‘माणूसपणाचे संस्कार महत्त्वाचे’ (आदेश बांदेकर)

aadesh bandekar
aadesh bandekar

एकदा मी गाडी चालवत होतो आणि सोहम शेजारच्या सीटच्या पुढं उभा होता. साधारण पाच-साडेपाच वर्षाचा असेल. अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून मी वायपर सुरू केले, तर सोहमनं ते पटकन् बंद केले. मी पुन्हा सुरू केले. त्यानं पुन्हा बंद केले. असं दोन-तीनदा घडलं. शेवटी मी त्याला विचारलं : ‘‘तू वायपर सारखा बंद का करतोस?’’ त्यावर तो आकाशाकडे बघत म्हणाला : ‘‘बाबा, तू पण असं काय करतोय? तो पाऊस इतक्या लांबून येत आहे आणि आपल्या गाडीच्या काचेवर जरा बसायला बघतो आहे; तर तू त्याला बसू पण देत नाहीस जरा वेळ!!’’ गोष्ट छोटीशी होती; पण त्याचे शब्द ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं- कारण त्यावेळी माझ्या पाच-साडेपाच वर्षांच्या मुलानं मला खूप मोठी गोष्ट शिकवली होती.

आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणं हे प्रामुख्यानं मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलो. माझे वडील शासकीय सेवेत होते, तर आई नर्स होती. या दोघांकडून आम्ही भावंडं आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे महिन्यातली एक तारीख असो अथवा तीस तारीख- आलेल्या माणसाचं भरल्या ताटानं आदरातिथ्य केलं पाहिजे. आहे त्यात कायम समाधानी राहिलं पाहिजे. समोरच्याचं नेहमीच चांगलं चिंतलं पाहिजे. समोरच्याला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही आमच्या पालकांनी दिलेली प्रमुख शिकवण. त्यांच्याबरोबरच आम्ही राहत होतो, त्या अभ्युदयनगरमधल्या आमच्या मजल्यावरच्या नऊ घरांतल्या नऊ आईसामान मावशांनी ठेवलेलं लक्ष आणि दिलेलं प्रेम हे आमच्यातली संस्कारशीलता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. कारण आई-बाबा रोज कामावर जायचे. सकाळी गेले, की रात्रीच यायचे. तेव्हा याच घरांतल्या आमच्या नऊ मावशांनी खूप सांभाळलं.
मी खेळताना पडलो आणि काही लागलं, तर शेजारच्या पवार मावशी धावत येऊन मला उचलायच्या. स्वतःचा पदर फाडून त्याची पट्टी जखमेवर बांधायच्या. हे प्रेम त्या गिरणगावात होतं. त्यावेळी आम्ही कोणीच कधी विचारही केला नाही, की हे लुगडं फाडल्यानंतर त्यांना नेसायला आणखी लुगडी आहेत का? हा विचार स्वतः पवार मावशींनीही कधी केला नाही. आज पवार मावशी हयात नाहीत; पण त्यांची आठवण कायम आमच्या मनात आहे. आमच्याच मजल्यावर बनसोडे काकू राहायच्या. त्यावेळी फक्त त्यांच्याकडेच टीव्ही होता; पण स्वतःच्या जेवणाच्या वेळेचादेखील त्यांनी कधी विचार केला नाही. नेहमी आमच्यासाठी त्यांची दारं उघडी ठेवली. अभ्यास करण्यासाठी पोटतिडकीनं आईपेक्षा जास्त ओरडणाऱ्या शेवटच्या घरातल्या जाधव काकी होत्या. असा प्रेमळ नात्याचा ठेवा आम्ही अनुभवला आहे. या सर्व गोष्टी पालकत्वाशीच खूप निगडित होत्या, असं मला वाटतं. गिरणगावात शिकत असताना किंवा कुठलेही उपक्रम करत असताना आई-बाबांनी कुठल्याच गोष्टीला नाही म्हटलं नाही. तिथं गावाकडचा एखाद दुसरा पाहुणा कायम असायचाच; पण तरीही त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. त्यामुळे त्या काळात जे काही संस्कार झाले ते खूपच महत्त्वाचे ठरले.

माझ्या मोठ्या भावाची वापरून लहान झालेली शाळेची पँट माझ्याकडे यायची. अर्थात ती माझ्याकडे येताना नवीनच दिसेल अशी काळजी भावानं घेतलेली असायची. दादाची पँट मला मिळाली, की त्याचा खूप आनंद व्हायचा. आहे त्याच्यात आनंदी कसं राहायचं हे संस्कार त्यापाठीमागं होते. कालच्यापेक्षा उद्याचा दिवस आनंदात कसा घालवायचा याचा विचार करायचा, ही शिकवण आमच्या आई-वडिलांकडून आम्हाला मिळाली.

लहानपणी पाऊस साठला, की वडील तिन्ही मुलांना आवर्जून पावसात फिरायला घेऊन जायचे. कोजागरी पौर्णिमेला आमच्या समोरच्या मैदानात चटई घेऊन सोबत केशर दूध घेऊन जायचे. आम्हा तिघा भावंडांसोबत आमच्या मित्रांनाही दूध दिलं जायचं. लालबागच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी आई-बाबा आम्हा तिघा भावंडांना घेऊन गिरगावला जायचे आणि डबलडेकर बसमध्ये बसून उलट दिशेनं येत सगळे गणपती दाखवायचे. आज मला आनंद वाटतो, की ती आठवण लक्षात ठेवून माझा मुलगा सोहमदेखील माझ्याबरोबर असाच फिरतो. तो आता मोठा झाला आहे.
सोहमच्या बाबतीत मी नेहमी एक गोष्ट पालक म्हणून पाळली. व्यग्र असलो, तरी फक्त त्याच्यासाठीचा वेळ ठेवतो. तो नेहमी म्हणतो, की माझा बाबा मला ‘क्वांटिटी टाईम’पेक्षा ‘क्वालिटी टाईम’ देतो तो जास्त महत्त्वाचा आहे. मी एक गोष्ट नेहमी पाळली. कितीही थकून घरी आलो, तरी सोहम झोपेपर्यंत उत्साह कमी होऊ द्यायचा नाही. कारण तो त्याच्यासाठीचा क्वालिटी टाईम होता. तो मी त्याला कायम दिला. त्यामुळे आम्ही उत्तम मित्र बनलो आहोत. बऱ्याचदा पिकनिकलासुद्धा आम्ही दोघंच जातो.

माझी पत्नी सुचित्रा आणि मी आमच्या दोघांपैकी सोहमकडं नव्याण्णव टक्के लक्ष सुचित्रानंच दिले आहे. मी केवळ एक टक्का लक्ष दिलं आहे. तो एक टक्का म्हणजे त्याच्या प्रगतिपुस्तकाव्यतिरीक्त त्याच्यात किती आणि कोणते गुण सकारात्मक आहेत, यावर मी जास्त काम केलं. प्रगतिपुस्तकातल्या उत्तम गुणांपेक्षा त्याला माणूस म्हणून उत्तम जगता आलं पाहिजे, एवढंच लक्ष मी दिलं आहे. माझ्या मते ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर ठरवून संस्कार करावे लागले नाहीत. इतरांचा विचार करणं हे त्याच्या स्वभावात आहेच. अगदी उदाहरण द्यायचं झालं, तर त्याची आमच्या ड्रायव्हरशी घट्ट मैत्री आहे. आम्ही कुठं बाहेर गेलो, तर आधी ड्रायव्हर जेवले का हे तो बघतो. मला वाटतं- यामध्ये सगळं काही आलं. इथं पालक म्हणून सार्थक झाल्याची भावना जाणवते.

एकदा मी गाडी चालवत होतो आणि सोहम शेजारच्या सीटच्या पुढं उभा होता. साधारण पाच-साडेपाच वर्षाचा असेल. खूप लहान होता, म्हणून सीटवर बसता यायचं नाही. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून मी वायपर सुरू केले, तर शेजारी उभ्या असलेल्या सोहमनं ते पटकन् बंद केले. मी पुन्हा सुरू केले. त्यानं पुन्हा बंद केले. असं दोन-तीनदा घडलं. शेवटी मी त्याला विचारलं : ‘‘तू हे काय चालवलं आहेस सोहम? वायपर सारखा बंद का करतोस?’’ त्यावर तो आकाशाकडे बघत म्हणाला : ‘‘बाबा, तू पण असं काय करतोय? तो पाऊस इतक्या लांबून येत आहे आणि आपल्या गाडीच्या काचेवर जरा बसायला बघतो आहे; तर तू त्याला बसू पण देत नाहीस जरा वेळ!!’’ गोष्ट छोटीशी होती; पण त्याचे शब्द ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं- कारण त्यावेळी माझ्या पाच-साडेपाच वर्षांच्या मुलानं मला खूप मोठी गोष्ट शिकवली होती.

सोहमनं शिकवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे तो सातवीत असताना शाळेच्या एका नाटकात काम करत होता. मी नाटक बघायला गेलो. एका मधल्या रांगेत बसलो होतो, तर त्यांच्या प्रिन्सिपलनी जवळ येऊन मला पुढच्या रांगेत बसण्याचा आग्रह केला. मी नाही म्हणत होतो; पण ते ऐकेनात. म्हणून मी पुढं बसलो. नाटक झालं. त्यानं मला स्टेजवरून पाहिलं. नाटक संपल्यावर तो खाली आला; पण माझ्याशी बोलेचना आणि माझ्याकडे बघेही ना! मी त्याला म्हटलं : ‘‘अरे, नाटक चांगलं झालं की. तुला काय झालं?’’ त्यावर तो जवळ येऊन हळूच म्हणाला : ‘‘बाबा, इथं तू पालक म्हणून आला आहेस, की पाहुणे म्हणून?’’ मी म्हटलं : ‘‘पालक म्हणून! पण का रे?’’ त्यावर तो म्हणाला : ‘‘मग पालक म्हणून आला आहेस, तर पहिल्या रांगेत कशाला बसलास? माझ्या सर्व मित्रांचे पालक मागच्या रांगांमध्ये बसले आहेत.’’ मी त्याला सांगितलं : ‘‘अरे, मी पण मागंच बसलो होतो; पण तुमच्या प्रिन्सिपलनी सांगितलं म्हणून मी इथं बसलो.’’ त्यावर तो म्हणाला : ‘‘मग तू सांगायचं, की मी पालक म्हणून आलो आहे.’’ हा प्रसंग घडल्यानंतर पुढं आठवी, नववी, दहावी तीनही वर्षं मी पुढं न बसता मागं इतर पालकांबरोबर कार्यक्रम पाहिला. त्याची लहानवयातली ही समज खरंच कौतुकास्पद होती. मला बरंच काही शिकवून गेली.

सोहम लहान होता, तेव्हापासून आमचं नातं असं घडलं आहे, की मी त्याला कधी रागावलो नाही. त्याला माझ्या डोळ्यांतून कळतं, की बाबा चिडला आहे. याचं कारण म्हणजे आमच्यातल्या संवादामध्ये कुठलंही अंतर नाही. माझ्या मते हे पालकत्वाचं उत्तम उदाहरण ठरू शकेल, की मुलाला पाहिजे तेव्हा वाडिलांशी बोलता आलं पाहिजे, किंवा वडिलांचा एखादा प्रश्न असेल, तेव्हा त्याचं खरं उत्तर मुलाला देता आलं पाहिजे. असं नातं तयार होण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला आणि त्यात यशस्वीदेखील झालो. इतका संवाद आमच्यात आहे, की प्रत्येक गोष्ट त्याला माझ्याशी शेअर करावीशी वाटते. म्हणूनच त्याला पिकनिकला जाण्यासाठी आई-बाबा की मित्र असे दोन पर्याय उपलब्ध असतील, तर तो आई-बाबांबरोबरच येईल. सोहमचे जे सात-आठ मित्र आहेत, तेसुद्धा माझ्याशी अतिशय मोकळेपणानं बोलतात, चर्चा करतात. त्याचे हे मित्र महिन्यातून किमान आठ दिवस तरी आमच्या घरी राहायला असतात. मी घरी गेलो आणि सोहम एकटाच आहे, असं मी कधी बघत नाही. त्याच्याबरोबर नेहमी कोणीतरी असतंच.

माझ्या मते मुलांशी उत्तम नातं निर्माण होण्यासाठी आणि उत्तम प्रकारची मैत्री निर्माण होण्यासाठी मुलांचं म्हणणे शांतपणे ऐकलं पाहिजे. बऱ्याचदा आपणच समोरच्याला सांगतो; पण समोरच्याचं ऐकणं म्हणजे त्याला जिंकल्यासारखं असतं. ‘तू चुकीचाच आहेस,’ असाच ग्रह बरेच पालक मुलांच्या बाबतीत करून घेतात; पण तसं नसतं. समोरच्यालाही काहीतरी सांगायचं असतं. त्याचंही काही म्हणणं असतं. त्याचा आपण आदर केलाच पाहिजे. माझ्या मोबाइलमध्ये सुचित्राचं नाव मी ‘सुचित्राजी’ असं सेव्ह केलं आहे, तसाच आदर मुलगा म्हणून सोहमलाही मिळालाच पाहिजे. वयापेक्षा नात्याचा आदर राखला, की नातं अधिक घट्ट होतं.

सोहम आता बावीस वर्षाचा आहे; पण लहान असतानाही त्याला मोबाईलबद्दल फारसे नियम घालावे लागले नाहीत. कारण तो प्रचंड अभ्यासू आहे. सध्याच्या काळातलं नव्यानं येणारं सर्व प्रकारचं ज्ञान त्याला अवगत असतं. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट, कुठलंही सोशल मीडिया, लॕपटॉप, कोणतंही गॅजेट असो- ते किती प्रमाणात वापरायचं याचं त्याला अचूक ज्ञान आहे. तो वाचतो आणि ऐकतोही. ‘हातातला मोबाईल बाजूला ठेव,’ असं कधी सांगावं लागलं नाही. त्यामुळे अर्थातच ‘हे वापरू नको,’ असं सांगण्याचीही आम्हाला कधी वेळच आली नाही. हा कंट्रोल त्यानं मिळवला आहे, त्याच्या आहारी गेलेला नाही. सध्या तो झी फाइव्ह या वाहिनीवर इंटर्नशीप करत आहे. त्यानं एक मालिकानिर्मितीदेखील केली आहे. त्याला एक उत्तम गाडी घेऊन दिलेली आहे; पण कामाला जाताना तो रिक्षानं जातो. गाडी नेत नाही. ‘गाडीनं जास्त वेळ लागतो. रिक्षानं पंधरा-वीस मिनिटांत पोचतो,’ असं त्याचं उत्तर असतं. उगाच मोठेपणा न दाखवणं हा त्याचा आणखी एक गुण आहे.

गॅजेट्स किंवा आधुनिक तंत्राचं ज्ञान तुम्हाला असलंच पाहिजे, असं मला वाटतं. मात्र, गरज आणि ज्ञान यांसाठी ते वापरलं गेलं पाहिजे. ज्ञान आणि गरज या पलीकडे वापर गेला, की ते आहारी जाणं होतं. आहारी न जाता ‘वापर म्हणून फोन आणि ज्ञान म्हणून गॕजेट’ असा विचार केला, तर यासंबंधी कुठल्याही अतिरेकापासून दूर राहता येतं. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांशी पालकांचा संवाद हवा. तोच बंद झाला, तर मुलं मोबाईलमध्ये गुंतणारच. जो सगळ्यांत जास्त व्यग्र आहे तोच या मोबाइल, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींपासून दूर आहे. रिकामपणच गॕजेट्सच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरतं, असं मला वाटतं. प्रत्यक्ष संवाद असेल, तर व्हर्चुअल (आभासी) जगातल्या संवादाची गरज पडत नाही. कित्येक वेळा आम्ही सोहमला त्याचा मोबाईल आणून देतो आणि तो चार्ज कर म्हणून सांगतो. याचं कारण म्हणजे तो लहानपणापासून भरपूर माणसांत राहिला आहे. अजूनही तो फुटबॉल खेळतो. त्याला वाचनाची आवड आहे. त्याला चर्चा करण्याची खूप आवड आहे, स्किप्ट वाचण्याची आवड आहे. इतर दहा मार्ग खुले असल्यामुळे गॅजेट्स वगैरे गोष्टी त्याच्या दृष्टीनं मागं पडल्या असाव्यात. आमच्या घरात त्याचे मित्र येतात, राहतात. त्यामुळे त्यांच्यात सतत गप्पा, चर्चा होत असतात. असं वातावरण असल्यामुळे सोहम गॕजेट्‍समध्ये रमत नसावा. पालक या शब्दाची व्याख्या करायची झाल्यास ‘समजूतदारपणा, प्रचंड विश्वास आणि आदर या तिन्हींचं नाव म्हणजे पालक किंवा पालकत्व होय,’ अशी मी करीन आणि याचं आम्ही काटेकोरपणे पालन करतो.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com