जेव्हा नियतीही नतमस्तक होते...!

मी पुणे विमानतळावर उतरलो. उतरून माझे कारचालक गणेश यांना फोन केला, तर फोन लागत नव्हता. विमानतळाच्या समोर रिक्षा आणि टॅक्सी मिळण्याची अडचण होतीच.
Savita Kumbhar
Savita Kumbharsakal
Summary

मी पुणे विमानतळावर उतरलो. उतरून माझे कारचालक गणेश यांना फोन केला, तर फोन लागत नव्हता. विमानतळाच्या समोर रिक्षा आणि टॅक्सी मिळण्याची अडचण होतीच.

मी पुणे विमानतळावर उतरलो. उतरून माझे कारचालक गणेश यांना फोन केला, तर फोन लागत नव्हता. विमानतळाच्या समोर रिक्षा आणि टॅक्सी मिळण्याची अडचण होतीच. शनिवार- रविवारच्या गर्दीत विमानतळही फुलून गेले होते. विमानतळाच्या बाहेर पडलो. रिक्षा, टॅक्सीला हात दाखवत होतो; पण कोणीही थांबवत नव्हतं. एक टॅक्सी मला नकार देत पुढे गेली, अन् पुन्हा मागे आली. काच खाली घेत आतून एक आवज आला, ‘दादा कुठे जायचंय?’ गाडी चालवणारी महिला होती. मी म्हणालो, ‘‘बाणेरला जायचंय.’’ त्या म्हणाल्या, ‘‘बसा.’’ मी गाडीत बसलो. त्या महिला लगेच मला म्हणाल्या, ‘‘बराच वेळपासून तुम्हाला गाडी मिळत नाही हे मी पाहत होते. मी तुम्हाला दुरून पाहत होते. तुमच्या हातात बॅग, तुम्ही घामाघूम झाला होतात. तुम्ही अडचणीत आहात म्हणून म्हटलं तुम्हाला टॅक्सीत घ्यावं, जिथे कुठे सोडायचं तिथे सोडावं.’’ माझी उडालेली त्रेधा त्या महिलेने ओळखली होती.

कणखर आवाज, प्रचंड प्रामाणिकपणा, कमालीचा साधेपणा त्या महिलेमध्ये दिसत होता. पुण्यातील ट्रॅफिक, पुण्याची माणसं असं आमचं बोलणं सुरू झालं. ती महिला बोलता बोलता सारखं म्हणत होती, ‘‘जे काही करायचं ते एकट्याने करायचं असतं, सोबत कोणी येत नाही.’’ बोलता बोलता मी तिला म्हणालो, ‘‘तुमचं कुणीच नाही का?’’ ती महिला काहीच बोलली नाही, एकदम शांत झाली. मला वाटलं, आपण त्या महिलेला असा प्रश्न विचारायला नको होता. ती थोड्या वेळाने मला म्हणाली, ‘‘हो दादा, मी एकटीच आहे. माझं अख्खं आयुष्य तसं गेलं; पण त्यात काय! जे होतं ते चांगल्यासाठीच. कदाचित या परिस्थितीनेच मला सारं काही शिकवलंय.’’

ती महिला नितळ पाण्यासारखी होती, म्हणूनच तिच्या बोलण्याला, वागण्याला प्रामाणिकपणाची किनार होती. पोटात कावळे ओरडत होते, तरीही त्या महिलेचं बोलणं ऐकून कान तृप्त होण्याच्या मार्गावर होते. त्या ताईचा सगळा प्रवास जेव्हा मी ऐकला, तेव्हा वाटलं, एखाद्याच्या आयुष्याला नियती किती जखमा देते !

मी ज्या ताईंशी बोलत होतो, त्यांचं नाव सविता कुंभार (९९७०९७०५५२). सविता यांचं मूळ गाव, म्हणजे माहेर करमाळा. १९९२ मध्ये सविता यांचा विवाह पुण्यातल्या संजय कुंभार यांच्याशी झाला. सविताने लग्नानंतर संसाराला हातभार लावत काम सुरू केलं. सविता यांना मुलगा झाला, त्याचं नाव प्रथमेश. चार महिन्यांनंतर प्रथमेशला ताप आल्याचं निमित्त झालं आणि उपचार करण्याआधीच तो गेला. तिथून सविताच्या आयुष्यात दुःखाचा पाढा सुरू झाला. त्यानंतर सविताला मुलगी झाली, तिचं नाव प्राजक्ता ठेवलं.

सविताचे यजमान उच्चशिक्षित होते, ते चांगल्या नोकरीच्या शोधात रिक्षा चालवायचे. सविताची आई कमल आणि बाबा श्रीरंग क्षीरसागर हे दोघेही सविताच्या संसाराला हातभार लावायचे. आज ना उद्या आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडेल याची सविता वाट पाहत होत्या; पण सविताचे यजमान संजय यांचा अपघात झाला आणि त्यात ते गेले. सविताच्या आयुष्यावर काळाने खूप मोठा घाला घातला होता. संजयच्या अंत्यसंस्कारानंतर सविता त्यांच्या माहेरी करमाळा येथे गेल्या. तिथे त्या वर्षभर राहिल्या.

आई-बाबांच्या जिवावर बसून खायचं नाही, काही तरी काम करायचं या उद्देशाने सविता परत पुण्यात आल्या. त्यांनी नानातऱ्हेची कामं केली; पण त्या कामांतून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक गरज भागत नव्हती. शेवटी सविता यांनी त्यांचे यजमान संजय यांची धूळखात पडलेली रिक्षा काढली, ती चालवायला त्या शिकल्या आणि काही दिवसांतच त्यांनी नियमितपणे प्रवासी वाहतूकही सुरू केली.

माझे वडील फार धाडसी होते, ते एसटीचे ड्रायव्हर होते. त्यांना आपल्या कुठल्याही मुलाने ड्रायव्हर होऊ नये असं वाटायचं. त्यांनी माझ्या भावालाही त्यापासून दूर ठेवलं होतं. पण ज्या वडिलांचा मला आधार होता, जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहायचे, ते वडीलही देवाघरी गेले, त्यापाठोपाठ आईही गेली. त्या दोघांनंतर ज्या भावाचा आधार होता, तो विजय नावाचा भाऊही गेला. अभिमन्यू जसा चारही बाजूंनी चक्रव्यूहात अडकला होता, तशीच मीदेखील अडकले होते...’ आपले अश्रू पुसत सविता म्हणाल्या. ‘‘मी तेव्हाच ठरवलं होतं, कधी रडायचं नाही. पदर कमरेला खोवला आणि मी मुलीचा चेहरा बघून कामाला लागले.

‘‘पुढे महिला बचत गटाच्या माध्यमातून चारचाकी व्हॅन चालवण्याचं प्रशिक्षण मी घेतलं. नवीन व्हॅन घेतली. आम्ही पुन्हा गप्पा मारत घराच्या दिशेने निघालो. रस्त्यात पोलिसांची तपासणी सुरू होती. सविताला पाहताच केस पांढरे झालेला तो पोलिस म्हणाला, ‘‘काय सविताताई आज इकडं कुठं ? माझी भाची प्राजक्ता कशी आहे?’’ सविता अगदी हसून म्हणाल्या, ‘‘दादा ती आता आनंदी आहे, तिच्या सासरी.’’ ‘येते दादा’ असं म्हणत सविता यांनी गाडी पुढे काढली. सविता मला सोडताना म्हणाल्या, ‘‘दादा मी सिंहगडला राहते. माझ्या घरी स्वामी समर्थ आहेत, तुम्ही नक्की या दर्शन घ्यायला.’’ मी सविता यांना म्हणालो, ‘‘उद्या मी त्या भागात येतोय, तेव्हा पाहतो.’’ आम्ही एकमेकांचा संपर्क नंबर घेत निरोप घेतला. सकाळी आठच्या ठोक्याला सविताताईंचा फोन आला. म्हणाल्या, ‘‘दादा या नाश्त्याला.’’ मी म्हणालो, ‘‘हो येतो.’’ मी आवरलं. सविता यांच्या घरी पोहोचलो. सविता यांनी माझं स्वागत केलं व मला त्यांचे जुने फोटो दाखवले.

आम्ही बोलत असताना काही महिला सविता यांच्याकडे आल्या. त्या महिलांच्या काही अडचणी होत्या. त्याबाबत त्या सविता यांचा सल्ला घेण्यासाठी आल्या होत्या. त्या प्रत्येकीला सविता यांनी आलेल्या संकटातून बाहेर कसं पडायचं हे सांगितलं. पुन्हा सविता यांच्याकडे कुंभार समाज महिला आघाडीच्या महिला आल्या. त्यांनी त्याही महिलांशी वार्तालाप करून त्यांना पाठवून दिलं. दुसऱ्यांचं करता करता आयुष्य गेलं, घरावर साधं छप्परही नाही, सोबतही कुणाची नाही, तरीही ही बाई एवढी आनंदी आणि मोठ्या मनाची कशी, असा प्रश्न मला पडला होता. आदिमाया शक्ती काय असते, हे माहिती नव्हतं.

कदाचित सवितांच्या रूपात ती असेल. मी सविता यांच्या पायावर नतमस्तक झालो आणि त्यांचा निरोप घेतला. सवितांच्या जीवनात नियतीने अनेक परीक्षा घेतल्या, तरी नियतीला सतत हार मानायला लावणारी सविता त्या संकटांचा सामना करायला लागणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी एक केस स्टडी होत्या. हरायचं नाही, झुकायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही... कमरेला पदर खोवत सतत विजयाचं पाऊल पुढे टाकायचं, अशी थक्क करणारी वाटचाल सविता यांची होती. आपल्या अवतीभोवती अशा अनेक सविता आहेत, ज्यांना तुमच्या-आमच्या मदतीची गरज आहे. ती उभी राहिली आणि यशस्वी झाली तर हा समाज सरळ रुळावर असेल! बरोबर ना...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com