सांगलीत कॉंग्रेसवर 'जिंकू किंवा मरू'ची वेळ

शेखर जोशी
मंगळवार, 22 मे 2018

कर्नाटकातील कटू अनुभवाच्या आठवणी पुसण्यासाठी भाजपला येथे आणखी एक संधी आहे, तर मरगळलेल्या कॉंग्रेसला पुन्हा पालवी फुटायची असेल तर हिच वेळ आहे. राष्ट्रवादीसाठी जयंत पाटील यांना आपण अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला महापालिकेच्या सत्तेची भेट देण्याची आणि इस्लामपूरचा बदला घेण्याचीही संधी आहे. शिवसेना, आप, एमआएम या पक्षांना आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी नवी संधी आहे. 

सांगली - कर्नाटकची धामधूम संपली आहे. येथे भाजपचा तोंडचा घास कॉंग्रेसने काढून घेतला. आता यापुढे या दोन्ही पक्षांतील नेत्यांची युध्दभूमी सांगली असणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रदीर्घकाळ कॉंग्रेसच्या अमलाखाली असलेली महापालिका ताब्यात घेण्याची प्रतिज्ञा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. 

यापूर्वी असे आव्हान देत येथील जिल्हा परिषदेवर भाजपने कब्जा केला आहे. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसनी हे आव्हान गांभीर्यांनेच घ्यायला हवे. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी कॉंग्रेससमोर येथे "जिंकू किंवा मरू' अशीच वेळ आहे. 
नुकतेच येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आपापले वेगवेगळे मेळावे भरवून कार्यकर्त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. 

भाजपने तर येथे संपूर्ण राज्याचे अधिवेशनच 5 जूनला भरवून लढाईची जोरदार तयारी सुरू केली आहे. या अधिवेशनाला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने महापालिकेची लढाई "हाय होल्टेज' होणार असल्याचे संकेत आहेत. सुभाष देशमुखांनी तर 60 प्रभागांवर भाजपचा दावा केला आहे. यावर महापौर हारूण शिकलगार यांनी "ईव्हीएम' मध्ये हातचलाखी करण्याच्या आधारावर भाजप असा दावा करू शकते, असा टोला मारला आहे.

 ऐंशी नगरसेवकांच्या या महापालिकेत सत्तारूढ कॉंग्रेसकडे 42 नगरसेवक तर विरोधी पक्ष असेलेल्या राष्ट्रवादीचे 25 नगरसेवक आहेत. भाजपकडे या घडीला दोन नगरसेवक आहेत. ते स्वाभिमानी आघाडीचे घटक होते. शिवसेनेला गेल्यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता, आता त्यांच्याकडे काही नगरसेवक आहेत, ज्यांनी सेनेचे बंधन बांधले आहे. यावेळी जिल्हा सुधार समिती, आप आणि एमआयएम अशा नव्या पक्षांची भर पडलेली आहे. पूर्वीच्या दोन सदस्यीय प्रभागांचा आता चार सदस्यांचा झाला आहे. एकूण 20 प्रभागांतून 78 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 

कॉंग्रेसपुढे आपली पडझड रोखणे मोठे आव्हान असेल कारण एककाळ संपूर्ण जिल्हा कवेत असलेल्या कॉंग्रेसचा आता फक्‍त एक आमदार येथे राहिला आहेत. पतंगराव कदम यांच्यासारखा मोठा आधारवड गेल्याने कॉंग्रेसकडे संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेऊ शकणारा नेता नाही. खऱ्या अर्थाने जी पोकळी म्हणतात ती आता कॉंग्रेसमध्ये आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोट निवडणुकीत भाजपने बाय दिल्याने कॉंग्रेसकडून पतंगरावांचे सुपुत्र विश्‍वजीत कदम आता विधानसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. 

सांगली जिल्ह्यातून बिनविरोध आमदार होणारे ते पहिलेच आहेत. सध्या भाजप-कॉंग्रेसमधील येथील संघर्ष सध्या पुढे गेला आहे एवढाच या निवडणुकीचा अर्थ आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने कॉंग्रेसला महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला आहे. अर्थात कॉंग्रेसपुढे नेतृत्व कोणी करायचे असाच मोठा प्रश्‍न आहे.

आता महापालिकेची धुरा वसंतदादांचे नातू विशाल आणि प्रतीक पाटील, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री आणि पतंगरावांचे चिरंजीव आमदार विश्‍वजीत यांच्याकडे असेल. प्रतीक लोकसभेच्या पराभवानंतर पुन्हा पालिकेकडे फिरकलेले नाहीत. विशाल यांनी कॉंग्रेसलाच लक्ष्य करणारी विधाने करीत आपली वेगळी चाल सुरु केली आहे. भविष्यात विधानसभेसाठी महापालिकेतील कॉंग्रेसचा गट जयश्रीताईंसाठी आग्रही असेल तर विशाल पाटील प्रति दावेदार आहेत. 

त्यामुळे त्यांच्यातच बेकी दिसते. महापालिका जयश्रीताईंनी सांभाळावी पण विधानसभा आपल्याला द्यावी असा साधारणत: विशाल पाटलांचा प्रयत्न असेल. याशिवाय कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटीलदेखील आमदारकीसाठी बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना कशी संधी मिळेल यासाठी जो तो आग्रही असणार आहे.

यातून उमेदवारी वाटप हा देखीली कॉंग्रेससमोरचा मोठा कटकटीचा प्रश्‍न असेल. त्यापेक्षा निवडणूक खर्चाची बाजू कोणी उचलायची हा कॉंग्रेसपुढील सर्वात मोठा प्रश्‍न आहे. याशिवायच प्रश्‍न आहे तो म्हणजे राष्ट्रवादीशी निवडणूक पूर्व की नंतर आघाडी करायची? हा तिढाही अद्याप सुटलेला नाही. दोघांच्याही मेळाव्यात आघाडी नको, असा कार्यकर्त्यांचा आग्रह पुढे आला आहे. राष्ट्रवादीने यापुर्वीच्या महाआघाडी करून कॉंग्रेसचा पाडाव केला होता. त्या महाआघाडीचा पराभव करूनच सध्या कॉंग्रेस सत्तेत आहे. 

स्वतंत्र लढली तेव्हा सत्तेतून गेली, त्याचा अनुभव ताजा असल्याने ते निवडणूक पूर्वच आघाडीसाठी तयार होतील, अशी अवस्था आहे. कारण जयंत पाटील आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. इस्लामपूर त्यांचे होम पिच. तेथील नगरपालिका भाजपने हिसकावून घेतली असल्याने आता जयंतरावांना महापालिका क्षेत्रात आपली ताकद दाखवून भाजपला उत्तर देण्यासाठी आकाशपातळ एक करावे लागणार आहे. 

अशी एकंदर राजकीय युध्दभूमी सांगलीतील चित्र आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र की विभक्त हे अजून निश्‍चित नाही. हे दोघे विभक्‍त लढले तर कॉंग्रेसला फायद्याचे होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार भाजपची मते काही ठिकाणी घेतील त्याचा फटका भाजपला होऊ शकतो. भाजप प्रचंड पैसा खर्च करेल, असे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेतेच जाहीर भाषणांतून म्हणून लागले आहेत. त्यामुळे सांगलीत आता उलटी गंगा वाहू लागली आहे. 

भाजपची आर्थिक बाजू नक्‍कीच मजबूत आहे पण लढण्यासाठी चांगले चेहरे मात्र त्यांना सापडेनात. अशी एकंदरीत अवस्था आहे. त्यांची बरीचशी मदार दोन्ही कॉंग्रेसमधील मोहरे गळाला लागतात का यावरच आहे. पण ही निवडणूक भाजप विरुध्द इतर अशीच साधारण तापेल असा अंदाज आहे. महापालिका क्षेत्रात भाजपचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे असे दोन आमदार असल्याने त्यांच्या साठीही ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. खासदार संजय पाटील यांनीही लोकसभेला येथून चांगले मताधिक्‍य घेतले असल्याने त्यांनाही आपली व्होटबॅंक सांभाळण्यासाठी फलंदाजी करणे अपरिहार्य आहे. 

Web Title: Sangli News Sangli corporation Election