यंदा कलाटणी नक्की... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

चौथी, सातवी, दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली अतिशय गंभीर वर्षं असतात, असं सर्व मोठ्या माणसांचं एकमत आहे. बाबा तर दरवर्षी म्हणतात ः ""हे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे.'' म्हणून वर्ष सुरू होऊन संपत आलं, की मी कलाटणीची वाट पाहायचो; पण आता दहावीत येईस्तोस्तर तरी तशी काही कलाटणी वगैरे मिळालेली नाही.

सध्या आमची दहावीची परीक्षा सुरू आहे. म्हणजे कुटुंबाच्या केंद्रस्थानी आम्हीच! हे मी चौथीपासून अनुभवतोय. चौथी, सातवी, दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली अतिशय गंभीर वर्षं असतात, यावर सर्व मोठ्या माणसांचं एकमत आहे. बाबा तर दरवर्षी म्हणतात ः ""हे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे.'' म्हणून वर्ष सुरू होऊन संपत आलं, की मी कलाटणीची वाट पाहायचो; पण आता दहावीत येईस्तोस्तर तरी तशी काही कलाटणी वगैरे मिळालेली नाही. आईला मी एके दिवशी सहज विचारलं ः ""बाबांच्या आयुष्याला कलाटणी वगैरे कधी मिळाली?'' ती हसत म्हणाली ः ""आमचं लग्न झालं त्या वर्षी!'' या मोठ्यांचं बोलणं कधी कधी काही कळत नाही.

दहावीचं वर्ष सुरू झालं, तेव्हा बाबा म्हणाले ः ""हा ठोंब्या टीव्हीवर काहीही पाहत बसतो. आपण टीव्ही वर्षभर बंद करून खोक्‍यात ठेवून देऊ.'' आई म्हणाली ः ""मला सिरीयल पाहण्यापुरता तरी चालू ठेवा.'' तर बाबा म्हणाले ः ""खऱ्या सासूला नीट जपत नाहीस आणि त्या सिरीयलमधल्या सासू-सुना काय पाहत बसतेस?'' यावरून दोघांचं भांडण सुरू झालं आणि मला नवी सिरीयल पाहायला मिळाली.
ताई या कशातच नसते. तिच्याकडं चांगला मोबाईल आहे. त्यात व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर अशा काय काय नवनवीन वैज्ञानिक गंमती भरलेल्या आहेत. ती त्यातच मश्‍गूल असते. मला अभ्यासाचं कधी काही विचारत नाही. पूर्वी ती खूप पुस्तकं वाचायची. छान बोलायची. आता मोबाईलच्या रूपानं तिच्या हातात विश्व आलं आहे; पण आमचं छोटंसं भावनिक विश्व ती पार विसरून गेली आहे. ती आता मोबाईलच्या माध्यमातून जगाशी बोलते; पण घरात फारसं बोलत नाही. ती बाबांची लाडकी आहे, त्यामुळं तिला कुणीच काही बोलत नाही. सकाळी कॉलेजला जाताना स्कार्फनं पूर्ण चेहरा बांधून जाते. आमच्या वर्गातल्या खूप मुली असंच करतात. माझ्या ताईसारख्या आधी साऱ्या सुंदर दिसायच्या. आता गूढ दिसतात. मी ताईला एकदा धाडस करून म्हटलंच, तर म्हणाली ः ""हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. दहावीचं वर्ष आहे. नको त्या पंचायती करू नकोस.''

बाबा म्हणाले ः ""आता अभ्यास म्हणजे अभ्यास. हे वर्ष खरंच तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं आहे. रात्री थोडं जेवायचं. म्हणजे झोप येत नाही. जणू सारं जग बुडालेलं आहे- फक्त तू आणि दहावीची पुस्तकंच शिल्लक आहेत, असं समजून अभ्यास करायचा.'' मी मनात म्हणालो ः ""जगच शिल्लक नाही, तर मी एकटा तरी अभ्यास करून काय करू? मोठ्यांनी कसंही वागायचं आणि मुलांना उपदेश करायचा म्हणजे ही गंमतच आहे.'' आता दहावीची परीक्षा सुरू व्हायला आणि आयपीएलच्या मॅचेस सुरू व्हायला एकच वेळ. याच्यामुळंच सचिन तेंडुलकर बारावीला नापास झाला असावा. लग्नवाले तर बारोमास डीजे वाजवत वराती काढतात. त्याच्या दणदणाटानं अभ्यासाचं पार वाटोळ होऊन जातं. त्यात एखादी निवडणूक ठरलेली. नवीन सिनेमे आणि सिरीयलचा मारा. त्यात मोबाईलची सवय असेल, तर दहावी झालीच म्हणून समजा! समाजाला, पालकांना खरंच काळजी असेल आमच्या दहावीची, तर हे दिवस सर्वांनी कसे शांततेत घालवावेत ना! पण तसं होताना दिसत नाही.
आईची एकच अपेक्षा आहे. शेजारच्या शिर्केंच्या पोरापेक्षा एक टक्का तरी जास्त पडला पाहिजे. "म्हणजे त्याला 33 टक्के पडले, तर तू 34 तरी पाड.' शिर्के बाईंची आणि आईची पहिल्यापासून खुन्नस आहे. त्यांनी मागच्या आठवड्यात एलईडी टीव्ही आणला, तर गल्लीला ऐकू जाईल एवढा आवाज केला. आता "हा टीव्ही विका आणि शिर्क्‍यांपेक्षा मोठ्या आवाजाचा टीव्ही आणा,' म्हणून आईनं बाबांकडं हेका धरलाय. सध्या त्यांची खुन्नस आमच्या मार्कावर येऊन ठेपली आहे. म्हणजे हे अजून एक नाहकचं टेन्शन! एक तर आठवीपर्यंत पास होण्याचं दडपण नसल्यामुळं अभ्यासाची सवय पार मोडून गेली आहे. नववी एकदम अंगावर धावून आल्यासारखी वाटते. मुलांना असं मध्येच वाऱ्यावर सोडून देणारं सरकारी धोरण योग्य नाही.
पप्पाची इच्छा आहे, की मी डॉक्‍टर व्हावं, नाही तर मोठ्या पॅकेजवर आयटी सेक्‍टरमध्ये जावं. थोडक्‍यात एटीएम मशीन व्हावं. चोवीस तास पैसे देणारं. मला तेवढे मार्क्‍स पडतील, असं वाटत नाही. पाचवीपासून मी खूप अभ्यास करूनही सत्तरच्या आसपासच पिंगा घालतोय. दहावीला एकदम नव्वदच्या पुढं कसा जाणार? बुद्धी अनुवंशिक असते, असं माझं ठाम मत आहे; पण सांगायची सोय नाही. पालक नको तेवढ्या अपेक्षा ठेवतात- मग त्यांचा भ्रमनिरास होतो. खरोखर हुशार आहेत ते होतील डॉक्‍टर वगैरे. पैसे भरून आमच्यासारख्यांना डॉक्‍टर करून काय लोकसंख्या कमी करून घ्यायचीये का? तीन तासाच्या पेपरवरून काय आयुष्याची दिशा ठरत नाही. माझी चित्रकला चांगली आहे; पण रंग आणि ब्रश आणून देण्याऐवजी बाबा मला गाईड आणून देतात. चित्रं लाखोंना विकली जातात. उत्तम खेळाडू कोट्यवधी रुपये कमावतो. कला माणसाच्या आयुष्याला संपन्न आणि समृद्ध करते; पण आपल्या पालकांच्या डोळ्यांपुढच्या पारंपरिक नौकऱ्या काही जात नाहीत.

सर म्हणाले ः ""पेपर चांगला लिहा.'' म्हणजे मार्कासाठी सारं खोटंच तर लिहायचं ना! घटनेतल्या समानतेबाबतचं विश्‍लेषण दोन-तीन मार्कासाठी करायचं; पण आजूबाजूला तर समानता कुठंच दिसत नाही. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नागरिकशास्त्राच्या पुस्तकात दिलेली कामं सोडून भलतीच कामं करत आहेत. प्रत्येकाला मालमत्ता साठवण्याचा अधिकार आहे, हे पुस्तकातलं एकमेव विधान मात्र सारे कसे मनोमन पाळत आहेत. लोकशाही बदलली तसं नागरिकशास्त्राचं पुस्तकपण बदललं पाहिजे. कळत असूनही सरांना वरून आलं ते शिकवावं लागतं आणि आम्ही मुलं असल्यामुळं तर आम्हाला खरी-खोटी मतं मांडण्याचा अधिकारच नाही. मी सरांना हे सांगायला गेलो, तर ते म्हणाले ः ""तुझी हुशारी तुझ्याजवळ ठेव. पुस्तकात आहे तेच पेपरात लिहायचं असतं. स्वतःची मतं मांडायला गेलास, तर आयुष्यभर नापासच होत राहशील.''

आमचे काही मित्र छोटी गाईड खिशात ठेवून परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत. गण्या तर म्हणाला ः ""माझे बाबा म्हणाले, की मी खिडकीवर चढून तुला कॉपी पुरवू शकतो. भिऊ नकोस- मी तुझ्या पाठीशी आहे.'' पोटाशी आलेल्या मुलांच्या पाठीशी राहणाऱ्या अशा पालकांचं मला नेहमी कौतुक वाटत आलं आहे.
बाबांना क्रिकेट बघण्यासाठी, आईला सिरीयल बघण्यासाठी आणि मी तिकडं ढुंकूनही न पाहण्याच्या तडजोडीवर घरातला टीव्ही सुरू आहे. ताई मोबाईलमध्ये गुंग आहे. मी जोरात अभ्यासाला लागलोय. चला "बेस्ट लक' म्हणा.... तुम्ही तरी दुसरं काय करू शकता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com