एकाग्रता : निसर्गाची आणि माणसाची!

एकाग्रता ही निसर्गदत्त आहे. ती मानवनिर्मित नाही. म्हणजे असं, की प्राणी किंवा पक्षी जेव्हा शिकार करतात, तेव्हा ते आपल्या भक्ष्यावर स्वतःचं लक्ष पूर्ण एकाग्र करतात. ही त्यांची एकाग्रताच असते.
Concentration
Concentrationsakal
Summary

एकाग्रता ही निसर्गदत्त आहे. ती मानवनिर्मित नाही. म्हणजे असं, की प्राणी किंवा पक्षी जेव्हा शिकार करतात, तेव्हा ते आपल्या भक्ष्यावर स्वतःचं लक्ष पूर्ण एकाग्र करतात. ही त्यांची एकाग्रताच असते.

एकाग्रता ही निसर्गदत्त आहे. ती मानवनिर्मित नाही. म्हणजे असं, की प्राणी किंवा पक्षी जेव्हा शिकार करतात, तेव्हा ते आपल्या भक्ष्यावर स्वतःचं लक्ष पूर्ण एकाग्र करतात. ही त्यांची एकाग्रताच असते. त्यांची शारीरिक हालचाल, त्यांचे डोळे हे त्या बेसावध लक्ष्यावर इतके खिळलेले असतात, की आजूबाजूचे आवाज, आजूबाजूच्या गोष्टी या कशामुळेही त्यांचं लक्ष भंग पावत नाही आणि क्षणार्धात ते आपल्या भक्ष्यावर झडप घालतात. त्यांची शारीरिक हालचाल वयपरत्वे मंदावली, की त्यांना भक्ष्य मिळणार नाही. तशीच त्यांची एकाग्रता कमी झाली, तरीही त्यांना भक्ष्य मिळणार नाही. म्हणजेच जगण्यासाठी त्यांना एकाग्रता ही अत्यावश्यक असते.

कुठल्याही सर्वोत्तम प्रयत्नांची पूर्वअट ही एकाग्रता आहे. म्हणजेच एकाग्रतेमुळेच सर्वोत्तमता साध्य होते. सर्वोत्तमता आहे म्हणून माणूस स्वतःचं जीवन विकसित करू शकला आहे. आपण निसर्गाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं, की निसर्ग हा एका ठराविक चक्रातच फिरत असतो. माणूस मात्र या चक्राला भेदत असतो आणि सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करतो. उत्तमता आणि उत्तमतेचा ध्यास याचं इंधन म्हणजे एकाग्रता आहे. एकाग्रतेमुळेच तुम्ही तुमच्या प्रयत्नांचा दर्जा वाढवू शकता आणि प्रयत्नांचा दर्जा जेवढा वाढतो, तेवढी तुमची कामगिरी उत्तम होते आणि तुम्हाला उत्तमता प्राप्त होते.

निसर्ग हा एका लयीत, एका सुरात, एका तालात सुरू असतो. जोपर्यंत काही अरिष्ट येत नाही, मोठं संकट येत नाही, उदाहरणार्थ धरणीकंप, ज्वालामुखी, वादळ, अतिवृष्टी, दुष्काळ होत नाही, तोपर्यंत निसर्गाचं गाणं सुरूच असतं. निसर्ग हा बोअर होत नाही. कारण तो सतत रसनिर्मिती करत असतो. हॅपनिंग असतो. संकट आलं किंवा भीषण संकटाची चाहूल लागली, की निसर्गाची लय बिघडते. अवघं निसर्गाधारित विश्व विचलित होतं. दोन वर्षांपूर्वी येथे भीषण पूर आला होता, या कारणामुळे आज निसर्ग विचलित होत नाही किंवा पुढल्या वर्षी वादळ आलं तर काय, अशा भीतीमुळेही निसर्ग विचलित होत नाही. निसर्ग हा रोजच्या रोज जगत असतो. तो शंभर टक्के वर्तमानात असतो. निसर्ग कधीच शक्यतांचा विचार करत नाही किंवा त्याला चक्र भेदण्याची प्रेरणाही कधीच होत नाही. सीडलेस पेरू असावेत काय? सीडलेस द्राक्ष करावीत काय? कृत्रिम पाऊस पाडावा काय? असे प्रश्न निसर्गाला कधीच पडत नाहीत. ती त्याची गरजच नसते. निसर्ग हा त्याच्या गरजेनुसार आणि गरजेपुरताच जगत असतो. सर्वोत्तमतेचा गुण हा निसर्गाने बहुधा माणसासाठी सोडून दिला आहे.

कारण हेही खरं, की माणूस वगळता इतर कोणत्याही प्राण्याने आपल्या जीवनशैलीत किंवा कार्यशैलीत एक्सलन्स अर्थात सर्वोत्तमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. प्राण्यांची एकाग्रता ही त्यांना निसर्गाने दिलेल्या कौशल्यापुरतीच मर्यादित असते. मनुष्य वगळता (आणि मर्यादित प्रमाणात इतर काही प्राणी व पक्षी वगळता) इतर कोणतेही प्राणी स्वतःच्या बुद्धीचा सातत्याने विकास करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्या प्राण्यांच्या एकाग्रतेचा आणि कौशल्याचा स्तर हा अर्थातच प्राथमिक राहिला आहे. ते पिढ्यान् पिढ्या एकाच पद्धतीने शिकार करत आले आहेत. एकाच पद्धतीने जगत आले आहेत. एकाच पद्धतीने एकाग्र होत आले आहेत; मात्र माणसाची एकाग्रता ही निसर्गातून आली असली तरी पुढे ती त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, प्रयत्नांमुळे आणि कौशल्यामुळे विकसित होत गेली हे लक्षात घ्यायला हवं.

माणूस हा एकमेकांना मदत करत जगत आल्यामुळे, तो वृत्तीने सामाजिक असल्यामुळे एखाद्याकडे एकाग्रता नसेल किंवा तो कामगिरीने सुमार असेल किंवा त्याला काही अपरिहार्य मर्यादा असतील, तरी त्याच्या जगण्याची आणि त्याला जगवण्याची हमी ही इतर माणसांनी घेतलेलीच असते. कारण ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे तत्त्व आपण त्यागले असून ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व अंगिकारले आहे. आपले स्वतःचे काम दुसऱ्याकडून करवून घेण्याची कलाही माणसाकडेच आहे. माणूस दुसऱ्याला नोकरीवर ठेवतो. माणूस एकाग्रता विकतही घेऊ शकतो. निसर्ग कोणालाच नोकरीवर ठेवू शकत नाही. निसर्ग तुम्हाला जगवतो, पण जगवण्याची हमी कधीच घेत नाही. प्राणी हे विकसित झाले की एकमेकांना मदत करण्याचं थांबवतात. स्वतंत्र होतात. स्वतंत्र जगतात. स्वतंत्र शिकार करतात. त्यामुळे प्रत्येक प्राण्याला स्वतःची अशी एकाग्रता अंगी बाणवून घ्यावीच लागते. कौशल्य आत्मसात करावे लागते. त्यात आळस करून चालत नाही. संचय निसर्गाला अद्याप तरी सुचलेला नाही. माणसाचं तसं नाही. माणसाला संचय-कला ही उत्तमरीत्या अवगत झाली आहे आणि संचयामुळेच माणूस हा त्याच्या मूळ नैसर्गिक वृत्तीपेक्षा भिन्न झाला आहे. इतका, की संचय ही त्याची नैसर्गिक वृत्ती झाली आहे. तो महिन्याभराच्या रजेवर सहज जाऊ शकतो, त्याच्याबरोबर त्याची एकाग्रता आणि इतर कौशल्यही महिन्याभराच्या रजेवर जाऊ शकतात. जे निसर्गाला कधीच परवडणार नाही!

म्हणजे आपल्या असं लक्षात येईल, की निसर्गामध्ये आजही एकाग्रतेशिवाय आणि अर्थातच सावधतेशिवाय त्याचं चक्र चालू शकत नाही. प्राणी जगू शकत नाहीत. माणसाच्या बाबतीत मात्र तसं नाही. एकाग्रता ही माणसाच्या जगण्याची पूर्व अट नाही. ज्यांना एक्सलन्स साध्य करायचा आहे, आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्तम प्रयत्न करायचे आहेत, असे सेल्फ मोटिवेटेड लोक एकाग्रतेसाठी खूप धडपडत असतात. प्रयत्न करत असतात. कारण माणसाला अनेक आकर्षणे, अनेक विचार, अनेक प्रलोभनं, अनेक भयगंड असल्यामुळे त्याला एकाग्रतेचा सूर्य सहजपणे नजरेस पडत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

म्हणजे आपण आज असा विचार करायला हवा, की आपल्यात असलेली एकाग्रतेची नैसर्गिक प्रेरणा आपण विसरत चाललो आहोत का? आपल्यात एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्याला वेगळं मोटिवेशन का लागतं? ती एकाग्रता ही आपली तहान-भूक का नसते? माणसाला नुसती बुद्धी दिलेली नाही, तर सद्‌बुद्धीसुद्धा दिलेली आहे. या सद्‌बुद्धीचा वापर करून माणसाने स्वतःसाठी आणि समाजासाठी एक्सलन्स साध्य करण्याकरिता एकाग्रतेचा अंगीकार करायलाच हवा... बुद्धी, शरीर, इतर अवयवांप्रमाणेच माणसाला निसर्गाकडून एकाग्रताही प्राप्त झाली आहे; मात्र प्रत्येक माणसाने या एकाग्रतेचा अधिकाधिक वापर केला तरच त्याला स्वतःची कौशल्येही सर्वोत्तम करणं शक्य होईल...

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com