विश्वास हेच उत्तर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trust

मुलीचे वागणे खटकत असल्याने बाबांनी अबोला धरला होता. कारण होतं, तिच्याकडे सापडलेलं प्रेमपत्र. त्या पत्राविषयी मुलीनं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, तरीही बाबांचा विश्‍वास बसत नव्हता.

विश्वास हेच उत्तर!

मुलीचे वागणे खटकत असल्याने बाबांनी अबोला धरला होता. कारण होतं, तिच्याकडे सापडलेलं प्रेमपत्र. त्या पत्राविषयी मुलीनं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, तरीही बाबांचा विश्‍वास बसत नव्हता. मुलीचा बाप म्हणून त्यांना काळजी वाटत होती आणि याच काळजीने घराचं स्वास्थ्य बिघडलं होतं...

‘तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज?’’ माझ्या या प्रश्नावर सोनाचे बाबा गडबडले. आई चटकन म्हणाली, ‘‘लव्ह मॅरेज... कॉलेजमध्ये असतानाच आम्ही प्रेमात पडलो होतो...’’ मी हसून बाबांकडे पाहिलं. बाबा चपापले आणि म्हणाले, ‘‘आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती... आम्ही दोघांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मी पुढे मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि नंतर आम्ही लग्न केलं. स्वतःच्या पायावर स्थिर उभे झाल्याशिवाय लग्न करायचं नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं...’’ बाबांनी स्पष्टीकरण दिलं. ‘‘आणि आम्ही फायनल इयरला प्रेमात पडलो... शिक्षण जवळपास पूर्ण होत आलं होतं... बारावी हे काय वय आहे प्रेमात पडण्याचं?’’ बाबा उद्गारले.

मला आता बोलणं भागच होतं... ‘‘मला वाटतं तुम्ही जास्त पॅनिक झाला आहात. मुलीच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काळजी असणं स्वाभाविक आहे; पण तशीच काळजी सोनाच्या आजी-आजोबांनाही होतीच की तिची आई तुमच्या प्रेमात पडली तेव्हा! तुमच्याही घरचे काळजीत पडले असतील...’’ मी म्हणालो.

‘आमच्या दोघांच्याही घरी अगदी उशिरा कळलं. म्हणजे यांचा मॅनेजमेंट कोर्स पूर्ण होत आला होता... त्याच वेळी मला स्थळं सांगून यायला लागली. तेव्हा मग आमचं प्रेम आहे, हे सांगणं भागच होतं. दोघांच्याही घरी थोडा विरोध झाला; पण त्यानंतर दोघांच्याही आई-बाबांनी जराही वेळ न दवडता आमचं लग्न लावून दिलं...’, सोनाची आई म्हणाली.

‘तेव्हा तुम्ही एकमेकांना पत्र लिहीत होतात की नाही?’ मी हसून विचारलं.

सोनाचे बाबा आता थोडे नरमले होते. ‘हो! आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो; पण पत्रातली आमची भाषा खूपच सभ्य असायची...’ सोनाचे बाबा म्हणाले.

‘तुम्ही सोनाशी यासंदर्भात व्यवस्थित बोलला आहात का? तिची बाजू नीट ऐकून घेतली आहे का? आणि तिची बाजू तुम्हाला नीट समजली आहे का? खरंच तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही तिच्यासोबत जे वागताय ते योग्य आहे?’ मी बाबांना थेट प्रश्न केला.

सोनाच्या आई-बाबांशी बोलताना आईने बरीच माहिती दिली होती. या सगळ्या विषयावरचं सोनाचं म्हणणं सांगितलं होतं. सोना अगदी क्लियर होती. तिची या विषयातली स्पष्टता खरोखरच कौतुकास्पद होती. त्या पार्श्वभूमीवर मी बाबांना म्हणालो, ‘‘सोना तुमच्याशी जे बोलली ते मी नीट समजून घेतलं... तिचं म्हणणं काय आहे हे मला थोडं समजलं आहे... तिच्या डोक्यात प्रेमबीम असं अजिबात काहीच नाहीये. तिला तिची करिअर महत्त्वाची वाटते आणि आजकालच्या मुलांप्रमाणे तीही खूप प्रॅक्टिकल आहे. तिने तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, की तो मुलगा तिच्या प्रेमात पडला आहे आणि तो तिच्या प्रेमात पडला, तर ही त्याबद्दल काहीच करू शकत नाही! सोनाने खूप छान पद्धतीने त्याला समजावले की तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही किंवा सध्या तिची ती प्रायोरिटीपण नाही... पण आपल्या मैत्रीत बाधा येणार नाही... ती तशीच पुढे सुरू राहील... मला असं वाटतं की तिचं हे उत्तर तिची क्लॅरिटी दाखवणारे आहे. तुम्हाला तिच्या उत्तराचा अभिमान वाटायला हवा. ती परोपरीनं सांगते आहे की मी हे पत्र जपून ठेवलं... कारण आपल्यावर कुणीतरी प्रेम करतोय ही भावना तिला सुखाची वाटली. आपण तिच्या मनाचा हा हळुवार कोपरा समजून नाही घेतला, तर तो तिच्यावरचा मोठा अन्याय ठरेल...’’ मी खूप मनापासून बोललो.

आईला ते पटलं. कारण आईला सोनाची भूमिका आधीपासूनच पटलेली होती; पण बाबांना कसं कन्व्हिन्स करायचं हा तिच्यापुढे प्रश्न होता. बाबा अजूनही सत्य स्वीकारायला तयार नव्हते. आपला मुद्दा रेटताना ते म्हणाले, ‘मी तिला म्हटलं, त्या मुलांच्या पालकांना आपण भेटून चांगलं खडसावू... की हे तुमच्या मुलाचं काय चाललंय? तुमच्या मुलाकडे लक्ष नाही... तो असं कसं माझ्या मुलीला प्रेमपत्र लिहू शकतो... तर सोना नको म्हणाली... सोनाच्या मनातही त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, असं मला वाटतं! ती म्हणते प्रेम वगैरे नाही म्हणून... पण माझा विश्वास नाही...’

‘विश्वास ठेवावा लागेल! तुम्ही जर सोनावर या संदर्भात सतत अविश्वास दाखवत राहिलात तर तिचा स्वतःवरचा... चांगल्यावरचा... सत्यावरचा विश्वास उडेल... सध्या तुम्हाला तिच्याबद्दल वाटत असलेला अविश्वास हा काळजीपोटी नव्हे, तर भीतीतून निर्माण झाला आहे. तुम्हाला एक प्रकारची भीती वाटते आहे किंवा टेन्शन आहे, की ही परस्पर प्रेम करेल... परस्पर लग्न करेल किंवा ते दोघं परस्पर भेटत असतील... तुमच्या डोक्यात सतत तोच विचार घोळतोय... बरोबर ना?’

माझ्या थेट प्रश्नावर बाबा सौम्य झाले. त्यांचा आवाज एकदम मृदू झाला. ते म्हणाले, ‘‘मुलीचा बाप म्हणजे काय असतं ते फक्त मुलीचा बाप झाल्यावरच कळतं! आजूबाजूला इतक्या वाईट गोष्टी सुरू असतात, इतक्या भयंकर गोष्टी वाचायला आणि ऐकायला मिळतात, की बापाला आपल्या मुलीची काळजी वाटतेच... आमच्या हिला सोनाबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच वाटत असतं; पण मला प्रेमाबरोबरच तिची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिचं पाऊल चुकीचं पडायला नको... तिच्याकडून काही चुकीचं घडायला नको, ज्यांनं तिचं भविष्य उद्ध्वस्त होईल... यासाठी मी सतत डोळ्यात तेल घालून जागा असतो... हे प्रेमपत्र प्रकरण घडल्यापासून माझी झोप उडाली आहे...’, बाबांच्या डोळ्यांच्या कडा किंचित पाणावलेल्या वाटल्या.

‘तुम्हाला सतत वाटणाऱ्या काळजीमुळे सगळ्या घराचं स्वास्थ्य जर बिघडत असेल, तर अशा काळजीचा उपयोग काय, तुम्हीच मला सांगा? तुम्हाला तिच्याबद्दल ठाम विश्वास वाटलाच पाहिजे... तुम्हाला जेवढा ठाम विश्वास वाटेल तेवढं सोनाचं वागणं अधिक विवेकी बनेल... ती खूप विवेकानं वागते आहे... तुम्ही त्या मुलाच्या घरी जायला निघाला तेही चुकीचंच आहे. कारण त्यातून ती एक चांगला मित्र गमावू शकते आणि तिची आत्मप्रतिमा आणि आत्मविश्वास खच्ची होऊ शकतो... तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा... ती जर मनापासून म्हणते की माझं प्रेम नाही, तर ते मान्य करा... तिच्या डोळ्यात डोळे घालून... तिचा हात हातात धरून हे तिला सांगा, की आमचा तुझ्यावर विश्वास आहे. तू विवेकानं वागशील.. सगळं समजून उमजून मगच कोणताही निर्णय आयुष्यात घेशील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे... तुम्हाला मी नक्की सांगतो की या संवादाचा तिच्यावर अधिक सखोल परिणाम होईल. तुमच्या काळजीला.. तुमचा स्वतःवरचा आणि तिच्यावरचा विश्वास हे उत्तर आहे...’ असं म्हणून मी बाबांचा हात हातात घेतला. तेही बराच वेळ माझा हात हातात धरून उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या अश्रूला मोकळी वाट करून दिली...(उत्तरार्ध)