एका विद्यार्थ्याचा प्रेमभंग!

दीपक हुशार होता. त्याचे पालक मध्यमवर्गीय. त्यांनी दीपकच्या शिक्षणासाठी खरोखरच खस्ता खाल्ल्या होत्या. खूप खर्च केला होता.
Love Breakup
Love BreakupSakal
Summary

दीपक हुशार होता. त्याचे पालक मध्यमवर्गीय. त्यांनी दीपकच्या शिक्षणासाठी खरोखरच खस्ता खाल्ल्या होत्या. खूप खर्च केला होता.

दीपक हुशार होता. त्याचे पालक मध्यमवर्गीय. त्यांनी दीपकच्या शिक्षणासाठी खरोखरच खस्ता खाल्ल्या होत्या. खूप खर्च केला होता. एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या करिअरवर त्यांची भिस्त होती. एक पालक म्हणून त्यांना असं वाटत होतं की, दीपकने आपल्या करिअरमध्ये उत्तुंग कामगिरी करावी आणि आयुष्यात सेटल व्हावं, अशी सर्वसाधारण पालकांप्रमाणे त्यांचीही अपेक्षा होती; पण फायनलची परीक्षा जवळ आली असतानाच दीपकने थेट सांगून टाकलं, मला परीक्षा द्यायची नाहीये, बस्स! त्याच्या या निर्णयामागचं भावविश्‍व जाणून घ्यायला हवं...

मला वाटत नाही, की मी ही परीक्षा देऊ शकेन, असं जेव्हा दीपकने त्याच्या पालकांना सांगितलं, तेव्हा पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. दीपकचा निर्णय पालकांसाठी अतिशय अनपेक्षित होता. पालकच कशाला, दीपकचे शिक्षक, त्याच्या क्लासचे संचालक आणि शिक्षक या सगळ्यांनाच हा एक धक्का होता. दीपक स्वतःच्या निर्णयाबद्दल फारसं कोणाशी काही बोलला नाही. आपण असा निर्णय का घेतोय, याचं त्यांनं स्पष्टीकरण केलं नाही. खूप खोदून विचारल्यानंतर तो एवढेच सांगत राहिला, की ‘‘मला जास्त काही विचारू नका. मला परीक्षा द्यायची नाहीये, बस्स!’’

त्याचा चिडचिडा झालेला स्वभाव पाहून त्याच्या आई-वडिलांनी गप्प राहणं पसंत केलं; तरीही त्यांच्या डोक्यामध्ये सतत उलटसुलट विचार येत. त्यातला महत्त्वाचा विचार हाच होता की दीपकने असा निर्णय का घेतला? दीपक हुशार होता. आतापर्यंतचा त्याचा ट्रॅक उत्तम होता. मागच्या परीक्षेत त्याला थोडे मार्क कमी पडले होते हे खरं; पण त्यानंतर त्याने अभ्यास भरूनही काढला होता. मग असं काय घडलं, की दीपक फायनलच्या परीक्षेतून अचानक बाहेर पडला?

योगायोग असा घडला की, दीपकच्या शिक्षकांना मी ओळखत होतो. त्यांनी माझं वर्कशॉप अटेंड केलं होतं. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मी दीपकशी एकदा बोलावं अशी विनंती केली.

मी म्हटलं, मी दीपकला भेटायला तयार आहे; पण दीपक मला भेटायला तयार आहे का, तेवढं विचारून पाहा! दीपकच्या संस्थेमध्ये माझं लेक्चर पूर्वी झालेलं होतं आणि दीपक श्रोत्यांमधला एक होता. त्यामुळे असेल कदाचित; पण त्याने मला भेटायची तयारी दाखवली. माझ्यासाठी - तो मला भेटायला... म्हणजेच संवादासाठी तयार होणे - ही खूप महत्त्वाची गोष्ट होती.

दीपकचे पालक हे मध्यमवर्गीय घरातून आलेले होते. त्यांनी दीपकच्या शिक्षणासाठी खरोखरच खस्ता खाल्ल्या होत्या. त्याग केला होता. परवडत नसतानाही खूप खर्च केला होता. भरपूर गुंतवणूक केली होती. दीपक हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या करिअरवर त्यांची स्वतःची भिस्त होती. एक पालक म्हणून त्यांना असं वाटत होतं की, दीपकने आपल्या करिअरमध्ये उत्तुंग कामगिरी करावी आणि आयुष्यात सेटल व्हावं. आपल्याला जे आयुष्य जगावं लागलं ते त्याला जगावं लागू नये, अशी सर्वसाधारण पालकांप्रमाणे त्यांचीही अपेक्षा होती. त्यामुळे दीपकच्या करिअरबद्दल, त्याच्या परीक्षेबद्दल, विषेशत: फायनल परीक्षेबद्दल घरात थोडसं तणावाचं किंवा चिंतेचे वातावरण असायचं. परीक्षेचा विषय निघाला की सगळे गंभीर व्हायचे. दीपकवर याचा कदाचित नकारात्मक तणाव आलेला असू शकत होता...

‘तुझ्या बाबतीत जे घडलं आहे, ते कॉमन आहे की अनकॉमन?,’’ असा प्रश्न मी समोर खुर्चीत बसून अस्वस्थपणे पाय हलवत बसलेल्या दीपकला विचारला. दीपक या प्रश्नावर किंचित गोंधळात पडला आणि माझ्याकडे प्रश्नार्थक पाहू लागला.

‘माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नसलं तर राहू दे...’’, असं म्हणून मी थांबलो.

पण आता दीपक उत्तर द्यायचा थांबणार नव्हता. दीपक पाय हलवायचा थांबला आणि म्हणाला, ‘‘माझ्या बाबतीत जे घडलं ते कॉमन असेल कदाचित; पण माझ्यासाठी ते धक्कादायक आहे! तुम्हाला समजणार नाही, माझ्यावर काय प्रसंग ओढवला आहे ते! मी खूप दुःख आणि यातना भोगतो आहे...’’ हे सांगताना दीपकच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. त्यानं डोळ्याच्या कडा पुसल्या. थोडं पाणी प्यायला आणि हाताची घडी घालून माझ्यापुढे शांतपणे बसून राहिला. त्याची नजर जमिनीवर खिळलेली होती.

‘आयुष्यातला पहिला नकार कठोरपणे पचवावाच लागतो दीपक!’’

माझ्या या वाक्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला असावा, कारण त्यानं चमकून माझ्याकडे वर पाहिलं! मी त्याचं वर्म जणू ओळखलं होतं!!

‘तुम्हाला कोणी सांगितलं?’’ दीपकच्या नजरेत अनेक शंका होत्या, अनेक प्रश्न होते.

त्याच्या आयुष्यातलं सर्वोच्च गुपित मला इतक्या सहजासहजी कळेल, असं त्याला वाटलं नव्हतं. त्यामुळे तो स्तब्ध झाला होता.

‘दीपक! तू तुझ्याच बाजूने विचार करतोयस. तू थोडा तिच्या बाजूनेही विचार कर ना! प्रत्येकाची काही अपरिहार्यता असते, काही नाईलाज असतात... ते आपण समजून घ्यायचे असतात...’’ माझ्या या वाक्याने तो अधिकच अस्वस्थ झाला.

न राहवून शेवटी त्यानं विचारलं, ‘‘तुम्हाला ती भेटून गेली आहे का?’’

दीपक त्याच्याच वर्गातल्या एका मुलीवर निस्सीम प्रेम करत होता. तिची दीपकशी चांगली मैत्री होती; पण घरच्या दबावामुळे असेल किंवा सामाजिक मर्यादांमुळे, पण तिने आपलं प्रेम व्यक्त केलेलं नव्हतं, असं त्याला वाटत होतं. दीपक तिचं प्रेम गृहीत धरून चालला होता आणि त्याला अशी खात्री होती, की फायनलची परीक्षा झाल्यानंतर त्यानं तिला विचारताच ती हो म्हणेल आणि परीक्षेला तर केवळ काही महिन्यांचा अवधी होता. म्हणून दीपक निर्धास्त होता; पण तिथे चांगलं स्थळ आलं, म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचं लग्न अचानक ठरवूनही टाकलं. मुलगा परदेशातून अचानक आला होता. त्यामुळे लगबगीने साखरपुडा झाला आणि तो मुलगा पुन्हा परदेशी निघून गेला. आता फायनल परीक्षा झाल्यानंतर ती मुलगी त्या मुलासह बोहल्यावर चढणार होती. त्या मुलीचं माहीत नाही, पण दीपकसाठी मात्र हा घोर प्रेमभंग होता. त्याला या प्रेमभंगाचं नैराश्य आलं होतं. काहीच करावंसं वाटत नव्हतं. म्हणून त्याला परीक्षाही द्यावीशी वाटत नव्हती. त्याच्या डोक्यात अनेकदा भलतेसलते विचार येत. तो विचारांनी आणि भावनेने भरकटला होता. त्याचं अभ्यासावर अजिबात लक्ष नव्हतं. तो वर्गात बसलेला असूनही वर्गात नसल्यासारखी स्थिती होती. त्याची अभ्यासावरची पकड पूर्णपणे सुटली होती.

त्याच्या घरच्यांना यापैकी कशाचाच थांगपत्ता नव्हता. दीपकने ही मनातली गोष्ट त्याच्या जवळच्या मित्रांनाही कधी बोलून दाखवली नाही. जेव्हा त्याने आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा त्याला अपेक्षा होती, की ती मुलगी येऊन आपल्याला भेटेल आणि आपण परीक्षा द्यावी म्हणून गळ घालेल; पण ती मुलगी काही आली नाही. त्यामुळे दीपक आणखीनच निराशेच्या गर्तेत रुतला गेला. आता त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता.

दीपकची सर्व कहाणी मी ऐकून घेतली. त्यानेही कोणताही आडपडदा न ठेवता मला सर्व सत्य मनापासून सांगितलं. मग मी दीपकशी सविस्तर बोललो आणि त्याला म्हटलं की आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. दीपकबरोबर झालेल्या माझ्या दुसऱ्या भेटीत असं काही घडलं, की दीपकने परीक्षेला बसायचा निर्णय घेतला. इतकच नव्हे, तर तो फायनलची परीक्षा अतिशय उत्तम मार्कांनी उत्तीर्णही झाला.

मी दीपकला असं काय सांगितलं? त्याच्याशी काय बोललो? दीपकचे मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन कसं झालं? हे पुढल्या भागात...

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com