नटी आली अंगणी! (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

गणेशोत्सव, दहीहंडी आणि कुठलीही निवडणूक आली की तारे-तारकांना सुगीचे दिवस येतात. त्यांना मानधनापोटी घसघशीत रक्कम दिली जाते. हे पैसे देणाऱ्याच्या कष्टाचे कितपत असतात, तोच जाणे. कुणी घामाचा पैसा घालून महागड्या नटीला निमंत्रित केलं तर पुढं त्या संयोजकाला त्या नटीच्या शूटिंगला स्पॉट बॉय म्हणून काम करावं लागेल एवढं मात्र खरं! असे पैसे उधळणारी मंडळी कावेबाज असतात. नटीला वगैरे बोलावून गर्दी जमवायची आणि त्या कार्यक्रमातून आपली प्रतिमा उजळून घ्यायची असा त्यांचा डाव असतो; परंतु कुणी बोलावलं आहे, त्यापेक्षा कुणाला बोलावलं आहे, हे पाहून लोक जास्त गर्दी करत असतात. त्या अमुक यानं तमुक नटीला निमंत्रित केलं म्हणून त्यालाच मत दिलं पाहिजे असं कधी होत नाही. त्याच्या मतांमध्ये वाढ होत नसली तरी काही दिवस पठ्ठ्याच्या चेहऱ्याची चमक तेवढी वाढते. त्यात बाकीचे चमचे "साहेब, तुमच्यामुळे ती आली बरं का...समोरच्यानं कोटभर रुपये देऊनही आली नसती,' असा हवा भरण्याचा कार्यक्रम इमानेइतबारे सुरू ठेवतात.

फार वर्षांपूर्वी एका पुढाऱ्यानं हॉटेलच्या उद्‌घाटनासाठी एका मराठी नटीला आणलं होतं. दादा कोंडके यांच्या सिनेमानं नाव झालेल्या या नटीला पाहायला गर्दी उसळली. स्टेजवर ती नटी व तिच्या शेजारी हा पुढारी सुपरस्टारसारखा उभा राहिला. नटीचा सत्कार झाला. कार्यकर्त्यांनी साहेबांचा सत्कारही त्या नटीच्या हस्ते उरकून घेतला. लोक नटीकडं पाहून जल्लोषात ओरडू लागले तेव्हा तिनं गळ्यातला हार काढून गर्दीमध्ये फेकला. कुण्या स्वर्गस्थ देवीनं जणू प्रसन्न होऊन हार फेकला आहे, असं समजून लोकांनी चेकाळून त्या हारातली फुलं ओरबाडली. काहींनी हाराचा शिल्लक राहिलेला दोराही प्रसाद म्हणून खिशात घातला! ते पाहून पुढाऱ्यालाही जोर आला. त्यानंही गळ्यातला हार काढून गर्दीत फेकला; पण... गर्दीनं तो हार पुन्हा जसाच्या तसा त्या पुढाऱ्याच्या अंगावर फेकून दिला. एकंदर, लायकी दाखवून देण्याची एकही संधी जनता सोडत नसते.

नटीला कार्यक्रमाला बोलावण्याचे मात्र अनेक फायदे असतात. तिच्या शेजारी फ्लेक्‍सवर संयोजकाला चमकता येतं. हे येणाऱ्या कुठल्या तरी बिगबजेट सिनेमाचं पोस्टर असून नायिकेशेजारी नायक म्हणून आपलाही फोटो आहे, असा भास त्या संयोजकाला बरेच दिवस होत राहतो. कारण, कार्यक्रम झाला तरी पुढं कित्येक दिवस फक्त निमंत्रिताला सुंदर वाटणारे असे फ्लेक्‍स शहराच्या विद्रूपीकरणात भरच टाकत असतात. आभासी आणि आपल्या क्षमतेबाहेरच्या गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. त्यामुळे नटी येते तेव्हा गर्दी होणं साहजिक असतं. ती फारसं बोलत नाही. तिच्याकडं बोलण्यासारखं फार काही नसतंही. ती सभोवार पाहते. तिची नजर जाईल तो कोपरा चेकाळून ओरडतो. प्रत्येकाला वाटतं, की तिनं आपल्याकडं पाहिलं; पण ती कुठंच पाहत नसते. तिच्या डोळ्यासमोर एकच धुरकट असा वेड्या माणसांचा सामुदायिक चेहरा असतो. त्या चेहऱ्याचं तिला काही देणं-घेणं नसतं. प्रत्येक सुट्या चेहऱ्याला मात्र तिचं घेणं असतं. ती यंत्रवत्‌ हात हलवते. मग पुढारीही हात हलवतो. सांगितली गेलेली असतात तेवढी एक-दोन वाक्‍यं (कृत्रिम हसत) ती बोलते..."या साहेबांशिवाय या मतदारसंघाला पर्याय नाही...लोकशाही बळकट करायची असेल तर यांनाच निवडून द्या...' वगैरे वगैरे... ती जशी आली तशी भुर्रकन्‌ निघून जाते. पुढारीही घाईनं स्टेजखाली उतरतो. कारण, ती गेल्यानंतर आपले मूठभर पंटर सोडता आपल्यासाठी कुणीच थांबणार नाही, याची त्याला कल्पना असते. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम कुठंतरी चौकात असतो. रस्ता खड्ड्यांनी भरलेला असतो. माणसं त्या खड्ड्यात उभी राहून टाचा वर करून त्या नटीला पाहतात; पण तिला दिलेल्या मानधनाच्या पैशातून हे सारे खड्डे बुजवले असते तर बरं झालं असतं, असं त्या पुढाऱ्याला सांगण्याची हिंमत कुणी करत नाही. शाळा-कॉलेजात नट-नट्यांना बोलावलं जातं ते निव्वळ हौस म्हणून! डोनेशन घेऊन काही संस्थाप्रमुख गब्बर झालेले असतात. काही नादिक असतात, काहींना त्यात प्रतिष्ठा वाटते. काहींना इतर विद्यालयांबरोबर गुणवत्तेची स्पर्धा करण्यापेक्षा "भारीतला पाहुणा' आणण्यात स्पर्धा करावीशी वाटते. काही कॉलेजेस भपकेदार कार्यक्रम करून विद्यार्थ्यांना भुलवतात. येणारा सेलिब्रिटी भक्कम मानधन घेतो. चार-पाच बक्षिसं वाटतो आणि निघून जातो. पुढं काही काम नसलं तरी "मला शूटिंग आहे...विद्यार्थ्यांसाठी आलो होतो' असा डायलॉग फेकून मारायला तो विसरत नाही.

यातून कुणाला काय मिळतं, ते समजायला मार्ग नसतो. साहित्यिकांचं किंवा व्याख्यात्यांचं मानधन फारसं नसतं. ते प्रेक्षणीय नसले तरी श्रवणीय असतात, ते ज्ञानाचं दान देतात. मात्र, बहुतेकांना ते घेण्याचा कंटाळा असतो; पण हजारांतल्या दहा श्रोत्यांच्या मनात ज्ञानाचं बीज पडलं तरी कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला असं समजावं. मात्र, आपल्याकडं "असण्या'पेक्षा "दिसण्या'ला जास्त महत्त्व दिलं जातं. ज्ञानाचा परिणाम दीर्घ काळ राहतो, सौंदर्य क्षणकाल टिकणारं असतं हे फक्त विवेकी माणूस जाणू शकतो, म्हणून संयोजक विवेकी असणं हे श्रोत्यांचं भाग्य असतं.

शहरातला, जिल्ह्यातला वक्ता कितीही चांगला असला तरी त्याचं महत्त्व अथवा आकर्षण वाटत नाही. राज्यात जितका मिळतो तितका सन्मान त्याला स्थानिक पातळीवर मिळत नाही म्हणून मोठ्या व्याख्यानमालेत बाहेरचा "पोकळ वक्ता' बोलावतील; पण जवळचा "भरीव पाहुणा' बोलावला जात नाही. बोलावला तरी "आपलाच आहे' म्हणून श्रीफळावर त्याची बोळवण केली जाते. परदेशात जाऊन आलेला पाहुणा दर्जेदार असतो, असंच लोकांचं मत असेल तर...! कवी, लेखक व व्याख्याते यांनी परदेशात जाऊन खुशाल हिंडून यावं. तिकडं बहुत कार्यक्रम झाले व सन्मान मिळाला अशा बातम्या इकडं प्रसृत होतील, याची काळजी घ्यावी! वस्तुतः प्रख्यात होणारा व्याख्याता कुठंही जन्मू शकतो, त्याचं आडनाव काहीही असू शकतं अन्‌ तो कुठल्याही व्यवसायातला असू शकतो. त्याचं दिसणं, केशभूषा, वेशभूषा यांचा त्याच्या प्रभुत्वाशी काहीही संबंध नसतो.
...पण लक्षात कोण घेतो?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com