सण्माससुख: स्नेहस्निग्ध श्रावण...

month of shravan
month of shravan

आषाढाची झांबडझुंबड अनुभवायला मिळते न मिळते, तोच सरींचा वाळा पायात घालून श्रावणऊन रानभर हुंदडायला लागले. वाऱ्याशी मैत्री करीत सूर्याशी लपंडाव खेळायला लागले. श्रावणातल्या घन नीळा अधून-मधून बरसून सृष्टी सौंदर्याला नवीन झळाळी देत आहेत. साऱ्या पृथ्वीला वैशाखात भाजून काढणाऱ्या सूर्यालाही श्रावणातल्या सौंदर्याचा मोह आवरला नाही. श्रावणघन बरसताना त्याचे स्नेहस्निग्ध रूप ढगांशी एकरूप झाले अन्‌ सप्तरंगांचे तोरण आकाशात बांधले गेले! सांजवेळच्या संधीप्रकाशात इंद्रधनुचे हात पसरून जणू आकाशाने पृथ्वीला आलिंगन दिले. इंद्रधनूच्या कमानीखाली झुल्यावर खेळतांना श्रावणालाही काही रंग चिकटले. हे ओले श्रावणरंग घेऊन नदी वाहाते आहे. नदीच्या पाण्याला आता आषाढघाई नाही, उलट तरण्याबांड नदीच्या डौलदार गतीला सौंदर्य आले आहे. तिच्या काठच्या मातीतून गंधवाती उमलल्या आहेत. हा श्रावणगंध रानफुलांना नादी लावतो. डोलवतो. रानफुलांच्या शोधात गावाच्या बाहेरची रानवाट आपण धरायची. इथे आणखी एक गंमत भेटेल. वैशाखवणव्यात होरपळून निघालेल्या वसुंधरेने आषाढधारांचे पाणी भरपूर पिऊन घेतले आहे. कडे कपारी, डोंगरदऱ्याही तृप्त झाल्या आहेत. आषाढात काळ्या दगडांवरून, डोंगरदऱ्यांवरून कोसळणारे जलप्रपात रौद्र वाटत होते. पण आता त्यांचे रौद्रपण श्रावणाने सौम्य केले आहे. त्या शुभ्र जलमाला श्रावणी हळदीच्या उन्हात मोहक दिसत आहेत. डोंगरउतारावरून बाळपाणी दुडूदुडू धावत येऊन नदीच्या कुशीत विसावताना इथेच दिसेल. या बाळपाण्याला पाय लावून दुखवायचे नाही. त्याच्या नितळ त्वचेवरून अलगद हात फिरवायचा. मात्र त्यासाठी आपलाही हात स्वच्छ अन्‌ कोमल आहे याची आधी खात्री करून घ्यायची.

श्रावणातील नदीही नितळ त्वचेची असते. आधीचे सगळे साचलेले, कुजलेले वाहून गेलेले असते आषाढपाण्यात. श्रावणजळ असते तरुणाईचा यक्षस्पर्श झालेले टवटवीत. निसर्गातले ताजेपण अंगात मुरवून घेत आला आहे श्रावण. सृजनोत्सवाची गाणी गायिली जात आहेत माधवींकडून. हा सण्मास आहे. सणांचा मास. प्रतिपदेपासूनच प्रत्येक दिवस सण घेऊनच उतरतो अंगणात. तरीही श्रावण आहे पारिजातकासारखा व्रतस्थ. म्हणून तर श्रावणगंध घेऊन येणाऱ्या कहाण्यांची देवघरातल्या समयीच्या स्निग्धतेज प्रकाशात व्रते झाली आहेत. उन-पावसाच्या फुगड्यांमधून, राती जागवणाऱ्या झिम्म्यांमधून, स्वप्नांच्या झुल्यांवरून, खोडी काढणाऱ्या उखाण्यांमधून श्रावण व्रत मांडून बसलेला दिसतो आहे. श्रावणी ज्ञानसाधनेत गढलेली दिसते आहे.

तांबडकाठी हिरवे लुगडे नेसलेली माय मेरेवरून फिरते आहे. आषाढमातीत रोवलेली भाताची बाळरोपे आता चांगलीच बाळसे धरून डोलताना पाहून सुखावली आहे. श्रावणाच्या पहिल्या तिथीलाच माय मेरेवरून कुणग्यात उतरते. सातेरीच्या देवळाच्या दिशेने पाहात कुणग्यात वाकते. पदरात बांधून आणलेले तांदूळ भूमिकेच्या ओटीत घालते, म्हणते,


पर्तिपदेक भरली भूमकेची वटी
दुधा येव दे गे भाता लेकरांसाटी

माय भातपिकावरून एकवार नजर भारावून घेते. भरल्या डोळ्यांनी सातेरीच्या देवळाकडे पाहते. आता तिची नजर वर आकाशाकडे वऴते. तिच्या डोळ्यातली घनकरूणा श्रावणावर पांघरते अन्‌ घराकडे वळते.

पांदीतून पुढे येताना रुक्‍मिणीच्या खळ्यातील पारिजाताच्या फुलांची गादी तुम्हाला खेचून घेईल आणि त्याचवेळी झुबक्‍या झेंडूचे एखादे चुकार झाड सत्यभामेच्या परड्यात डोकावून पाहतानाही दिसेल.

भामा घाली पानी, रख्माई येची फुला
भामेचो पारिजात रख्माईच्या दारी डुला
रख्माईचो गोंडो भलतो खोडियाळ
भामेच्या पोरसात त्येचो जाता तोल
गोंडो-पारिजात देवाघरची झाडा
देवांनी आणली, दोनी बायलांच्या लाडा


ही दोन्ही फुलझाडे स्वर्गभूमीतून श्रीकृष्णांनी आणली. म्हणूनच दोन्ही फुलांनी साधुरंग स्वीकारला असावा. मात्र भगव्या पाकळ्या नेसतानाही गोंड्याने हिरवी आनंदआस देठानिशी पकडून ठेवली आहे. पारिजात तेवढाही गुंतत नाही. संन्यस्त देठानिशी इथले झाड सोडतानाही पारिजाताच्या इवल्याशा पांढऱ्या जिवणीत कृष्णनाम गुंजत आहे, असेच मला भासते.
तुम्ही प्राजक्ताच्या झाडाकडे वळण्याचा मोह टाळा. त्या वाटेवर श्रावणाच्या विरक्त कहाणीने तुमची ओंजळ भरेल. पारिजात हरीभजनी रमलेला असतो. श्रावणातल्या सांध्यसमयी तो आपल्या पोवळ्यासारख्या नाजूक कळ्यांसह कहाणी ऐकायला तयार होतो. कळ्यांच्या देठांशी सुगंधी कुप्या भरून ठेवत रात्रभर श्रावणमाहात्म्य ऐकतो आणि सूर्यनारायणांच्या रुपात विष्णूदर्शन झाले की, फुलांच्या रुपात समर्पण करतो. जगण्याची वासना मनभर असल्यावर पारिजातासारखे समर्पित नाही होता यायचे. म्हणून म्हणतो, झेंडूच्या सोनबनातून जा, जगण्याच्या वाटेवरचा उत्सव तुमचे स्वागत करील. तुम्ही फक्त चालत राहा रानवाटा. रंग-गंधाने बहरून आलेला श्रावण माळभर पसरलेला दिसेल.

वैशाखवणव्यात या माळावर पाय पोळून घेतले असतील तुम्ही, त्यावेळी तुम्हाला वाटलेले असते - संपलेय सारे. हा माळ आतून संपून गेला आहे जणू. आपलेच शव वाहून न्यावे खांद्यावरून तसा हा वेताळमाळ वैशाखाच्या आगीनकाळी दिसतो. पण आता पाहा ना! आषाढ-श्रावणातले पर्जन्यामृत पिऊन माळ हिरवागार झाला आहे. हिरव्या रंगाच्या कितीएक छटा मोजताना भान हरपावे, पण रंगगान संपू नये असा भास होतो. तृणपाती आता बरीच वाढली आहेत. नीट निरखून पाहा, मग समजेल, तृणांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पण सगळ्यांचाच गोतावळा एकमेकांत गुंतलेला! गुंतूनी गुंत्यात साऱ्या प्रत्येक पाती वेगवेगळी होती. ती अलग होती, पण विलग नव्हती. मधूनच वाऱ्याची झुळूक आली, की ही तृणपाती छान डोलत राहतात. गवतगोताळ्यात बऱ्याच लहानुशा वनस्पती लपल्या आहेत. भूमीचे मार्दव इवलेसे कोंब होऊन उगवले आहे. त्यांची ती मुलायम, नवजात अर्भकाच्या कांतीसारखी, पण हिरवी-पोपटी कांती सुखावते आहे. त्या लवलवत्या पात्यांमधून त्यांच्या विश्‍वाचे रहस्य सामावलेले आहे. साऱ्या सृष्टीत नवचैतन्य भरले आहे! रानातल्या ओल्या गचपणात हिरव्या रंगाच्या छटांचे जणू प्रदर्शनच मांडले आहे.

दोन मासांपूर्वी उघडे पडलेले भूमीचे तपकिरी-काळे अंग आता झाकले गेले आहे. कडेकपारी, धोंड्यांचे आडोसे, पाणथळी, काळे कुळकुळीत कठीण पत्थर साऱ्या साऱ्यांवर शेवाळी मखमल पसरली होती. शेवाळ खरे तर पाण्यात वाढणारे. पण इथे पाषाणावर जरा ओल धरताच त्याच्या आधारावरही ते वाढले आहे. त्याला सतत ओला ठेवण्याचे काम पावसाच्या येरझारा करत आहेत. या शेवाळी मखमलीवर पाऊल टाकण्याचे धाडस करू नका. कितीही सावध राहा. शेवाळावरून सावरणे कठीण. यात केवळ शेवाळच नाही, दगडांच्या सापटीतून नेचे तरारले आहे. किंचित रुंद पानांचे. ही पाने वरून हिरवी अन्‌ पाठीमागून पांढरी. हिवतापाचा जोर वाढला तर नेच्याच्या पानांचा रस नाकात सोडायचा. अंगाला चोपडायचा. नेच्याबरोबरच आणखीन एक वनस्पती दिसते ती म्हणजे "काळीदोर". काळा-तपकिरी दोरा जादूगाराने लयदार उभा करावा तशी ही नाजूक अंगकाठीची "हंसपदी". उभ्या दोराच्या टोकाला पोपटी पानांचे पंख. हंसाची पावलं जणू. म्हणून तर ती हंसपदी. मालवणी माणसानं हंस पाहिला नाही, त्याला आठवला तो रोजच्या व्यवहारातला काळा दोरा अन्‌ त्याने या गवतकाडीला म्हटले - "काळीदोर". आणखीही कितीएक वनस्पती. इवल्या इवल्या. हिरव्या इरकलीतल्या. त्यांना ना फूल, ना पान, ना फळ. हरितद्रव्य माखून बसल्या आहेत म्हणून वनस्पती म्हणायचे. अलगद नजर फिरवा. मध्येच एक जांभळट तुरा दिसेल. त्याच्या शेजारी पांढऱ्या टपोऱ्या मोत्यांचा सर तुमच्या डोळ्यांना साद घालत असेल. पानातल्या पानात लाजून चूर असलेली, जांभळट फुले माळून बसलेल्या "गवळणीं"ची वस्ती ओलांडून जाणे आपल्याला शक्‍य नाही. मध्येच पिवळ्या चांदणीची नक्षी. मला पिवळा रंग खूप आवडतो. सोन्याची झळाळी असलेला किंवा आमरसाचा गोडवा असलेला. म्हणून असेल, पण पिवळी चांदणी मला मोहवत असते. ही नाजुका मनाला वेड लावते. या औषधगुणी देखणीचे कुणा अरसिकाने "काळी मुसळी" असे बारसे केले आहे.
त्या तुऱ्यातल्या इवलुश्‍या जांभळ्या फुलांना "शिळ्याची फुले" म्हणायचे. वनस्पती अभ्यासक याला "सिला" म्हणतात. या "सिला"चेच मालवणी माणसाने "शिळा" केले असेल काय? मला तर या कंदाकडे पाहताना अहल्येची गोष्ट आठवते. मायेची ओल संपून गेल्यावर हा कंद शिळेगत झाला होता. वैशाखात माळावर फिरताना त्याचा मागमूस लागत नाही. पावसाच्या पावलांचा स्पर्श होताच कंदाने शिळापण सोडले. तो जिवंत झाला. जमिनीलगत त्याच्या चारपाच पानांनी फेर धरला. काळपट हिरव्या पानांवर गडद निळ्या-काळ्या बारीक पट्ट्या, थोडी तुकतुकीत काया. मध्य भागातून एक जांभळट तुरा उभारलेला. पानांचा फेरही असा की, मुळाशी पाणी साठू नये अजिबात यासाठी खबरदार असलेला. पाण्याचे थेंबुटले पिऊन वाढणारा हा कंद थोड्याशा पाणसाठ्यानेही अस्तित्व गमावतो. "शिळ्याच्या फुलां"सारखीच जांभळट, पण त्याहूनही नाजूक फूल माळून बसलेली "गवळण" (इपिजिनीया) दिसते. कृष्णांच्या आठवणीत रमताना तिच्या डोईतले एकुलते फूल कधी जांभळे झाले हे तिलाही कळले नसेल. शिळ्याच्या पानांसारखाच जमिनीलगत पानांचा फेर मांडून "मोत्याळी' (क्‍लोरोफायटम) आपले स्थान आता पक्के करू लागला आहे. याची पाने गवतपात्यासारखी, पण थोडी रुंद असतात. पानांच्या मध्यातून पांढऱ्या टपोर मोत्यांचा सर आलेला दिसेल. ही मोत्याळी उमलताच त्यातून पुंकेसराचा पिवळसर पुंजका खुणावतो.

शेताच्या मेरेने गुलबट-जांभळट फुलोऱ्याचा "कुरडू' डोलतो आहे. कुरडू कुणासमोरही वाकत नाही. वाळला तरी कडक अंगाचा. त्याच्या शेजारीच नाजूक देहाचा तेरडाही बेचक्‍या बेचक्‍यातून जांभळ्या, पांढऱ्या, गुलाबी किरमिजी रंगाची उधळण करीत फुलला आहे. कुणग्यातून सोलिया (सोनटक्का) सारखा मंद गंध येतो आहे. कुणग्याच्या कोपऱ्यातली अधिकची पाणमाया पाहून वाढलेल्या त्या गंधमालकिणीच्या पाकळ्याही सोलियासारख्याच पांढऱ्या शुभ्र. मात्र सोलियाच्या पाकळ्या अधिक मऊ मुलायम असतात. या रानसोलीचा जाडजूड देठ गडद जांभळा, किंचित तांबूस असतो. ही रानसोली (कॉस्ट्‌स) अलीकडे शहरात कुंडीत वाढतानाही दिसते आहे. पानथळ जागेतला एक निवडुंगही ब्रह्मकमळ होऊन शहरवासी झाला आहे. पानफुटीच्या प्रत्येक बेचक्‍यातून एका देठावर एकाच वेळी अनेक फुले येतात या ब्रह्मकमळाला. जणू ते गुलाबी काठाचे पांढरे शुभ्र वस्त्र नेसून चढत्या रात्रीची श्रावणकहाणी गंधीत करीत फुलते.

सगळ्या सृष्टीचा हा रंगगंधाचा सणमास आहे. सोनचाफ्यावर नितळ सुवर्णकांतीचा, मंद-धुंद सुगंधाचा श्रावण फुलला आहे. त्याची चाफेकळी पानांच्या बेचक्‍यातून फुलली आहे, त्याच्या शेजारीच हिरव्या पानांत लाजून लपून बसलेल्या हिरव्या चाफ्याला सुगंध कसा आणि कुठे लपवू असे झाले आहे. अनंताचे पांढरे टप्पोरे फूल पानाच्या बेचक्‍यातून बहरले आहे. सुगंध पसरवत आहे. हजारी मोगऱ्यानेही किरमिजी रंगाची किनार असलेल्या पांढऱ्या फुलांनी भरलेले तबकच आणले आहे.

जाई, जुई आपली पांढरी, मंद वासाची फुले घेऊन आल्या आहेत. मला कौतुक वाटते, ते केतकीच्या बनाचे. गाववस्ती सोडून केतकी वसते. थोडी फटकून वागते. भरदुपारीही केवड्याच्या जवळपास जाण्याची भीती वाटते. नीरव जागेत व्रताला बसल्यासारखी ती दिसते. तिचा व्रतभंग होऊ नये म्हणून जणू फांदीच्या टोकावर लांब, तलवारीसारखी काटेरी कडा असलेली खरखरीत पाने खडा पहारा देत असतात. ती व्रतस्थ असली तरी संन्यस्त नाही. जगण्याची, फुलण्याची केवड्याला आस आहे. निसर्गाने तिची कठोर परीक्षा घ्यायचे ठरवले असावे, पण ती सर्वस्व पणाला लावून फुलते आहे. निसर्गाने केतकीच्या फुलांना फारसे रूप दिलेले नाही, तिची नर फुले आणि मादी फुलेही वेगवेगळी केली. त्यांना पाकळ्याही दिल्या नाहीत. पण दोन्ही प्रकारच्या फुलांनी माघार घेतलेली नाही. आपल्या फुलांना कणसातल्या दांड्यावर दाटीवाटीने बसवले आहे. त्या फुलांना गंधमाखन केले आणि त्या फूलकणसाला कनकरंगी पानाने झाकून टाकले. केतकीचे हे पानही ताठ उभे असते. केतकीबनातून हे फूल शोधणे थोडे अवघडच. पण फुलाचा अस्तित्वगंध साऱ्या आसमंतात भरून राहिला आहे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो दूरवर पसरतो आहे. हा केवड्याचा गंध शिव-गणपतीना प्रिय आहे. एखाद्या तरी श्रावणी सोमवारी शिवाला केवडा वाहायला मिळायला हवा.

शिवभक्तांसाठी श्रावणाचे महत्त्व खूपच. नवविवाहिता पहिली पाच वर्षे दर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ-तीळ, मूग, जवस व सातू यांची शिवामूठ एकेका सोमवारी वाहिली जाते. सायंकाळी ओलेत्याने कर्पूरगौरासाठी कापूरआरती गातात. यमगरवाडीत भटकेश्वरापाशी पारधी समाजाची यात्राच भरते. पं. कुमार गंधर्व श्रावणी सोमवार करायचे. मनात आले की, उज्जैनीच्या महाकाळासमोर रुद्र म्हणायचे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला यायचे. एकदा ते त्र्यंबकेश्वरासमोर उभे असतानाच बाहेर पावसाचा डमरू वाजू लागला. कुमार झपतालात गाऊ लागले.

सुंदर नयन तोरे देख मन भाये।
नाद शिव शिव डमरू बाजे।
आये नटराज शेष गलमाल।
शोभे संग गिरिजासुत साथ।


पाऊस पडतोय आणि सगळे डोंगर जणू महादेव बनलेत. त्यांच्या डोईवरून झऱ्या-नाल्यांनी, धबधब्यांनी गंगारूप घेतले आहे. कुमार आता त्रितालात आलेत.

सिर पै धरी गंग, कमर मृगच्छाला।
मुंडकी गरमाल, हथेली सुल साजे।
पिनाकी महाग्यानी, अजब रूप धारे।
डुलत डुलत आवे, डिमरू डिम बाजे।


कुमारांनी स्वरांची पूजा बांधली महादेवांची. त्यांनी महादेवांचे महिम्न आळवले शब्दांमधून. नवा राग जन्मा आला. कुमार म्हणाले, "शंकरा' अवतरला.

ही वेळ असते श्रावणधून ऐकायची. बांबूच्या बनातून येणारी श्रावणशीळ रानाला रोमांचित करते. मोराचा पिसारा रानभर डवरतो अन्‌ त्याच्या कंठातील निषाद श्रावणाला झुलवतो. गायीच्या गळ्यातील गंधार ऐकताना तिच्या डोळ्यातील असीम करूणा श्रावणाच्या अंगणात अलगद उतरते. कोकिळगान वसंताची चाहूल देतही असेल, पण कोकिळाला पंचम देणारा असतो तो श्रावण. या पंचमानेच शंकराला आत्मस्वर लाभला अन्‌ डोळ्यादेखत पार्वतीची कोकिळा झाली. शंकराच्या ज्ञानसाधनेतील सुरेल पंचम झाली. पु. शि. रेगे यांची साऊ आठवतेय. ती म्हणायची, जे जे हवे असेल ते ते आपण स्वतःच व्हायचे. पार्वतीला आत्मज्ञान हवे होते शिवांकडून. शिवांना आत्मज्ञान झाले होते ते कोकिळेच्या पंचमातून. हे चक्र पूर्ण व्हायचे तर, पार्वतीने कोकिळ होऊनच तो आत्मस्वर धारण करायला हवा होता. यासाठीच श्रावणातील कोकिळस्वर हा शैवस्वर मानला जातो. म्हणून तर केवळ कोकिळव्रतच नव्हे, शैवांकडूनही ज्ञानमाध्यमातून व्रत केले जाते.

श्रावणातल्या पहिल्या पंधरवड्यात कोकिळव्रत केले जाते. कोकिळेची प्रतीकपूजा बांधली जाते. यात ना दक्षिणा असते, ना प्रसाद. हे व्रत आहे भक्तीचे साधन. श्रावणातील कोकिळा आहे ज्ञानाचे कूजन करणारी. म्हणून तर शैवगुहा स्वात्मसाधनांनी भरून जातात श्रावणात. शैवमंदिरात पुराणकथा बहरतात.

मंगळागौर म्हणजे नवविवाहितांनी सौभाग्यदानासाठी बांधलेली गौरीची पूजा. घरात अखंड ज्ञानसाधना सुरू राहावी म्हणून बुध-बृहस्पतीची पूजा असते. शुक्रवारी जिवतीला वडीलधाऱ्यांनी छोट्यांना ओवाळून त्यांच्यासाठी आयुष्य मागायचे असते. जिवतीचा कागद डकवलेला असतो. कहाणी सुरू होते. शुक्रवाराची कहाणी. आटपाट नगरातला अपत्यहीन राजा कहाणीत असतो. राजाला, राज्याला वारस हवा असतो. राणी सुईणीला गाठते. नाळावारी एक मुलगा गुपचूप आणून दे सांगते. द्रव्यलोभी सुईण मुलगा आणून देते. कहाणीच्या शेवटी खरा मुलगा खऱ्या आईला भेटतो. जिवतीच्या पुजेच्यावेळी. जिवती प्रसन्न झाली त्या खऱ्या आईला, त्या खऱ्या मुलाला. तशी ती आपल्यालाही होवो, म्हणून ही ओवाळणी आयुष्याची. संपत शनिवार येतात. रविवारी आदित्य राणूबाई मौनात येतात. संपूर्ण पूजा मौनात. कहाणी सांगताना मौन सुटते. मंगळागौर, बुध-बृहस्पती, जिवती, नरसोबा, आदित्य राणूबाई या प्रत्येकाची कहाणी होते.

पंचमीला उघडते सर्जनाचे महाद्वार. त्यादिवशी शेतीचा राखणदार, माहेरवाशीणीचा बंधू असलेल्या नागोबाची पूजा मांडायची. आपल्या हृदयात हवे सर्व जगतासाठीचे समुद्रासारखे अथांगपण आणि जीवनानुभवाची पुनवेच्या चांदासारखी परिपूर्णता. याची स्वतःलाच आठवण करून देण्यासाठी सागराची पूजा करायची. जनसागरासाठी समर्पण करण्याची भावना श्रीफळाच्या रुपात समुद्रासमोर साक्षात करायच्या. बहिणीसंबंधीच्या जबाबदारीची जाणीव बांधून घ्यायची राखीच्या प्रतीकात. गुरूंकडून रेशीमबंध स्वीकारताना शिष्याने द्यायचे असते आश्वासन ज्ञानसाधनेत अखंड व्रतीपणाचे. सुताची पोवती करून देवाला वाहायची. विष्णू, शिव आणि सूर्य यांना पोवती वाहिल्यावर स्त्रीने ती भ्रताराच्या हातात बांधायची. आंब्याखाली विसावणारी शीतळा सप्तमी आली की, गावदेवीला आठवणीने नैवेद्य पाठवायचा. कृष्णाच्या गायींचा हंबर ऐकू येत असतानाच पोळ्याला बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची.

अष्टमीला देहाची बासरी करून आत्मधून वाजवू पाहायची. ती धून ऐकता ऐकता आतला विकारांचा तुरूंग फोडला जाईल. अहंकाराच्या साखळ्या गळून पडतील. मग अज्ञानाच्या मध्यरात्री ज्ञानकृष्ण जन्म घेईल. अंतःकरणात आत्मदीप लावेल. त्या दीपाच्या प्रकाशात गोकुळाची वाट उजळेल. अडचणींची यमुना भांग पाडल्यागत दुभंगेल. या गोकुळात अधीर असेल आत्मज्ञानी राधा, गोकुळात कृष्णदर्शनासाठी उत्सुक असतील ब्रह्मज्ञानी गोपी. कृष्ण रास खेळेल राधा-गोपींसंगे.

एक फेर बाये राधीचा
दुसरा गुंफू बाये गवळणींचा
एक फेर बाये आत्मगेनाचा
दुसरा गुंफू बाये बरमगेनाचा
किरिष्णाने युगत सादली सादी
गवळणींच्या गुंफिरी गावली राधी


हा गोफ दिसतो मला गोकर्णीच्या वेलीवर फुलून आलेला. गोकर्णीची वेल अगदी नाजूक असते. लवलवती काडीच जणू असते तिचा देह. या नाजुकाला पानांचा भारही सोसेना. तलवारी रोखल्यासारखी पाने घेऊन आलेली ही नाजुका कुणाच्या तरी खांद्याचा आधार घेऊन उभी दिसते. वाऱ्याची छोटीशी झुळुकही तिला थरथरवून जाते मुळापासून. पण तिचे चिवटपण असे की, थोडासा आधारही तिला पुरतो. तिची निळी, जांभळी, पांढरी फुले गायींच्या कानांचा भास देतात. एक मोठी पाकळी ताठ उभी. तिच्या आत मिटलेल्या दोन पाकळ्या. तिच्या पाकळ्या उमलतानाची सऴसळ फुलपाखरांनी ऐकलेली असते. या फुलपाखरांना रंगसुख देऊन श्रावण पुढे सरकतो.

आता सरत्या श्रावणाचे वेध लागतील. पिठोरी अमावास्येला वाण देईल आई. प्रतिपदेपासून सुरू असलेल्या सणांची आठवण काढत श्रावणाला निरोपाचे वाण देईल. रवळनाथाच्या देवळाकडे तोंड करून खळ्याच्या कोपऱ्यावर पणती उजळेल. घरादाराचे रक्षण कर म्हणून गाऱ्हाणे घालील त्या रवळनाथापाशी. समोरच्या ओल्या गच्च काळोखाकडे पाहात स्वतःशीच पुटपुटल्यागत विचारेल, "अतीत कोण?" तिच्या मागोमाग आलेलो असेन मी उत्सुक. हळूच म्हणेन, "मी." ती म्हणेल पणतीच्या उजळत्या तेज स्वरात, "या पणतीसारखाच उजळत राहा स्वतःला. उजळून टाक आसमंत. स्वतःची वाट उजळ. उजेडाने भरून टाक दिशा. सतत पुढे जा. माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रदेशापुढचा अंधारा प्रदेश उजळत पुढे जा."

मी अंगण ओलांडत ओवळीखाली येतो. मंदमोहक गंधमादन केलेले असते ओवळीने आसमंताला. पावसाळी मातीचा रंग ल्यालेली ओवळी (बकूळ) दिसत नाही गर्द पानाआड. मी वेडावून हाका देतो त्या गंधकुपीला. त्या वेडीलाही धीर धरवत नाही. टपटप गळायला लागतात ओवळे. मी त्या नाजूक फुलांसाठी दोन्ही हातांची पाने पसरतो. त्या फुलांनी भरलेली ओंजळ मिटल्या पापण्यांवर टेकवतो. पापण्यांआडची अभ्रे एव्हांना धुवून निघालेली असतात. मीपण माझे गळून गेलेले असते टपटप. आतून उमलून आलेला असतो लख्ख प्रकाश. वाटेवर पसरलेला असतो सगळ्या रानाचा गंध. तो श्रावणगंध आत खोलवर शोषून घेतो. आतून नवेपणाचे आत्मभान झिरपत असते. तेच तर असते... श्रावणसुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com