गॅदरिंगचं 'लळित' (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

"...जोशी सर तुम्हाला म्हणून सांगतो, पाहुणे आल्यावर आपला तो चहावाला अजिबात बोलावू नका. अहो, मागच्या वेळेस पाहुण्यांसमोर त्याची उधारी मागायची घाई सुरू झाली. परवाही तो आपल्या साठेंजवळ म्हणाला ः "हेडमास्तरांना चारचौघांत मागितल्याशिवाय उधारी मिटत नाही.' चहावाल्यासारखाच तो मंडपवाला. गेल्या वेळेस पैशांचा इतका तगादा लावला, की जणू त्या मांडवात माझंच लग्न झालंय.''

"हे पाहा! मी तुम्हाला सांगून ठेवतो. हेडमास्तर म्हणून शेवटी सारी जबाबदारी माझी असते. होय की नाही? आजच्या मीटिंगमध्ये मी स्पष्ट सांगतो- गॅदरिंगला फालतू गाणी बसवायची नाहीत. मला माहीत आहे निकम सर तुम्ही काय बोलणार आहात. घरी टीव्हीवर लोक मुलांबरोबर काहीही आलतूफालतू पाहतील. त्याच्याशी आपल्याला काहीही मतलब नाही. शेवटी ती त्यांची मुलं आहेत, घर त्यांचं आहे. पालकांना काही कळत नाही म्हणून आपणही त्यांच्याच वाटेनं जायचं का? उडत्या चालीच्या गाण्यांना जास्त प्रतिसाद मिळतो; पण मग शाळेला मदत मिळण्यासाठी मुलांना कशावरही नाचवायचं का? मला ते जमणार नाही. आजच्या मीटिंगचा पहिला विषय संपला. दुसरं म्हणजे तुम्ही सुचवलेले पाहुणे फारच मानधन मागतात हो. जरा घासाघिस करून एखादे लेखक-कवी ठरवून टाका आणि त्यांना म्हणावं स्वतःची विद्वत्ता दाखवण्याऐवजी पोरांना समजेल असं बोला. तो मागचा पाहुणा जागतिकीकरणावर तासभर बोलला. पोरं सोडा- मलासुद्धा त्याचं काही समजलं नाही. असेच पाहुणे आणत राहिलो, तर पोरं एकमेकांना खडे मारण्याऐवजी तेच खडे आपल्यावर फेकतील. होय की नाही? आणि कार्यक्रम मुलांसाठी असतो. हे मी सर्व शिक्षिकांसाठी सांगतो आहे. या सोहळ्याला सर्वांनी सजून यावं याविषयी माझं काही दुमत नाही. परंतु, मेकअप आणि भरजरी साड्या सांभाळण्याच्या नादात मुलांकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणजे झालं. गेल्या वेळेस पाहुण्यांच्या भाषणाला मुलं बडबड करत होती आणि आपल्या काही सहकारी झाडाजवळ जाऊन सेल्फी काढत होत्या. लक्ष असत माझं सगळीकडं. माझ्या मते, स्नेहसंमेलन मुलांच्या अंगातले कलागुण बाहेर काढण्यासाठी असतं. शिक्षकांच्या नव्हे. होय की नाही?

""...आणि जोशी सर तुम्हाला म्हणून सांगतो, पाहुणे आल्यावर आपल्या त्या नेहमीच्या चहावाल्याला अजिबात बोलावू नका. अहो, मागच्या वेळेस पाहुण्यांसमोर त्याची उधारी मागायची घाई सुरू झाली. परवाही तो आपल्या साठेंजवळ म्हणाला ः "हेडमास्तरांना चारचौघांत मागितल्याशिवाय उधारी मिटत नाही.' चहावाल्यासारखाच तो मंडपवाला. गेल्या वेळेस पैशांचा इतका तगादा लावला, की जणू त्या मांडवात माझंच लग्न झालंय. एक तर मी कसं व्यवस्थापन चालवतोय हे माझं मला माहीत! त्यापेक्षा स्टेजवर निघण्याची वेळ झाली, की पाहुण्यांना चहा विचारा म्हणजे ते घाई पाहून आपसूक नाही म्हणतील. होय की नाही?
""दोन वर्षांपूर्वी मी पाहुण्यांना लावायला सहा बॅच आणले होते. त्यातले दोनच राहिले. बर्वे मॅडम या वर्षी बॅचवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची. दोन मुलंच नेमा या कामासाठी. कार्यक्रम संपल्याबरोबर त्यांनी टपूनच राहायचं आणि पाहुण्यांचे बॅच काढून घ्यायचे. पाहुणे निघाले, की त्यांच्या मागं पळायचं. मागल्या वेळेस बॅच काढून घ्यायला चार-पाच जण पळाले, तर पाहुण्यांना वाटलं, की माझी सही घ्यायला विद्यार्थी मागं पळताहेत. तरी मी सांगत होतो, की साधेच बॅच आणा म्हणून. ते कधी एकदाचे काढून देतो असं पाहुण्याला वाटलं पाहिजे. भारीतले बॅच आणले, की आपण कितीही खिशाकडं पाहिलं तरी पाहुणे ते काढून देत नाहीत. काय म्हणता सानप सर? दोन बॅच पुरायचे नाहीत? अहो, आपल्यासाठी गोल पुठ्ठे कापून तयार करा. तुमचं कार्यानुभव कस चाललंय तेही समजेल आम्हाला. अहो, किती मॅडम आहेत आपल्याकडं. कुणाच्याही घरी जुन्या रिबिनी सापडतील. नाही नाही तुम्ही नका जाऊ शोधायला. त्या आणतील. रिबिनीची झालर लावली, की बॅच तयार! होय की नाही? आता विषय सत्काराचा. मदन शिपायाशिवाय सत्काराचं समान उचलायला परफेक्‍ट माणूस नाही. मदन, याही वर्षी कार्यक्रम संपून गर्दी-गोंधळ सुरू झाल्याबरोबर गेल्या वर्षीप्रमाणं शाली उचलून कपाटात आणून ठेवायच्या! मनात असलं तरी मोठे पाहुणे शाली मागत नसतात. एखादा नवखा पाहुणा मात्र सत्काराचं सामान स्वतःच उचलून बखोटीला मारून घेऊन जातो. होय की नाही!

"यंदा मला शाळेचा अहवाल कोण लिहून देणार आहे? वाळूंज सर तुम्ही लिहिताय का? वा वा! फक्त आहे ते खरं लिहा. आपला एकही मुलगा अजून कुठल्याही स्पर्धेत राज्यात काय जिल्ह्यातसुद्धा पहिला-दुसरा आलेला नाही. तरी तुम्ही गेल्या वेळेस लिहून दिलं, की आमची पाच मुलं राज्यात पहिली आली म्हणून. पाहुणे नेमके भाषणात म्हणाले ः "त्या पाच मुलांना मला बक्षीस द्यायचंय.' तेव्हा कशी गडबड उडाली आपली. मी आपली वेळ मारून नेत म्हणालो ः "ते देशपातळीवर यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस सराव करताहेत म्हणून आले नाहीत.' तेव्हा कुठं पाहुण्यांचं समाधान झालं. होय की नाही? आणि याच वर्षीचा अहवाल माझ्या हातात द्या. गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीचा अहवाल चुकून माझ्या हातात दिला, तर किती तारांबळ उडाली माझी. काय म्हणालात? कुणाच्या लक्षात आलं नाही? अहो, लक्षात यायला अहवाल ऐकतंय कोण? तुम्ही लिहिणारे आणि मी वाचणारा. शाळेचं अहवालवाचन म्हणजे साऱ्यांच्या अंगावर काटेच येतात. होय की नाही! आणि ते डायस जरा कमी उंचीचं ठेवा. गेल्या वेळेस मी अहवालवाचनाला उठलो, तर तर कुठून आवाज येतोय म्हणून पाहुणे सर्वत्र भिरीभिरी पाहत होते.

""कितीही नियोजन केलं, तरी ती प्रमाणपत्रं आणि स्मृतिचिन्हं याची त्याला जातातच. त्यापेक्षा सारीच कोरी ठेवा. नंतर देऊ नावं टाकून. होय की नाही। आणि सातपुते सर सूत्रसंचालन तुम्हीच करणार का? तुम्ही जरा जास्तच बोलता हो. सूत्रसंचालकांचे सेपरेट कार्यक्रम नसतात हे आम्हाला मान्य आहे, म्हणून इतकं बोलायचं असतं का? आपल्या संस्थाप्रमुखांना तुम्ही मागल्या वेळेस कुठल्या वीरांची उपमा दिली, तेव्हा पाहुणे गालात हसून हळूच म्हणाले ः "हे नुसते वीर नाहीत, डोनेशनवीर आहेत.' बरं झालं, साहेबांनी ऐकलं नाही. मी म्हणणार होतो ः "डोनेशन दिल्याशिवाय पालकांनाही शाळा भारी वाटत नाही.' काय? "इतकं डोनेशन असून काटकसर कशाला,' असं म्हणताय? अहो, आपले संस्थाप्रमुख पहिल्यापासून काटकसरी आहेत. शिक्षकभरतीचा एक रुपया तरी त्यांनी संस्थेसाठी खर्च केलाय का? पुढं त्यांचा मुलगा आमदारकीसाठी उभा राहणार आहे. त्या वेळेस त्यांना या काटकसरीचा उपयोग होईल. तुम्ही सारेही आत्तापासून काटकसर करा. कारण त्या वेळेस आपल्याला दोन महिन्यांचा पगार द्यावा लागणार आहे. नाही- म्हणजे त्यांनी मागितला नाही अजून; पण त्यांचा एकंदर काटकसरी स्वभाव पाहता आपण सावध राहिलेलं बरं! संपली मीटिंग. आता इथं काही बोलण्यापेक्षा आपापल्या वर्गात जाऊन बोला. मदन बेल दे रे..!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com