स्वराज्याच्या मूल्यांचा पाया ‘किल्ले राजगड’

Rajgad fort
Rajgad fortesakal

लेखक - देवदत्त गोखले

पुणे जिल्ह्यातील भोर गावाजवळ नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर अर्थात, राजगड आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार करण्यासाठी राजगड (Rajgad) आणि तोरणा (Torna) हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याची दुरुस्ती सुरू असताना सुवर्ण मुद्रांनी भरलेले हांडे सापडले. याच संपत्तीतून शेजारीच असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाचे काम सुरू झाले. एकीकडे स्वराज्याची उभारणी सुरू होती, तर दुसरीकडे राजगड आकारास येत होता. महाराजांनी जवळपास २६ वर्षे राजगडावरून स्वराज्याचा कारभार बघितला. कुठलेही काम हाती घेतल्यावर, ते साध्य करण्यासाठी सतत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे उपलब्ध साधन- संपत्ती आणि इतर सर्व संसाधनांचा परिणामकारक वापर हा कार्य संस्कृतीचा पाया आहे. याचीच आठवण आणि शिकवण किल्ले राजगड सतत करून देतो.

तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. या उलट राजगडाचा बालेकिल्ला सर्वांत उंच म्हणजे सुमारे चार हजार ५७५ फूट एवढ्या उंचीवर आहे. तसेच राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागत होती. एवढी सुरक्षितता असल्यामुळे शिवाजी महाराजांनी आपले राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड केली. यातूनच सुरक्षा या मूल्याचे महत्त्व अधोरेखित होते. प्रत्येक संस्थेत सर्व प्रकारच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.

Rajgad fort
हिंदुत्व की हिंदवी स्वराज्य?


गडावर बालेकिल्ल्याव्यतिरिक्त सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती या तीन माच्या बांधल्या. त्याकाळी उपलब्ध असलेल्या बांधकाम विज्ञानाचा पुरेपूर वापर महाराजांनी करून घेतला आहे. हाती घेतलेले प्रत्येक काम नेटाने पूर्ण करणे आणि उपलब्ध असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शोध घेऊन आपल्या कार्यसंस्कृतीत त्याचा समावेश करून घेण्याचा महाराजांचा आग्रह आणि धडपड या किल्ल्याला असलेली दुहेरी तटबंदी, तीन माच्या, भक्कम बुरुज आणि अशा अनेक गोष्टींमधून दिसते. या गडाचा पायथा अतिशय भक्कम आणि भव्य आहे. त्यामुळे या गडाला वेढा घालणे किंवा आक्रमण करणे तर अवघड होतेच. शिवाय हा गड घेण्याचा विचारदेखील शत्रूच्या मनात सहजपणे येत नसे. आपण हाती घेलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचा पाया भक्कम आणि मूल्याधारित असेल, तर अनेक प्रयत्न करूनही विरोधक ते बिघडवू शकत नाही. राजगडाचा पाया याचा निदर्शक आहे. स्वराज्याची अनेक मूलभूत मूल्ये राजगडावर रुजली, अंगीकारली आणि जपली गेली. नवीन, आशावादी आणि खंबीर विचारांसाठी मूल्ये महत्त्वाची असतात. म्हणूनच प्रत्येकाने राजगडाकडून मूल्य आणि तत्त्व यांचे महत्त्व शिकावे.

अफजलखानाचा वध करण्याचे नियोजनदेखील याच गडावर झाले. स्वराज्याचा कारभार याच गडावरून बघितला जात असल्याने अनेक मोहिमांचे नियोजन, खलबते आणि विविध कार्यक्रम याच गडावर यशस्वीपणे पार पडले. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होता.

गडावर जाण्यासाठी पाली आणि गुंजवणे दरवाजा हे दोन मुख्य मार्ग आहेत. पाली दरवाजा हा गडावर येण्याचा महामार्ग असून, दोन दरवाजे पार करून किल्ल्यावर पोचता येते. पद्मावती माची पुष्कळ लांब-रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती होती. सुवेळा व संजीवनी या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ल्यावर त्या मानाने कमी वस्ती होती. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह बालेकिल्ल्यावर रहात असत. गडावर पद्मावती देवीचे मंदिर, तसेच इतर लहान-मोठी मंदिरे, दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा, अशा अनेक कमी-अधिक पडीक अवस्थेतील वास्तू आहेत. प्रत्येक माची आणि बालेकिल्ल्यावर पाण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. सदरेची जोती बघून जुन्या बांधकामाचे पुरावे बालेकिल्ल्यावर आजही दिसतात.

Rajgad fort
छत्रपती शिवाजीराजांचे मानवतावादी तत्त्वज्ञान

जसा राजगडाचा पाया भक्कम होता, त्याचप्रमाणे आपली कार्यसंस्कृती भक्कम असली पाहिजे. तसेच उपलब्ध साधन-संपत्ती आणि इतर सर्व संसाधनांचा परिणामकारक आणि प्रामाणिक वापर करणे महत्त्वाचे आहे. राजगडाकडे कोणत्याही बाजूने जाताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागत असल्याने ‘सुरक्षा’ हेसुद्धा महत्त्वाचे मूल्य ठरते. हाती घेतलेले प्रत्येक काम नेटाने पूर्ण करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि उपलब्ध असलेली प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या कार्यसंस्कृतीत सामावून घेण्यासाठीची तळमळ इथे दिसते. म्हणूनच नियोजन, नेतृत्व, दातृत्व, सुरक्षा, नावीन्यता अशी अनेक जीवनावश्यक मूल्ये राजगड शिकवतो. यामुळेच जसा स्वराज्याचा डोलारा उभा राहिला, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याला दिशा देणारी कार्यपद्धती आणि मूल्याधारित कार्यसंस्कृतीचा भक्कम पाया म्हणजेच किल्ले राजगड होय!

(लेखक : गोखलेज ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती) जळगावचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com