, मुलांची कॉलेजात येण्याची मानसिकता नाही. मुली मुलांपेक्षा चारपट कामं करतात, मार्कही छान असतात.’’ प्राचार्य हे बोलत असताना तिथं ऐकण्यासाठी केवळ सात-आठ मुलं असतील. बाकी संख्या मुलींचीच होती.

मी, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्या उपक्रमशील मुली असे आम्ही सारे प्राचार्यांच्या दालनात बसलो होतो. प्राचार्यांच्या भाषणाचा धागा धरून मी पुढे गेलो. मी त्या प्राचार्य बाभळे यांना विचारलं, ‘‘तुम्ही मुलांविषयी जे बोलत होता, ते फार गंभीर आहे हो!’ प्राचार्य माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘काय सांगावं सर, आता परिस्थितीच तशी आहे. खूप मोठं होण्याच्या नादात आपण अख्खी पिढी बरबाद करीत आहोत. त्यात कोविडने सर्व शिक्षण व्यवस्थेला आळशी बनवून टाकलं. अजून ना शिक्षक त्या आळशी व्यवस्थेमधून बाहेर येत आहेत, ना विद्यार्थी.’

आमच्या खूप गप्पा झाल्या. त्या प्राचार्यांचं बोलणं ऐकून मी अस्वस्थ झालो. प्राचार्य सर म्हणाले, ‘‘माझी दोन मुलं याच संस्थेत शिकली. मोठा आता हयात नाही, पण छोटा आदर्श शिक्षक आहे.’’ मी काही बोलायच्या अगोदर ते प्राचार्यच आम्हाला सांगू लागले, ‘‘मी आणि माझ्या बायकोने मिळून माझ्या मुलाचा जीव घेतला. मुलगा परदेशात जाऊन शिकला पाहिजे, तो तिकडे स्थायिक झाला पाहिजे, असा आमचा आग्रह होता.

तसं करून आम्ही त्या मुलावर अन्याय करीत आहोत, याची मला कल्पनाही आली नाही. मुलगा बाहेर गेला, आमच्यापासून तुटला, तो केवळ मार्कांसाठी शिकायला लागला, त्याच्या आयुष्याचं ध्येय हे माणुसकी नाही, तर केवळ अधिक पैसा कमावणं असं झालं. तो दोन दिवस परदेशातून आमच्याकडे आला तर त्याला कोंडल्यासारखं व्हायचं. परदेशात त्याने आयआयटी करून परदेशातच काम सुरू केलं. नोकरीनंतर तो परदेशातच स्थायिक झाला.

पुढे तो दोन-दोन महिने आमच्याशी बोलायचा नाही. तो अनेक वेळा आजारी असायचा असं त्याच्या बोलण्यावरून वाटायचं. कमावलेला पैसा तो गुंतवून टाकायचा. अधिक हव्यासामुळे तो स्वतः कधी जगलाच नाही. संगीत, संस्कार, माणुसकी हे त्याला मान्य नव्हतं. कारण आम्ही त्याला कधी ते समजून घेण्याची संधीही दिली नाही. हा अभ्यास, ती परीक्षा, ते ट्रेनिंग यातच बिचाऱ्याचं सारं तारुण्य संपलं. तो खूप टेन्शनमध्ये असायचा, त्याला खूप व्यसनं लागली होती.

माझा मुलगा वाघासारखा परदेशात गेला, तोच वाघ डेडबॉडीच्या रूपात परत भारतात आला. एक बाप जेव्हा आपल्या तरुण मुलाला खांदा देतो, तेव्हा तोही मेलेलाच असतो.’’ प्राचार्य सरांनी त्यांचा चष्मा काढला. खिशातला रुमाल काढत डोळे पुसत ते म्हणाले, ‘‘छोटा मुलगा माझ्याकडे राहिला, तो शिक्षक आहे. गावपातळीवरील मुलांना उभं करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करतो. तो संस्कारांत वाढला. त्याने आम्हाला सावरलं.

आता माझ्या महाविद्यालयामध्ये पटावर मोठी संख्या आहे; पण प्रचंड शुकशुकाट आहे. तो शुकशुकाट माझ्या हयात नसलेल्या मुलाच्या दिशेने जातोय, याची मला फार भीती वाटते.’’ उत्तम नियोजन आणि हुशार असलेल्या मुलींचं काम आणि त्यांचा उत्साह पाहून मी एकदम भारावून गेलो.

आम्ही यवतमाळच्या स्टेशनकडे निघालो. जे मी सोलापूर, लातूर, नांदेडमध्ये पाहिलं होतं, ते मला यवतमाळमध्येही पाहायला मिळालं. त्या महाविद्यालयापासून ते रेल्वेच्या डब्यात बसेपर्यंत जिकडे नजर जाईल तिकडे खासगी क्लासेसच्या जाहिराती पाहायला मिळत होत्या. मला सोडायला आलेल्या अजय शिंदे सर यांना मी म्हणालो, ‘बापरे... किती या जाहिराती.’ शिंदे खूप वेळ बोलत होते. ते म्हणाले, ‘मी प्राध्यापक झालो, कधी कुठला क्लास लावला नाही.

मला जे काही बनवलं ते माझ्या महाविद्यालयाने आणि प्राध्यापकांनी. या जाहिराती माणुसकीशून्य असणाऱ्या, कारखाने बनवण्यासाठी आकर्षित करणाऱ्या आहेत. ही संस्कृती आपल्याला अधोगतीकडे नेणारी आहे.’ मी गाडीत बसलो. शिंदे सर यांनी माझ्या हाती कधीही क्लासेसची पायरी न चढणारे आणि देशातील सर्वांत मोठे शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र दिलं.

शिटी वाजली, गाडी सुटली आणि माझ्या डोक्यात अतिशय चिंता करणारी टकटकही सुरू झाली. आताची इयत्ता नववीपासूनची शिक्षण व्यवस्था, तिचा कल संस्कार आणि माणूस बनवण्यापासून कोसो दूर आहे. पालक याला सर्वांत अधिक जबाबदार आहेत. मी ज्या चार महाविद्यालयांमध्ये गेलो होतो, तिथं मुलांनी स्वत: काहीतरी निर्माण केलं, ज्यातून ते स्वतः आणि समाजासाठी काहीतरी करणार हे सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. हे वाढलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com