माणुसकीच्या नात्याने...

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही काही पत्रकार मित्र दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात जातो. तिथं असणारे प्रश्न समजून घेतो. त्यावर त्या भागाला काही मदत करता येते का, यावर काम करतो.
Dr Nitin Joshi
Dr Nitin JoshiSakal
Summary

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही काही पत्रकार मित्र दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात जातो. तिथं असणारे प्रश्न समजून घेतो. त्यावर त्या भागाला काही मदत करता येते का, यावर काम करतो.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही काही पत्रकार मित्र दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात जातो. तिथं असणारे प्रश्न समजून घेतो. त्यावर त्या भागाला काही मदत करता येते का, यावर काम करतो. यावेळी आम्ही महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात गेलो होतो. सीमावर्ती भागात ना कुणाला ओळख सांगायची, ना कुणाची ओळख काढायची. साधेपणाने राहायचं आणि सगळं शांतपणे समजून घ्यायचं, हे आमचं ठरलेलं होतं. आम्ही किनवटकडे जात असताना एक मोबाईल दवाखाना आम्हाला दिसला. ज्या गावात आम्हाला जाणं शक्य नव्हतं, त्या गावात व्हॅन आली होती. लोकांनी तपासणीसाठी रांगा लावल्या होत्या. आम्ही गाडी बाजूला लावली. गावात एक फेरफटका मारला. गावात चिंचेच्या झाडाखाली काही माणसं बसली होती. त्यांच्याशी मी बोलत होतो. ‘तुमच्या गावात आलेली ही गाडी नेहमी येते का? ही कुणाची आहे? तुमच्याकडून पैसे आकारते का?’ ते आजोबा म्हणाले, ‘काय सांगावं बाबा. काय करायचं त्या पैशाला? आमच्या गावापासून शहर गाठायला चार तास लागतात. रस्ता एवढा खराब आहे की, जाताना जीव ‘शाबूत’ राहील याचा अंदाज नाही. दवाखाना आता गावातच येतो, तिथं सगळं मिळतं, हे काय कमी आहे? हे डॉक्टर पैसेही नावालाच घेतात. आमचा आशीर्वाद लागेल यांना.’

ते आजोबा आणि त्यांच्या सोबतची सर्व मंडळी मला गावात आलेल्या आरोग्यसेवेबद्दल भरभरून बोलत होती. मी आणि माझे सर्व पत्रकार मित्र आता त्या व्हॅनमध्ये चालणाऱ्या दवाखान्याच्या जवळ आलो. त्या व्हॅनवर लिहिलं होतं, गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित, एंडोस्कोपी रुग्णालय.’ इथं काम करणारी आठ लोकांची टीम होती. सर्वजण आपापल्या कामात व्यग्र होते. कुणालाही आमच्याकडे बघायला वेळ नव्हता. मी घड्याळाकडे आणि सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. दोघांचा स्पीड सुसाट होती. मी त्या डॉक्टरकडे गेलो, त्यांना माझं नाव सांगत तुम्हाला बोलायचं आहे, अशी विनंती केली. माझं नाव ऐकताच जुनी ओळख असल्यासारखी डॉक्टरांच्या डोळ्यांत एकदम चमक दिसली. डोक्यावरची टोपी काढत डॉक्टर म्हणाले, ‘‘मी आपलं नाव नयन बाराहाते यांच्याकडून खूप वेळा ऐकलं होतं.’’ नयनदादाचं नाव काढताच मीही भावुक झालो. भानावर येत मी डॉक्टरांना म्हणालो, ‘‘या आदिवासी आणि अत्यंत मागास भागात आपण ही सेवा सुरू केली, आम्हा सर्वांना खूप आनंद झाला.’’ इथं सेवा सुरू करण्यामागे कारण काय? याबरोबरच मी डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारले.

मी ज्या डॉक्टरांशी बोलत होतो, त्यांचं नाव डॉ. नितीन जोशी (९८१९२६८१४०). डॉक्टर पचनसंस्था विकारतज्ज्ञ सुपर स्पेशालिस्ट आहेत. डॉ. जोशी यांच्या नावावर अनेक वैद्यकीय रेकॉर्ड आहेत. समाजसेवेच्या व्रताने झपाटलेली माणसंच असं काम करू शकतात, हे माझ्या लक्षात आलं होतं. डॉ. जोशी हे लातूर जिल्ह्यामधल्या तळेगाव भोगेश्वर इथले. परदेशात तसंच हैदराबाद, मुंबई याठिकाणी आरोग्यविषयक सेवा दिल्यावर डॉक्टर आता मराठवाड्यामध्ये स्थायिक झाले आहेत. ज्या गावांनी कधी दवाखान्याचं तोंडही पाहिलं नाही, अशा गावांमध्ये अत्याधुनिक उपकरणं घेऊन डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवेचा वसा घेऊन काम करत आहेत.

डॉ. जोशी मला सांगत होते, ‘डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे, ज्या सुविधा शहरांमध्ये आहेत, त्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या भागामध्ये गेल्या तेव्हाच समजायचं आम्ही सामाजिक परिपूर्णतेकडे पाऊल टाकत आहोत. माझे व्यवसाय बंधू असणारे अनेक डॉक्टर देवाला सोन्याचा मुकुट चढवतात. कुणी लंडनवारीला जातं. त्यांना त्यातून आनंद मिळतो. मला गावपातळीवर येऊन लोकांची सेवा करण्यात आनंद मिळतो. मी अनेकांना विनंती केली आहे, तुम्हाला ‘पुण्याचं’ काम करायचं असेल, तर आपण लोकांच्या आरोग्यावर काम करू या. या कामासाठी मला अनेकांची साथ मिळते. लोकांच्या मदतीने अजून चार लोकांना जास्तीची मदत करता येईल, त्यांचे आशीर्वाद घेता येतील.’

मी म्हणालो, ‘सर, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या प्रश्नाला घेऊन सर्वात जास्त काय जाणवतं?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘कॅन्सरचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये प्रचंड वाढलं आहे. दहा माणसं तपासली, तर त्यांमध्ये दोन माणसांना कॅन्सर आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. कुठल्याही सरकारकडे कॅन्सरला घेऊन कुठलाही डेटा नाही. सरकारकडे कॅन्सरवर काय उपाययोजना कराव्यात त्याचं नियोजन नाही. आपली रोजची जीवनपद्धती, आहारामुळे आपोआपच कॅन्सरचा मुक्काम अनेक बहुसंख्य शरीरांमध्ये बळावतोय.’

आम्ही बोलत असताना एक आजी डॉक्टरांच्या जवळ आल्या. त्या डॉक्टरांच्या गालावर हात फिरवत म्हणाल्या, ‘बाबा आता बरं झालं रे.’ डॉक्टर त्या आजीला म्हणाले, ‘मी दिलेली औषधं घेतली का वेळेवर?’ आजी म्हणाल्या ‘हो..!’ ‘आशीर्वाद रे माझ्या राजा,’ असं म्हणत आजी पुढे गेल्या. आम्ही पुन्हा बोलत होतो. कॅन्सर, ग्रामीण भागातील आरोग्य, सामाजिक आणि सरकारची मानसिकता हे सगळे विषय डॉक्टरांशी बोलत असताना असं वाटत होतं की, त्यांच्याशी या विषयावर सारखं बोलतच राहावं. डॉक्टर म्हणाले, ‘मी अनेक वेळा रुग्णांना तपासण्यासाठी माहूरला येतो; पण रेणुकामातेचं दर्शन घेत नाही. देवीचा आशीर्वाद मी एखादा रुग्ण वाचवला तर मला नक्की मिळेल, अशी माझी धारणा आहे. आता एक मोबाईल व्हॅन दवाखाना आहे, पुढे चार करायचे आहेत, तेव्हा कुठे अर्धं राज्य कव्हर होईल. दान करणाऱ्या व्यक्तीने इथं मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आता बसचा संप सुरू आहे. लोकांचे हाल सुरू आहेत. रुग्ण दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाहीत. मी अर्धा वेळ दवाखान्यात राहतो आणि अर्धा वेळ उपचार करत गावकुसात. मी ज्या तळेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, तिथं मला पाचवीला असताना कळालं की गरिबी, रोगराई गावातल्या गरीब माणसाच्या पाचवीलाच पुजली आहे. तेव्हापासून मी ठरवलं होतं, आपण रोगराईवर मात करायची, तरच गरिबीवर आपोआप मात करता येईल.’

डॉ. जोशी यांच्या डोळ्यांतून सेवाभावाचं स्फूलिंग बाहेर पडत होतं. डॉ. जोशी यांनी माणुसकीच्या नात्यातून सुरू केलेलं काम प्रेरणा देणारं होतं. डॉ. जोशी यांना कडाडून मिठी मारून मी पुढच्या प्रवासाला लागलो. मी गाडीत बसल्यावर एकदम शांत होतो. बाळंतपणात अडलेल्या बायका, पोटात एक-एक किलोचा गोळा घेऊन काम करणारी माणसं. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे अनेक धक्कादायक किस्से डॉ. जोशी यांनी मला सांगितले होते. माझे पत्रकार मित्र डॉ. जोशी यांच्या कामाविषयी भरभरून बोलत होते. एका डॉक्टरने ठरवलं तर तो काय करू शकतो, हे डॉ. जोशी यांच्या कामावरून दिसत होतं. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाआम्हा सर्वांना आता डॉ. जोशी बनण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातल्या गरिबांसाठी, गरजूंसाठी आम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल. बरोबर ना..?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com