व्यथा एका पोटाची! (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

"इतकं वय झालं तरी वारंवार आरशात काय पाहता?' असं कुणी म्हणालं तरी आपण ओशाळण्याचं काही कारण नाही. कारण, आपला चेहरा पाहण्यापलीकडं गेलेला असला तरी पोट नेमकं किती वाढलंय हे पाहण्यासाठी आरसा हा गरजेचाच असतो. कित्येक माणसं रोज चेहरा पाहण्याच्या निमित्तानं चोरनजरेनं स्वतःचं पोट पाहून-निरखून घेत असतात. त्यांना आपलं एकेकाळचं रोलर फिरवल्यासारखं सपाट पोट आठवतं. मग ते श्वास आत ओढून वाढलेलं पोट - गोगलगाय शंखात शिरावी तसं - आकसून घेतात. क्षणभर सपाट पोट भूतकाळात डोकावतं आणि आपली श्वास रोखण्याची क्षमता संपली की पुन्हा गरगरीत होऊन ते वर्तमानकाळात स्थिरावतं. "या पोटानं पाठीत खंजीर खुपसला! नाहीतर आपल्यासारखी फिगर कुणाची नव्हती' असं म्हणून आपण पोटातल्या पोटात कातावतो; पण त्या भल्या मोठ्या पोटानं केलेला अपराध पोटात घालण्याशिवाय पर्याय नसतो. पोटभर विचार केला तर पोट हा अवयव किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. एकतर हे पोट दर्शनी भागात असल्यानं त्याच्यावर शरीराचं बरचसं सौंदर्य अवलंबून असतं. आळशी माणसं तर सकाळी पोट गुरगुरलं तरच उठतात. गंमत म्हणजे, पोट भरण्यासाठी निम्मं आयुष्य पळायचं आणि ते पुढं आलं की त्याला मागं खेचण्यासाठीही पुढचं आयुष्य धावायला जायचं, ही गोळाबेरीज काही बरी नाही. मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी पोटच मागं का खेचत नाहीत, त्यानिमित्तानं एकमेकांची पोटं तरी कमी झाली असती, असा पोटाइतकाच विशाल विचार मनात चमकून जातो. एकंदर, पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसं आपलं आख्खं आयुष्य पोटाभोवतीच फिरत असतं. पोटाचा आकार चंद्रकलेप्रमाणे वाढू लागल्यावर त्याची पूर्णाकृती होईपर्यंत काही ते थांबत नाही. पोटाचा असा "गोळा' झालेला पाहून पोटात गोळा उठतो. मग आता ही पौर्णिमा घालवून अमावास्येकडं वाटचाल कशी करायची, या चिंतेनं पोटमालकाच्या चेहऱ्यावर अमावास्या पसरते. मग विविध उपाय सुरू होतात. आठ दिवसांत पोट कमी होण्याच्या जाहिराती खुणावतात. "ऑर्डर करा, चार दिवसात औषधं मिळतील,' म्हणून अधीर पोटानं ऑनलाईन ऑर्डर केली जाते, तर आपल्या पोटाची प्रचंड चिंता असल्याप्रमाणे सेल्समन तासाभरात पार्सल घेऊन दारात उभा राहतो. तो आपल्या ऑर्डरची वाट पाहत घराशेजारीच कुठं तरी लपून बसलेला असतो जणू! यापेक्षा "व्यायाम करा आणि पोट कमी करा' असे सल्ले अनेकजण देत सुटतात. मग व्यायामाचे प्रकार सुरू होतात. कांगारू जसं पिल्लाला घेऊन उड्या मारत असतं तसं सकाळी किंवा संध्याकाळी "पोटाला' घेऊन ताडताड चालणं सुरू होतं. आपली दशा पाहून आपलंच पोट हे नर्तकीच्या कानातल्या झुब्यासारखं डुलूडुलू हलत आपल्याच स्थितीची मजा लुटत राहतं जणू! त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे, घेरेदार पोटवाले अनेकजण तरातरा फिरताना दिसतात. अशी सर्वत्र "विशाल पोटबंधूं'ची संख्या पाहून "आपण एकटेच नाही आहोत' या भावनेनं हायसं वाटतं. मात्र, फार जोरानं फिरलं तर हृदयात बैलगाडीच्या चाकासारखी खडखड सुरू होते. पायात पेटके उठतात. श्वास भात्यासारखा फुलतो. मग घाम पुसत एखादं बाकडं गाठावं लागतं. एखाद्या गोंडस बाळाला कुशीत घ्यावं तसं आपण हा ऽऽ श हु ऽऽ श करत पोटाला कुशीत घेऊन शांत बसून राहतो. फिरल्यानं पोट किती कमी झालं, याचा अंदाज घेण्यासाठी आपण घरी आल्याबरोबर आरशासमोर उभे राहतो, तर त्यात फारसा काही बदल झालेला दिसत नाही. मग नेमक्‍या आपल्या हालचाली कुठून तरी लपून-छपून निरखणारी सौ हसत म्हणते ः "अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप!' तिचा चांगलाच राग आलेला असला तरी काही बोलता येत नाही. कारण, आपलं पोट भरावं म्हणून तिनं किचनमध्ये जय्यत तयारी करून ठेवलेली असते. "खाऊन माजावं; पण टाकून माजू नये,' या उक्तीनुसार आपण खात राहतो; पण "आडजिभेनं खाल्लं न्‌ पडजिभेनं बोंब मारली' असं काहीसं होतं. आपले जिभेचे लाड पोटाच्या रूपानं असे "सार्वजनिक' होत राहतात. "खातीचे गाल आणि न्हातीचे बाल' कधी लपत नाहीत हेच खरं. मग लोकांना टवाळी करायला विषयच हवा असतो हो. कुणाच्या पोटात काय दडलंय काय सांगावं! आपलं गरगरीत पोट म्हणजे कित्येकांच्या पोट धरून हसण्याचा विषय होऊन जातो. कुणी म्हणतं, अंगापेक्षा बोंगा मोठा...कुणी म्हणतं, अचाट खाणं, मसणात जाणं...तर कुणी म्हणतं, खादाडखाऊ न्‌ लांडग्याचा भाऊ...' आपलं पोट पाहून काहींची कल्पनाशक्ती तर पोटासारखी फुगून वर येते. "पृथ्वीचा गोल', "भोपळा', "टरबूज', "फुगा' अशा शेलक्‍या उपमांबरोबर "बालपणी लोक तुमचा प्रेमानं गालगुच्चा घेण्याऐवजी ढेरीगुच्चा घेत होते काय हो?' असाही तिरकस टोमणा मारला जातो. गंमत म्हणजे, मुलीचं लग्न झाल्यावर तिचं आडनाव बदलावं तसं पोट वाढल्यावर त्याचं नामांतर होऊन त्याला "ढेरी' या गोंडस नावानं संबोधलं जातं आणि मुलीनं सासरच्या आडनावाबरोबर पुढं कंसात माहेरचंही नाव लिहावं, तसे ढेरी आणि पोट हे दोन शब्द एकत्र केले जाऊन "ढेरपोट्या' हा कुचेष्टायुक्त शब्द तयार केला जातो. मग इरेला पेटून आपण चालण्याचा वेग अजून वाढवतो; पण कित्येक महिने झाले तरी पोट तसंच. कारण, लगाम तुटलेली जीभ एव्हाना घोड्यासारखी चौखूर उधळून दिसेल ते चापत असते. व्यायामात सातत्य नसलं तरी खाण्यात मात्र आपण सातत्य ठेवतो. त्याचा फायदा पोट बरोबर घेतं आणि आपण चालताना आपल्या पुढं दोन पावलं पळतं! आपण एका कुशीवर झोपलं की ते आपल्या शेजारी झोपतं. त्याला गोंजारत आपण विचार करतो ः"सुटलेलं पोटही काही वाईट नाही. उगीच झीरो फिगरच्या नादात दुष्काळी जनावरासारखं खप्पड दिसण्यात काही मजा नाही. सुटल्या पोटानं माणूस कसा खात्या-पित्या घरातल्यासारखा वजनदार दिसतो. सुटलेलं पोट म्हणजे विकास, प्रगती! लोक काय, डोळ्यात भरणाऱ्या कशालाही नावं ठेवत असतात. इतरांना नावं ठेवल्याशिवाय एखाद्याचं पोटच भरत नसेल तर आपण तरी काय करणार!' नाहीतरी "खाऊ जाणे तो पचवू जाणे' अशा लोकांची संख्या आपल्या देशात काही कमी नाही. त्यांना खडी, सिमेंट, डांबर, पूल असं काहीही पचतं आणि आपल्याला साधं अन्नही पचत नाही. विशाल पोट जसं लपवूनही लपत नाही, तसं एक सत्यही काही लपून राहत नाही. या देशातल्या दहा टक्के लोकांची पोटं कधीच भरत नाहीत म्हणून तर नव्वद टक्के लोकांची पोटं खपाटीला गेलेली दिसतात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com