'फक्त गाणं ऐका आणि स्वरात भिजा' (संजय गरुड)

संजय गरुड
रविवार, 22 एप्रिल 2018

गुरुजींचा मूड एकदम बदलला. ते आपला आजार विसरून गेले. रुग्णालयातल्या खाटेवर ते उठून बसले. त्यांनी मला पुढं यायला सांगितलं आणि "लंगर का करिये...' ची छान तालीम त्यांनी मला दिली. आनंद भाटे यांचं टीव्हीवरचं गाणं ऐकून गुरुजींचा मूड एकदम छान झाला होता. त्यामुळं रुग्णालयात असतानासुद्धा त्यांनी मला ही तालीम दिली! मला माझ्या गुरूंकडून मिळालेली ही अखेरची तालीम होती.

गुरुजींचा मूड एकदम बदलला. ते आपला आजार विसरून गेले. रुग्णालयातल्या खाटेवर ते उठून बसले. त्यांनी मला पुढं यायला सांगितलं आणि "लंगर का करिये...' ची छान तालीम त्यांनी मला दिली. आनंद भाटे यांचं टीव्हीवरचं गाणं ऐकून गुरुजींचा मूड एकदम छान झाला होता. त्यामुळं रुग्णालयात असतानासुद्धा त्यांनी मला ही तालीम दिली! मला माझ्या गुरूंकडून मिळालेली ही अखेरची तालीम होती.

आमच्या घरी शास्त्रीय संगीतगायनाचा मोठा वारसा नव्हता; परंतु माझे आजोबा कीर्तनकार मारुतीबुवा गरुड हे पखवाज वाजवायचे. वडील (चंद्रकांत मारुती गरुड) हे शेती सांभाळून भजन करायचे. या कारणानं आमच्या घरी भजन-कीर्तनातल्या गायक-वादकांची थोडीफार ऊठ-बस असायची. भजन-कीर्तनाचे संस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून झाले. आमच्या गावातल्या धोंडिबा कुंभार सरांनी लहान मुलांचा एक ग्रुप तयार केला होता. आम्हा सगळ्यांना ते भजन शिकवायचे. हळूहळू मीदेखील पंचक्रोशीत "ग्रुप-भजन' करू लागलो, भजन, गवळणी, अभंग मी गायचो.

हार्मोनिअममुळं माझी स्वरांशी दृढ मैत्री झाली. स्वरांनीही माझ्याशी घट्ट मैत्री केली. जे गायन मी ऐकेन, ते माझ्या पेटीतून हुबेहूब उमटू लागलं. माझं मुळशी हे गाव पुण्यापासून अगदी जवळ असलं, तरी शास्त्रीय संगीतापासून खूप दूर आहे! परिणामी, माझा शास्त्रीय संगीताशी फारसा संबंध आला नव्हता. याच दरम्यान मी मारुतराव दोंदेकर यांचे अनेक अभंग ऐकले. ते पतियाळा घराण्याचे उस्ताद रजब अली खॉं यांच्याकडं गाणं शिकले होते. ते मोठे ख्यालिया होते. ते शास्त्रीय संगीत का गायचे नाहीत, हे मला माहीत नाही. मात्र, ते मुखडा अभंगाचा ठेवून शास्त्रीय संगीत अभंगातून गायचे. माझ्या आजोबांकडं ते येत असत. त्यांच्याशी माझा सांगीतिक संबंध आला नाही, मात्र मला शास्त्रीय संगीताची विलक्षण ओढ वाटू लागली.
अशा गोष्टीत मी रमलेला असताना, आमच्या गावात काही सांगीतिक कार्यक्रमांच्या निमित्तानं त्या वेळी पंडित यादवराज फड येत असत. माझे मित्र आणि गुरुबंधू गायक सुनील पासलकर यांनी मला सुचवलं ः "तुझ्या गळ्यात गाणं आहे. तू फड यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन घे.' पासलकर यांच्या छोट्या पत्र्याच्या खोलीत आमचा रियाज चालायचा. त्यांनी मला खूप प्रकारची मदत केली. दोन वर्षं फड यांच्याकडं प्राथमिक धडे गिरवताना मी संगीतातल्या सुरवातीच्या परीक्षा दिल्या. नंतर मी स्वतः अभ्यास करून "संगीतविशारद' झालो.

सवाई गंधर्व महोत्सवातलं शास्त्रीय गाणं ऐकण्यासाठी व हा श्रवणानंद मनात साठवून ठेवण्यासाठी माझा मित्र दत्तात्रय उभे व मी या महोत्सवाला यायचो. रात्री 12- एक वाजेपर्यंत "सवाई'च्या स्वरमहालाबाहेर उभं राहून आम्ही गाणं ऐकायचो. कारण, रात्री एकनंतर (हा महोत्सव पूर्वी पहाटपर्यंत चालत असे) आत फुकट सोडलं जायचं. फुकट गाणं ऐकण्याची आमची वृत्ती नव्हती; परंतु तिकीट काढायला आमच्याकडं पैसेच नसायचे. संगीत शिकण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. गुरूंचा माझा शोध सुरूच होता.

याच दरम्यान भजनातला माझा एक मित्र राजगोपाल गोसावी (पंडित पांडुरंग मुखडे यांचा शिष्य) पंडित श्रीकांत देशपांडे यांच्याकडं त्यांच्या रियाजाच्या वेळी तबल्याच्या साथीला जात असे. त्याच्या मदतीनं माझी आणि पंडितजींची पहिली भेट घडली. त्यांच्याकडं शिकण्याची इच्छा मी व्यक्त केली. त्यांनी मला होकार दिला. ही माझ्या आयुष्यातली मोठी संधी होती. "तुम्ही फक्त गाणं ऐका आणि स्वरात भिजा' असं ते म्हणायचे. याचं मुख्य कारण म्हणजे, माझ्या गळ्यावर कोणत्याच गायकीचे उचित संस्कार झालेले नव्हते की कोणतीच शास्त्रीय शिस्तही नव्हती! हे गुरुजींनी अर्थात श्रीकांत देशपांडे यांनी बरोबर हेरलं होतं. यानंतर असाच एकदा अचानक त्यांनी मला षड्‌ज लावायला सांगितला आणि ती परीक्षा मी उत्तीर्ण झालो. गुरुजींनी मला खूप प्रेम दिलं. पुढच्या काळात हळूहळू माझ्या गाण्यात शिस्त येऊ लागली. गुरुसहवासानं माझा आवाज तिन्ही सप्तकांत योग्य पद्धतीनं फिरू लागला. गुरुजींनी मला 1997 ते 2004 या काळात "मुलतानी', "पूरिया धनाश्री', "मियॉं मल्हार', "तोडी', "अहीरभैरव', "दरबारी', "मेघ' असे किराणा घराण्याचे मुख्य राग शिकवले. इथं माझा शास्त्रीय संगीताचा सांगीतिक पाया भक्कम होत गेला.

गुरुजी आजारी असताना मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो. तिथल्या खोलीतल्या टीव्हीवर त्या वेळी आनंद भाटे यांचं गायन सुरू होतं. "मियॉं की तोडी'मधील "लंगर का करिये...' ते गात होते. ते गायन ऐकून गुरुजींचा मूड एकदम बदलला. ते त्यांचा आजार विसरून गेले. त्यांनी मला पुढं यायला सांगितलं. ते कॉटवर उठून बसले आणि त्यांनी मला "लंगर का करिये...' ची छान तालीम दिली. भाटे यांच्या टीव्हीवरील गाण्यानं गुरुजींनी मला रुग्णालयात असतानासुद्धा गाण्याची तालीम दिली. ही मला माझ्या गुरूंकडून मिळालेली अखेरची तालीम होती. गुरुजी गेल्यावर सन 2011 मध्ये "सवाई'च्या स्वरमंचावर मला स्वतंत्रपणे गाण्याची संधी मिळाली. मात्र, माझं गाणं ऐकण्यासाठी माझे गुरुजी समोर नव्हते.

मी त्या वेळी "पटदीप' हा राग गायलो आणि गुरुजींना श्रद्धांजली म्हणून एक अभंग गायलो. "संजय गरुड यांच्या गाण्यानं पंडित श्रीकांत देशपांडे यांची आठवण करून दिली', असं वार्तांकन दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालं. ते वाचल्यावर गुरुजींच्या आठवणीनं मला रडू कोसळलं.

सध्या माझ्याकडं उच्चशिक्षित विद्यार्थीही शिकतात. आर्थिक अडचण असल्यास मी कुणाकडून शक्‍यतो "फी' घेत नाही. "तुम्ही ज्या वेळी पैसे कमवायला लागाल, त्या वेळी गुरुदक्षिणा द्यायला या,' असं मी विद्यार्थांना अगदी मोकळेपणाने सांगतो. कारण, या विद्यार्थ्यांमध्ये मला लहानपणीचा "संजय गरुड' दिसत असतो! केवळ शास्त्रीय गाण्याच्या ओढीनं आणि गाण्यावरच्या प्रेमानं मी खूप सोसलं. मात्र, याचं आता थोडं समाधान वाटू लागलं आहे. शास्त्रीय संगीतावर काही भाष्य करण्याएवढं अथवा अधिकारवाणीनं काही विचार व्यक्त करण्याएवढं माझं वय नाही आणि मला तेवढा अनुभवही नाही. कारण, आत्ता कुठं माझी कारकीर्द सुरू झाली आहे...

(शब्दांकन ः रवींद्र मिराशी)

Web Title: sanjay garud write article in saptarang