
एक आठवी-नववीतला मुलगा. प्रत्येक शिक्षकाकडून या मुलाची (कु) ख्याती पोहोचलेली होती. तो खूप दंगेखोर होता...
‘त्याचं’ आकाश वेगळं होतं!
एक आठवी-नववीतला मुलगा. प्रत्येक शिक्षकाकडून या मुलाची (कु) ख्याती पोहोचलेली होती. तो खूप दंगेखोर होता. वर्गात हाणामाऱ्या, उपद्रव, अर्वाच्य भाषेत बोलणे, हे त्याचं नित्याचं होतं. त्याला कोणतीही शिक्षा केली, तरी फरक पडत नव्हता. तो अख्खा वर्ग डोक्यावर घ्यायचा. गोंधळ घालायचा. त्यामुळे प्रत्येक शिक्षक त्याला वर्गाबाहेरच ठेवायचे. तसाच तो मलाही दिसला आणि जरा खोलात जाऊन त्याच्या मनाचा ठाव घेतला तेव्हा कळलं, त्याचं आकाशच वेगळं होतं. त्याचीच ही गोष्ट...
काही दृश्य ही तुमच्या मनावर खूप खोलवर आणि कायमची गोंदली जातात. अनेक वर्षं लोटली तरी अशी दृश्य डोळ्यासमोरून जात नाहीत. माझ्या मनातही एका शाळेतल्या वर्गाबाहेरचं मी पाहिलेलं दृश्य असंच रेंगाळत आहे. मी नववी आणि दहावीच्या मुलांसाठी व्याख्यान देत होतो; पण माझी नजर अधूनमधून एका टोकाच्या वर्गाशी, बहुधा शिक्षा म्हणून उभ्या असलेल्या मुलाकडे जात होती. माझं व्याख्यान संपलं; तरीही उभा असणारा तो मुलगा जवळपास दीड तासानंतरसुद्धा तिथेच होता!
मी अस्वस्थ झालो. त्या मुलाची नक्कीच काहीतरी चूक असेल म्हणून त्याला हे शिक्षा झाली असेल; पण दीड तास तो मुलगा तिथेच उभा असलेला पाहून मला हे काहीतरी विचित्र आहे, असं वाटू लागलं. कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्याध्यापकांच्या दालनात गेलो. तिथे मी हा विषय काढला. सरांना विचारलं, ‘‘अमूक मुलगा वर्गाबाहेर जवळपास दीड तास उभा होता. तो का? त्याला शिक्षा का करण्यात आली, हे कळू शकेल?’’ मुख्याध्यापक माझ्या परिचयाचे होते. त्यामुळे त्यांना माझा प्रश्न खटकला नाही. ते हसले. म्हणाले, ‘‘तुमचं लक्ष मध्येमध्ये त्या मुलाकडे जात असताना मी पाहिलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की तुम्हाला हे खटकलंय आणि तुम्ही मला हा प्रश्न विचारणार.’’ मुख्याध्यापक मुलाची हकिकत सांगू लागले. प्रत्येक शिक्षकाकडून त्यांच्यापर्यंत या मुलाची (कु) ख्याती पोहोचलेली होती... ते पुढे सांगू लागले. ‘‘तो मुलगा खूप दंगेखोर आहे. वर्गात हाणामाऱ्या करणे, उपद्रव देणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, हे नित्याचं आहे. तो कोणाचंही ऐकत नाही. त्याला कोणतीही शिक्षा केली, तरी फरक पडत नाही. तो अख्खा वर्ग डोक्यावर घेतो. अख्ख्या वर्गात गोंधळ माजवतो. त्याला स्वतःला अभ्यासात गती नाहीच, पण इतरांनाही तो प्रगती करू देत नाही. मधल्या सुट्टीत इतरांचे डबे खातो. त्यामुळे इतर पालकांच्याही खूप तक्रारी आहेत. खूप ताप झाला आहे आम्हाला त्याचा. पुन्हा शाळेचे धोरण, स्थानिक दबाव यामुळे त्याला आम्ही काढू शकत नाही. त्यामुळे कोणी शिक्षक वर्गात आले की प्रथम याला बाहेर काढतात!’’
‘‘त्या मुलाचं समुपदेशन केलंय का? त्याच्या पालकांशी चर्चा केलीये का? त्याच्या पालकांना याची कल्पना आहे का?’’ माझ्या प्रश्नांवर मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘अहो सर्व प्रयत्न करून झाले! मध्यंतरी त्यानं एका मुलाला इतकं बदडलं की त्या मुलाचा डावा हात फ्रॅक्चर झाला. त्या मुलाचे पालक पोलिसात तक्रार द्यायला निघाले होते. शेवटी कसंबसं आम्ही हे प्रकरण मिटवलं. दंगेखोर मुलाच्या पालकांना बोलावलं, तर त्यांचं म्हणणं तुम्ही त्याला जी शिक्षा करायची ती करा; पण ही कटकट घरात नको. घरी खूप त्रास देतो. अभ्यासही करत नाही.’’
‘‘आम्हालाही शाळा म्हणून प्रश्न पडतो, की पालक मुलांना शाळेत शिकवण्यासाठी पाठवतात की घरात त्यांची कटकट नको म्हणून पाठवतात! अशी मुलं स्वाभाविकपणे दुर्लक्षित असतात. घरात अनेक समस्या असतात. पालक अनेक आघाड्यांवर लढत असतात. कदाचित लढता लढता पराभूत होत असतात... त्यामुळे अशा मुलांसाठी खूप मेहनत घेऊनसुद्धा अनेकदा यश मिळत नाही. या मुलाचे पालक शाळेत त्याची प्रगती किती झाली आहे, याची साधी विचारणा करत नाहीत. कोचिंग क्लासमधून त्याला केव्हाच कमी करण्यात आलं आहे. खासगी शिकवणी घ्यायला कुणी धजत नाही. अशा परिस्थितीत मला व्यक्तिगतरीत्यासुद्धा या मुलाचं खूप वाईट वाटतं. त्याच्या भविष्याची खूप चिंता वाटते.’’
मुख्याध्यापक हे खरोखरच एक हाडाचे आणि संवेदनशील शिक्षक होते. त्यांच्या नैराश्याबद्दल शंका घेण्याचं कारणच नव्हतं. कारण आपल्या शाळेतल्या प्रत्येक मुलाचं भलं व्हावं, यासाठी ते अखंड धडपड करीत, हे मी अनेक दिवस पहात होतो. त्यांची कळकळ शंभर नंबरी खरी होती. त्यामुळेच कदाचित, मला त्या मुलाबद्दल कुतूहल वाटायला लागलं. मी मुख्याध्यापकांना म्हटलं, मला त्या मुलाला भेटता येईल का? त्यांनी तात्काळ तयारी दर्शवली आणि पुढल्या काही मिनिटांतच तो मुलगा माझ्या पुढे येऊन उभा राहिला! वयाच्या मानाने थोराड. उंचापुरा. धिप्पाड. थोडंसं मिसरूड फुटलेलं...
त्याच्या चेहऱ्यावर किंचितही गोंधळलेले भाव नव्हते; किंबहुना आपल्याला आता कोणती तरी शिक्षा देणार आहे, अशा आत्मसंरक्षणात्मक, बचावात्मक पवित्र्यातच तो उभा होता. मी त्याला माझ्या समोरच्या खुर्चीत बसवलं. तो बसायला तयार नव्हता; पण मी त्याला हात धरून बसवलं आणि त्याची चौकशी करू लागलो. तो सुरुवातीला थोडा दबून होता. नंतर खुलला. मी त्याला खूप प्रश्न विचारले. अगदी गप्पा मारल्यासारखे. मुख्याध्यापक ते शांतपणे ऐकत होते.
त्या मुलाची मला मिळालेली माहिती अशी... त्याचे वडील एक राजकीय कार्यकर्ते होते. दिवसभर ते बाहेर असत. घरात दोन भावंडं होती. आई घरकाम करे. या मुलाला अभ्यासात फारसा रस नव्हता. त्याला कोणताच विषय आवडत नसे. गोष्टी ऐकायलाही त्याला फारशा आवडत नसत. टाईमपास म्हणून टीव्ही बघतानाही तो स्पोर्ट्स चॅनल बघे. त्या मुलाला खेळण्याची प्रचंड आवड होती. वडिलांच्या मागे लागून त्याने बॉक्सिंगचे कोचिंग लावले होते. फुटबॉल त्याला प्रिय होता. जेव्हा जमेल तेव्हा तो फुटबॉल खेळे. बॉक्सिंग आणि फुटबॉल याविषयी त्याला प्रचंड माहिती होती. टीव्हीवरच्या सर्व फुटबॉल मॅचेस तो आवर्जून पाहत अस; मात्र शाळेत त्याला फुटबॉल खेळण्यासाठी कधीच वाव मिळाला नाही. कारण इतर मुलांना तो धटिंगण वाटे आणि त्याच्या आडदांड शरीरापुढे कोणाचेच काही चालत नसे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फुटबॉलच्या मैदानावरही त्याला बाहेरच उभं केलं जाई. त्या शहरात कुठेच फुटबॉल खेळण्याची सोय नसल्यामुळे त्याची कुचंबणा होई. मग तो जिथे जमेल तिथे एकटाच फुटबॉलने खेळू लागला. त्यामुळे गाड्यांच्या काचा वगैरे फुटल्या. वडिलांनी तंबी दिल्यानंतर तेही थांबलं...
मी त्याला म्हटलं, ‘‘तू शाळेच्या मैदानावर मला फुटबॉल खेळून दाखवशील?’’ त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच हास्य खुललं. तो खूप खूष झाला. जोरात मान हलवून म्हणाला, ‘‘हो!’’
मग स्पोर्ट्स टीचर, मी, मुख्याध्यापक, तो मुलगा आणि त्याच्या हातात फुटबॉल असे शाळेच्या मैदानात गेलो. मैदानात तो एकदम राजासारखा वागू लागला. त्याचा आत्मविश्वास वाढला... फुटबॉल पायाशी घेऊन तो अक्षरशः बागडू लागला. तो फुटबॉल म्हणजे त्याच्या पायांचा एक अविभाज्य भाग वाटावा इतका त्याचा पदन्यास सुंदर होता. मग त्याने दोन-चार फुटबॉल कीक्स मारून दाखवल्या. त्या इतक्या वेगवान आणि अचूक होत्या की स्पोर्ट्स टीचरसुद्धा गोल वाचवू शकले नाहीत. स्पोर्ट्स टीचरपेक्षा त्याची किक नक्की उत्तम असणार! मग त्याला मी म्हटलं, ‘‘चल... आता वर्गावर जा. तर तो वर्गावर जायला तयारच होईना. खूप अजीजीने म्हणाला, ‘थोडं अजून खेळू द्या ना सर!’’
त्याच्या त्या अजीजीत खूप गोष्टी दडल्या होत्या... मैदान ही त्याची जणू मूळ जागा होती आणि ती त्याला आता सोडायची नव्हती. मग मी म्हटलं, ‘‘अरे, सर मला ओरडतील! पुन्हा कधीतरी मी येईन आणि तुला नक्की मैदानावर खेळू देईन...’’ त्याची समजूत घातल्यानंतर तो वर्गात गेला. (खरं म्हणजे वर्गाबाहेर गेला!)
मी मुख्याध्यापकांच्या दालनात आलो. त्यांना म्हटलं, ‘‘सर, तुमच्याकडे एक अनमोल हिरा आहे. हा मुलगा असामान्य क्रीडापटू होऊ शकतो. तो तुमच्या शाळेचं, शहराचं, राज्याचं किंवा कदाचित देशाचं प्रतिनिधित्वही करू शकतो. हा मुलगा स्पोर्ट्समन म्हणूनच जन्मलेला आहे आणि आपण त्याच्यावर गणित, विज्ञान, भूगोल यांचे संस्कार लादत आहोत. ते तो कदाचित स्वीकारणार नाही आणि म्हणून शिक्षकांना तो आवडणार नाही; पण ही आपली चूक आहे. ही शिक्षणाची चूक आहे. त्याला ज्या विषयात उत्तम गती आहे, त्याच विषयात त्याला पुढचं शिक्षण मिळायला पाहिजे आणि हेच शाळा म्हणून, शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून आपलं काम आहे. त्याला खेळू द्या. भरपूर खेळू द्या. तो नक्की पुढे जाईल आणि जितका तो खेळेल, तितका तो शांत होईल. वर्गातही शांत बसेल. पठडीतल्या अभ्यासात थोडीफार प्रगतीही करेल. सर, त्याची ऊर्जा सध्या वाया जातेय... त्याची बुद्धिमत्ता वाया जातेय... हा मुलगा बुद्धिमान आहे; पण खेळात बुद्धिमान आहे. त्याच्या बुद्धिमत्तेचा आपण आदर करायला हवा. त्याच्यावर पठडीतला अभ्यास लादू नका. त्याला उत्तम प्रशिक्षण द्या. त्याच्या पालकांना विश्वास द्या, त्याला विशेष सवलत द्या... बघा! हा मुलगा उद्या नक्कीच उत्तुंग कामगिरी करेल.’’
बोलताना कदाचित मी भावविवश झालो असेल. कारण सरांनी माझे खांदे थोपटले आणि मला म्हणाले, ‘‘नक्की! तुम्ही सांगताय यात मलाही तथ्य दिसतंय. मुलाला ओळखण्यात आमची सर्वांची चूक झाली. तुम्ही आलात म्हणून या मुलातला हिरा आम्हाला आज सापडला. मी नक्की यापुढे त्याला पैलू पाडण्याचा प्रयत्न करेन. हा हिरा भंग पावणार नाही, हे मी तुम्हाला आज प्रॉमिस देतो!’’
मुख्याध्यापकांनी हात पुढे केला. तो हात मी हातात घेतला. माझ्यासाठी आणि त्या मुलासाठी हे आश्वासन खूप अमूल्य होतं!
Web Title: Sanjeev Latkar Writes About Student Life In His School And Society
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..