आयुष्याच्या संध्याकाळी... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून
सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही
घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना! म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा. आपल्याला कारभारीपणाच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून शांतपणे जगायला पाहिजे; पण लहान पोरांत आणि म्हाताऱ्या माणसांत तसा काही फरक नसतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. सगळं कळत; पण वळत नाही. तर मुलगा म्हणाला ः""बाबा, तुम्हाला कमी दिसतं म्हणून मोठा टीव्ही आणला.''
- मी म्हणालो ः ""बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत.'' तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र, त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टीव्हीसाठी मागं लागली होती हे मला माहीत होतं; पण आपण कशाला बोलायचं तसं! म्हातारे म्हणजे परावलंबी; पण आपण असे तरुण असल्यासारखे जोमानं राहायला जातो ते काय खरं आहे का गड्यांनो! तो सीताभौ नाही का, गात्रं शिथिल झाली तरी काठी न घेता फिरायला गेला आणि आदळला डांबरी रस्त्यावर. नवा खुबा टाकावा लागला. पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो ः "या घरी. नव्या खुब्याचा चहा पाजतो!' अशी गंमत...आमच्या पलीकडचा शांताराम काल मला म्हणत होता ः "चहा देताना माझी सून डोक्‍यावर पदरच घेत नाही.' मी त्याला सांगितलं ः "माझी सून मला चहाच देत नाही, आता बोल! अरे, तुला चहा मिळतोय ना, मग तुला पदराचं काय घेणं आहे, बाबा? तिच्या नवऱ्याला जसं आवडतंय तसी ती राहते.' अहो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आवडेल असं राहणारी सून दाखवा अन्‌ माझ्याकडून हजार रुपये घेऊन जा! काळाबरोबर बदलायला पाहिजे ना आपणही? आता वास्तवातले आजोबा अडगळीत गेले आणि गोष्टीऐवजी गेम दाखवणारा मोबाईल नावाचा आजोबा नातवंडांच्या हातात आला. शिवाय, तो खोकत नाही, ढासत नाही म्हणून मम्मी पोराला त्या आजोबाच्या नादी लावते. त्यात तिला दोष देण्यात काही अर्थ नाही. आता फारच गोष्टी सांगाव्याशा वाटल्या तर काही निमित्तानं असं एकत्र येऊन म्हाताऱ्यांनीच म्हाताऱ्यांनाच गोष्टी सांगाव्यात!
काय म्हणाले तुम्ही रामभौ? पेन्शनमुळं आमचं बरं आहे? अहो, पेन्शन ठेवली पाहिजे ना आमच्याजवळ. ज्यांना पेन्शन आहे त्यांची वीस-पंचवीस तारखेपासून चांगली सेवा सुरू होते. विशेष म्हणजे, महिनाभर म्हाताऱ्याकडं पाहायला वेळ नसलेल्या कुटुंबाला एक तारखेला त्याच्यासाठी भरपूर वेळ असतो. एकदा पेन्शन कुटुंबाच्या पदरात पडली की पुन्हा म्हातारा पंचवीस-तीस तारखेपर्यंत कुचकामी! अहो, तो आपला नानूभौ नाही का...तो तर पेन्शन मिळाली की काही पैसे पायमोज्यात दडवून ठेवायचा. सुनेच्या हे लक्षात आल्यावर ती आता त्याचे पायमोजे रोज धुवायला मागते. एरवी, भूल देण्याइतपत वास मोज्यांना यायचा तरी धुतले जात नसायचे. अहो, घराघरातल्या गमती सांगायला लागलो तर मोठा ग्रंथ तयार होईल. त्यापेक्षा मी काय सांगतो ते नीट ऐका, आधी हे लक्षात घ्या की आपला काळ आता गेला. आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते. ती तिच्या जागी बरोबर आहे. पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल. आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन, स्मार्ट फोन असते तर आपणही हेच केलं असतं की नाही! अहो, इतकं वय झालं तरी आपण व्हाट्‌सऍप, फेसबुक वापरतोच ना! मग ती तर तरुण पोरं आहेत. काळ घडवतो आणि बिघडवतोही. डोळे जातील, डोकं चक्रम होईल तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल. आपण कुणाला काही समजावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही माणसं मरताना देहदान करतात. रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात. तसे आपल्या म्हाताऱ्या माणसांवरही कुटुंबाकुटुंबात प्रयोगच सुरू असतात. रुग्णालयातला देह तक्रार करतो का? नाही. तशी आपणही करायची नाही. घरात हक्क गाजवायचा नाही. कर्तेपणा सोडून द्यायचा. कुणाला उपदेश करायचा नाही. घरातल्यांना आवडेल इतकंच त्यांच्यावर प्रेम करायचं. घरात कुणी नवीन आला की लगेच त्याच्या पंचायती सुरू करायच्या नाहीत. कुणाची निंदा करायची नाही. ताटात भाजी धडाची येत नसेल तर आपलंच तोंड म्हातारपणामुळं बेचव झालं आहे असं समजायचं. निसर्ग म्हाताऱ्यांची गात्रं शिथिल करतो, ती शिक्षा नव्हे; तर वरदान समजायचं! घरातल्या न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत म्हणूनच डोळे अधू झाले आहेत, असं समजायचं. मग कुणी केलेलं भडक मेकअप्‌ही सौम्य दिसू लागतं. ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं. आपल्याविषयी बोललं जातं ते ऐकण्यासारखं नसतंच! हात-पाय चालतात तोवर असे फिरायला बाहेर पडत जा. आपण सारे एकत्र आलो की कशा छान गप्पा होतात. शिवाय, घरच्यांनाही जरा मोकळेपणा मिळतो. सकाळी जागीच जमेल तेवढा योग केलेला बरा. चला, आज मी एकटाच बोलतोय म्हणून तुम्ही कंटाळला असाल. इतका का बोललो तर आता पंधरा दिवस आपली भेट होणार नाही. आमचा थोरला तिकडं दूर राहतो, म्हणजे आमच्या तीन पोरांनी मला पंधरा पंधरा दिवस वाटून घेतलेलं आहे! सकाळीच सुनेनं पिशवी भरली आणि आठवण करून दिली की इथले पंधरा दिवस संपले. निघा हवाबदलाला! आता मी ज्या घरी जाणार आहे, त्या घरातल्या सुनेला पंधरा दिवस अमावास्या वाटणार! त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. त्या पडल्या परक्‍या. आपलं रक्त धडाचं पाहिजे ना! मोठमोठे शिकलेले नवरे बायकोसमोर होयबा होतात तेव्हा हसू येतं. सकाळी सूर्य आभाळात लाली पसरतो. मावळतानाही तो तक्रार न करता आकाश रंगवूनच बुडतो ना. बस्स, आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची. सूर्यासारखी! भोगाची सारी उष्णता पोटात दाबून!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com