अक्षरांत उतरलेलं 'सगेपण'

संतोष शेणई
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून जाण्याची भीती असते, तर कधी प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट होण्याचा धोका असतो. मात्र, या दोन्ही गोष्टी टाळून गुलजार यांच्या "सगे सारे' या संग्रहातल्या साठ कवितांमधून त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू येतो.

माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून जाण्याची भीती असते, तर कधी प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट होण्याचा धोका असतो. मात्र, या दोन्ही गोष्टी टाळून गुलजार यांच्या "सगे सारे' या संग्रहातल्या साठ कवितांमधून त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू येतो. एका संवेदनशील कवीशी निगडित नातं, एकात्म मानवपणात सामावलेलं सगेपण, कवीच्या व्यक्तिमत्त्वाशी बांधलेलं त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व पारदर्शीपणे या कवितांमधून व्यक्त होते.

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज, ग्रेस, नामदेव ढसाळ, आशा भोसले, गालिब, बिरजू महाराज, पाब्लो नेरुदा, मुन्शी प्रेमचंद, शेक्‍सपिअर, बिमल रॉय, नसीरुद्दीन शाह, व्हॅन गॉग, मीनाकुमारी, बासूदा, ओम पुरी, पंचमदा, जगजीत सिंह, कलबुर्गी अशी गुलजार यांना प्रत्यक्षात भेटलेली, न भेटलेली माणसं या पुस्तकाच्या पानांतून भेटतात. मनाशी, भावनेशी, विचारांशी ज्यांचं नातं जुळलेलं आहे अशाच माणसांशी कवितांमधून साधलेला हा संवाद आहे. अनेकांना न भेटताही त्यांच्याशी असलेलं गुलजारांचं नातं उत्कटपणे जाणवते. पुस्तकाच्या सुरवातीलाच गुलजार हे सगेपण कबूल करतात. एका अर्थी ही सेल्फ पोट्रेट आहेत. आरशात आपलं प्रतिबिंब पाहावं, तसं जगण्याच्या या प्रवासात भेटलेल्या सगेपणात गुलजार स्वत:लाच शोधत आहेत, हे जाणवतं.
काळाच्या लयीला पायात परिधान करून आलेल्यांविषयीच्या या कविता आहेत. "बिरजू महाराज' या कवितेत ते म्हणतात :
तुम्ही पाहिलं होतं का?
काळाला आकाशातून उतरताना
पायात घुंगरू होते त्याच्या
कोणाही व्यक्तीचा काळ जगण्याचा नाद घेऊन येतो, तो आनंदकाळ अनुभवायचा असतो. ज्याला त्याचा आनंदकाळ पकडता येतो, तो जगण्याचा नाद नेमका पकडतो, जसा बिरजू महाराजांनी पकडला होता, हेच गुलजार सुचवतात. म्हणूनच, "नसीरुद्दीन शाह' या कवितेत "जगावी लागतात कैक आयुष्यं एकाच हयातीत मला' असा जगण्याचाच अनुभव व्यक्त होतो.

कवी कुसुमाग्रजांवर गुलजारांचं प्रेम होतं. कुसुमाग्रजांच्या शंभर कवितांचा अनुवादही त्यांनी केला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचं मर्म पकडताना ते लिहितात :
लालजर्द गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालताना
कुसुमाग्रजांची पावले अलवार होऊन फोड यायचे
तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनातील धगधगते वणवे स्मरायचे!
ग्रेस आणि गुलजार या दोन्ही मनस्वी कवींमधलं नातंही विलक्षण होतं. कोणत्याही अभ्यासक्रमात नसलेली गुलजारांची "गंगा आये कहॉं से' ही कविता ग्रेस यांनी वर्गात तासभर शिकवली होती. ग्रेस शेवटच्या आजारपणात रुग्णालयात असताना गुलजार यांनी त्यांच्याशी गप्पा केल्या होत्या. दोघांनाही जाणीव होती, "काळपुरूषाची सावली आसपासच कुठेतरी येरझाला घालत' आहे, तरीही कवितेचं बोट दोघांनीही घट्ट पकडून गप्पा केल्या होत्या. हा अकृत्रिम नातेसंबंध जपताना त्यांनी ग्रेसवर दोन कविता लिहिल्या आहेत.

त्यांचा असाच स्नेहबंध नामदेव ढसाळ यांच्याशी होता. या मित्राला शेवटचा निरोप द्यायला हा कवी ढसाळांच्या अंत्ययात्रेत चालत गेला होता. ढसाळ हा आतून बाहेरून वाचला, लिहिला जाणारा पारदर्शक माणूस होता. त्यांना "मानवी आक्रंदनाचा अंगार" म्हटलं जायचं. जोपर्यंत निर्भेळ मानवतावादाची स्थापना इथल्या मातीत आणि मनांत होत नाही, तोपर्यंत हा अंगार गार पडणार नाही, अशी भावना गुलजारांनी श्रद्धांजली वाहतांना व्यक्त केली होती. ढसाळ आणि गुलजार हे खऱ्या अर्थानं एकाच वेदनेनं बांधलेले सगे होते. दोघांची भाषाशैली जरी वेगळी असली, तरी वेदनेची अनुभूती सारखीच होती. म्हणूनच ते म्हणतात :
जागोजागी ईश्वर भेटलेत खूप...
खांद्यावर हात ठेवून जेव्हा दाबायचे
तेव्हा हाडं दुखायची.

चित्रकार व्हॅन गॉग याचं आणि गुलजारांचं स्ट्रगलच्या काळातलं नातं व्यक्त होतं, मुन्शी प्रेमचंद यांच्या "सहवासात यातना खूप आहेत,' अशी गुलजार तक्रार नोंदवतात. प्रेमचंदांच्या "कफन', "गोदान' यांसारख्या लेखनातून उघड्या पडलेल्या यातना कुणाही संवेदनशील माणसाला टाळता येत नाहीत, गुलजार त्याला अपवाद नाहीत. या लेखनामुळेच प्रेमचंदांचा सहवास हवासाही वाटतो आणि यातना देणाराही वाटतो. "तुम्ही किती दु:ख दिलीत आम्हालाही, आणि ज्यांना तुम्ही भरडून भरडून मारलं, त्यांनाही,' अशी ही तक्रार आहे.

कोवळ्या वयात महात्मा गांधींची व्याख्यानं ऐकलेलं मन बापूंच्या हत्येनं व्याकुळ होतं. गुलजार हिंसेचा निषेध नोंदवतात : "पिस्तुल चालतच आहे... त्याचा विचार काही मरत नाही!' मध्ये बरीच वर्षं लोटली आणि कलबुर्गी यांची हत्या झाली. अस्वस्थ मनानं पुन्हा हेच सत्य सांगितलं : "दुसराच कुणीतरी मेला आहे... विचार उंबऱ्यावरच पडला आहे!' समाजाच्या शत्रूंना हे सत्य केव्हा उमगेल माहीत नाही.
अरुण शेवते यांचा हट्ट पुरवण्यासाठी किशोर मेढे यांनी गुलजार यांच्या मनांतून अक्षरात उतरलेली माणसं तितक्‍याच हळुवारपणे मराठीत आणली, त्याबद्दल वाचकांतर्फे दोघांचेही आभार मानतो.

पुस्तकाचं नाव : सगे सारे
लेखक : गुलजार
अनुवाद : किशोर मेढे
प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन, पुणे (9892438574)
पृष्ठं : 182, मूल्य : 499 रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shenai write book review in saptarang