Happy Birthday : मुलाखतींचं 'गाडगीळ पर्व' !

Sudhir-Gadgil
Sudhir-Gadgil

मला बोलणे आणि माणसांना भेटणे यात खूप रस होता. बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकत असताना मी केसरीमध्ये उमेदवारी करीत होतो. त्यावेळी प्रकाश भोंडे आणि सुधीर मोघे यांनी ग. दि. माडगूळकरांवर 'मंतरलेल्या चैत्रबनात' कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. मी कॉलेजमधल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये चांगलं बोलतो म्हणून मला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करशील का, असं विचारण्यात आलं. तेथून खरी सुरवात झाली.

त्यावेळी देखील माझ्या मनात होतं की सूत्रसंचालन म्हणजे बडबड व्हायला नको. म्हणून मी माडगूळकरांना भेटलो. त्यांच्याकडून गाण्यामागच्या आठवणी घेतल्या, सुधीर फडके यांच्याकडून चालीमागच्या गमतीजमती घेतल्या, नंतर राजा परांजपे, रमेश देव-सीमा देव भेटू चित्रीकरणामागील गोष्टी घेतल्या आणि त्याची सूत्रसंचालनावेळी गाण्यांच्या मागे पुढे पेरणी केली. त्यामुळं ते अनुक्रमणिका वजा सूत्रसंचालन होता, उत्तम निवेदन झालं. त्यावेळी मला कुठंतरी वाटलं की यातच करियर केलं पाहिजे. राजकारणासून उद्योगापर्यंत आणि खेळापासून संगीतापर्यंत त्या त्या क्षेत्रातील माणसं कशी जमवायची आणि त्यांची माहिती कशी गोळा करायची, हे पत्रकारितेमुळे आपोआप घडत गेलं आणि मला विविध संस्थाची सूत्रसंचालनाची कामं मिळत गेली.

सुरवात ही अशी झाली, पण हेच क्षेत्र करियर म्हणून निश्चित करायचं होतं. पत्रकारितेत उमेदवारी संपवून नोकरी सुरू झाली होती. पूर्णवेळ याच क्षेत्रात करियर करायचं म्हणजे नोकरी सोडणं भाग होतं. त्यावेळी कुटुंबाचा विचार घेणं महत्वाचं होतं. पत्नी अनघाने मला त्यावेळी साथ दिली, मानसिक आधार दिला. तुझा नोकरीचा पिंड नाही. तुला लोकांना भेटायला आवडतं, वाचायला-लिहायला, बोलायला आवडतं, तर त्यासाठी वेळ द्यायला लागतो म्हणून तू नोकरी सोड आणि पूर्णवेळ हे काम कर, असं तिनंच मला सांगितलं. पैशांचा विचार करशील, तर मला आहे नोकरी. आपल्या फार गरजाही नाहीत, असं बळ तिनं दिलं. त्यावेळी ती पुणे विद्यापीठात नोकरी करीत होती. मात्र आई-वडिलांना धाकधूक होती. मी त्यांना आत्मविश्वास दिला की ज्या महिन्यात मला नोकरीपेक्षा कमी पैसे मिळतील, त्याच महिन्यात मी नोकरी सुरू करीन. त्यांचाही विश्वास बसला होता. आता मला कुठेच अडचण येणार नव्हती. मग 1980 मध्ये नोकरी सोडली आणि करियरला सुरवात झाली. त्याला आता 42 वर्षे झाली आहेत.

माझा पत्रकारितेत येण्याचा किस्साही असाच मजेशीर आहे. किशोर देवधर हा पत्रकार मित्र होता. साल होतं 1968. त्यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पुण्यात सन्मान होणार होता. मला त्यांना जवळून पाहायचं होतं. मी देवधर सांगितलं आणि कार्यक्रमाच्या दिवशी तो मला थेट मंचावर घेऊन गेला. मला कुठेच कुणी अडवलं नाही. मजा वाटली. मनात आलं की या क्षेत्रात आलं पाहिजे. मग कॉलेजच्या काळात केसरीमध्ये उमेदवारी सुरू झाली. नंतर सकाळमध्ये बराचकाळ नोकरी केली. तिथे रमलो होतो. पण मला नोकरी करायची नव्हती. या विचाराला सूत्रसंलनाच्या करियरने बळ दिलं. मी नोकरी सोडली आणि असंख्य कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं आणि पुढं चार हजार मुलाखतींचा टप्पा ओलांडला. मला चाळीस वर्षात कधीच नोकरी करण्याची गरज भासली नाही.

करियर सुरू झालं होतं, पगाराएवढे पैसे मिळवावे लागणार होते. म्हणून पहाटे चारला उठून आकाशवाणीत जाऊन प्रादेशिक बातम्या द्यायचो. नंतर मद्रास एक्सप्रेस पकडून मुंबईला जायचो. तिथे एका जाहिरात एजन्सीत जाऊन कॉपी रायटिंग करायचो. नंतर फोर्टला जाऊन एका एजन्सीत व्हाइसओव्हर द्यायचो. तेथून परतल्यावर असलाच तर चैत्रबनचा कार्यक्रम करायचा. त्यावेळी दुरदर्शनचा काळ सुरू झाला होता. हे दृकश्राव्य माध्यम होतं. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्याची मोठी संधी यातून मिळणारच होती. याशिवाय हे पूर्णवेळ व्यावसायिक करियरच चांगलं आणि प्रभावी क्षेत्र होणार, असंही वाटत होतं. त्यामुळं तिथंही प्रवेश केला.

तिथं मला, अरुण काकतकर, विनय आपटे, किरण चित्रे विजया जोगळेकर यांच्यामुळे तिथं उमेदवारी करता आली. पत्रकारितेची पार्श्वभूमी असल्याने त्यांना विषय सूचवत गेलो. आमची पंचविशी, वलयांकित, मुलखावेगळी माणसं, असे दृकश्राव्य कार्यक्रम केले. शंतनूराव किर्लाेस्करांपासून असंख्य मोठ्या माणसांना मला भेटता आलं. त्या प्रत्येकानं मला अनुभवांनी समृद्ध केलं आणि सूत्रसंचालन देखील वेगळं होत गेलं. त्यांना ऐकणंही मला उपयुक्त ठरलं. चार पिढ्यातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या, तसे चार पिढ्यांतील वक्तेदेखील ऐकले. ना. सी. फडके, अत्रे, दत्तो वामन पोतदार ते पु. ल. त्यातील पु. लं. देशपांडे यांचा प्रभाव माझ्यावर पडला. ते कधीही ज्ञानदीप थाटाचं अलंकारिक बोलायचे नाहीत. त्यांचं साधं बोलणं आणि प्रत्येकाला माझ्याशीच बोलताहेत, असं वाटणं हे त्यांचं कौशल्य मला भावलं.

या सर्वांना ऐकता ऐकता त्यांचा शब्द निवडीतला साधेपणा, मांडणीतील अनौपचारिकता, क्वचितप्रसंगी उत्स्फुर्तता आणि कायमस्वरूपी सतर्कता ही सूत्रे मला कळाली आणि तेच माझ्यासाठी मार्गदर्शन ठरलं. अनेक मोठ्या लोकांच्या मुलाखती मी घेतल्या. उद्योजक शंतनूराव किर्लोस्करही त्यात आहेत. ते कधीही मुलाखत देण्यास तयार नसत. तरीही माझ्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली. ते नेहमी म्हणत, 'मी काय बनवतो, तर शेतासाठी चालणारी यंत्रे. मग ती बोलतातच की.' पण मला तर मुलाखत घ्यायची होती. मग मी किर्लोस्करवाडीला जाऊन त्यांचे 'विक पाँइंट' शोधले. त्यांना ऑपेरा खूप आवडत असे. त्यांच्या घराच्या हिरवळी मुलाखतीला सुरवात झाली. पण ते उत्तर फार खुलून देत नव्हते.

मग मीच म्हटलं, बाबा ती मुलाखत राहू द्यात बाजूला. तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का हो? हे ऐकताच ते खूष झाले. चला, चला तुम्हाला दाखवतो, असे म्हणत त्यांनी मला ऑपेरा दाखवला आणि नंतर छान मुलाखतही दिली. छान मुलाखत झाली या आनंदात मी बाहेर पडत होतो. त्यांनी मला परत बोलावलं आणि म्हणाले, माझ्यातला विक पाँइट शोधून मला बोलतं केलं, हे मला समजल नाही, असं काही समजू नका बरं का. तुमचा अॅप्रोच मला आवडला म्हणून मी उत्तरं दिलं. पुढं असं कधी कुणाला गृहित धरच जाऊ नका... मला बाबांनी मुलाखत दिली होती आणि एक धडाही!

उद्योगपती, राजकारणी, अभिनेता ते रस्त्यावरील भंगारवाली अशा चार हजार मुलाखती घेतल्या. त्यातील प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलं आहे. एक किस्सा असाच आहे. जागतिक मराठी परिषदेच्या निवेदनासाठी मला मॉरिशसला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी मी निवेदन करीत असताना पु. ल. देशपांडे हे माणिक वर्मांना घेऊन आले आणि खालूनच म्हणाले, 'एक मोठी गायिका आणली आहे, तिची मुलाखत घे.' त्यावेळी मी निवेदन करीत होतो. या किश्श्यातून मला या नव्या सूत्रसंचालकांना मला सांगायचंय की कोणते कौशल्य आपल्याला आत्मसात करायला लागतं, याची जाणीव मला त्यावेळी मला झाली.

एकीकडे माधव गडकरी आणि कार्यक्रमाचं निवेदन मी करतोय आणि पुलंसारखा मोठा माणूस मला मुलाखत घ्यायला सांगतोय. हा कसोटीचा क्षण होता. सूत्रसंचालन करीत असतानाच मी माणिक वर्मा यांचा बायोडाटा डोक्यात आणायला सुरवात केली. ही खूप अवघड गोष्ट आहे. पहिला कार्यक्रम संपत नाही, तोच पुल मंचावर आले आणि म्हणाले विचार आता. तोपर्यंत वर्मा यांची माहिती डोक्यात जमली होती. त्या मूळच्या दादरकर, पुण्यात स्वागत भांडार, चितळे बंधूंच्या बाजूला राहणाऱ्या. भावगीत गायिका. गाण्यातून त्यांचं प्रेम फुललेलं, ते अमर वर्मा या परप्रांतियाशी जुळलेलं. यातून त्यांना मी प्रश्न विचारला. दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला तुमचं कोणतं भावगीत उपयोगी पडलं. त्या काही उत्तर देणार तेवढ्यात 'पुलं'नी कोटी केली. म्हणाले, अरे तिच्या वर्मावर कशाला घाव घालतो?... आपण ज्यांना मानतो, त्यांच्याकडूनच विकेट पडली होती. पण स्टेजवर आपण राजा असतो. सर्वांना उत्तर द्यावी लागणार, तीही नम्रतेणे! मग मी म्हटलं, मी कोण त्यांच्या वर्मावर घाला घालणार? त्यांचा वर्मा 'अमर' आहे. हे ऐकताच प्रचंड हशा पिकला. त्यानंतर पुलंनी स्टेजवर येऊन माझी पाठ थोपटली ना, तो मला माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार वाटतो. यातून एक समजलं की आपल्याकडे भरपूर माहिती हवी, ती कुठली कधी वापरावी हे समजलं पाहिजे आणि कुठं थांबावं, याचं भाव हवं. त्यासाठी खूप वाचन हवं.

पत्रकारितेतील अनुभवही मला खूप उपयोगी पडला. माझी साडेपाच हजार पुस्तकांची लायब्ररी आहे. काय वाचले, याची रोज रात्री टिपण करतो. वाचनाचा वापर सर्व ठिकाणी करतो. यातून मुलाखतीला खुमासदारपणा येतोच, शिवाय एक उंची लाभते आणि समोरचा आपलीच फिरकी घेऊ शकणार नाही, यासाठी त्याचा उपयोग होतो. मी कधीही प्रश्नावली आधी देत नाही. मागितलीच कुणी तर नम्रपणे मुलाखतकार बदलण्याची विनंती करतो. त्याचमुळे मुलाखत खुसखुशीत आणि रंजक होत जाते. आधी प्रश्नपत्रिका दिली, तर ती मास्तर आणि विद्यार्थी यांच्यातील तोंडी परीक्षा असते. त्यामुळे प्रश्नावली आधी देत नाही. हेतू एकच की ऐकणाऱ्या, पाहाणाऱ्याला ती रंगतदार मैफल वाटली पाहिजे.

मला बाळासाहेबांची बारावेळा, शरद पवारांची साेळा वेळा, आशा भोसले यांची 29 वेळा, पाचही मंगेशकर कुटुंबाची टीव्हीसाठी मुलाखत आणि चित्रपट, संगीत, अभिनय आणि साहित्य क्षेत्रातील चार पिढीतील कलाकरांच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या. अब्दुल कलाम, शंतनूराव, ठाकरे, पवार, आशा भोसले, नितीन गडकरी, प्रमोद महाजन यांच्या मुलाखती घेताना मजा आली. महाजनांची शेवटची मुलाखत घेतली. बाळासाहेब हे मुलाखतीत आपलीही फिरकी घेतात, पवार अगदी तिरकस प्रश्न असला, तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर टाळत नाहीत. न चिडता, शांतपणे उत्तरे देतात. आशा भोसलेही खुसखुशीत गप्पा मारतात. त्यामुळे या मुलाखती माझ्यासाठी आणि रसिकांनाही मजेदार असतात. हे खरं तर माझं भाग्य आहे की एवढ्या लोकांना भेटून त्यांना भेटता आले, बोलता आले. सर्व मुलाखतीचे ऑडियो-व्हिडिओ, छापून आल्या. पण ही सगळी मातब्बर मंडळी माझी पुरेशी पात्रता, अनुभव आणि वय नसतानीही हे सर्वजण मला भेटले, त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू मनात नोंदवून ठेवले आहेत. त्याचे छान पुस्तक आता करायचे आहे. 

(शब्दांकन : संतोष शाळिग्राम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com