।। आधी केलेची पाहिजे।।

विचार आणि कृती आपल्या जगण्याची दोन अभिन्न अंगं आहेत. कृतीमागे विचार असावा आणि विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती असावी हे आपण जाणतोच.
।। आधी केलेची पाहिजे।।
Summary

विचार आणि कृती आपल्या जगण्याची दोन अभिन्न अंगं आहेत. कृतीमागे विचार असावा आणि विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती असावी हे आपण जाणतोच.

विचार आणि कृती आपल्या जगण्याची दोन अभिन्न अंगं आहेत. कृतीमागे विचार असावा आणि विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती असावी हे आपण जाणतोच, पण विचारांशिवाय केलेली कृती जशी भरकटून कुठेही जाऊ शकते आणि आपला घात करू शकते, त्याप्रमाणेच कृतीशिवाय केलेले विचारही आपला अधिक घात करू शकतात. कारण सतत विचार करून आपण कृतीहीन बनतो.

जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतशी काळजी, चिंता, समस्या, अडचणी, संकटं यांचं स्वरूप गंभीर होत जातं. याचं कारण म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, वर नमूद केलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्यालाच हाताळायच्या असतात आणि त्या हाताळताना आपली मानसिकता कशी हवी, याचं प्रशिक्षण अनेकांच्या बाबतीत झालेलं नसतं. ‘एका वेळी एकच’ या शीर्षकाच्या मागील लेखात जे सूत्र सांगितलं होतं, ते व्यावहारिक जीवनात विसरायला होतं आणि आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार पिंगा घालू लागतात. साहजिकच आपल्याला कशावरच नीट विचार करता येत नाही आणि कशाकडेही आपले पूर्ण लक्ष लागू शकत नाही. ‘एका वेळी एकच’ हा लेख वाचून एका वाचकाने विचारलंय, की एकाच वेळी डोक्यात अनेक विचार सुरू असतात... ते कसे रोखू? कारण माझ्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरू असल्यामुळे मला एकाग्रता साध्य करता येत नाही. ही अवस्था अनेकांची होते, हे सत्य आहे. माणसाच्या मनामध्ये विचार... म्हणजे खरं तर वेगवेगळ्या भावना या येतच असतात. या भावना कधी कधी अनियंत्रित पद्धतीने येतात आणि आपला वेळ आणि आपली ऊर्जा अक्षरशः खातात. नको त्या वेळी नको तो विचार हा आपली कार्यक्षमता कमी करतो. त्यामुळेच विचार करताना आपण आपला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, पण अनेकांना ते जमत नाही. सर्वसाधारणपणे विचार/भावना या अनियंत्रित पद्धतीने आपल्या मनामध्ये येत-जात असतात. काही नकोसे विचार दिवसभर टिकून असतात. खरं म्हणजे त्या वेळी त्या विचारांनी येण्याची काही गरज नसते. उदाहरणार्थ परीक्षेत माझं कसं होईल, हा विचार कितीही वेळा डोकावला तरी परीक्षा प्रत्यक्षात होईपर्यंत त्याचं तुम्ही काहीही करू शकत नाही. परीक्षेत माझं कसं होईल, मला किती गुण पडतील या चिंतेपेक्षा, मी अजून जास्त काय वाचू शकतो किंवा अजून जास्त काय अभ्यास करू शकतो? हा विचार असायला हवा. म्हणजेच इथे कृतीची जास्त गरज आहे. पण कृतीवर जेव्हा चिंता मात करते, तेव्हा आपली कृती मागे पडते आणि मनात केवळ चिंतेचं घर होतं. आपण जेव्हा अनेक गोष्टींवर अनेक पदरी विचार करतो, तेव्हा आपण आपल्या बहुमोल अशा कृतीवर अन्याय करत असतो.

।। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे।। या समर्थ रामदास यांच्या उपदेशात कृतिशीलता दडलेली आहे. कृती हा प्रयत्नांचा भाग आहे आणि योग्य प्रयत्न म्हणजे विचाराला मिळालेली योग्य दिशा आहे. आपण विचार भरकटले असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपोआपच प्रयत्न कमी पडलेले असतात किंवा प्रयत्न घेतलेलेच नसतात. आपण जेवढे प्रयत्नांपासून लांब जातो, तेवढे आपण उलटसुलट विचारांच्या अधीन होतो; मात्र एक विचार घेऊन त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करायला लागलो, की एकाग्रता आपोआप जमू लागते.

कल्पना करा तुम्ही विमानात बसलेले आहात आणि निघताना घरचा दिवा बंद केला का? पाण्याचा नळ बंद केला का? असे प्रश्न तुमच्या मनात जर सतत येऊ लागले, तर तुम्ही विमान प्रवासाचा आनंद कसा घेणार? तुमचे विमान प्रवासात लक्ष नाही. आजूबाजूला काय चालले आहे याचे पूर्ण भान नाही. तुम्ही या क्षणी विश्रांती घेण्याची गरज आहे; मात्र सतत येत असलेल्या उलटसुलट विचारांमुळे तुम्ही अस्वस्थ आहात. याचा अर्थ तुमच्या विचारांची दिशा ही चुकते आहे. पाण्याचा किंवा दिव्याचा विचार करण्यात गैर काहीच नाही; मात्र त्या विचारांवर अडून राहणं गैर आहे. कारण तुम्ही कितीही विचार केलात तरी तुमचं विमान जमिनीवर उतरेपर्यंत तुम्हाला तो विचार सतत करणं परवडणार नाही. त्यात अर्थही नाही. याऐवजी तुम्ही चक्क झोप काढली असती तरी ते अधिक चांगलं झालं असतं, पण अनेकांची भूमिका अशी होते, की मलाच किती काळजी आहे, मीच कशी चिंता करतो... या स्वभाव वैशिष्ट्यामुळे आपण सगळ्या जगाच्या चिंता-काळजी आपल्या अंगावर ओढवून घेतो. नको ती ओझी नको त्या प्रमाणात आपण वाहू लागतो. त्याचा परिणाम म्हणजे आपली एकाग्रता कमी होते. आपल्या प्रयत्नांमागची कार्यक्षमता ही निष्प्रभ होऊ लागते.

विचार आणि कृती हे एक अद्वैत आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या जगण्याची ही दोन अभिन्न अंग आहेत. कृतीमागे विचार असावा आणि विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती असावी, हे आपण जाणतोच, पण विचारांशिवाय केलेली कृती जशी भरकटून कुठेही जाऊ शकते आणि आपला घात करू शकते, त्याप्रमाणेच कृतीशिवाय केलेले विचारही आपला अधिक घात करू शकतात. कारण सतत विचार करून आपण कृतीहीन बनतो. असे विचार पोकळ असतात आणि असं जगणंही मग पोकळ व्हायला लागतं. म्हणूनच संत रामदास आग्रहपूर्वक सांगतात, की ।।केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे।।

आपण रस्त्याने चालत असतो. रस्त्यातून चालता चालता आपल्याला अनेक माणसं दिसतात. थोडे फार ओळखीचे असतात. बाकी बरेच अनोळखी असतात, पण आपण त्या प्रत्येक माणसाच्या मागे चालत सुटत नाही. ती माणसं नुसती दिसतात आणि त्यांच्या ठरलेल्या दिशेने पुढे निघून जातात. आपण मात्र आपल्याला जेथे पोहोचायचे आहे अशा ठिकाणी जाण्यासाठी निश्चित दिशेने, निश्चित वेगाने आणि ठामपणे पुढे जात असतो. विचारांचेही तसेच आहे. आपल्या डोक्यात अनेक विचार हे येणारच आहेत. कारण वेगवेगळी दृश्यं, वेगवेगळ्या स्मृती आणि त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया या वेळोवेळी येत असतात. असे विचार आणि अशी दृश्यं हे वेगवेगळ्या विचार आणि भावना आणणारच आहेत, पण ते सर्व आपल्याला क्षणभंगुर ठरवायचे आहे. म्हणून त्यावर उत्तर एकच आहे, की तुम्ही तुमच्या कृतीचा हात घट्ट धरून पुढे चालत राहायचं आहे. ही कृती म्हणजे तुमची दिशा. ही कृती म्हणजे तुमचा वेग. कृतीचा हात पकडून आपण जितके पुढे जात राहू, तितके आपण आपल्या उद्दिष्टांच्या जवळ जाऊ. ते उद्दिष्ट म्हणजे आपला एक विचारच असतो. ठाम विचारांशिवाय ठाम कृती जन्म घेऊ शकत नाही. म्हणून कृतीची कास कधी सोडायची नाही. अनेक विचार येतात आणि जातात. या विचारांच्या गर्दीत स्वतःला हरवून द्यायचं नाही की भरकटू द्यायचं नाही. कृती ही एकाग्रतेचा पाया आहे आणि विचारपूर्वक केलेली परिपूर्ण कृती ही एकाग्रतेचे सार्थक आहे!

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com