आठवणींची चाळता ऍप्स (संतोष धायबर)

रविवार, 15 जुलै 2018

आपण अनेक गोष्टी करायचं ठरवतो; पण कामात व्यग्र असल्यामुळं किंवा इतर कारणांमुळं त्या करायच्या विसरतात. अशा वेळी आठवण करून देणारी वेगवेगळी ऍप्स मदतीला येतात. वाढदिवसापासून योग्य वेळी पाणी प्यायची आठवण करून देण्यापर्यंत अनेक कामं करणाऱ्या या ऍप्सविषयी माहिती.

आपण अनेक गोष्टी करायचं ठरवतो; पण कामात व्यग्र असल्यामुळं किंवा इतर कारणांमुळं त्या करायच्या विसरतात. अशा वेळी आठवण करून देणारी वेगवेगळी ऍप्स मदतीला येतात. वाढदिवसापासून योग्य वेळी पाणी प्यायची आठवण करून देण्यापर्यंत अनेक कामं करणाऱ्या या ऍप्सविषयी माहिती.

एखादी गोष्ट आपण आठवणीनं करायची ठरवतो; परंतु दिवसभराच्या धावपळीमध्ये नेमकी महत्त्वाचीच गोष्ट विसरून जातो. त्यामुळं पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. या समस्येला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. एखादी गोष्ट विसरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे कामांची भली मोठी यादी किंवा स्मरणशक्तीचा अभाव. सगळेच विसराळू असतात असंही नाही; मात्र एखादी गोष्ट मागं पडत गेली, की ती विसरली जाते, हा मानवी स्वभाव आहे.

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण मी कामात व्यस्त आहे, असं म्हणताना दिसतो; परंतु कामाच्या भल्यामोठ्या यादीमुळं शरीराकडंही लक्ष द्यायला अनेकांना वेळ मिळत नाही. महत्त्वाचे कार्यक्रम लक्षात राहत नाहीत. वेगवेगळी बिलं वेळेत भरायची राहिल्यामुळं आर्थिक भुर्दंड बसतो. विविध गोष्टी लक्षात न राहिल्यामुळं नुकसानाला सामोरं जावं लागतं; परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आता हा मोबाईल हाती असला तर आणखी काय हवं? सध्या विविध ऍप्सचा खजिनाच उपलब्ध आहे. ही ऍप्स तुम्हाला सतत वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देत राहतील. अशाच ऍप्सबद्दल आपण माहिती घेऊ..

टू डू रिमाइंडर विथ अलार्म (To do reminder with Alarm)
"ताण-तणाव घेऊ नका, निवांत राहा, आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देऊ,' हे या ऍपचं घोषवाक्‍यच आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामांची माहिती ऍपला देऊन ठेवा. मीटिंग, घरची कामं, असाइनमेंट, व्यवसासायासंबंधी अपॉइंटमेंट्‌स, विविध बिलं, पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम भरणं, महत्त्वाचे फोन, विविध वाढदिवस याशिवाय विविध गोष्टींची आठवण करून देण्याचं काम हे ऍप करतं. आठवणीची माहिती तुम्हाला कशा स्वरूपात हवी आहे, तशी निवड केली की काम सोपं होतं. योग्य वेळी तुम्हाला आठवण करून देण्याचं काम हे ऍप करतं. म्हणून नेटिझन्सची या ऍपला मोठी पसंती आहे.
रेटिंग ः 4.4

एनी.डू: टू-डू लिस्ट (Any.do: To-do list)
प्रत्येकजण ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्‍टवर काम करत असतो. कामांची विभागणी केलेली असते. काम वेळेत पार पाडायला हवं, यासाठी बॉस प्रयत्न करताना दिसतो; परंतु कोणाकडं कोणती जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवणंसुद्धा मोठी जबाबदारी असते. अशा वेळी या ऍपची मदत होते. शिवाय, हे ऍप लोकेशननुसार माहिती देत राहतं. उदाहरणार्थ, तुम्ही आता या-या ठिकाणी उभे आहात, तर तुमच्या जवळच अमुक ठिकाण आहे, तिथून ही वस्तू खरेदी करा, अशी आठवण हे ऍप करून देत राहतं. जगभरातल्या तब्बल दोन कोटी नेटिझन्सनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे, यावरूनच या ऍपची लोकप्रियता दिसून येते.
रेटिंग ः 4.5

वॉटर ड्रिंक रिमाइंडर (Water Drink Reminder):
धावपळीच्या युगात प्रत्येकजण एवढा व्यग्र आहे, की पाणीसुद्धा प्यायचं विसरून जातो. संगणकावर अथवा वेगळं काम करत असताना पाणी पिण्याचं लक्षात राहत नाही. काम कितीही महत्त्वाचं असलं, तरी प्रकृतीकडं दुर्लक्ष करून चालत नाही. तुमचं वजन एवढं आहे, यामुळं तुमच्या शरीराला एवढ्या पाण्याची आवश्‍यकता आहे. या-या वेळेला एवढं पाणी प्या, अशी आठवण हे ऍप्स करत राहतं. लाखो नेटिझन्सनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे, यावरूनच अनेकजण पाणी प्यायचं विसरून जातात की काय, अशी शंका येते. म्हणजेच अनेकांना या ऍप्सची आवश्‍यकता भासते, हे दिसून येतं.
रेटिंग ः 4.6

कॉल रिमाइंडर (Call Reminder)
अनेक जण "व्यग्र कामा'मुळं पत्नीला फोन करायला विसरून जातात. यामुळं दोघांमधलं वातावरण काही वेळासाठी तरी तंग होऊन जातं. अशा वेळी महिला आपल्या पतीच्या मोबाईलमध्ये कॉल रिमाइंडर नावाचं ऍप डाऊनलोड करून ठेवतात आणि कोणत्या वेळेला कॉल करायचा, याची माहिती ऍपला देऊन ठेवतात. यामुळं पती विसरलो वगैरे-वगैरे कारण देऊ शकत नाही, हा झाला गंमतीचा भाग; परंतु कामात व्यग्र असताना कोणा-कोणाला कधी कॉल करायचे याबद्दल आपल्याला आठवण करून देत राहतं. एसएमएस, ऍलर्ट, टून कॉलच्या माध्यमातून ही आठवण मिळते.
रेटिंग ः 4.2

मेडिकल रिमाइंडर (Medical Reminder)
कामातली व्यग्रता अथवा वयोमानामुळं कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यायचं हे लक्षात राहत नाही. रुग्णांसाठी हे ऍप महत्त्वाचं आहे. यामध्ये औषधं घेण्याबरोबरच डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आणि माहितीची आठवणही हे ऍप करून देत राहतं.
रेटिंग ः 4.2

डेडलाइन्स रिमाइंडर (Deadlines Reminder)
आपण आठवणीसाठी मोबाईलमध्ये विविध ऍप्स डाऊनलोड करतो; परंतु एखादं काम नंतर करू, असं समजून ते मागं ठेवतो; परंतु ते काम तसंच राहण्याची शक्‍यता असते. यासाठी डेडलाइन्स रिमाइंडर ऍप महत्त्वाची भूमिका बजावतं. कामाची वेळ संपत आली आहे, अशी सतत आठवण हे ऍप करून देत राहतं.
रेटिंग ः 3.9

कार मेंटेनन्स रिमाइंडर प्रो (Cover art Car Maintenance Reminder Pro)
प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी चारचाकी वाहन असतंच; पण या वाहनाची निगा वेळेवर राखणं गरजेचं आहे. मोटारीची वेळेवर तपासणी अथवा मेंटेनन्स केल्यास ते चांगली सेवा देऊ शकेल; परंतु मोटारीच्या प्रत्येक गोष्टीची आठवण आपल्याला राहत नाही. यासाठी हे ऍप महत्त्वाचं आहे. मोटारीची एकदा माहिती भरून ठेवली की झालं. प्रत्येक गोष्टीबद्दलची आठवण ते तुम्हाला करून देत राहील.
रेटिंग ः 3.7

बॅटरी रिमाइंडर (Battery Reminder)
मोबाईल म्हणजे प्रत्येकाची जीवनावश्‍यक वस्तू. दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर बॅटरी संपून जाते, अशा वेळी अनेकजण मोबाईल चार्जिंगला लावून झोपून जातात. मोबाईल रात्रभर चार्ज होऊन गरम झाल्यामुळे स्फोट होण्याची शक्‍यता असते. यामुळं बॅटरी रिमाइंडर ऍप महत्त्वाची भूमिका बजावतं. बॅटरी फुल झाल्यानंतर ते सतत आठवण करून देत राहतं.
रेटिंग ः 4.1

प्रत्येक जण कामात असताना थोडं फार तरी विसरत असतो. यामुळंच विविध ऍप्सचा जन्म झाला असून, ते डाऊनडोड करण्याचं प्रमाणही मोठं आहे. प्ले-स्टोअरवर विविध प्रकारची ऍप्स उपलब्ध आहेत. काही ऍप्स मोफत, तर काही विकत आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवश्‍यकतेनुसार ऍप्स आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेऊ शकतो. यामुळं विसरायला होणार नाही, याबाबतची काळजी ही ऍप्स नक्कीच घेतील.

Web Title: santosh dhaybar technodost article in saptarang