का वागतात मुलं अशी..?

जिवंतपणे आई-बाबांना यातना देणाऱ्या त्या मुलांना तरी सुखाने मरण येईल का, याचे उतर काळच देईल.
sandip kale writes two son throw his mother father out of house family
sandip kale writes two son throw his mother father out of house familysakal
Summary

जिवंतपणे आई-बाबांना यातना देणाऱ्या त्या मुलांना तरी सुखाने मरण येईल का, याचे उतर काळच देईल.

दिल्लीमध्ये आमचं ‘यिन’चं अधिवेशन होतं. दिल्लीच्या मुक्कामात रात्री पान खायला निघालो. एक ८० पार केलेला, जर्जर झालेला म्हातारा तेवढ्या रात्री सायकलवरून त्या पानपट्टीसमोर आला. सायकलच्या समोर आणि मागच्या बाजूला दोन सामानाने भरलेल्या बॅगा त्याने सायकलवरून खाली उतरवल्या.

त्या दोन्ही बॅगा ठेवून तो त्या पानपट्टीवाल्याशी बोलायला येत होता. तेव्हाच धाडदिशी त्याने उभी केलेली सायकल त्याच्याच अंगावर पडली. आजूबाजूच्या माणसांकडे तो मदतीच्या अपेक्षेने बघत होता. तो सायकलीखाली दबून गेला होता. मी जोरात पळालो. ती सायकल उचलली. तो माणूस उठला. त्या पानपट्टीवाल्याकडे गेला. पानपट्टीवाल्याला म्हणाला, दादा, आज नवीन काहीतरी सामान आणलंय. आपण एकदा पाहाल का?

तो पानपट्टीवाला म्हणाला, आता ग्राहकांचा टाईम आहे, तू तर थांबू नकोस. तुझा माल नाही पाहिजे. तो बिचारा खाली मान घालून निराश होऊन आपल्या सायकलीकडे निघाला. तो आल्या पावलाने सायकल ढकलत ढकलत निघून गेला.

मी त्या पानपट्टीवर गेलो. पानपट्टीवाल्यांपासून साधं पान घेतलं. आता पानपट्टीवर गर्दी नव्हती. मी त्या पानपट्टीवाल्याला विचारलं, ते आजोबा कोण होते. तो म्हणाला, काय सांगायचं साहेब, रोज असे कितीतरी मार्केटिंगवाले येतात. त्यांना वाटते, त्यांच्या जवळचा माल आम्ही विकत घ्यावा.

पानपट्टीमध्ये काम करणारे सगळे जण बाहेर आले आणि पानपट्टी बंद करू लागले. घड्याळाच्या काटा रात्रीच्या अकराची रेषा ओलांडत होता. थोडंसं हलकं व्हावं, या उद्देशाने मी बाजूला असलेल्या एका गार्डनमध्ये फिरण्याच्या उद्देशाने पावलं टाकत पुढे गेलो.

गार्डनमध्ये शिरल्यावर ती सायकल त्या दोन्ही बॅग आणि ते म्हातारे काका मला ओळखीचे वाटत होते. माझी ओळख पटली. थोड्या वेळापूर्वी त्या पानपट्टीवर जे काका सायकल घेऊन दोनवेळा पडले होते. तेच काका तिथं डोक्याला हात लावून बसले होते.

थोडंसं चालल्यावर मी एका झाडाच्या गोल ओट्यावर जाऊन बसलो. माझ्या आणि काकांच्या मध्ये शोभेच्या झाडाची भिंत होती. पलीकडल्या बाजूला ते काका फोनवरून कुणाला तरी बोलत होते. त्यांचा बोलण्याचा आवाज माझ्या कानावर अगदी स्पष्टपणे पडत होता.

काका समोरच्या माणसाला फोनवरून बोलत होते, दादा शंभर रुपये असतील तर द्या, घरी खायला काहीच नाही. बायको आज उपाशी झोपेल. तिकडनं माणसांनी त्याला काय उत्तर दिलं माहिती नाही, काकांनी फोन ठेवला होता. काकांनी परत दुसऱ्या एका व्यक्तीला फोन लावला. त्यांनी अजून एक फोन केला.

समोरच्या माणसाला म्हणतात की, मला आजच्या जेवणापुरते पैशाची आवश्यकता होती. तुम्ही मदत कराल का? काकांनी चेहऱ्यावर नाराजी दाखवत फोन ठेवला. मी आता निघण्याच्या तयारीमध्येच होतो.

झाडांच्या पलीकडल्या साईडला जाऊन मी काकांकडे एकदा डोकावून बघितलं, तर काका आपल्या गळ्यामध्ये असलेल्या रुमालाने स्वतःचे भरून आलेले डोळे पुसत होते. मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो, तुम्ही रडताय का? काय झालं? काही अडचण आहे का? मी आपल्याला काही मदत करू का?

काकांनी हात जोडले, आणि म्हणाले नाही हो, असं काही नाहीये. तुम्ही म्हणालात तेच खूप झालं; पण मी आत्ता फोनवरून ऐकत होतो, तुम्ही काही माणसांकडे पैसे मागत होतात. त्यांनी माझ्याकडे वर बघून आश्चर्य व्यक्त केलं. ते काहीच बोलले नाहीत. अगदी शांत होते. मी खिशामध्ये हात घातला.

काही पैसे त्यांच्या हातावर ठेवले, ते म्हणाले, इतके पैसे कशासाठी? मला आणि माझ्या बायकोला आजचं खाण्यापुरते शंभर रुपये दिले तरी खूप होतील. उद्या सकाळी तिच्या कामाचे पैसे मिळतील आणि घरात काहीतरी येईलच. मी ते पैसे त्यांच्याकडे ठेवायला त्यांना भागच पाडलं. मी म्हणालो, काका तुम्हाला मुले नाहीत का?

काका म्हणाले, तसं समजा. मी पुन्हा काकांना म्हणालो, समजा म्हणजे काय?

काका म्हणाले, काय सांगावं, बाबा मोठी लांबलचक कहाणी आहे. आता मला फक्त घरी उपाशापोटी माझी वाट बघत बसलेली बायको दिसते. काका पुढे आणि मी त्यांच्या मागे बोलत बोलत पुढे चाललो.

त्यांनी माझी चौकशी केली आणि मी त्यांची चौकशी केली. आमचं बोलणं सुरू झालं. त्या गल्लीमधल्या छोट्या हॉटेलवर आम्ही गेलो; पण उशीर झाल्यामुळे बंद झाली होती. आता तिथे आसपास काही मिळणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मला एक पटकन आयडिया सुचली. मी काकांना म्हणालो, काका तिथे बाजूला आज एक लग्न आहे.

त्या लग्नाचा स्वयंपाक बाहेर होतोय. आपण त्यांना जाऊन थोडंसं जेवणासाठी विनंती करू या... ते आपल्याला देतील. काकांनी पुन्हा माझ्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघितलं. काका म्हणाले, अहो, असं कोणाच्या लग्नात जाऊन मागत असतात का?

मी म्हणालो, लग्नात जाऊन कुणाला बोलायचं नाही. बाहेर स्वयंपाक चालू आहे त्या स्वयंपाक बनवणाऱ्यांना आपण विनंती करू शकतो. आपण त्यांना पैसे देऊया. काकाला माझा सल्ला पटला. मी ज्या बंगल्यामध्ये राहत होतो, त्याच्या बाजूलाच अगदी खासदारांचा क्लब आहे. त्या क्लबमध्ये एक लग्न होतं. त्या लग्नाचा बाहेर रस्त्यावर स्वयंपाक सुरू होता. आम्ही गेलो.

काका म्हणाले, माझी बोलण्याची काही हिंमत होईना. रस्त्यावर भट्टी पेटवून तंदुरी भाजण्याचं काम सुरू होतं. तंदुरी भाजणाऱ्या आचाऱ्यासमोर पैसे करत मी म्हणालो, दादा दोन तंदुरी रोटी आणि थोडीशी भाजी मिळेल का, आम्हाला खूप भूक लागली. आजूबाजूला हॉटेलपण बंद आहेत. आम्ही खरं बोलतोय हे आचाऱ्याच्या एका मिनिटात लक्षात आलं.

तो म्हणाला, अहो पैसे कशाला देताय. मी देतो तुम्हाला. एका कागदाच्या तुकड्यावर आचाऱ्याने चार पोळ्या, त्यावर भाजी टाकली आणि आमच्या हातामध्ये आणून दिली. आम्ही ते घेतले आणि आम्ही पुढे निघालो. आता त्या काकाचं आणि माझं जरा घट्ट नातं झालं होतं. ते कोण आहेत, ते कुठून आले, त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे, सगळं त्यांनी मला सांगितलं.

काकांवर नात्यापाई आलेली वेळ धक्कादायक होती. काकांचा स्वाभिमानही विचार करायला लावणारा होता. काकांना दोन मुलं आहेत. एक मुलगा अमेरिकेमध्ये. तो आणि त्याची बायको इंजिनिअर आहेत. दुसरा मुलगा दिल्लीच्या नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे.

त्या मुलाची पत्नी खासगी शिकवणी घेते. काका मूळचे बिहारमधील पावापुरी या गावचे. गावाकडे शेतीवाडी. चांगला हसता-खेळता परिवार. मोठी जमीन, असे होते. मुलं बारावीपर्यंत शिकली. मुलांसाठी पुढच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये, काकांनी गावाकडची पूर्ण शेती विकली.

मुलांचाही ती जमीन विका, असा आग्रह होता. मुलांना खूप शिकवलं, त्यांची लग्न केली. ते आपापल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे उभे राहिले. दोन्ही मुलांची लग्ने झाली. दोन्ही मुलांच्या दोन्ही बायकांनी त्यांच्या नवऱ्याला ठामपणे सांगून टाकलं, की तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी नाते तुम्हाला तोडावे लागेल; नाहीतर आम्हाला सोडावे लागेल.

आज पंधरा वर्काषापासून काका काकू आणि मुलांचा अजिबात संपर्क नाही. काका दिवसभर मार्केटिंगचे काम करतात. लोकांचे कपडे धुवून त्याची इस्त्री करून देतात. ते जे काम करतात त्याचा थांग पत्ता त्यांनी ना कधी नातेवाईकांना लागू दिला, ना घरच्या गावाकडच्या मंडळीला.

आम्ही काकांच्या घरी गेलो. खाटेवर पडलेली काकू (पत्नी) त्यांची देवासारखी वाट पाहत होती. काकांनी काकूच्या हातात तो डब्बा ठेवला. काकूंनी तो डबा बाजूला ठेवला. त्या काकू म्हणाल्या, अहो, एवढा वेळ का लावलात? मी किती वाट बघत होते तुमची. त्या दोघांचं बोलणं सुरू झालं. काकू मला म्हणाल्या, तुम्ही इस्त्रीसाठी काही कपडे टाकले का?

काका लगेच म्हणाले, नाही ते माझ्यासोबत आलेले आहेत. ते मुंबईचे पाहुणे आहेत. आपल्या बाजूलाच त्यांच्या नातेवाईकाकडे ते राहतात. आमची भेट झाली आणि त्या भेटीमधून मैत्री झाली. खास तुला भेटायला ते घरी आलेत. माझे आणि दोघांचे दोन तास बोलणे झाले. शेवटी नवरा आणि बायकोच या जगातले साथ देणारे शेवटचे नाते असते, हे त्यांच्या आस्थेवरून दिसत होते.

काका आणि काकू यांची संध्याकाळची जेवणाची व्यवस्था नाही; पण त्या दोघांत प्रचंड स्वाभिमान होता. हे मला बोलताना जाणवत होतं. मुलं आनंदी आहेत. आमचं काय, आम्ही एक एक दिवस पुढे ढकलत जातो. एवढे होऊनही त्या दोघांनी कधी मुलांच्या विरोधामध्ये ‘ब्र’ही काढला नाही. ज्या घरात आज काय खावं, हेच माहीत नाही, त्या घरातल्या दारिद्र्याची व्याख्या करावी तरी काय?

माझ्याकडून मोठ्या मुश्किलीने पाचशे रुपये घेणाऱ्या त्या काकांना मी अजून काही मदत करू का? असं विचारून त्यांना मला पुन्हा लाजवायचं नव्हतं. त्या घरामध्ये छोटंसं देवघर होते; पण त्या देवघरापेक्षाही त्या दोन मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा फोटो लावला होता. त्या फोटोला पदराने पुसत ती महिला म्हणाली, आपलीच मुलं आहेत, आज चुकली म्हणून काय झालं. उद्या कळेल त्यांनाही, हे आई-बाबाही आपलेच आहेत.

ते सारे ऐकून आणि पाहून माझं डोकं सुन्न झालं होतं. पत्नी उपाशी झोपणार या काळजीने काका त्या बागेमध्ये रडत होते. माझ्या मुलांचा चेहरा अनेक वर्षांपासून मी पाहिला नाही. याची काळजी करत त्या काकू घरात रडत होत्या. शिक्षण घेतल्यावर माणसं शहाणी होतात, असं म्हणतात, ते खरं आहे की खोटं, या प्रश्नाचे उतर मला काही मिळत नव्हतं.

जिवंतपणे आई-बाबांना यातना देणाऱ्या त्या मुलांना तरी सुखाने मरण येईल का, याचे उतर काळच देईल. आपल्या अवतीभवती असणारे असे अनेक आई-बाबा त्यांच्या मुलांना शहाणपण शिकवू शकत नाहीत, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अशा अनेक निराधार आई-बाबांना मुलं म्हणून तुम्ही-आम्ही आधार देऊ शकतो, हे खरं आहे, बरोबर ना..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com