आनंदाची दुकानं (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com
रविवार, 6 जानेवारी 2019

सुखाची ठिकाणं, आनंदाची दुकानं बाजारात नसतात, तर प्रत्येकाच्या मनात असतात. काही जणांनी त्यांची कवाडं कायमचीच बंद केलेली असतात, काहीजण ती अध्येमध्ये उघडतात, तर अशी दुकानं आपल्या आतच दडलेली आहेत याचाच पत्ता काहीजणांना नसतो. आपल्या आत डोकावलं की या दुकानांचा पत्ता अचूक सापडतो. असं स्वतःत डोकावता डोकावताच आपल्या भोवतालचीसुद्धा सुखाची ठिकाणं, आनंदाची दुकानं कशी शोधायची त्याचं इंगित सांगणारं हे हलकंफुलकं साप्ताहिक सदर

सुखाची ठिकाणं, आनंदाची दुकानं बाजारात नसतात, तर प्रत्येकाच्या मनात असतात. काही जणांनी त्यांची कवाडं कायमचीच बंद केलेली असतात, काहीजण ती अध्येमध्ये उघडतात, तर अशी दुकानं आपल्या आतच दडलेली आहेत याचाच पत्ता काहीजणांना नसतो. आपल्या आत डोकावलं की या दुकानांचा पत्ता अचूक सापडतो. असं स्वतःत डोकावता डोकावताच आपल्या भोवतालचीसुद्धा सुखाची ठिकाणं, आनंदाची दुकानं कशी शोधायची त्याचं इंगित सांगणारं हे हलकंफुलकं साप्ताहिक सदर

तसं पाहायला गेलं तर वेदना व दुःख या फार गमतीच्या गोष्टी असतात. तुम्ही त्यांच्याकडं कसं पाहता, यावर सगळं काही अवलंबून आहे. काही दुःखं, काही वेदना या श्वापदाप्रमाणे दबा धरून बसतात. सावज हेरून झेपावतात. त्यांना रोज भक्ष्य हवं असतं. ती घाबरून पळणाऱ्याच्या मागं लागतात. धाडसानं समोर येणाऱ्याला मात्र दबकून असतात. "हा आपल्याला घाबरत नाही, धीरानं तोंड देतो,' हे समजलं की ही दुःखं, या वेदना फारशा त्रास देत नाहीत. सुख जसं मानण्यावर असतं तसं दुःखही मानण्यावरच असतं. वेदनांना धरून बसलं की त्या अजून सतावतात. त्या सवयीच्या होऊन गेल्या की सौम्य वाटू लागतात. काही माणसं खरोखरच दुःखी असतात, काही दुःखी नसतानाही तशी दिसतात. त्यांचा चेहरा पाहून बाकीचे धास्तावून जातात.

"आता जागतिक युद्ध सुरू होणार आहे आणि पडणाऱ्या पहिल्या अणुबॉम्बचा केंद्रबिंदू आपलं डोकं असणार आहे', अशी काल्पनिक भीती घेऊनच काहीजण वावरत असतात! एखाद्या धार्मिक कृत्याच्या प्रसादाप्रमाणे काही माणसं आपलं दुःख वाटत सुटतात आणि सुख मात्र न्याहारीप्रमाणे स्वतःच खातात. तेल न दिलेल्या सायकलच्या चेनसारखी काहींची कायम कुरकुर सुरू असते. समोरचे सारे सुखी आहेत असं समजून ही माणसं दिसेल त्याच्याजवळ आपली दुःखं सांगत बसतात. त्यांच्या मनाचा निचरा होतो हे खरं; परंतु ऐकणाऱ्याच्या मनाचा पार विचका होऊन जातो. वारंवार असं घडलं तर सांगणाऱ्याच्या दुःखाला सहानुभूती मिळत नाही. उलट, त्याची चेष्टा-कुचेष्टा होण्याचीच शक्‍यता जास्त असते. कुठलीही गोष्ट आपण कशी स्वीकारतो यावर आपल्याला मिळणारा आनंद अथवा वेदना अवलंबून असते. आता हेच पाहा ना...साहेबराव ऑफिसातून उशिरा घरी आले. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांची बायको मोठ्यानं म्हणाली ः""किती उशीर केलात हो. मघापासून आपला बंड्या म्हणतोय, माकड पाहायचंय, माकड पाहायचंय...'' यातल्या साहेबरावांचा स्वभाव सकारात्मक असेल तर ते म्हणतील ः ""पाच मिनिटांत आवरतो. आपण सारेच प्राणिसंग्रहालयात जाऊन माकड पाहू या.'' पण हेच साहेबराव नकारात्मक विचारसरणीचे असतील तर ते बायकोवर ओरडतील ः ""तुझ्या जिभेला काही हाड! मुलासमोर मला माकड म्हणतेस?'' (ती मनात म्हणेल ः "म्हणायची काय गरज आहे!').

...तर, जग तेच आहे. प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. जशी दृष्टी तसं जग दिसतं. माणसं स्वतःचा आवाका पाहून वागत नाहीत; त्यामुळे नको ती दुःखं पदरात पडतात. ऐश्वर्या रायचं लग्न झालं त्या दिवशी अनेक तरुण दुःखी झाले होते. आमचा एक मित्र तर दिवसभर जेवला नव्हता तेव्हा. खरं म्हणजे, त्याच्या सख्ख्या बहिणीचं लग्नाचं वय उलटून गेलं होतं. त्याला तिची काळजी वाटत नव्हती. बरं, ऐश्वर्याचं लग्न अभिषेकशी झालं नसतं तर काय याच्याशी लग्न होणार होतं का? पण नाही...! आमच्या गल्लीतली कुठलीही सर्वसाधारण मुलगीसुद्धा याच्याशी लग्नाला तयार नव्हती. तरी हा दु:खी झाला होता. सानियानं शोएबभाईला स्पिन टाकला तेव्हा, प्रियांकानं निकूभाऊशी लग्न केलं तेव्हा तर आमच्या काही मित्रांनी थयथयाट केला, "यांना भारतात नवरे सापडले नाहीत का' म्हणून! खरं म्हणजे, आपल्या गावातल्या अनेक सुंदर पोरी परगावी दिल्या, याचं या मित्रांना काहीच वाटत नाही; पण जवळच्या दुःखाला जणू आम्ही जुमानतच नाहीत. विज्ञानानं जग जवळ आलं म्हणून आम्हाला जागतिक दुःखं जवळची वाटू लागली आहेत. आपल्या आवाक्‍यात नसलेल्या गोष्टीत नाक खुपसलं की दु:खाचं नकटेपण वाट्याला येणारच. "जुने लोक काळाशी जुळवून घेत नाहीत...त्यांना नवीन काळ बिघडलेला वाटतो...आम्हाला एकच सदरा होता...आम्ही तोच रात्री धुऊन वाळत घालायचो...इस्त्री नसल्यानं त्याची घडी घालून उशीखाली ठेवायचो...नाहीतर तांब्यात विस्तव घालून तो सदऱ्यावर फिरवून इस्त्री करायचो...थेट कॉलेजात गेल्यावर आम्हाला चप्पल मिळाली...' वगैरे, वगैरे...नव्या पिढीला अशा गोष्टी सांगितल्या तरी त्या पिढीला जुन्या मंडळींबाबत सहानुभूती वगैरे वाटत नाही. उलट, नवी पिढी अशा गोष्टींची टरच उडवते बहुतेकदा. मात्र, तरुण मुलं भेटली की जुन्या लोकांना जुन्या काळातल्या गमती सांगण्यापेक्षा अडचणींचा पाढा वाचण्यात, त्यांना उपदेश करण्यात काय आनंद मिळतो कोण जाणे! जणू जुन्या पिढीनं काही आनंद उपभोगलेलाच नसावा कधी. बाबा कायम किरकिरत असतात म्हणून मुलं त्यांच्यापासून लांब पळतात. मग "तरुण मुला-मुलींना माया नाही...ती आमच्याशी बोलत नाहीत...आमच्या जवळ येत नाहीत' अशी जुन्या लोकांची तक्रार असते. "आता जग बुडणार आहे', अशीही हाकाटी अधूनमधून दिली जाते! खर म्हणजे जो बुडायच्या मार्गावर असतो तोच जगबुडीची आवई उठवत असतो. माझ्याशिवाय हे जग सुखेनैव जगू शकतं, ही कल्पनाच काही लोकांना सहन होत नाही.

आजकाल प्रत्येक जण ओढवलेल्या किंवा ओढवून घेतलेल्या दु:खानं त्रस्त आहे. बाजारात सुख व आनंद मिळण्याची दुकानं असती तर माणसांनी तिथं गर्दी केली असती; पण ही दुकानं बाजारात नसतात, तर प्रत्येकाच्या मनात असतात. काहींनी त्यांची कवाडं कायमची बंद केलेली असतात. काहीजण ती अध्येमध्ये उघडतात, तर ती दुकानं आपल्या आतच दडलेली आहेत याचाच पत्ता काहीजणांना नसतो. माझ्या मनातली अशी दुकानं मात्र कायम उघडी असतात. त्या सुखाच्या-आनंदाच्या दुकानांतला आनंद जेवढा देता येईल तेवढा तुम्हालाही द्यावा, हाच या सदरामागचा हेतू आहे. काही आठवणी, अनुभव, भेटलेली माणसं, समाजात घडलेल्या, घडत असलेल्या राजकीय-सामाजिक-शैक्षणिक-साहित्यविषयक घटनांच्या हलक्‍याफुलक्‍या पद्धतीनं घेतलेल्या नोंदी तुमच्यापर्यंत या सदराद्वारे पोचतील... एकूणच हे सदर म्हणजे तुम्हा वाचकांना "आनंदाचं दुकान' आहे, असंच वाटावं, असा माझा प्रयत्न राहील. वाचणाऱ्यांच्या चित्तवृत्ती फुलाव्यात, त्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन त्याला निदान हलकंफुलकं वाटावं या अपेक्षेसह हा श्रीगणेशा...

Web Title: sanjay kalamkar write article in saptarang