जीवन तारणारा गांधीविचार...

राज्यात ‘यिन’ च्या निवडणुका होत आहेत. त्यानिमित्तानं राज्यभर फिरतोय. नाशिकचा दौरा झाल्यानंतर मी जळगावच्या दिशेनं निघालो. मी ठरवलं होतं, या वेळी आपण जळगावच्या जैन हिल्समध्ये राहायचं.
Santosh Bhintade
Santosh BhintadeSakal

राज्यात ‘यिन’ च्या निवडणुका होत आहेत. त्यानिमित्तानं राज्यभर फिरतोय. नाशिकचा दौरा झाल्यानंतर मी जळगावच्या दिशेनं निघालो. मी ठरवलं होतं, या वेळी आपण जळगावच्या जैन हिल्समध्ये राहायचं. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या छायेत राहता येईल. मी अनेक वर्षं सर्वोदय चळवळीचं काम केलं असल्यामुळे गांधी आणि सर्वोदय हे मनात रुजलं आहे. आम्ही जैन हिल्सला पोहोचलो. तो परिसर इतका देखणा होता, की माझ्या गाडीचा चालक गणेश डावखर गाडीतून उतरल्यापासून फोटो काढायला लागला होता. मी गांधींची सर्वांत जुनी आणि दुर्मीळ असणारी पुस्तकं चाळत होतो.

इतक्या सकाळी किशोर कुलकर्णी, उदय महाजन आणि माझे ‘सकाळ’मधले जुने सहकारी अनिल जोशी प्रार्थनेसाठी मला घ्यायला आले. प्रार्थना सुरू झाली. माझ्या अगदी बाजूला बसलेली एक व्यक्ती अगदी उत्साहानं प्रार्थना म्हणत होती. प्रार्थनेनंतर आम्ही सूतकताईला बसलो. आजूबाजूला अनेक जण होते. माझा सूतकताईचा वेग आणि आजूबाजूच्या सर्वांचा वेग सारखाच होता. माझ्या बाजूला जे गृहस्थ होते, ते उत्साहानं गाणं म्हणत होते. त्यांचा वेग मात्र कमालीचा जास्त होता.

मी त्यांना सहज म्हणालो, "बापरे, तुमचा वेग किती आहे." ते लगेच म्हणाले, "अहो, मी हे तुरुंगामध्ये शिकलो आहे." ते बोलता बोलता सहज बोलले. आजूबाजूचे सर्व जण त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडं तुरुंगांचं नाव काढल्यावर आश्चर्यानं बघत होते. मी सूत कातत होतो खरा; पण माझं सर्व लक्ष त्या व्यक्तीच्या हालचालींकडं होतं. ते का गेले असतील तुरुंगात, कुठलं कारण असेल... असे प्रश्न माझे मला पडले होते.

आमचं सूतकताईचं काम संपलं. जे गृहस्थ माझ्यासमोर बसले होते, त्यांना मी गाठलं. त्यांचा आणि तुरुंगाचा संबंध कसा काय? असे काही प्रश्न मी त्यांच्यासमोर ठेवले. त्यांच्या बोलण्यामधून अनेक विषय समोर आले.

मी ज्या गृहस्थांशी बोलत होतो, त्यांचं नाव संतोष महादेव भिंताडे (९४०५४४५१४४). मूळचे सातारा भागातील असलेले संतोष १९९० मध्ये पुण्यात बी.कॉम. करीत होते. नेहमी सामाजिक पिंड बाळगणारे संतोष सतत दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायचे. पुण्यात ते ज्या कोथरूड भागात राहायचे, तिथं एक मुलगा मुलींची छेड काढायचा. अनेक वेळा त्या छेड काढणाऱ्याला समजावून सांगूनही हे प्रकरण थांबलं नाही. छेड काढणाऱ्याला धडा शिकवताना संतोष यांच्या हातून त्याचा जीव गेला. "रागाच्या भरात होत्याचं नव्हतं झालं." संतोष मला सगळं सांगत होते. "पोलिसांनी मला पकडलं. पाच वर्षं केस चालली. या काळात नोकरी आणि लग्न या दोन्ही विषयांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. ती पाच वर्षं मी तणावाखाली काढली. १९९५ मध्ये १ सप्टेंबरला मला चौदा वर्षांची जन्मठेप झाली. मी तुरुंगामध्ये जाताना पूर्णपणे खचून गेलो होतो. माझे वडील रेल्वेमध्ये पोलिस अधिकारी होते. झालेला प्रकार त्यांनी स्वीकारला होता. ते मला तुरुंगामध्ये सतत भेटायला यायचे. मात्र आईचं तसं नव्हतं. माझ्या आईचं नाव यमुना, ती बाबांना म्हणायची, ‘संतोषने जे केलं, ते माझे संस्कार नाहीत.’ ती मला भेटायला तुरुंगात यायची नाही. तिचा स्वाभिमान मला स्वीकारत नव्हता.

माझ्या काळजीनं ती खंगून गेली होती. तिच्या आजारासाठी मी तुरुंगातून पॅरोलवर घरी यायचो. घरी आल्यावर दोनच विषय होते. एक आईचा आजार आणि दुसरा म्हणजे, अनेक जण सांगायचे, ''तुम्ही यांच्याकडं जा, तुम्ही त्यांच्याकडं जा, तुम्ही विनंती अर्ज करा म्हणजे तुमची शिक्षा माफ होईल.'' खूप अर्ज केले, खूप पत्रव्यवहार केला; पण काही फायदा झाला नाही. मी असंच एकदा तुरुंगामधून आईसाठी घरी आलो होतो. मी तुरुंगामध्ये राहून दोन पदव्या मिळविल्या होत्या. गांधी परीक्षेत मी राज्यात पहिला आलो. तुरुंगामध्ये मी केलेलं चांगलं काम पाहून अनेक रूपानं शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडायची. हे सगळं मी माझ्या आईला घरी आल्यावर सांगितलं. आई कधीच माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची नाही. त्यादिवशी आई खूप भावनिक होऊन माझा हात हातामध्ये घेऊन रडत होती."

संतोष म्हणाले, "माझा दोष नसताना मी तुरुंगामध्ये गेलो. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, त्या सर्वांचा बाहेर गेल्यावर बदला घ्यावा, असे विचार माझ्या मनात घर करू लागले; पण मी जेव्हा गांधीजींचं ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचलं, तेव्हा माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. महात्म्यांना जे चुकलं नाही, तिथं आपण कोण? ‘सर्वोदय’चे अध्यक्ष आणि प्रचारक श्रीराम जाधव यांची गांधी विषयाशी संबंधित भाषणं तुरुंगामध्ये अनेक वेळा ऐकली. ‘मारणारा विचार’ माझ्या मनात होता; पण गांधीविचारांच्या सहवासानं माझ्यात ‘तारणारा विचार’ खोलवर रुजला. १० वर्षं येरवडा आणि ४ वर्षं पैठणच्या जेलमध्ये राहिल्यावर माझी शिक्षा पूर्ण झाली. आता मी इथं जैन हिल्समध्ये आहे. मी ज्या गांधीविचारांमुळं परिपूर्ण माणूस झालो, त्या गांधीविचारांनी अनेक माणसं गांधीमय करायची, या विचारानं मी या आश्रमात आहे."

मला मीटिंगसाठी जायचं होतं. दिव्या भोसले आणि सुकन्या महाले या दोघींसह ‘यिन’ची कोर टीम मला घेऊन जाण्यासाठी जैन हिल्सला आली. मला निघणं गरजेचं होतं. संतोष यांचे हात हातांमध्ये घेत मी तिथून निघालो. मी जाताना संतोषही भावनिक होत होते. मागं घडलेल्या त्या घटनेत, संतोष यांनी गुन्हा केला, की त्यांना अडकवलं, हे मला माहिती नाही.

मला एवढंच माहिती होतं, संतोष हा माणूस आता माणुसकी वाढवण्यासाठी मोठं काम करीत आहे. ते आता मारणारे नाहीत, तर तारणारे आहेत. एखादी चूक झाली असेल, तर ठीक आहे. त्यानंतर स्वतःला सावरून आपण उत्तम काम करू शकतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक संतोष आहेत, ज्यांना नव्यानं जगण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे, बरोबर ना? प्रत्येक ठिकाणी गांधी किंवा गांधीविचार पोहोचू शकत नाहीत, हेही तेवढंच खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com