
पुन्हा एकदा ससा आणि कासव!
लहानपणी आपण आजी-आजोबांकडून ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्या आपण आपल्या मुलांना सांगत असतो. अर्जुनही त्याच्या बाबाने ऐकवलेल्या गोष्टी त्याची मुलगी प्रियाला सांगायचा आणि प्रिया गोष्ट ऐकत-ऐकत झोपून जायची. असेच एकदा अर्जुनने ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तिला सांगितली. गोष्ट संपली तरी ती झोपली नव्हती. अर्जुन अस्वस्थ झाला. त्याला वाटलं ही गोष्ट प्रियाला आवडली नसावी. पण काही क्षणानंतर तिने या गोष्टीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांनी अर्जुनची झोप उडाली. तिने विचारलेल्या प्रश्नांवरून, अस्वस्थ अर्जुनने त्याच्या बाबाला लिहिलेले पत्र...
प्रिय बाबा,
तुम्हाला हे पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे तुमची नात आणि अर्थातच माझी मुलगी प्रिया हिने मला कालपासून विचारात पाडले आहे... अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने मला इतके प्रश्न विचारले की, मी थक्क झालो, निरुत्तर झालो आणि अंतर्मुखही झालो. काल ती मला म्हणाली, ‘बाबा, मला एखादी गोष्ट सांग!’ मी घरात असलो की रात्री झोपता झोपता तिला गोष्ट सांगतो. कधी-कधी गंमत म्हणून ती अगदी लहान असताना ज्या गोष्टी सांगायचो, त्या गोष्टी पुन्हा सांगतो. कारण लहानपणी ऐकलेल्या जुन्या गोष्टी पुन्हा ऐकायला तिला खूप आवडतात.
मी तिला विचारलं, ‘ससा आणि कासवाची गोष्ट सांगू का?’
ती ‘हो’ म्हणाली.
म्हणून मी तिला ससा आणि कासवाची गोष्ट रंगवून रंगवून सांगितली. आजच्या आधुनिक जगामध्ये स्पर्धेचे महत्त्व किती आहे, आपल्याला सतत कसं सावध राहायला पाहिजे, बेसावधपणा आणि अति आत्मविश्वास कसा घातक ठरतो वगैरे वगैरे मी तिला गोष्टीत पेरत सांगू लागलो. कथेत काळानुरूप थोड्या आधुनिक गोष्टीही पेरल्या.
मला आठवतंय, मलाही ससा आणि कासवाची गोष्ट ऐकायला खूप आवडायची. तुम्ही मला ती रंगवून सांगायचात. त्या वेळेला माझ्या डोळ्यांपुढे अक्षरश: ते जंगल, ससा आणि कासवाची शर्यत, त्यातला हिरवा चारा, सशाचं हिरवा चारा खाणं, मग पाणी पिणं व झोपणं आणि कासवाचं संथ चालीने पुढे पुढे जात जिंकणं... हे सगळं खूप आवडायचं. अक्षरशः डोळ्यांपुढे उभं राहायचं... बहुदा मी तुमची शैली उचलली असावी. कारण माझं गोष्ट सांगणंही प्रियाला खूप आवडतं.
माझी गोष्ट सांगून झाली.
मला वाटलं प्रिया झोपली असेल, पण प्रिया चक्क जागी होती. डोळे सताड उघडे होते आणि ती कसला तरी विचार करत आढ्याकडे बघत होती. मी तिला विचारलं, ‘काय झालं?’ तिने मला विचारलं, ‘‘बाबा, पण मला तू एक सांग... सशाने कासवाशी पैज लावलीच कशाला? आणि कासवाने तरी सशाशी पैज लावावी कशाला? ससा वेगळा.. कासव वेगळं.. मग या दोघांनी एकमेकांशी का बरं शर्यत लावली असेल?’
तिच्या या प्रश्नावर मला उत्तर सुचलं नाही. तेव्हा मला कळलं की प्रिया माझ्याहून खूप हुशार आहे! मी तुम्हाला हा प्रश्न कधीच विचारला नाही!! बहुदा आमची पिढी तुम्ही जे सांगाल त्यावर विश्वास ठेवणारी होती. प्रतिप्रश्न न करणारी होती, पण प्रियाची पिढी तशी नाही.
प्रिया एवढ्यावरच थांबली नाही.
‘इट्स नॉट फेअर बाबा... कासवाला चांगलं पोहता येतं आणि सशाला चांगलं पळता येतं... मग कासवाने इतर कासवांबरोबर पोहण्याची शर्यत लावायला पाहिजे होती आणि सशाने इतर ससा मित्रांबरोबर धावण्याची शर्यत लावायला पाहिजे होती...’
खिडकीबाहेर बघत प्रियाला मुद्दे सुचत होते आणि मी तिला बोलायला प्रोत्साहन देत होतो. मला त्या क्षणी माझ्या सहा वर्षांच्या मुलीचा खूप खूप अभिमान वाटला! जे विचार माझ्या डोक्यात कधी आलेही नाहीत, असे मूलभूत विचार ती अगदी सहजपणे मांडत होती. तिला खूपच चांगली स्पष्टता आहे याचा प्रत्यय मला काल आला.
‘कासव शाकाहारी आहे ना?’
प्रियाच्या प्रश्नावर मी होकार दिला.
‘ससापण शाकाहारी आहे ना?’
तिच्या पुढच्या प्रश्नावर मी ‘हो’ म्हटलं.
‘मग दोघेही शाकाहारी असतील तर दोघेही फ्रेंड्स झाले ना? मग ते कशाला शर्यत लावतील एकमेकांशी? ते तर फ्रेंड्स आहेत!’
बालपणापासून माझ्या मनात जपलेल्या ससा आणि कासवाच्या गोष्टीला प्रिया सुरुंग लावत होती...
‘तुला माहितीये, कासव ८० वर्षें जगतो आणि ससा फक्त आठ वर्षें जगतो... शर्यत झाली तेव्हा कासवाचं वय काय होतं आणि सशाचं वय काय होतं?’
प्रियाच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.
मीही हा प्रश्न तुम्हाला कधी विचारला नाही... किंबहुना मला तो सुचलाच नाही. मी अधिक खोलात गेलो नाही, पण कासव सरासरी किती वेगानं चालतं आणि ससा सरासरी किती वेगाने पळतो हे तिला नक्की ठाऊक असणार! तिची गाडी दोन्ही प्राण्यांच्या सरासरी वेगाकडे जाऊ नये म्हणून मी तिला कौतुक केल्यासारखं म्हटलं, ‘प्रिया, तू करतेस तसा विचार मी कधीच केला नाही गं!’
तिला माझ्या कौतुकाने काहीच फरक पडला नाही. ती अजून कसला तरी विचार करत राहिली.
‘तू कुठे शिकलास ही गोष्ट?’ असं प्रियाने मला थेट विचारलं, तेव्हा बाबा, मी तुमचं नाव सांगून टाकलं! त्यावर प्रियाने विचारलं, ‘आजोबांनी स्वतः ही शर्यत पाहिली का?’
तुम्हीसुद्धा ही शर्यत पाहिलेली नाही, असं खरंखुरं उत्तर मला द्यावंच लागलं. त्यावर प्रिया समजूतदारपणे आणि माझी समजूत काढल्यासारखी म्हणाली, ‘म्हणजे बाबा! ही स्टोरी आहे रे... ही खरी नाही... ही नुसतीच गोष्ट आहे... स्टोरी... खोटी खोटी... परी राणी सारखी...’, पण एवढ्यानेही तिचं समाधान झालं नाही. मी तिच्या झोपण्याची वाट बघत होतो आणि प्रिया मात्र ससा व कासवाच्या गोष्टीतून काहीतरी शोधत होती. ‘आणि शेवटी ती शर्यत होती ना रे... म्हणजे कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार... तूच म्हणतेस ना की प्रत्येक वेळेला आपणच जिंकायला पाहिजे, असं नाही... कधी तरी समोरचा जिंकतो... कधीतरी आपण जिंकतो... हरलो म्हणून सॅड वाटून घ्यायचं नाही... हरलो तर हरलो... पुन्हा खेळायचं... रडायचं नाही... चिडायचं नाही..’
प्रियाची विचारशक्ती पाहून मी आश्चर्यचकित झालो!
बाबा, मला वाटतं की आपल्याला गोष्टी आता बदलायला हव्यात. प्रियाला गोष्ट सांगण्यापूर्वी आता प्रियासारखा विचार करायचा आणि मगच गोष्ट सांगायची हे मी ठरवून टाकलंय. तुम्हाला जर अशा काही चांगल्या गोष्टी आठवत असतील, ज्या मला निरुत्तर करणार नाहीत, तर अशा गोष्टी मला कृपया कळवा.
आणि अजून एक बाबा.
तुम्हाला बहुदा तुमच्या वडिलांनी, म्हणजे आजोबांनी ही गोष्ट सांगितली असणार. प्रियाला जे प्रश्न पडले, ते तुम्हाला कधी पडले का हो?
तुमचा
अर्जुन
sanjeevlatkar@hotmail.com
Web Title: Sanjeev Latkar Writes Rabbit And Turtle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..