एका वेळी एकच...

कमी वेळेत खूप कामं हातावेगळी करण्याच्या अट्टहासामुळे तात्पुरतं छान वाटू शकतं; पण आपल्या कर्तृत्वाची मोहोर आपण आपल्या जीवनावर उमटवण्यासाठी मोठं काम करण्याची गरज असते.
thinking
thinkingsakal
Summary

कमी वेळेत खूप कामं हातावेगळी करण्याच्या अट्टहासामुळे तात्पुरतं छान वाटू शकतं; पण आपल्या कर्तृत्वाची मोहोर आपण आपल्या जीवनावर उमटवण्यासाठी मोठं काम करण्याची गरज असते.

कमी वेळेत खूप कामं हातावेगळी करण्याच्या अट्टहासामुळे तात्पुरतं छान वाटू शकतं; पण आपल्या कर्तृत्वाची मोहोर आपण आपल्या जीवनावर उमटवण्यासाठी मोठं काम करण्याची गरज असते. ते एका वेळी एकच या सूत्राने तयार होतं. आपल्या कामाला आपला विचार देता आला पाहिजे आणि त्या कामाने आपल्याला पुन्हापुन्हा विचारात पाडलं पाहिजे. या कामातून समाधान मिळायला पाहिजे...

एका वेळी एकच गोष्ट करावी, हा सल्ला ऐकून ऐकून आता ऐकू येईनासा झाला आहे; पण तो सल्ला अनेकांना अद्याप समजलेला नाही किंवा त्याचं महत्त्व उमगलेले नाही. एका वेळी एकच हा केवळ एकाग्रतेचा नव्हे, तर यशस्वी कार्याचा आणि पर्यायाने यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे.

एका वेळी अनेक कामं करणं म्हणजे आपली कार्यक्षमता जोखणे किंवा आपली व्यग्रता ठसवणे, असं काही जणांना वाटतं. काही जणांना अपरिहार्यपणे एका वेळी अनेक कामं करावी लागतात. कारण कुणी तरी ती नेमून दिलेली असतात. त्या व्यक्तींनाही असं वाटत असतं, की आपल्या माणसांनी कार्यमग्न असावं. म्हणजे ते कार्यक्षम होतील. पण कार्य-व्यग्र असणं म्हणजे कार्यक्षम असणं, असे असेलच याची हमी नसते. कुठलंही काम किंवा कृती करताना ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असायला हवा. त्या कामाचा आपल्याला आनंद मिळायला हवा. आपलं कौशल्य, अनुभव, आकांक्षा, सृजन याचं प्रतिबिंब त्यात पडायला हवं. खरं तर आपलं व्यक्तिमत्त्व आपल्या कामात उमटायला हवं. कारण आपलं काम हे जेव्हा या जगातल्या उत्तम गोष्टीत भर टाकत असतं, जगासाठी काही तरी काँट्रिब्युट करत असतं, तेव्हा त्याचं कार्य होतं, आपल्या कामाचं सार्थक होतं. सामान्य आणि असामान्य, सामान्य आणि उत्तम याची सीमारेषा इथेच अधोरेखित होते!

गुणात्मक (दर्जावाढ) आणि गुणाकारात्मक (संख्यावाढ) अशा आधुनिक द्वंद्वात सुवर्णमध्य साधण्याचं कौशल्य अंगी असेल तर ही सांगड तुम्हाला सर्व प्रकारची प्रगती आणून देतेच देते. पण केवळ तात्पुरत्या लाभाकडे डोळे लावले की ध्यास संख्यावाढीचा लागतो. थोडक्यात संख्यावाढ ही प्रबळ ठरते, ते अपरिहार्य आर्थिक गणितं सोडवावी लागतात म्हणून. आणि त्यात जास्त मोबदला मिळतो म्हणूनही. आपण विद्यार्थ्यांना जोखतो ते त्यांच्या मार्कांवरून. ज्या अर्थी त्याला इतके चांगले मार्क पडलेत, त्या अर्थी त्याचा अभ्यास उत्तम झाला आहे, त्याला विषय उत्तम समजला आहे, तो हुशार आहे असं आपण आणि आपली शिक्षण व्यवस्था गृहीत धरते. प्रत्यक्ष करिअरमध्ये आणि आयुष्यात यापैकी खूप कमी मुलं भरीव कामगिरी करतात, तेव्हा आपल्याला आपल्या गृहितकातली चूक लक्षात येते. कारण आपल्याला मुलांच्या अभ्यासाच्या दर्जापेक्षा परीक्षेतले मार्क महत्त्वाचे वाटतात. विद्यार्थी अभ्यासामध्ये एकाग्र झाले, अभ्यासाशी एकरूप झाले, विषय नीट समजून घेतला, तो स्वतःच्या भाषेत समजून सांगितला, त्याची उपयोजितता त्यांच्या लक्षात आली, व्यवहारी जीवनात शिकलेला अभ्यास ते प्रत्यक्षात उतरवू शकले तर त्या अभ्यासाचं चीज झालं, असं म्हणता येईल. केवळ गाळलेल्या जागा भरून, जोड्या लावून, स्पष्टीकरण देऊन, पुस्तकी उत्तर देऊन, अपेक्षित उत्तरांचा मारा करून खरा आणि परिणामकारक अभ्यास होईल का, हा प्रश्नच आहे.

एखादी कृती करण्यात जेव्हा आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी आणि त्याहीपेक्षा आपला आत्मा तल्लीन होतो, तेव्हा आपल्याला खरी एकाग्रता प्राप्त होते. आपण ते काम मनापासून करतोच, पण त्यात आपलं कौशल्य ओततो, क्रिएटिविटी जोडतो आणि त्यातून खूप काही तरी कॉन्ट्रीब्यूट करतो. अशा कामातून आपल्याला आनंद मिळतोच, पण ते काम बघणाऱ्या इतरांनाही आनंद मिळतो. जगातल्या श्रेष्ठ मान्यवर व्यक्ती याच कारणांमुळे मोठ्या होतात. त्या मोठ्या होतात, कारण त्यांची एकाग्र होण्याची क्षमता खूप उच्च दर्जाची असते. अशा व्यक्ती अष्टपैलू असू शकतात, अष्टावधानी असू शकतात. त्यांना अनेक व्यवधाने संभाळायची असू शकतात. तरीही एका वेळी एकच हे सूत्र त्यांनी पक्क अंगी मुरवलेलं असतं. जोवर एकावेळी एकच हे सूत्र आपण अमलात आणत नाही, तोवर जे काम करतो आहोत, त्याचा दर्जा उत्तम करता येत नाही.

कमी वेळेत खूप कामं हातावेगळी करण्याच्या अट्टहासामुळे तात्पुरतं छान वाटू शकतं; पण आपल्या कर्तृत्वाची मोहोर आपण आपल्या जीवनावर उमटवण्यासाठी मोठं काम करण्याची गरज असते. आणि मोठं काम हे एका वेळी एकच या सूत्राने तयार होतं. आपल्या कामाला आपला विचार देता आला पाहिजे आणि त्या कामाने आपल्याला पुन्हापुन्हा विचारात पाडलं पाहिजे. या कामाने आपली ओळख तयार केली पाहिजे. या कामातून आपल्याला समाधान मिळायला पाहिजे... आपण आणि आपलं काम हे तेव्हाच अभिन्न होतं, जेव्हा आपली कामात एकाग्रता तयार होते. स्वयंशिस्त, आत्मविश्वास, समर्पण, ध्येयनिश्चिती, इच्छाशक्ती, जीवनमूल्ये यांच्या मिलाफातून उत्तम दर्जाची, म्हणजेच वरच्या पातळीवरची एकाग्रता प्राप्त होते. ज्याची एकाग्रता उत्तम त्याचे व्यक्तिमत्त्व हे विकसित झालेलेच असते!

आपण जे काम करतो, त्याला शंभर टक्के न्याय द्यायचा असेल, प्रयत्नांमध्ये ओतप्रोत प्रामाणिकपणा हवा असेल, तर एकाग्रतेचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. तुम्ही दिवसभरात अनेक कामं करा, पण वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्याने ताण तयार होतो. कसेही करून काम करण्याकडे कल वाढतो. कामात यांत्रिकता येते. इतकी की नक्की काय काम केले, हेच लक्षात येत नाही. खूप लोक जेवताना टीव्ही बघतात. अशा स्थितीत त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे आता डॉक्टर मंडळी सांगू लागली आहेत. तज्ज्ञ सांगतात की, आपला मेंदू आणि शरीर हे एकाच वेळी असंख्य कामे करण्यासाठी बनलेला नाही. या विषयात होणाऱ्या संशोधनाचे हेच निष्कर्ष आहेत...

म्हणून आपण एक सूत्र पुन्हा पुन्हा मनात ठसवायला हवं... एका वेळी एकच! आणि त्या एकाला शंभर टक्के न्याय!!

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com