
नि:स्वार्थी सेवेची तपस्या...
आमच्या बुधवार पेठ कार्यालयाच्या दिशेने निघालो होतो. त्यावेळी गाईची वाजत-गाजत आरती होतानाचं दृश्य मला बाजूला दिसलं. आता ना कुठला सण ना वार उत्सव, मग गाईची पूजा का केली जाते, असा प्रश्न मला पडला. क्षणभर मला असं वाटलं की, रस्त्यावर गाईच्या नावाने अनेक जण पैसे, धान्य मागतात, त्यापैकी काहीसा हा प्रकार असेल; पण ते तसं नव्हतं. मी जरा जवळ जाऊन बघितलं, तर अनेक कुटुंबांतील माणसं एकत्र येऊन त्या गाईची पूजा करत होती. मी बाजूला असणाऱ्या एका माणसाला विचारलं, ‘कुठल्या देवाला वगैरे ही गाय दान दिली जात आहे का?’
ती व्यक्ती म्हणाली, ‘असं काही नाही.’ मी त्याला खूप खोलात जाऊन विचारल्यावर त्याने मला सांगितलं, ‘ज्या ताई त्या गाईला कुंकू लावत आहेत, त्यांनी पुढे हात जोडून उभ्या असणाऱ्या कुटुंबाला ही गाय भेट दिली.’ मला काही कळेना. मला वाटलं भेट दिली म्हणजे, माहेरच्याकडून सासरला मुलीकडे गाय देण्याची प्रथा लग्न झाल्यावर आजही आहे, तसं काहीतरी असेल. या शंकेने खोलात शिरल्यावर लक्षात आलं, की असं काही नव्हतं. त्या माझ्याशी बोलणाऱ्या माणसाने मला ती गोपूजा आणि ती माणसं यांच्याविषयी तपशीलवार सांगितलं. मलाही ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. पिंपरी-चिंचवडमध्ये असणाऱ्या शीतल तेजवानी-सूर्यवंशी (९०११००००००) या मोठ्या दत्तभक्त आहेत.
उद्योजक असणाऱ्या शीतल यांनी राज्यातल्या अनेक भागांत जाऊन लोकांना गाई दिल्या. उदरनिर्वाहासाठी, भक्तिभावाने गाय भेट देण्यामध्ये शीतल यांना प्रचंड रस आहे. गाय, कुत्रे हे श्री दत्तगुरूंचे सेवेकरी आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयीची विशेष काळजी घेतली पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे, या धारणेतून शीतल यांनी सुरू केलेलं काम आज वेगळ्या वळणावर येऊन थांबलं.
शीतल यांच्यासोबत असणारी ती व्यक्ती मला सारं काही सांगत होती. शीतल यांच्या घरी दत्त संप्रदायाचं वातावरण. इंजिनिअर असणाऱ्या शीतल नेहमी सामाजिक कार्यात रुची ठेवतात. त्या गाईची आरती, पूजा संपली. त्या व्यक्तीने माझी शीतल यांच्याशी ओळख करून दिली. मी शीतल यांना नमस्कार केला. मला बोलायचं आहे, अशी मी शीतल यांना विनंती केली. त्या म्हणाल्या, ‘मी आपल्याशी बोलते, पण एका कामाला मला जायचंय, कारण पण जाता -जाता बोलुया, कुणीतरी माझी वाट पाहत आहे.’ मी लगेच होकार दिला.
ज्या कुटुंबाला त्यांनी ही गाय दिली होती, ते गरीब कुटुंब आनंदाने अश्रू ढाळत होतं. माझ्याशी जी व्यक्ती बोलत होती, त्या व्यक्तीची शीतल यांनी मला ओळख करून दिली. शीतल म्हणाल्या, ‘हे सदाशिवराव जाधव. पुणे, पिंपरी-चिंचवड या भागामध्ये जे गरजू लोक आहेत, त्यांच्यापर्यंत मला नेण्याचं काम हे करतात.’ मी म्हणालो, ‘तुमच्याविषयी सदाशिवभाऊंनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत; पण मला तुमच्याशी बोलायचं होतं.’ शीतल अगदी नम्रपणे मला म्हणाल्या, ‘बोला, बोला दादा.’ ‘तुम्ही कोणाला तरी गाय भेट देता. आतापर्यंत असंख्य गाई भेटी दिलेल्या आहेत. त्यामागचं कारण नेमकं काय आहे?’ शीतल शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, ‘चांगलं काम करायला कारण लागतं का दादा? माझी आई रेणू मला नेहमी म्हणते, ‘बाळा एक गाय जगली, वाढली, आनंदी राहिली, तर तो आशीर्वाद थेट श्रीदत्तगुरूंपर्यंत जाऊन पोहोचतो.’
बराच वेळ पुढे गेल्यावर एका मोकळ्या जागेत आमची गाडी थांबली. गाडी थांबल्या थांबल्या अनेक कुत्री आमच्याजवळ आली. ड्रायव्हर लगबगीनं खाली उतरले. त्यांनी गाडीत मागच्या बाजूला असलेल्या बॅगा खाली काढल्या, त्या उघडल्या. त्यातील खूप सारी बिस्किटं काढली, ती शीतलजवळ दिली. ती बिस्किटं शीतल यांनी त्या कुत्र्यांच्या समोर टाकली. कुत्री बिचारी ती बिस्किटं घेऊन बाजूला जाऊन शांतपणे खात होती. बऱ्याच वेळाने शीतल आणि कुत्र्यांसमोरची सगळी बिस्किटं संपली होती. मनसोक्तपणे बिस्किटं खाऊन शांत झालेली कुत्री शीतल यांच्याकडे शेपटी हलवत लाडाने अंगावर येत होती. शीतल त्या प्रत्येक कुत्र्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होत्या.
श्री दत्तप्रभू, श्री दत्तप्रभू असं त्यांच्या तोंडातून अधूनमधून निघत होतं. मलाही आश्चर्य वाटत होतं, इतकी सगळी कुत्री एकाच ठिकाणी एकत्रित येतात कशी? याचाच अर्थ शीतल तिथं नेहमी येत असाव्यात हाच होता. कुत्र्यांना बिस्किटं टाकताना, त्यांच्याशी हितगूज करताना शीतल माझ्याशी बोलत होत्या. ‘मुकी जनावरं माणसांपेक्षा प्रेमळ असतात, फक्त त्यांच्यावर आपण प्रेम करत नाही. मी दत्ताची भक्त आहे. म्हणून त्यांच्यावर प्रेम आहेच आहे; पण एक माणूस म्हणून आपण जर प्राण्यांवर प्रेम केलं, तर प्राणी माणसापेक्षा जास्त प्रेम आपल्यावर करतात.’
शीतल बोलता बोलता मला म्हणाल्या, ‘आज तुमच्या रूपाने कोणी तरी माहेरचं माणूस मला भेटलं असं वाटतं दादा.’ मीही हसून त्यांना प्रतिसाद दिला. माझं बोलणं अजून संपलेलं नव्हतं, मला त्यांच्याकडून त्यांच्या कामाविषयी सगळे बारकावे जाणून घ्यायचे होते. मी पुन्हा त्यांच्या गाडीत बसलो. आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आमचं बोलणं सुरू होतं, या प्रवासादरम्यान शीतल यांचा ग्रुप करत असलेले अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी मला सांगितले. दृष्टिहीनांच्या शाळेला उभं करण्यासाठी मदत करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. शीतल म्हणाल्या, ‘मुक्या जनावरांना जसं नेमकं काय हवं आहे, काय पाहिजे हे कळत नाही, ते त्यांच्या डोळ्यांमधून व त्यांच्या शारीरिक हालचालींवरून समजून घ्यावं लागतं, तसंच अंध-अपंग असणाऱ्या मुलांचं आहे.’ शीतल त्यांना आलेले अनेक अनुभव मला सांगत होत्या. मी शीतल यांच्या घरी गेलो, त्यांनी त्यांचे यजमान सागर यांची मला ओळख करून दिली. चहापान झाल्यावर शीतल यांचे जुने अल्बम मी चाळत होतो.
कधीही समाजासमोर आलं नसेल, इतकं मोठं काम शीतल पूर्णवेळ करत होत्या. ना एनजीओ आहे, ना कुण्या वर्तमानपत्रात बातमी द्यायची आहे, ना कुणाला दाखवायचं आहे की, मी किती मोठं काम करते! बस आपल्याला आवडतं लोकांचे, मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद घ्यायला, या भावनेतून त्यांचं काम सुरू आहे. मी शीतल यांच्या घरून निघालो. माझ्या मनात असंख्य प्रश्न होते. देवावरची श्रद्धा हा विषय ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे; पण त्या सेवेतून एक सेवाभावी वारसा जपता येतो हे खरं होतं. शीतलसारखी समाजाचं दुःख न पाहू शकणारी माणसं आपल्या भक्तीच्या माध्यमातून असंख्य घरांना उभं करू शकतात, त्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसू शकतात. शीतलसारखी एखादी महिला पुढे आली, तर त्याचं काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण होतं. जे गरजू आहेत त्यांनी शीतल यांच्या मदतीने पुढे आलं पाहिजे आणि जे शीतल बनू पाहत आहेत, त्यांनी शीतलच्या रस्त्याने प्रवास केला पाहिजे. बरोबर ना...!
Web Title: Sandip Kale Writes Shital Tejwani Suryavanshi Cow Service
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..