जगी या सर्व जीवांचा मेळा..

जैवविविधता म्हणजे सजीवाच्या विविध जाती-प्रजातींमधील वैविध्य. सर्व सजीव नेहमीच आपापसांसह काही अजैविक घटकांशी ताळमेळ राखून राहतात. ज्याला आपण परिसंस्था म्हणतो.
Biodiversity
Biodiversity sakal
Summary

जैवविविधता म्हणजे सजीवाच्या विविध जाती-प्रजातींमधील वैविध्य. सर्व सजीव नेहमीच आपापसांसह काही अजैविक घटकांशी ताळमेळ राखून राहतात. ज्याला आपण परिसंस्था म्हणतो.

- प्रा. संदीप पेटारे

पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरच थक्क करणारी आहे, याबाबत योग्य माहितीचा प्रचार-प्रसार झाल्यास तिच्या संवर्धनासही हातभार लागेल, या विचाराने जैवविविधता दिन २२ मे रोजी साजरा केला जातो. सृष्टीतील प्रत्येक जीव हा इतर जीवांवर अवलंबून आहे. इतर जीवांना धोक्यात आणून मानवी जीवन फार काळ सुखी होऊ शकणार नाही, याचे भान ठेवून सर्व सजीवांना जगवणे गरजेचे आहे. त्यासाठी मानवाने सर्वांसोबत सौख्य ठेवले पाहिले.

जैवविविधता म्हणजे सजीवाच्या विविध जाती-प्रजातींमधील वैविध्य. सर्व सजीव नेहमीच आपापसांसह काही अजैविक घटकांशी ताळमेळ राखून राहतात. ज्याला आपण परिसंस्था म्हणतो. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक, तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन:पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस-टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते.

पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडं लावली जायची. त्यावर पक्षी, फुलपाखरं बागडायची; पण सद्यस्थितीत सगळीकडे वाढलेल्या कॉंक्रिटीकरणामुळे परिसरच नाही. आहे तेवढ्यात शोभिवंत झाडे लावली जातात. असेच होत राहिले तर फुलपाखरांनी बागडायचे कुठे, मध कोठे शोधायचा?

एकूणच निसर्गनिर्मिती ही एक अद्भुत प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून सृष्टीतील अनेक रूपे आकाराला आली आहेत. वनस्पतींपासून इतर जीवांची प्रजाती या निसर्गाचा अनाकलनीय चमत्कार आहे; परंतु पर्यावरणातील अति मानवी हस्तक्षेपामुळे सुंदर धरेवरील कीटक, वनस्पती, पक्षी, प्राणी समुद्री जीव लुप्त झाले आहेत. काही लुप्त होण्याच्या अगदी काठावर आहेत. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार २४ तासाला जवळपास २०० प्रजाती नष्ट होत आहेत. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप हे याचे मूळ आहे, यात काही शंका नाही. याचाच प्रभाव या जीवसृष्टीच्या पतनाला कारणीभूत ठरतोय. मानवाचा अतिहव्यास हे निसर्गचक्र खिळखिळे करू पाहतोय. ‘जीव जीवस्य जीवनम’ या संस्कृत वचनानुसार सृष्टीतील प्रत्येक जीव हा इतर जीवांवर अवलंबून आहे. तेव्हा इतर जीवांना धोक्यात आणून मानव प्राणी इथे फार काळ सुखी राहू शकणार नाही. जैवविविधतेविना मानवी जीवन अशक्य आहे. जगातील विकसनशील देशातील जैवविविधतेच्या नष्ट होण्याची कारणे बघितल्यास अज्ञान, वाढलेली लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांचा अविचारी वापर, विज्ञानाचा अस्वीकार या बाबी समोर येतील. या जगात एकूण किती जीव असावेत, हे अजून पूर्णपणे उलगडले नसले तरी एका वैज्ञानिक शोधपत्रिकेच्या आधारे २०१६ साली पृथीवरील जीवांची संख्या ३० लाख ते १० दशलक्ष असावी, असा अंदाज आहे.

आजपर्यंत जगभरात एकूण १४ लाख ३५ हजार ६६२ प्रजातींची ओळख पटलेली आहे आणि कितीतरी प्रजाती अजून ओळखल्याच गेल्या नाहीत. ओळखल्या गेलेल्या प्रजातींपैकी सात लाख ५१ हजार प्रजाती कीटकांच्या आहेत. २ लाख ४८ हजार वनस्पती, २ लाख ८१ हजार प्राणी, ६८ हजार जीवाश्म, २६ हजार बुरशी, ४८ हजार जीवाणू आणि एक हजार विषाणूंच्या प्रजातींचा समावेश होतो.

नासाने उपग्रहावरून केलेल्या पाहणीत ठाणे खाडीमधील खारफुटीच्या जंगलाचे (मँग्रोव्ह) क्षेत्रफळ हे गेल्या १९ वर्षांत ३६ टक्क्यांनी घटल्याचे लक्षात आले आहे. २००४ च्या त्सुनामी तडाख्यातही केवळ खारफुटीमुळे तमिळनाडूमधील दोन गावांत मनुष्यहानी शून्य होती. त्यांनी केलेल्या खारफुटी संवर्धनाचा गौरव संपूर्ण जगाने केला होता, हे आपल्याला माहीत आहेच. चक्रीवादळ, त्सुनामी आणि समुद्राच्या पाणी पातळीत वाढ या आपत्तींपासून किनारपट्टीचे संरक्षण करणारे खारफुटीचे जंगल वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे; परंतु बांधकामांना मिळणाऱ्या प्राधान्यामुळे खारफुटीचा होत असलेला विनाश ही भविष्यातील अनेक आपत्तींची पेरणी करण्यासारखा आहे.

निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावल्याने येणाऱ्या पिढ्यांना या शतकात सुखाचे जीवन जगता येईल, असे वाटत नाही. वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे स्वयंपोशी सजीव आहेत. अलीकडेच अमेरिकेतील येल विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या चमूने उपग्रहाच्या साह्याने केलेल्या एका संशोधनात असा अंदाज बांधला आहे की, जगात आता फक्त तीन ट्रिलियन (म्हणजे तीन हजार अब्ज) झाडे उरली आहेत. पुढील काही वर्षांत जगाच्या मनुष्य संख्येचा अंदाज सात अब्ज आहे. याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवर आज दर माणसी सुमारे ४२५ झाडे आहेत. म्हणून आपल्या हवेच्या आवरणात पुरेसा ऑक्सिजन आहे. त्यामुळे आपण जिवंत आहोत. आपल्या वातावरणात प्राणवायूचा पुरवठा करणारा प्रमुख स्रोत झाडे हाच आहे; परंतु वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्यासाठी, सोयीसाठी होणारी वृक्षतोड सतत वादाचा विषय असते.

जैवविविधतेचे मानवी जीवनातील स्थान लक्षात घेता भारत सरकारने २००२ मध्ये जैव संवर्धन कायदा बनविला, तर २००८ पासून महाराष्ट्र सरकारने जैवविविधता नियम बनविले; परंतु त्यांच्या अंमलबजावणीत प्रशासनाची मवाळ भूमिका राहिल्याने हा कायदा कागदी देखावा ठरू पाहतो. जैवविविधता कायदादेखील असाच उपेक्षित राहिलेला आहे. राष्ट्रीय जैवविविधता कायद्यानुसार, कुठल्याही जैविक संपदेवर प्रक्रिया करून नफा मिळवणाऱ्या उद्योगाने काही प्रमाणात हा नफा जैविक संपदेचे जतन करणाऱ्यांपर्यंत पोहचवायला हवा. जसे की दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी दूध उत्पादकाला केवळ दुधाचा भाव देऊन चालणार नाही, तर दुधापासून केल्या जाणाऱ्या उप-उत्पादनांच्या नफ्यातही त्यांना सहभागी करून घेतले तर साखळी अबाधित राहील. त्यासाठी सर्व राज्यांतील जैवविविधता मंडळांना, समित्यांना सक्रिय करावे लागेल.

जैवविविधतेत माणसाचा प्रवेश झाल्यामुळे जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यास हॉलोसिन विनाश असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचाही नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले होते; पण यातून संवर्धनाला लागावा तो हातभार लागला नाही, तेव्हा आता जागे होण्याची गरज आहे.

प्रामुख्याने मागील ५० वर्षांपासून निसर्ग, पर्यावरण, मानव व विकास यांच्यातील संघर्ष ऐरणीवर येताना दिसतो. भारतात मात्र या विषयावरील चर्चा, चिंतन तोकडेच. अद्याप आपण हळवी, वरवरची चर्चा करण्यातच धन्यता मानतो आहोत. वसुंधरेला ‘माता’, ‘देवी’ म्हणून देव्हाऱ्यात बसवतो व कुठल्याशा पुराणात, पोथीत सांगितलेले कसे खरे आहे, हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे लोकांनाही बरे वाटत असल्याने चर्चा अजून मागे जाते. फार थोड्या वर्तुळांमध्ये व मोजक्याच व्यासपीठावर थेट मुद्द्याला हात घातला जातो. तेव्हा जागतिक पातळीवर भारतातील विकास व पर्यावरणाचे प्रश्न व आव्हाने याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे.

स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय ही चार तत्त्वे लोकशाहीचा डोलारा सांभाळत असताना निसर्ग भक्षण कसे घडले? कुठे पाणी मुरले, विकासाच्या नावावर औद्योगिक वसाहती वसवणाऱ्यांनी सर्वांनाच पदभ्रष्ट करून पापाचा भागीदार बनविले आहे. तेव्हा आता लगेच आत्मपरीक्षण करून सर्वसमावेशक सहकार्यातून जैव संवर्धनासाठी, पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावे लागतील. नाहीतर आणखी विनाश करण्यासाठी अजूनही काही जीव, पर्यावरण शिल्लक आहेच. शेवटचे झाड तुटेपर्यंत, पाण्याचा प्रत्येक थेंब विषारी होईपर्यंत आणि श्वास गुदमरेपर्यंत सवड आहे. आपण धोरणकर्ते वा कष्टकरी, उद्योगपती वा शेतकरी, शहरी वा ग्रामीण, आशावादी, निराशावादी वा वास्तववादी- असे कोणीही असलो तरी आपल्या सर्वांचे पर्यावरण एकच आहे!

(लेखक वर्धा येथील इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्-कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील जैव तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत.)

sandypetare@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com