विळखा (आरती मोने)

aarti mone
aarti mone

घरात ऋषभ नेहमीप्रमाणेच वागत होता. फक्त जास्त वेळ तो खोलीतच असायचा आणि ‘अभ्यास करत आहे’ असं चक्क खोटंच सांगायचा. बंड्या माझ्या सतत संपर्कात होता व मला रोज सर्व गोष्टी नव्यानं कळत होत्या.

माझ्या टेबलवरचा फोन वाजत होता. मीटिंग सुरू असताना सगळ्यांनी फोन बंद ठेवायचा असा माझा नियम होता आणि आज माझाच फोन वाजला होता. शेवटी नाइलाजानं उचलला. ऋषभच्या - म्हणजे माझ्या मुलाच्या - शाळेतल्या बाई बोलत होत्या.
‘‘अर्जंट आहे सर, दोन मिनिटं वेळ आहे का?’’ त्यांनी विचारलं.
‘‘हं, बोला’’
मला वाटलं, एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल बहुतेक; परंतु बाईंनी जे सांगितलं ते ऐकून मी हादरलोच.
इयत्ता नववीत असलेला आमचा ऋषभ हुशार होता. मात्र, तो गेले पाच-सहा दिवस शाळेतच जात नव्हता.
‘‘परीक्षेत ऋषभनं गणिताचा पेपर कोरा दिला होता आणि त्याचे मित्रही आता कुणीतरी वेगळेच आहेत. नेहमीचे नाहीत,’’ बाईंनी मला सांगितलं.
मी चेहरा शक्यतो शांत ठेवायचा प्रयत्न केला व ‘‘उद्या शाळेत येऊन तुम्हाला भेटतो,’’ असं बाईंना सांगून मी फोन बंद केला.
मीटिंगमध्ये नंतर माझं लक्षच नव्हतं. सहकाऱ्यांनीही हे ओळखलं आणि मीटिंग आवरती घेतली. तरीही घरी जाईपर्यंत साडेसात-आठ वाजलेच.
घरी गेलो तर ऋषभनंच छान हसत दार उघडलं. मीही हसलो.
‘‘काय करतोयस?’’ मी विचारलं.
‘‘बाबा, मी अभ्यास करतोय,’’ असं म्हणत तो वरती त्याच्या खोलीत गेला.
मी अवाक् झालो!

पत्नी नीलम घरी यायला अद्याप अवकाश होता. तिची ‘लॉयर्स असोसिएशन’ची मीटिंग होती आणि कन्या राही तिच्या मेडिकल एन्ट्रन्सच्या क्‍लासला गेली होती.
मी घरात आता तसा एकटाच होतो.
काय करावं ते कळेना.
ऋषभला खाली बोलावून विचारावं का सरळ? ओरडावं का त्याला?
खरं तर आमचं अगदी सुसंस्कृत, उच्चशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय घर. कशाचीही कमतरता नव्हती.
पण हे नवीनच काय उद्भवलंय?
***

रात्री जेवण झाल्यावर ‘चक्कर मारून येतो जरा’ असं घरात सांगून मी घराबाहेर पडलो आणि मला तीव्रतेनं बंड्याची - माझ्या जिवलग मित्राची - आठवण झाली.
माझ्या सर्व कठीण प्रसंगांत धावून येणाऱ्या बंड्याशी मी बोललो आणि मला खूप हलकं वाटलं.
यापुढं कुठलं पाऊल उचलायचं हे दोघांनी मिळून ठरवलं.
त्यानुसार उद्या आधी शाळेत जाऊन भेटायचं ठरलं.
जरा शांत झालो.
सकाळी नेहमीप्रमाणे स्कूल बसमधून ऋषभ शाळेत गेला.
मी त्याचं निरीक्षण करत होतो. तो अगदी नेहमीप्रमाणे वागत होता. थोड्या वेळानं मी आणि बंड्या निघालो. शाळेजवळ आलो.
बस शाळेजवळ थांबली. सगळी मुलं शाळेच्या इमारतीत आपापल्या वर्गांच्या दिशेनं गेली.
ऋषभ व आणखी एक मुलगा असे दोघं शाळेत न जाता बाहेरच थांबले. हा ऋषभचा अलीकडंच झालेला नवा मित्र होता. नवीन असं त्याचं नाव!
नवीनच्या हातात मोबाईल होता आणि पलीकडच्या मैदानावर थांबून दोघंही मोबाईलवर खेळत होते.
मी काय ते समजलो. दोघंही मोबाईलमध्ये गुंग झाले होते. गुंतले होते.
शाळेत जाऊन मी मुख्याध्यापिकांना भेटलो. त्यांची परवानगी घेतली.
ऋषभच्या वर्गशिक्षिकाही अस्वस्थ झाल्या होत्या.
आम्ही शाळेत आलेले पाहून बाईंनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायचं ठरवलं. बंड्या त्याचं स्वतःचं काम सांभाळून ऋषभच्या आणि नवीनच्या मागावर राहिला.

शाळेत न जाता बाहेरच राहणं हा आता ऋषभचा आणि नवीनचा रोजचा दिनक्रम झाला होता. बाहेर मैदानात वगैरे जाऊन ते दोघं मोबाईलवरचे गेम खेळत बसत व शाळा सुटण्याच्या वेळी तिथून निघून नेहमीप्रमाणे घरी येत असत.
घरातही ऋषभ नेहमीप्रमाणेच वागत होता. फक्त जास्त वेळ तो खोलीतच असायचा आणि ‘अभ्यास करत आहे’ असं चक्क खोटंच सांगायचा. बंड्या माझ्या सतत संपर्कात होता व मला रोज सर्व गोष्टी नव्यानं कळत होत्या.
* * *

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मला माझ्या वडिलांची - अण्णांची - आठवण येत होती.
अनिलदादा -माझा थोरला भाऊ- नुकताच कॉलेजला जायला लागला होता आणि मित्रांच्या नादानं त्याला सिगारेटचं व्यसन लागलं होतं. अण्णांना हे कुणीतरी सांगितलं. मी त्या वेळी तसा लहानच होतो; पण मला सगळं कळत होतं आणि एवढी वर्षं सरली तरी आजही तो प्रसंग आठवणीत आहे.
एके दिवशी दादा घरी येण्याच्या वेळेआधी अण्णा ऑफिसातून घरी आले व नेहमीप्रमाणे आरामखुर्चीत बसले. दादा आला.
अण्णा त्याला म्हणाले : ‘‘अन्या, आत जा आणि माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सिगारेट घेऊन ये. बरोबरच बसून ओढू. नंतर शिऱ्यालाही (म्हणजे मला) दे. खूप मजा येते ना सिगारेट ओढायला?’’
दादा खांबासारखा स्तब्ध झाला. अण्णांनी फक्त त्याच्याकडं पाहिलं. तो आतून दोन पाकिटं घेऊन आला आणि त्यानं सर्वांसमोर ती जाळून टाकली. विषय संपला.
दादा नंतर पुढच्या आयुष्यात पूर्णपणे निर्व्यसनी राहिला. आता तो पुण्यातला एक मोठा डॉक्‍टर आहे.
* * *

बंड्या ऋषभच्या मागावर असल्याला आता आठवडा उलटून गेला होता.
आज ऋषभ आणि नवीन दोघंही मैदानाकडं न जाता चक्क शाळेच्या इमारतीत शिरले. मात्र, वर्गात जाण्याऐवजी शाळेच्या गच्चीवर जाऊन दोघांनी कसली तरी पाहणी केली. ते आपापसात काही ठरवत होते. त्यांच्या खेळाचा उद्या शेवटचा दिवस होता.
बंड्याबरोबर आज मीही होतो. माझ्याबरोबर दोन साध्या वेशातले पोलीसही होते. आम्ही बाईंनाही सगळी पूर्वकल्पना दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून निघताना ऋषभ क्षणभर घरात घोटाळला असं मला वाटलं. नंतर शाळेत जाण्यासाठी म्हणून तो नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला.

बंड्या आणि मी शाळेच्या बसच्या मागं मागं निघालोच होतो. ऋषभ आणि नवीन बसमधून उतरून शाळेत गेले व नंतर काहीतरी कारण सांगून वर्गातून बाहेर पडले व गच्चीकडं निघाले. त्या दोघांनी एकमेकांत काही चर्चा केली. नंतर शेकहँड केला आणि ते कठड्याच्या दिशेनं धावले. त्यांना कळू न देता आम्हीही त्यांच्या मागं धावलो व त्या दोघांना आम्ही शेवटच्या क्षणी उडी मारण्याच्या आधी पकडलं. दोघंही अस्वस्थ होते. मला पाहताच ऋषभ गडबडला.
त्याची तडफड, अस्वस्थता मला जाणवली.
आम्ही बाईंचे आभार मानले.
ऋषभला घेऊन आम्ही घरी आलो. डॉक्‍टरांनी त्याला इंजेक्‍शन देऊन झोपवलं. तो घाबरला होता. कित्येक दिवस त्याची झोप नीट झालेली नव्हती. गेले काही दिवस तो झोपलेलाच नसावा कदाचित!
आमचं कुटुंब एका फार मोठ्या संकटातून वाचलं होतं.
नंतर ऋषभ हळूहळू सावरला. नववीचं वर्षं असंच संपलं. दहावीत मात्र तो जोमानं अभ्यासाला लागला.
***

आज ऋषभचा सत्कारसमारंभ होता. तो प्रथम आला होता. त्यानं सगळी बक्षिसं पटकावली होती. हे सर्व कळल्यावर आई आणि अण्णा आमच्याकडं वर्षभर राहायला आले होते. सत्काराला उत्तर देताना मी मुलांना म्हणालो : ‘‘ मी सर्वप्रथम नववीच्या तुमच्या वर्गशिक्षिका सप्रेबाईंचे आणि मुख्याध्यापिकांचे आभार मानतो. त्यांचं अमूल्य सहकार्य आम्हाला लाभलं. मुलांनो, या आभासी इलेक्ट्रॉनिक जगापासून तुम्ही खरंच दूर राहा. या आभासी जगापेक्षाही फार सुंदर असं वास्तवातलं जग तुमच्या समोर आहे. तुमच्यावर जिवापाड प्रेम करणारे तुमचे आई-बाबा, आजी-आजोबा, बहीण-भाऊ यांच्याबरोबर राहून ‘जीवन’ शिका आणि मोठे व्हा. निर्सगात रमा व खऱ्याखुऱ्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवा. वाचन करा. मात्र, आभासी जगापासून कृपया दूरच राहा. तो भीषण असा विळखा आहे. त्यातून बाहेर पडा.
ज्या ज्या पालकांना शक्‍य असेल त्या त्या पालकांनी आजी-आजोबांना घरातच ठेवून घ्यावं. घरात आजी-आजोबा असणं हा उत्तम व्यक्तिमत्त्वाचा एक चालता-बोलता वस्तुपाठच असतो. त्यांच्याकडून त्यांच्या स्निग्ध प्रेमाबरोबरच अनुभवाचं ज्ञान आत्मसात करा.’’
****

सत्कारसमारंभाहून घरी येताना गेल्या वर्षभरातल्या घटना माझ्या डोळ्यांसमोर तरळत होत्या.
अखेर तो विळखा सुटला होता. आमचं कुटुंब त्यातून सावरलं होतं.
नवा सूर्योदय झाला होता...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com