एकाग्र होण्याची कसरत

आपण दोन प्रकारे एकाग्र होतो. पहिला प्रकार म्हणजे सहजपणे एकाग्र होतो. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते, पुन्हापुन्हा करावीशी वाटते.
Concentrated
ConcentratedSakal
Summary

आपण दोन प्रकारे एकाग्र होतो. पहिला प्रकार म्हणजे सहजपणे एकाग्र होतो. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते, पुन्हापुन्हा करावीशी वाटते.

वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, हे सांगणं जितकं सोपं आहे, तितकंच अमलात आणणं कठीण आहे. आपलं लक्ष, आपलं व्यवधान, आपले विचार आणि आपल्या भावना या इतक्या भरकटत असतात, की त्यांना गोळा करून एका जागी स्थिर बसवणं, हीच मोठी कसरत असते.

आपण दोन प्रकारे एकाग्र होतो. पहिला प्रकार म्हणजे सहजपणे एकाग्र होतो. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते, पुन्हापुन्हा करावीशी वाटते, तिथे आपलं मन आणि शरीर दोन्ही एकत्र धावते आणि मन एकाग्र होते. अर्थात आपण जेव्हा हरवून जातो किंवा आपली तंद्री लागते, त्याला एकाग्र होणं म्हणता येणार नाही. अशासाठी, की आपण तेव्हा आपल्या कौशल्याचा वापर करत नसतो किंवा ना आपल्या कौशल्यात भर टाकत असतो. आपण केवळ स्वतःला विसरलेलो असतो. ही एकाग्रता नव्हे. आपली इच्छा असो वा नसो, अशा वेळी आपल्या मनावर नियंत्रण आणून एकाग्र होणं, हे खरं कौशल्य आहे. हे खरंच तंत्र आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपलं सर्व लक्ष वर्तमानावर केंद्रित करावं लागतं. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, हे सांगणं जितकं सोपं आहे, तितकंच अंमलात आणणं कठीण आहे. आपलं लक्ष, आपलं व्यवधान, आपले विचार आणि आपल्या भावना या इतक्या भरकटत असतात, की त्यांना गोळा करून एका जागी स्थिर बसवणं, हीच मोठी कसरत असते. आपण जेव्हा तक्रार करतो, की माझं लक्ष लागत नाही किंवा मी एकाग्र होत नाही, तेव्हा प्रामुख्याने आपला भवताल आणि आपल्यातली आंतरिक स्थिती ही आपल्याला विचलित करत असते, अस्वस्थ करत असते, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनातली अस्थिरता दूर करावी लागते.

आता आपल्यालाच... आपल्याच... मनातली अस्थिरता दूर करायची आहे म्हटल्यावर आपल्याला स्वतःच्या मनाची समजूत घालावी लागते. मनाला आंजारावं आणि गोंजारावं लागतं. मनाला पाठबळ द्यावं लागतं. कधी मनाचं सांत्वन करावं लागतं, तर कधी मनावर कठोरपणे नियंत्रण आणावं लागतं. ही अवस्था ‘कळत असतं, पण वळत नसतं’, अशा प्रकारची असते. अमुक एका गोष्टीचे दुष्परिणाम हे माहिती असतात, बुद्धीला पटलेले असतात, आपल्या स्मरणात नोंदलेले असतात; परंतु ऐन वेळी आपल्या बुद्धीची निर्णयक्षमता कच खाते आणि आपण मनाचं ऐकून चुकीच्या गोष्टी करतो. याचं कारण, मन हे कायम मोहाकडे आकृष्ट होत असतं.

मोह एकाग्रतेचा शत्रू आहे. कारण तो तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देत असतो. तुम्ही जितक्यांदा त्याला दाबू पाहाल, तितका तो वर उसळी खातो आणि पुन्हा तुम्हाला खुणावू लागतो. आकृष्ट करतो. मोह म्हणजे एकतर तुमचा पूर्वीचा अनुभव असतो किंवा तो अनुभव घ्यायची अनिवार इच्छा असते. कित्येक विद्यार्थी मला सांगतात, की खूप ठरवलं तरीही मोबाईलकडे दुर्लक्ष करणे शक्य होत नाही आणि त्यांची नजर पुन्हा पुन्हा मोबाईलकडे जाते. मग ते मोबाईल उघडतात.

मोबाईलमधले मेसेज बघतात. स्टेटस तपासतात. गेम्स खेळतात. एकदा ते मोबाईलमध्ये गुरफटले, की त्यांचा वेळ वाया जातो आणि पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही. कारण डोळ्यापुढे पुस्तक किंवा हातात वही असली, तरी त्यांचं व्यवधान हे आता पूर्णपणे मोबाईलमधल्या गोष्टींवर केंद्रित होतं आणि ते तिथेच अडकून पडतात. मोबाईलमध्ये एखादा असा मेसेज किंवा अशी क्लिप असते, की ती त्यांना अस्वस्थ करते आणि ते त्याचाच विचार करू लागतात. त्यांच्या मनात जेव्हा आपण मोबाईल बघावा, हा विचार येतो, तत्क्षणी तो झटकून टाकण्याची इच्छा प्रबळ असावी लागते. इच्छा प्रबळ असेल, तरच ते मोबाईल उघडण्याच्या मोहावर मात करू शकतात. अनेक मुलांची ही इच्छा प्रबळ असते. एक क्षणभर त्यांनासुद्धा मोह झालेला असतो; पण ते त्या मोहावर मात करू शकतात; तर काही मुलांची इच्छा खूपच कमकुवत असते. इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते मोहाला वारंवार बळी पडतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की एकाग्र होण्यासाठी चांगल्या इच्छाशक्तीची गरज असते.

लहान मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अनुभवाचं गाठोडं हे तुलनेनं हलकं असतं. मोठ्या माणसांचे अनुभव हे अधिक गहन, गूढ असतात. त्यांना अनेक अनुभव हे अस्वस्थ करतात. अनुभवाचा पट मोठा असल्यामुळे भूतकाळातल्या अनेक घटना त्यांना आठवू शकतात. मानापमानापासून अनेक दुःखद आणि कटू आठवणी त्यांना अस्वस्थ करतात. दुःखात होरपळलेल्या गेलेल्या या व्यक्तींना त्यांचं दुःख पुन्हा पुन्हा आठवत राहतं. काही व्यक्ती या दुःखद स्मृतींना कायम इतक्या कवटाळून असतात, की त्यांना वर्तमानात आणणं हेच मोठं आव्हान बनून जातं. अशा प्रकारे सतत भूतकाळात रमणं, भूतकाळाभोवती रुंजी घालणे हे एकाग्रतेला बाधा आणणारं असतं. लहान मुलांचे अनुभव हेही अनेकदा तुलनेने लहान असले, तरी अस्वस्थता मात्र मोठीच असते. त्यामुळे ते त्यांच्या अनुभवविश्वात जेव्हा रमतात, तेव्हा अशा आठवणी त्यांनाही अस्वस्थ करतात. म्हणजे मोहाचा अनुभव घेण्याची अनिवार इच्छा ही मुलांच्याही एकाग्रतेमधील अडथळा ठरते...

विद्यार्थी जाणते असतील, तर त्यांना हळूहळू या मोहावर मात करण्यासाठी आपण प्रोत्साहित करायला हवं आणि मुलं जर लहान असतील, तर आपल्याला मुलांच्या मोहाची हाताळणी नीट पद्धतीने करायला हवी. तुम्ही मुलांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतलात, तर नंतरचा पूर्ण दिवस मुलं फक्त आणि फक्त मोबाईलचा विचार करण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यांचा अभ्यास तेवढा प्रभावी होईलच, याची खात्री नाही. म्हणजे हातात मोबाईल नसला, तरी मनात विचार मात्र मोबाईलचा आहे! हे मनातले नकारात्मक विचारच एकाग्रतेचे शत्रू असतात, हे लक्षात घेऊनच आपल्याला मोहाची हाताळणी करायला हवी. म्हणजे एकाग्रता हळूहळू साध्य होईल.

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com