खेळ मांडला...

खेळ मांडला...

मुलांमधला उपजत गुण हा आपली आपण खेळणी तयार करण्याचा असतो. आयती खेळणी आणून त्यांच्या पुढ्यात ठेवली तर हा उपजत गुण नाहीसा होण्याची शक्यता असते...

मुलांमधला उपजत गुण हा आपली आपण खेळणी तयार करण्याचा असतो. आयती खेळणी आणून त्यांच्या पुढ्यात ठेवली तर हा उपजत गुण नाहीसा होण्याची शक्यता असते... मुलं कल्पनेने खूप खेळ तयार करतात, त्यांना आपण ते करू दिले पाहिजेत.

एका ओळखीच्या घरी आजोबांना भेटण्याच्या निमित्तानं जाणं झालं. दिवस दिवाळीचे होते. लेकी-सुना घरी आल्या होत्या. त्यांची नातवंडं घरात खेळत होती... मी त्यातल्या एका मुलाकडे लक्षपूर्वक बघत होतो. तो खेळण्यांशी न खेळता वापरातल्या वस्तूंशी खेळत होता. घरात खेळणी पुष्कळ होती, रंगीबेरंगी, वेगवेगळ्या प्रकारची आणि महागडी असून सुद्धा...

आजोबांची लेक बहुदा तावातावानं बाहेर आली आणि त्या मुलाला म्हणाली, ‘हे कसलं खेळणं! एवढी महागडी खेळणी आणून दिली आहेत, पण हा त्याकडे बघतसुद्धा नाही...’, असं म्हणून तिनं रागारागानं एक महागडं खेळणं त्या मुलाच्या हातात कोंबलं आणि त्या मुलाच्या हातातली वस्तू ती घेऊन गेली.

काय होतं त्या मुलाच्या हातात? त्या मुलाच्या हातात करंजीच्या कडा जपणारे धारदार चाक होतं. पुढ्यात चमचा आणि चमच्याच्या मागे करवतीसारखं धारदार चाक. स्वयंपाक घरात बहुदा करंज्या करण्याची धांदल सुरू होती आणि त्या मुलाने तिथून उचलून त्याचं खेळणं बनवलं होतं. आईनं हातात कोंबलेल्या खेळण्यांमध्ये त्या मुलाला जराही इंटरेस्ट नव्हता, मग तो स्वयंपाक घरातून एक थाळी उचलून घेऊन आला आणि त्याने कल्पनेनेच हातातील थाळी स्टिअरिंग समजून गाडी चालवायला सुरुवात केली. जे-जे त्याने गाडीत बसून निरीक्षण केलं होतं, त्याबरहुकूम तो वागत होता. मग चार पायावर चालण्याचा अभिनय करून तो आजोबांवरती भुंकला सुद्धा! मला त्याचं खूप कौतुक वाटलं. थोड्या वेळाने तो एकावर एक रिकाम्या बॅगा रचून त्या ढकलत आमच्या पुढ्यात हमाल बनून आला. त्याच्या खांद्यावर टिपिकल टॉवेल होता आणि बाजू-बाजू करत जणू रेल्वे स्टेशनवर चालल्यासारखा तो ते सामान घेऊन पुढे पुढे जात होता.

आता आजोबा वैतागले होते. ‘अरे पडशील... अरे सांभाळ... ’ थोड्यावेळानंतर त्यांनी एक-एक करून सर्व बॅगा आत नेऊन ठेवल्या आणि त्याला म्हणाले, ‘खबरदार बॅगला हात लावशील तर..! अंगावर पडली म्हणजे..!’

दोन मिनिटांनी त्याने सगळ्यांचे मोजे एका मोज्यात घालून त्याचा बॉल बनवला आणि तो एकटाच कॅच-कॅच खेळू लागला. त्या बॉलने बॉलिंग करू लागला. ‘सांगा काय करायचं अशा मुलांचं... ती बाकीची नातवंडं बघा... कशी शांतपणे खेळत बसलेली आहेत... हा खेळण्यांशी खेळतच नाही!’

आजोबांचा सूर साहजिकच तक्रारीचा होता. मी त्यांना म्हटलं, की मुलांमधला उपजत गुण हा आपली आपण खेळणी तयार करण्याचा असतो. आयती खेळणी आणून त्यांच्या पुढ्यात ठेवली तर हा उपजत गुण नाहीसा होण्याची शक्यता असते... मुलं कल्पनेने खूप खेळ तयार करतात, त्यांना आपण ते करू दिले पाहिजेत. त्यांना आजूबाजूच्या वस्तूपासूनच खेळ करायचे असतात. ते कठड्याला किंवा दरवाजाला लोंबकळतील... ते घरातील बादलीची गाडी करतील. घरातल्या भांड्यांची भातुकली खेळतील. ते कदाचित आई-बाबांचे कपडे घालतील... त्यांच्या डोक्यात कधी काय येईल, याचा नेम नसतो. मुलं खेळत बसली की एक मुलगा पुढाकार घेऊन खेळ घोषित करतो आणि बाकीची मुलं त्याचं अनुकरण करतात. तुमच्या धाकामुळे ती बाकीची मुलं बिचारी शांत बसली आहेत... पण खरं सांगू का त्यांना या मुलाचा हेवा वाटतो आहे!

मी म्हणालो ते आजोबांना पटलं असावं. कारण तेच मोकळेपणाने म्हणाले की ‘खरं आहे हो! लहानपणी आम्ही दगडांपासून... लाकडापासून खेळणी बनवायचो... पण आजकालच्या पालकांना वाटतं की कशाला मुलांना खेळणी बनवण्याचे कष्ट द्या?'

‘खेळणं म्हणजे काय? तर मूल स्वतः एखादी संकल्पना तयार करतं आणि स्वतःच्या अटी आणि शर्तीवर खेळतं... आता तुमच्या नातवानं बनवलेला बॉल हा काही खरा बॉल नव्हे; पण त्यानं कल्पकतेने स्वतःचा बॉल तयार केला आणि तो बॉल झेलताना त्याला जो आनंद झाला, तो अवर्णनीय होता! तो बॅगा ढकलत होता, तेव्हा किती रमला होता... तुमची चिंता मी समजू शकतो; पण मुलांना इजा होणार नाही, अशा बेताने त्यांना हवे ते खेळ खेळू द्यावेत. कारण त्यांच्या स्वतःच्या कल्पकतेतून आलेले खेळ हे अधिक प्रभावी असतात. स्वतःचा विचार करण्याची वृत्ती त्यामुळे वाढते. मुलं एक कागद घेतात आणि त्याचं विमान करून ते आकाशात भिरकावत असतात. आता हे विमान करताना त्यांचं भौतिकशास्त्र काम करतं, त्यांची भूमिती काम करते, त्यांचं निरीक्षण काम करतं.... शिवाय आपण बनवलेलं विमान उडवण्याचा आनंद वेगळाच असतो! आता त्या ऐवजी मी त्यांना विकतचे विमान आणून दिलं आणि चावी मारून ते थोडावेळ उडालं तरी त्या मुलांना स्वतः बनवलेल्या विमानाचा आनंद या विकतच्या विमानात होईल का? याचा तुम्हीच विचार करा... मुलं प्रयोग करतच शिकतात... खेळातून सुद्धा शिकतात आणि मुख्य म्हणजे खेळातून ते एकमेकांशी संवाद आणि समन्वय साधतात. विकतची आणलेली खेळणी ही टिकत नाहीत, असं पालक जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे, की मुलं एकाच प्रकारच्या खेळात फार काळ रमू शकत नाहीत. कारण त्यांची रोज वाढ होत असते. एक वर्षापूर्वीचं खेळणं ते आज वापरतील हे कसं शक्य आहे?’

माझं म्हणणं आजोबांना पटलं.

इतक्यात गरम गरम करंज्या घेऊन त्यांची लेक व सून बाहेर आली आणि चव कशी आहे, असं त्या विचारू लागल्या. मी त्यांना म्हटलं, ‘खरंच सुंदर झाल्या आहेत करंज्या; पण राग येणार नसेल तर एक विचारू का? करंज्या विकतसुद्धा मिळतात... मग आपण त्या घरी का बरं करतो?’

त्यांच्या लेकीने आणि सुनेने एकमेकांकडे हसून पाहिलं आणि सून म्हणाली, ‘असं काय म्हणता काका! शेवटी आपण एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने करण्याचा आनंद वेगळाच असतो ना? आम्हाला करंज्या करायला खूप आवडतात...’

मी म्हटलं, ‘अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं! तसेच मुलांना स्वतःची खेळणी स्वतः बनवायलासुद्धा आवडतात... आपण करंज्या स्वतः करून करंज्या बनवण्याचा आनंद घेतो... मग मुलांना मुलांची खेळणी स्वतः तयार करण्याचा आनंद का बरं देत नाही? त्यांना का आपण विकतची खेळणी आणून देतो? तुम्हीच विचार करा आणि हो... एखादी करंजी त्या मुलालाही तयार करायला द्या... त्याला तो करवतीचा चमचा खूप आवडला आहे... तो मनापासून करंजी बनवेल बघा!’

माझ्या म्हणण्यावर दोघीही मनापासून हसल्या आणि मला म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्या मुलांचं मन अचूक ओळखलं... यापुढे आम्ही मुलांना खेळू देताना करंजीचे उदाहरण नक्की डोक्यात ठेवू!

तुम्हीही ठेवाल ना?’

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com