पाहते वाटुली... (संगीता कुलकर्णी)

sangeeta kulkarni
sangeeta kulkarni

अश्रुभरल्या नजरेनं मीरानं सदाला निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला आठवलं. आज तिला तिच्या मरणोत्तर परमवीरचक्र मिळवणाऱ्या पतीची- माधवची फार फार आठवण येत होती. आज तो असता, तर हे एकटेपण असं अंगावर आलं नसतं...

आज पहाटेपासूनच मीराची लगबग चालू होती. एका डोळ्यात लेकाच्या विरहाचं दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात लेकाला मुंबईला मोठ्या पगाराची छान नोकरी लागली, त्याच्या आणि आपल्या श्रमाचं सार्थक झालं या आनंदाचे अश्रू होते. आज रात्री नऊच्या गाडीनं सदा मामाबरोबर मुंबईला जाणार होता. त्याच्या आणि भावाच्या आवडीचे पदार्थ करताकरता संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. साडेसात वाजून गेल्यावर ती सदाला म्हणाली ः ""सदा, मामाला जेवायला बोलवून आण. दोघं वेळेवर जेवा. मग गडबड नको.''

अवीमामा आला; मामा-भाचे जेवायला बसले. मामा म्हणाला ः "सदा, आज ताट तुझ्या माझ्या आवडीच्या पदार्थांनी भरून गेलंय.'' सदा म्हणाला ः ""खरं रे मामा, बोलायच्या नादात माझ्या लक्षातच नाही आलं. बघ, पदार्थ काय छान चविष्ट झालेत. आई, तू पण बस ना आमच्याबरोबर जेवायला.'' त्याच्या हट्टामुळं ती त्यांच्याबरोबर जेवायला बसली; पण जेवणच जाईना. मामा-भाचे मुंबईच्या विश्‍वात हरवले होते. मामा त्याला मुंबईची खडान्‌खडा माहिती देत होता. त्या दोघांचं लक्ष नाही, असं पाहून ती उठली. पोटभर जेवून तेही उठले. सदा म्हणाला ः ""आई, बॅंकेला जोडून सुटी आली, की तुझ्या हातचं जेवायला येतो.''
साडेआठला ते घरातून निघाले. निरोप द्यायला आळीतले सर्व आले होते. सगेसोयरेही होते. सदानं सर्व मोठ्यांना नमस्कार केला. सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा घेऊन ते बाहेर पडले. रस्ताभर मीरा त्याला उपदेश करीत होती. अखेर अवीमामा म्हणाला ः ""मीरे पुरे गं, इतक्‍या गुणी बाळाला इतकं सांगावं लागतं का?'' खरंच सदा फार गुणी मुलगा होता. वडिलांच्या मागं आईनं खूप कष्टानं वाढवलं होतं. सदानं त्याचं चीज केलं होतं. आज तो मुंबईत एका मोठ्या बॅंकेत सीए म्हणून हजर व्हायला चालला होता. सर्व जण बसस्टॅंडवर आले.

बरोबर नऊला गाडी सुटली. अश्रुभरल्या नजरेनं तिनं दोघांना निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिनं अंथरुणावर अंग टाकलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला आठवलं. आज तिला तिच्या मरणोत्तर परमवीरचक्र मिळवणाऱ्या पतीची- माधवची फार फार आठवण येत होती. आज तो असता, तर हे एकटेपण असं अंगावर आलं नसतं. त्यालाही आपल्या बाळाचं फार कौतुक वाटलं असतं. त्याला खूप शिकवायचं हे त्याचं स्वप्न तिनं पूर्ण केलं होतं. तिची अस्वस्थता खूप वाढली. झोपही येईना.

सव्वाअकराच्या दरम्यान ती उठली. तांब्या-भांडं घेऊन बाहेर येताना, तिला सदा हाक मारतोय असं वाटलं. लगेचच ""मीरे'' अशी अवीची आर्त हाक आली. तिच्या हातून तांब्या-भांडे खाली पडलं. ती धावतच दारात गेली. दार उघडलं, तर दारात कोणीच नाही. ती खूप घाबरली, बेचैन झाली. आत जाऊन ती देवासमोर बसली. भगवंताला आळवू लागली. "अवी, सदा खुशाल असू देत,' म्हणून नवस बोलू लागली. मनामध्ये काहूर माजलं होतं. नाही नाही ते विचार मनात घोंघावू लागले. म्हणतात ना- "मन चिंती ते वैरी न चिंती!' भगवंतासमोरही चित्त शांत होईना; अखेर उठून ती शेजारी काका-काकूंकडं गेली. तिच्या आर्त हाकांनी दोघंही बाहेर आले. तिचा विदीर्ण चेहरा, थरथरणारा उभा देह बघून ते दोघे घाबरून गेले. काकूंनी तिला घरात आणलं. त्यांच्या मिठीत शिरून ती रडू लागली. काकूंनी तिला थोपटत शांत करण्याचा प्रयत्न केला. तिला रडू दिलं. त्या दोघांच्या आधारानं ती थोडी शांत झाली. रात्रभर तिची समजूत घालत, वेगवेगळे विषय काढून त्यांनी तिला सोबत केली.

साडेपाचला मीरा घरी आली. दूध काढलं. केरवारा झाला. सात वाजता म्हादू आला. त्याला चहा देऊन रतिबाचं दूध घालायला पाठवलं. तिचा अस्वस्थपणा संपत नव्हता. आंघोळ उरकून ती पूजेला बसली. कशीबशी पूजा करून ती फेऱ्या मारू लागली, मध्येच ती झोपाळ्यावर बसे. लगेच बाहेर येई. म्हादूनं हॉटेलला दूध घातले. तिथं त्याला बातमी कळली... रात्री नऊला सुटलेली राजापूर- मुंबई एसटी बस महाडजवळच्या तुटलेल्या सावित्री नदीच्या पुलावरून कोसळून वाहून गेली. त्याच पावली तो घावत सुटला. आधी साठेकाका-काकूंकडं गेला. रडत- अडखळत त्यांना ती बातमी सांगितली. दोघंही हादरून गेले. मीराला काय सांगायचं? लटपटत्या पावलांनी दोघं तिच्याकडं आले. म्हादूला त्यांनी चार लोकांकडं पाठवलं. हळहळतच सगळे मीराच्या सांत्वनाला जमले. तिचा आक्रोश कुणालाच ऐकवत नव्हता. मध्येच ती काकूंना म्हणे ः ""काकू, हे खोटं आहे हो. माझा सदा नक्की येईल. माझा दादा त्याला घेऊन येईलच. चला, आपण महाडला जाऊ. दादा- सदा तिथं भेटतीलच.''

मीरासह आठ-दहा जण महाडकडं रवाना झाले. दुर्घटनाग्रस्त जागेवर वेगानं मदतकार्य चालू होतं. सेवाभावी संस्थेमधली तरुण मुलं- मुली मनापासून काम करत होती. वाहून गेलेल्या गाड्यांमधल्या लोकांचे नातेवाईक जमले होते. त्यांचा आक्रोश ऐकवत नव्हता. त्यांचं सांत्वन तरी कसं करायचं? गाड्यांचा, वाहून गेलेल्यांचा शोध होड्यांद्वारे चालू होता. भर पावसाळी दिवस... नदीला महापूर पाणी... पण मदतकार्यात कुठंही कसूर नव्हती. रात्री सर्वांना घरी पाठवण्यात आलं. काकूंनी मीराला थोपटून झोपवलं. त्याही तिच्या शेजारी आडव्या झाल्या. रोजच्यासारखी ती सकाळी उठली. दूध काढून केरवारे झाले. सर्व आवरून ती स्वयंपाकाला लागली. शेजारीपाजारी खेपा घालून गेले. काहीच घडलं नाही, असं ती सर्वांशी वागली, बोलली. सर्व जण एकमेकांना खुणावत विचारत होते. तिचे नातेवाईक तिला काही सांगत होते. विचारत होते; पण ती एकदमच अलिप्त होती. भराभर कामं आवरत होती.
अकरा वाजता ती काकूंना म्हणाली ः ""काकू, आज सदा आणि दादा मुंबईहून येणार आहेत. पहिल्यांदाच तो रजा घेऊन येतोय. त्यांना आणायला स्टॅंडवर जाते मी. स्वयंपाक करून ठेवलाय.''

काकू हतबुद्ध होऊन तिच्याकडं बघतच राहिल्या. ती झपाट्यानं बाहेर पडली. काका-काकूंनी तिला हाका मारल्या; पण ती आपल्याच तंद्रीत पुढं गेली. काकांनी दोन माणसं बरोबर घेऊन तिला गाठलं. तिला समजावलं; पण ती काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सगळेच तिच्याबरोबर स्टॅंडवर आले. मुंबईहून आलेल्या प्रत्येक गाडीमध्ये ती सदा- दादाला शोधत होती. अखेर हताश होऊन तीन वाजता ती घरी आली. तिची निराश ग्लानमुद्रा काकूंना बघवेना. त्यांनी तिला जवळ घेतलं; खूप समजावलं; पण सदा-दादा या जगात नाहीत, हेच मुळी तिचं मन मानायला तयार नव्हतं. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. उठायचं, आवरायचं, स्वयंपाक करून अकराला स्टॅंडवर जायचं... तीन-चार तासांनी निराश होऊन परतायचं. दोन-अडीच वर्षं झाली... बिचारी मीरा मुंबईच्या गाड्या तपासून परत येते. अजूनही ती पाहते वाटुली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com