साधाभोळा कलास्वाद...रस्त्यावरचा! (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com
रविवार, 13 जानेवारी 2019

कला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य! "प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच खजील झाला. त्यानं मेंदूला, मनाला भरपूर ताण देऊन पाहिला; पण आपल्यात नेमकी कुठली कला आहे हेच त्याला उमजेना. नंतर त्याच्या डोक्‍यात अचानक प्रकाश पडला. कुठलीच कला नसणं हीच तर मोठी कला आहे आणि आपल्यात ती नक्कीच आहे!

कला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य! "प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच खजील झाला. त्यानं मेंदूला, मनाला भरपूर ताण देऊन पाहिला; पण आपल्यात नेमकी कुठली कला आहे हेच त्याला उमजेना. नंतर त्याच्या डोक्‍यात अचानक प्रकाश पडला. कुठलीच कला नसणं हीच तर मोठी कला आहे आणि आपल्यात ती नक्कीच आहे! कलाप्रकटीकरण नसेल जमत तर दुसऱ्याच्या कलेचा तरी आस्वाद घ्यावा आणि या दोन्ही गोष्टी जमत नाहीत तो माणूस म्हणजे शिंगं आणि शेपूट नसलेला पशूच, असं मनाशीच उद्गारत त्यानं नकळत स्वतःचं डोकं आणि माकडहाड चाचपून पाहिलं आणि तो कलास्वाद घेण्यासाठी बाहेर पडला...

तर असा हा आपला "केवळ श्रोता'!
कुठल्याशा पुढाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य मंडपात कविसंमेलन सुरू होतं. तिथं हा श्रोता शिरला. कविसंमेलन मुक्त असल्यानं कवींची संख्या वारेमाप होती. "माझा नंबर आधी लावा' म्हणून सूत्रसंचालकाभोवती कवींची गर्दी जमली होती; परंतु त्याचं कुणाकडंच लक्ष नव्हतं. एका कवीची कविता सादर करून झाली की त्यावर भाष्य करताना तो स्वतःच्याही एक-दोन कविता म्हणून घेत होता. त्या मंडपात कवी म्हणून तोच सर्वात समाधानी होता, असं म्हटलं तरी चालेल! पुढारी वरकरणी हसतमुख वाटले तरी अंतर्यामी त्यांचंही रूदन सुरू असल्याचं जाणवत होतं. ते अधेमध्ये कविसंमेलन आयोजित केलेल्या संयोजकाकडं - इतरांना दिसणार नाही असा- कातावलेला कटाक्ष टाकत होते. बहुतेक कवी गाऊन कविता सादर करत होते; त्यामुळे हे कविसंमेलन नसून गाण्यांचा कार्यक्रम असावा की काय, असा भास होत होता. काहींचे नुसतेच आवाज चांगले होते...काहींची नुसतीच कविता चांगली होती...काहींचं दोन्ही चांगलं होतं, तर अनेकांचे दोन्ही चांगलं नव्हतं. कवितेत लयबद्धता असो-नसो, ती गाऊन सादर करायची नवीनच परंपरा कवितेच्या प्रांतात सुरू झाली होती. मंचीय कवितेमुळे प्रसिद्धी झटपट मिळते, मानधन मिळतं, समाजमाध्यमांवर तिचा पटकन प्रसार होतो म्हणून कवी पेन व मेज यांच्याऐवजी माईक व मंच यांच्या प्रेमात पडत चालले आहेत. बहुतेक कवी कवितेतून सरकार, पंतप्रधान, व्यवस्था आदींना शब्दानं सोलवटून काढताना पाहून श्रोत्याला गंमत वाटत होती. त्यातल्या एका जुन्या कवीला श्रोता ओळखत होता. जुनं सरकार असताना तो कवी त्या सरकारवरही अशीच टीका करून टाळ्या मिळवत असे; पण जुनं सरकार बदललं तरी त्या कवीच्या "परिवर्तन करा रे' या कवितेत काही परिवर्तन झालेलं नव्हतं! त्यांना नेमकं कसं सरकार आणि व्यवस्था हवी होती ते कळायला मार्ग नव्हता. नंतर श्रोत्यानं स्वतःची समजूत काढली की, सरकार कुठलंही असो, व्यवस्थेवर टीका करणं ही अशा कवींच्या कवितेची गरज असावी. मुळात व्यवस्थाविरोध हाच त्यांच्या कवितेचा पाया असावा. वास्तव दाखवणाऱ्या कवींचं हेच तर अवघड असतं. वास्तव बदललं तरी त्यांना कविता बदलता येत नाही. त्यापेक्षा चंद्र-ताऱ्यांमध्ये रमणारे कवी सुखी! कल्पना वास्तवात बदलणं मुश्‍किल असतं (तरी अंतराळवीरांनी चंद्र हिसकावून घेतल्यामुळं अनेक कवी नाराज झाले आहेत. चंद्राचं खरं रूप उघडं पडल्यानं त्यावर कविता करण्यात पूर्वीइतकी मजा आता राहिलेली नाही!). एक कवी दीर्घ कविता गाऊ लागला. कविता दुष्काळावर होती. बहुदा त्यामुळेच त्याच्या घशाला कोरड पडून तो वारंवार पाणी पीत असावा. त्याच्या लांबलचक कवितेला सारे कंटाळले. आपला हा श्रोता शेजाऱ्याला म्हणाला ः "इतकी मोठी कविता लिहिण्याऐवजी हा कथाच का लिहीत नाही?'
शेजारी म्हणाला ः "आता थेट पावसाळा सुरू झाल्यावरच हा कवी थांबेल असं वाटतंय!'
वैतागलेले पुढारी विनाकारण कानाला मोबाईल लावून "आलोच हं' म्हणत चपळाईनं परागंदा झाले. नंतर शेतकऱ्यांच्या वेदनेवर सादर झालेल्या कवितांनी टाळ्या मिळवल्या. याचा अर्थ जमलेले इतर श्रोते कलाकृतीचं फक्त सौंदर्य पाहत होते, त्यामागच्या वेदनेशी त्यांना काही घेणं-देणं नव्हतं.
हे पाहून श्रोत्याला वाईट वाटलं. कुठल्याही वेदनेनं निव्वळ कलाकृतीचं भांडवल होणं वाईट! काव्यस्वादाची तुरट चव घेऊन श्रोता उठला.
***

जवळच्याच सभागृहात एका सोशल क्‍लबसमोर कुठल्यातरी तरुण व्याख्यात्याचं व्याख्यान सुरू होतं. तोही सरकारला उभा-आडवा झोडत होता. "लवकरच समाज दुभंगणार आहे,' असं भयचकित भाकीत त्यानं "ब्रेकिंग न्यूज' सांगतात तसा चेहरा करून सांगितलं. तोपर्यंत समोरच्या क्‍लब मेम्बर्सच्या हातात कोल्ड्रिंक्‍स व नाश्‍ता आल्यानं त्याच्या या विधानाला काहीएक अर्थ राहिला नाही. उलट, एकानं खालूनच त्याला "नाश्‍ता घ्या' असं खुणावलं. त्यामुळे त्याचं मनोधैर्य तेवढं दुभंगलं! वक्ता वास्तववाद गुंडाळून खाली बसला. नंतर क्‍लबचा प्रमुख माईक हातात घेत म्हणाला ः "लेट अस एंजॉय. सर्व प्रकारची कोल्ड्रिंक्‍स आणलेली आहेत. मजा करा; पण आजच्या चर्चेचा विषय विसरू नका. तो आहे ः "व्यसनी बनत चाललेल्या समाजाला थांबवण्यासाठी काय करावं?' एक्‍स्प्लेन धिस टॉपिक अँड एंजॉय युवरसेल्फ...! चिअर्स.''
***

कलास्वाद घेण्यासाठी बाहेर पडलो आणि कलाताप घेऊन परत निघालो, अशी श्रोत्याची अवस्था झाली. तो वैतागून एकटाच रस्त्याच्या कडेला बाकावर बसला. रहदारी वाहत होती. सामान्य माणूस पोटासाठी पळत होता. देशातल्या किती लोकांना स्वतःची, कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी असं जीवघेणं पळावं लागत असेल...पोटापुढं त्यांना धर्म-जात-परराष्ट्रधोरण-माणसामाणसामधल्या कुरघोड्यांचं काही घेण-देणं नव्हतं आणि विचारवंत मात्र सामान्यांना आपल्या विचारानं दिलासा देण्याऐवजी घाबरवून सोडत होते. उपाय, पर्याय सांगण्याऐवजी ही माणसं आहेत ते प्रश्न जास्त गंभीर करून त्यांची उत्तरं समाजाला का मागत आहेत? अशा काही तथाकथित विचारवंतांनी काही काळ तोंड बंद ठेवलं तरी समाज सुरळीत चालेल! वास्तववादात गुंतलेल्या कलेला तर दहशतीचं स्वरूप प्राप्त झालं आहे...श्रोत्याच्या मनात असे उलटेपालटे विचार सुरू होते. कसल्याशा आवाजानं तो भानावर आला. समोर मोठ्यानं ढोल वाजत होता आणि डोंबाऱ्याची एक बाई व पोरगं तारेवर चालण्याची कसरत करत होतं. निर्भेळ कलास्वाद मिळण्याच्या अशाच काही साध्या-भोळ्या, "अडाणी' जागा शिल्लक राहिल्या आहेत, असं श्रोत्याला वाटलं आणि तो सुखावला व त्यानं पहिल्यांदाच खिशात हात घातला...!

Web Title: sanjay kalamkar write article in saptarang