कर्तव्यदक्ष अधिकारी कसला 'तो' तर हुकुमशहा...

officer
officer

प्रशासकीय अधिकारी हा कर्तव्यदक्ष नक्कीच असवा. पण हुकुमशहा नसावा. कोणत्याही कामाचे यश हे 'टीम वर्क'चे यश असते. एकट्याचे नव्हे. कर्तव्यदक्ष अधिकाऱयाकडे कनिष्ठ कर्मचारी हे चांगल्या हेतूने पहात असतात. आपल्या अडचणी त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी एक केवीलवाणा प्रयत्न करतात. परंतु, तो अधिकारीच जर हुकुमशहा बनत असेल तर कर्मचाऱयांनी करायचे तरी काय? चांगल्या कामाचे यश स्वतःवर घ्यायचे अन् दुसऱयांना गुलाम बनवायचे... मग असला अधिकारी काय कामाचा. मग तो तो कर्तव्यदक्ष अधिकारी कसला त्याला हुकुमशहाच म्हणायला हवे. एका अनुभवावरील हा लेख...

पुण्यातील एका कर्तव्यदक्ष अधिकाऱयाबाबत खूप ऐकले होते. वाचलेही होते. इतरांप्रमाणेच दिवसेंदिवस त्या अधिकाऱयाबाबत माझ्याही मनात आदर वाढत होता. परंतु, काही काम नसल्यामुळे कधी भेट घेण्याचा अथवा जाणून घेण्याचा संबंधही नव्हता. पण... तरीही आदर वाढतच चालला होता. बहुदा... त्या अधिकाऱयाची फक्त एकच बाजू समोर येत असल्यामुळेही असू शकते. पण... एका कामामुळे त्या अधिकाऱयाशी भेटीचा 'योग' आला अन् त्याचा खरा चेहरा समोर आला. जो कधी आला नव्हता असा तो चेहरा.

'कर्तव्यदक्ष' अधिकारी ज्या विभागाचे काम पहात होता. त्या विभागातील कर्मचारीसुद्धा माझ्या पेक्षा काही प्रमाणात जास्त त्या 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाचा आदर करत होता. परंतु, तो होता कनिष्ठ कर्मचारी. कनिष्ठ कर्मचारी म्हटले की त्यात सर्वकाही आलेच. त्या कनिष्ठ कर्मचाऱयाला त्यांच्यासह इतर कर्मचाऱयांवर होत असलेल्या त्रासाची... अन्यायाची माहिती 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयापर्यंत पोहचविण्याची मनापासून इच्छा होती. अपेक्षेमागे न्याय मिळेल ही भावना. तत्पूर्वी, त्या कर्मचाऱयाने एक चांगले कामही केले होते. परंतु, त्या कामानंतर त्रासात आणखीच भर पडली होती. त्यामुळे न्याय मिळेल म्हणून 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाकडे तो पहात होता. भ्रष्टाचाराचे काही पुरावेही त्या कर्मचाऱयाकडे होते. उद्देश एकच... भ्रष्टाचार थांबेल अन् न्याय मिळेल.

संबंधित कर्मचाऱयाने मला विनंती केल्यामुळे 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाकडे जाण्याचे ठरले. अधिकाऱयाच्या दालनामध्ये पोहचलो देखील. पण.. त्यांच्याशी निगडीत असलेल्या विभागाचा विषय काढताच 'कर्तव्यदक्ष' अधिकारी भडकलाच. माझ्यासह त्यांच्या केबीनमध्ये अगोदरच एक व्यक्ती चहा पित बसलेली होती. (बहुदा त्यांना दाखवायचे असेल की मी कसा आहे ते?) मी शांत. माझा विषय त्यांनी पूर्ण ऐकून तर घेतला नाहीच. पण... फोनाफोनी करून माझ्याकडील तो विषय दाबण्याचा प्रयत्न केला. शिवाय, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मोकळाही झाला. मी माझ्या वरिष्ठांचा आदर म्हणून शांत बसलो. दुसऱया बाजूला त्या कर्मचाऱयाला आहे त्या क्षणी निलंबीत केले. काय तर एका पत्रकारासोबत आला म्हणून. असो, निलंबनाचा त्यांचा अंतर्गत विषय. पण, त्या कर्मचाऱयाला चांगल्या कामाची पावती म्हणून निलंबीत व्हावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून तो कर्मचारी निलंबीत आहे. संबंधित विभागातील अनेक कर्मचारी आजही घाबरलेल्या अवस्थेत काम करत आहेत. मग त्या अधिकाऱयाला काय म्हणावे? कर्तव्यदक्ष की हुकुमशहा...

कनिष्ठ कर्मचाऱयांनी 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाला भेटू नयेच का?
कनिष्ठ कर्मचारी असले तरी ते त्या विभागाचा एक भाग असतात. कनिष्ठांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी तर वरिष्ठ असतात. मग त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचू नयेच का? त्यांच्याशी अरेरावी करून बिनबुडाचे आरोप करून निलंबीत करणे कितपत योग्य आहे? चांगल्या कामाचे फळ हे निलंबन नक्कीच नसावे. कित्येक कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. काम मग एकटा तो अधिकाऱीच करणार का? दिसेल त्याच्यावर कारवाई करून काय साध्य करणार? आपण हुकुमशहा आहे हे साध्य करणार का?

भ्रष्ट्राचार उघड होऊ नये म्हणून कारवाई?
संबंधित विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून कारवाई केली गेली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. संबंधित कर्मचाऱयाने काही पुरावे 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाकडे सोपविणार असल्याचे काही वरिष्ठांना सांगितले होते. यामुळे हे प्रकरण अगोदरच 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाकडे पोहचले असावे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून कारवाई केली का? असा प्रश्न संबंधित कर्मचारी उपस्थित करू लागले आहेत.

बिनबुडाचे आरोप...
स्वतःला जर 'कर्तव्यदक्ष' अधिकारी समजत असेल तर त्यांनी एखादा आरोप करण्यापूर्वी माहितीची खातरजमा करून घ्यायला हवी की नको? इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आणि हुशार अशा अविर्भावात आरोप करून मोकळे. बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी माहिती घ्यावी की नाही, साधे एवढे कळत नसेल तर तो 'कर्तव्यदक्ष' अधिकारी असू शकतो? विविध राजकीय नेत्यांना अथवा वरिष्ठांना हाताशी धरून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणणे म्हणजे 'कर्तव्यदक्ष' अधिकारी ठरणार नाही. 

प्रसिद्धी पिपासू...
संबंधित 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाची प्रसिद्धी पिपासू म्हणूनही एक ओळखले आहे. परंतु, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? याबाबतची माहिती त्या अधिकाऱयांपर्यंत पोहचवणार कोण? सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे अन् सतत चर्चेत राहणे एवढेच काय ते अधिकाऱयाला समजते काय? सतत प्रसिद्धीच्या झोतात राहत असल्यामुळे 'कर्तव्यदक्ष' अधिकारी होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या सोबत सर्वांना घेऊन चालावे लागते. चांगले काम झाले तर ते केवळ माझ्यामुळे अन् नुकसान झाले तर ते इतरांमुळे? असा अधिकारी काय कामाचा? असले यश किती दिवस टिकणार? सर्वसामान्य नागरिकांसमोर केवळ एक बाजू येत असल्यामुळे 'कर्तव्यदक्ष'पणा दिसतो. परंतु, दुसरी बाजूही समोर यायला लागली तर...

कामगारांमध्ये दहशत...
'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाने अनेकांवर निलंबनाची कारवाई सुरू केल्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सोशल नेटवर्किंगवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱी कर्मचाऱयांवर कशा प्रकारे ओरडतो हे पहायला मिळते. आपल्या खात्यातील कर्मचाऱयांवर अशा प्रकारे खेकसणे हे त्या अधिकाऱयाला शोभते काय? तो पण एक नोकरच आहे ना? असला हुकुमशहा खरंच चांगली कामगिरी करतो? की दाखवतो काही वेगळेच. एक ना अनेक असे प्रश्न उपस्थित होतात.

'कर्तव्यदक्ष' अधिकारी चुकतच नाही का?
कोणताही कर्मचारी चुकला की त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई. यामुळे अनेक कर्मचाऱयांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. अनेकजण घाबरलेल्या अवस्थेत काम करताना दिसतात. 'कर्तव्यदक्ष' अधिकारी कधी चुकतच नाही का? अन् जर चुकत नसेल तर तो मग मनुष्य नव्हेच. सर्वचजण चुकत असतात. आपण एकटेच चुकत नाही, असा त्या 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाचा भ्रम झालेला असावा. तो लवकर दूर झाला तर बरा... अन्यथा... त्याला देवच म्हणावे लागेल.

मग पळ का काढला?
'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाने बैठक सुरू असताना मधूनच पळ काढल्याची चर्चा सर्वत्र आहे. चुकत नसलेला व 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाला मग असा पळ का काढावा लागतो? याचाही विचार करणे गरजेचे आहे. कनिष्ठ कर्मचाऱयांवर हुकुमशाही दाखवायची अन् बैठकीतून पळ काढायचा... ही कोणती कामगिरी, असे असेल तर मग या अधिकाऱयाला 'कर्तव्यदक्ष' अधिकारी म्हणायचे का?

आतापर्यंत उचलबांगडी का?
'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाची आतापर्यंत अनेक ठिकाणांहून उचलबांगडी झाली आहे. तो अधिकारी चांगले कामही करत असेलही, त्याबाबत दुमत नाही. चांगले काम करत असेल तर असेच काम करण्यासाठी शुभेच्छा. पण... चुकीचे काम करत असेल तर त्या अधिकाऱयाला त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. अन्यथा गर्वाचे घर खाली अन् पुन्हा एकदा उचलबांगडी ठरलेलीच.

दरम्यान, एका अनुभवावरून टिका करणे योग्य नाही. परंतु, अनेकांना आपली बाजू समोर मांडता येत नाही. यामुळे अनेक विषय तेथेच थांबले जातात अन् अनेकांचे फावले जाते. शिवाय, अनेकजण तक्रारी करत असतील तर कोठेतरी पाणी मुरते आहे, हे सुद्धा नक्की. यामुळे 'कर्तव्यदक्ष' अधिकाऱयाने आपले कर्तव्य जरूर बजवावे पण हुकुमशहा न होता. तर तुम्ही खऱया अर्थाने 'कर्तव्यदक्ष' अधिकारी होऊ शकाल. मग तुमची वाहवा.. नक्कीच करू. आणि हुकुमशहा नव्हेतर 'कर्तव्यदक्ष' अधिकारी म्हणून...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com