व्यक्तिमत्वविकासाच्या शोधात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

search of personality development

आईचं म्हणणं आहे की, मुलीनं डान्स करायला हवा, वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायला हवा, स्विमिंग करायला हवं. त्यामुळे तिच्यात फरक पडेल. मुलगी यातलं काहीच करत नाही.

व्यक्तिमत्वविकासाच्या शोधात...

आईचं म्हणणं आहे की, मुलीनं डान्स करायला हवा, वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायला हवा, स्विमिंग करायला हवं. त्यामुळे तिच्यात फरक पडेल. मुलगी यातलं काहीच करत नाही. मोठ्या मुलाचं तसंच आहे... त्याचं म्हणणं की मला यातलं काहीच करायचं नाही... मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मुलांना भेटायला बोलावलं...

काही दिवसांपूर्वी एक फोन आला. फोनवर बाई बोलत होत्या. माझ्या मित्र परिवारातून त्यांना माझा नंबर मिळाला, त्यामुळे त्यांनी फोन केला. माझं नाव त्यांनी खात्री करून घेण्यासाठी उच्चारलं. मी होय म्हणून प्रतिसाद दिला...

‘तुम्ही मुलांचं ग्रुमिंग करता का?’, असा प्रश्न त्यांनी मला विचारला.

मी त्यांना म्हटलं, ‘आपलं नेमकं कोणत्या स्वरूपाचं काम आहे, ते प्लीज सांगाल का?’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘माझ्या दोन्ही मुलांचं ग्रुमिंग मला करायचं आहे... दोघेही अतिशय मागे-मागे राहतात... त्यांना स्मार्ट बनवायचं आहे... त्यांना समाजात कसं वावरायचं, हेच कळत नाही...’

असं म्हणून त्यांनी मुलांबद्दल बरीच माहिती दिली.

बाईंचा मुलगा बारावी उत्तीर्ण होऊन सीनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता, तर मुलगी अकरावीला होती. दोन्ही मुलं अभ्यासात बरी प्रगती करत होती. घरचं सगळं चांगलं होतं. मुलांचे वडील वरिष्ठ सरकारी कर्मचारी होते. बाईंना फावल्या वेळेत अनेक छंद जोपासता येत होते. त्यांचं वाचन चांगलं होतं. नाटक आणि चित्रपटांचा आनंद त्या घेत असत. समाजजीवनात त्या क्रियाशील होत्या. अनेक संस्थांच्या, क्लबच्या मेंबर होत्या. वेगवेगळ्या सभासमारंभांमध्ये त्यांना पतीबरोबर जावं लागे. तेथेही त्यांची उत्तम छाप पडे... बाईंनी पूर्वी स्वतः व्यक्तिमत्त्व विकासाचा क्लास केला होता. त्यांच्या नातलगांमध्ये आणि मित्रपरिवारामध्ये काही मुलांनी असे क्लास किंवा कार्यशाळा केल्या होत्या. त्याचा त्यांनाही फायदा झालेला जाणवत होता... वगैरे... एवढी माहिती बाईंनी मला दिली.

मी त्यांना म्हटलं, ‘तुमचं जे म्हणणं आहे, त्याच्याशी तुमचे पती म्हणजे मुलांचे बाबा सहमत आहेत का?’

या प्रश्नावर त्या थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या, ‘दोन्ही मुलं यांच्यावरच गेली आहेत.. आमचे हेही मागे-मागेच राहतात.. आपली छाप पडावी, आपलं व्यक्तिमत्त्व लोकांच्या लक्षात राहावं, यासाठी तेही काही करत नाहीत. आजकालच्या जगात पर्सनॅलिटीवर सगळं चालतं.. पण आमच्या ह्यांना सांगणार कोण? ते वरिष्ठ पदावर आहेत म्हणून त्यांना मान मिळतो; पण खरं सांगायचं तर त्यांनाही व्यक्तिमत्त्व विकासाची गरज आहे...’

‘म्हणजे एकाच वेळी तिघांचं ग्रुमिंग करायचं आहे की काय?’ मी काळजीने विचारलं.

त्यावर त्या म्हणाल्या, ‘नको नको! आधी मुलांचं करू... तुम्ही फीची काळजी करू नका. मुलं उत्तम प्रकारे ग्रुम झाली पाहिजेत...’

मी त्यांना म्हटलं, ‘माफ करा.. पण मी अशा प्रकारचं बाह्य ग्रुमिंग फारसं करत नाही.. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा तो एक जाता जाता करण्यायोग्य असा नगण्य भाग आहे. त्यावर व्यक्तिमत्त्व विकास अवलंबून नसतो...’

त्या बाईंनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. पण त्यांना फारसा उलगडा झाला नाही. फोनवर किती खुलासे आणि स्पष्टीकरण देत राहणार? त्यालाही मर्यादा होत्याच... मग मीही त्यांना म्हणालो, ‘असं करा! मी आपल्या दोघांनाही भेटीन.. तुम्ही येत्या रविवारी सकाळी मला येऊन भेटा... तेव्हा आपण बोलू..!’

त्यांनी ते मान्य केलं.

‘मुलांना घेऊन येऊ का?’, असं त्यांनी फोन ठेवता ठेवता विचारलं. त्यावर मी म्हणालो, ‘नको! इतक्यात नको... आपली भेट झाल्यावर त्याविषयी ठरवता येईल...’

ठरल्याप्रमाणे बाई आणि त्यांचे पती मला येऊन भेटले. साधारण फोनवर जे त्यांनी सांगितलं, तेच त्यांनी प्रत्यक्ष भेटीत विस्तृत स्वरूपात सांगितलं. बाईंच्या पतींना हे फारसं मान्य नव्हतं.

ते म्हणाले, ‘मुलं बरी आहेत अभ्यासात... त्यांचं त्यांच्या वकूबानुसार ठीकठाक चाललं आहे. त्यांना मोजके मित्र-मैत्रिणीही आहेत; पण हिचं म्हणणं असं, की मुलीनं डान्स करायला हवा, वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायला हवा, स्विमिंग करायला हवं, मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जायला हवं, शॉपिंग करायला हवं... हिला असं वाटतंय, की त्यामुळे आमच्या मुलीच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडेल. पर्सनॅलिटी आकर्षक होईल. चारचौघात तिची छाप पडेल... मुलगी यातलं काहीच करत नाही. तिचं ती काही ना काही करत असते. पण फारशी मिसळत नाही... मोठ्या मुलाचं तसंच आहे... हिने त्याला एटिकेट्सच्या क्लासलाही घातलं... म्हणजे कपडे कसे घालायचे? जेवताना काटे चमचे कसे वापरायचे? इंग्रजी संभाषण अधिक चांगल्या पद्धतीने कसं करायचं? पण तो दहा-बारा दिवसातच कंटाळला! त्याचं म्हणणं की मला यातलं काहीच करायचं नाही... मला इंटरेस्ट नाही... त्यामुळे ही नाराज झाली...’

त्यावर बाई म्हणाल्या, ‘मी एकटीनं सांगून काय होणार आहे. दोघांना त्यांच्या बाबांनी सांगितलं तर ते नक्की ऐकतील... पण बाबांनाच यापैकी कशातच इंटरेस्ट नाही. त्यामुळे मुलांनाही नाही... तुम्ही मला सांगा, मी त्यांच्या वाईटाचं सांगतेय का? हे सगळं केल्याने मुलांचा पुढच्या आयुष्यात फायदाच होईल ना? मुलांची पर्सनॅलिटी किती चांगली होईल, तुम्हीच मला सांगा!’

मी दोघांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घेत होतो.

बाबांचं थोडक्यात म्हणणं असं, की मुलांना त्यांच्या कलाने घ्यावं. त्यांनी एखादी गोष्ट मागितली, तर ती त्यांना द्यावी; पण त्यांच्या मानगुटीवर बसू नये. तर आईचं म्हणणं असं की आजकालच्या समाजात वावरताना व्यक्तिमत्व विकास ही अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. ज्यामुळे माणसाची छाप चांगली पडते. माझ्या दोन्ही मुलांची तशी पडायला हवी. त्यांना एकदा गोडी लागली, की ते व्यक्तिमत्व विकासात इंटरेस्ट घेतील आणि त्यांचा चांगला व्यक्तिमत्व विकास होईल. कुठे पार्टीला गेलो... गेट-टुगेदरला गेलो... लग्नसमारंभांना गेलो, तर मुलांना आत्मविश्वास येईल. आत्मविश्वास आल्यावर ती अधिक मनमोकळेपणे बोलतील. लोकांमध्ये मिसळतील. सध्या त्यांचा आत्मविश्वास कमी आहे...

‘मुलांची नावं काय आहेत तुमच्या?’, मी विचारलं.

‘मोठा रोहित आणि धाकटी रीमा...’ बाईंनी सांगितलं.

‘तुम्ही दोघे जे म्हणताय ते माझ्या लक्षात आलंय... मला तुमच्या दोन्ही मुलांना... म्हणजे रोहित आणि रीमाला लवकरात लवकर भेटायचंय... कधी भेटता येईल?’, मी विचारलं.

भेटीची वेळ ठरली. मी रोहित आणि रीमाला भेटण्याची वाट पाहू लागलो... रोहित आणि रिमा यांना खरोखरच व्यक्तिमत्व विकासाची गरज होती का? की ती निव्वळ आईची अपेक्षा होती?

आपण वाचूया पुढल्या भागात...