esakal | एका भरारीची ‘सारस’कथा (अभिमन्यू काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

abhimanyu kale

एका भरारीची ‘सारस’कथा (अभिमन्यू काळे)

sakal_logo
By
अभिमन्यू काळे abhimanyukale@hotmail.com

एकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या प्रयत्नांतून या पक्ष्यांची संख्या उल्लेखनीयरित्या वाढली. ‘तलावांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या गोंदियाची ‘सारसांचा जिल्हा’ अशी ओळख होऊ लागली. या यशोगाथेवर एक नजर.

एके काळी सर्वत्र ठिकाणी सारस पक्षी आढळत होते, नद्या, तलाव, धान शेतं, उथळ पाण्याची ठिकाणं हे सारस पक्ष्याचं आधिवास क्षेत्र आहे. आपल्या ग्रंथामध्ये आणि संस्कृतीमध्ये सारस पक्षांबद्दलचा आदर आणि त्यांचं महत्त्व ठळकपणे नोंदवलेलं आहे. भारतामध्ये सारस पक्षी उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश इथं हमखास आढळतो आणि या राज्यांमध्ये सारसांची संख्या थोडी समाधानकारक आहे. मात्र, महाराष्ट्रात सारस पक्ष्यांची संख्या सन २०००- २००२ च्या दरम्यान एकदम नामशेष होण्याच्या अवस्थेपर्यंत गेली होती. सन २००३ ला राज्याचा वन विभाग आणि बीएनएचएस संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी राज्यात सारस पक्षाची गणना करण्यात आली आणि गणनेचे आकडे एकदम खळबळजनक आले. राज्यात फक्त चार सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. ते खूप निराशाजनक होतं.

सन २००३-०४ मध्ये गोंदिया जिल्ह्यात केवळ चार सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि विशेषतः सेवा संस्थेनं प्रेमाचं प्रतीक आणि वैभव असलेल्या या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाचा विडा उचलला. त्यामुळे हळूहळू सारसांच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली. सन २०१३-१४ पासून सेवा संस्थेच्या सदस्यांनी सारसांचं अधिवास असलेल्या परिसराचा शोध घेऊन त्यांची अंडी आणि त्यांचं संवर्धन करण्यास सुरुवात केली. सारससंवर्धनासाठी सुरू केलेल्या मोहिमेला आज चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं असून, या चळवळीचा उद्देशही साध्य झाला आहे. सुरवातीला चार असलेली सारस पक्ष्यांची संख्या आज ४२ वर पोचली आहे, तर लगतच्या मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातसुद्धा ही चळवळ पोचल्यानं त्या ठिकाणीसुद्धा ५२ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्यानं सारसांचं नंदवन फुलत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं गोंदिया जिल्ह्याची ओळख तलावांच्या जिल्ह्यासोबतच ‘सारसांचा जिल्हा’ म्हणून होऊ लागली आहे. सेवा संस्था आणि सारस मित्र हे प्रेमाचं प्रतीक आणि वैभव जपण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असून, सारसांचे ‘माळढोक’ होऊ नयेत म्हणून आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.

सारस संरक्षण आणि सेवा संस्थेचा पुढाकार
‘तलावांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला ‘सारसांचा जिल्हा’ अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहिमेमुळं गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात सारसांचं नंदनवन फुलत आहे. त्यामुळं सारस संवर्धनाच्या मोहिमेला चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं असून, ती यशस्वी होत आहे. महाराष्ट्रातून नामशेष होत असलेल्या माळढोक पक्ष्यासारखेच सारस नामशेष होऊ नयेत, यासाठी गोंदिया इथली सेवा संस्था आणि सारस‘मित्रां’ची फौज प्रयत्न करत आहे. सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासनातर्फे वार्षिक सारसमित्र संमेलन दरवर्षी आयोजित करण्यात येतं. त्यामध्ये सारसांची घरटी वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शेतकरी सारसमित्रांचा आणि स्वयंसेवकाचा सन्मानपत्र आणि आवश्यक साहित्य देऊन सत्कार करण्यात येतो. पशु-पक्षी आणि मानव यांच्यात नेहमीच नातं राहिलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनंसुद्धा पशु-पक्ष्यांचं फार महत्त्व आहे. पशु-पक्ष्यांच्या हालचालींवरून पाऊस आणि वातावरणातल्या बदलांचे अंदाज बांधले जातात. त्यामुळं पशु-पक्ष्यांचं मानवी जीवनात महत्त्वपूर्ण स्थान राहिलं आहे. प्रत्येक पक्ष्याला एक वेगळी ओळख आहे. प्रेमाचं प्रतीक आणि वैभव समजला जाणारा सारस पक्षी हा फार दुर्मीळ समजला जातो. महाराष्ट्रात या पक्ष्यांची संख्या फार कमी असून, ती सर्वाधिक गोंदिया जिल्ह्यात आहे.

त्यामागचं कारणही तसंच आहे. गेल्या चौदा वर्षांपासून जिल्ह्यातल्या सेवा संस्था आणि सारसमित्र यांची धडपड हे त्यामागचं कारण. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा असून, तलावांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. इथलं वातावरणसुद्धा सारस पक्ष्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळं या पक्ष्यांचा अधिवास धानाचं शेत, नदी, तलाव या परिसरात अधिक असतो.

एका विचारामुळं कलाटणी
मी गोंदिया जिल्हाचा तत्कालीन जिल्हाधिकरी असताना संपूर्ण जिल्ह्यात सेंद्रीय पद्धतीनं धानशेती करण्याचे उपक्रम आणि योजना राबवण्यात आली. प्रशासकीय संस्था आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांची मदत आणि सहभाग या उपक्रमामासाठी मिळाला. सोबतच सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना साहित्य आणि प्रशिक्षण शासनाद्वारे देण्यात आले, हे उपक्रम सन २०१६-१७ या कालावधीत सुरू करण्यात आले. त्यात अनेक शेतकरी सहभागी झाले आणि भरपूर एकर जमिनीवर सेंद्रीय शेतीला सुरवात झाली. अजूनही ही योजना कार्यान्वित आहे. तसंच सारसांचं संवर्धन व्हावं या हेतूनं आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसाचं घरटं असेल, त्या शेतकऱ्याला प्रत्येक घरट्यामागे दहा हजार रुपये नुकसानभरपाई/ प्रोत्साहन मानधन देण्यास सुरवात केली. हा विचार या संपूर्ण संवर्धन प्रक्रियेला कलाटणी देणारा ठरला. या योजनेमुळं अनेक शेतकरी मग पुढं आले आणि तेही या संवर्धन चळवळीचे एक प्रकारे साथीदार बनले. जमीन ताब्यात घेण्यासारख्या गोष्टींपेक्षा अशा प्रकारचं प्रोत्साहन मानधन देण्याचा विचार सारसांच्या संवर्धनाच्या बाबतीत जसा यशस्वी झाला, तसा तो महाराष्ट्रातल्या वन्यजीव संवर्धनाच्या इतर चळवळींनाही बळ देऊ शकेल. आम्ही केवळ या शेतकऱ्यांना मानधन दिलं नाही, तर त्यांनी या मोहिमेला हातभार लावल्यामुळं त्यांचा नंतर प्रजासत्ताक दिनी सत्कारही केला. त्यातून खरी सकारात्मक ‘पेरणी’ झाली.
सेवा संस्थेनं शेतकऱ्यांना ‘सारस मित्र’ करून या पक्ष्यांचं संवर्धन केलं. जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी सारसांच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आणि पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सारस पक्ष्यांच्या प्रतिकृती उभारण्यात पुढाकार घेतला होता. या गोष्टीचाही वातावरणनिर्मितीसाठी खूप चांगला उपयोग झाला. अशा प्रकारे सारसांच्या संवर्धनासाठी प्रशासनातर्फे पाठबळ देण्यास सुरवात केल्यानं एका चांगल्या उपक्रमाचं बीज रुजलं.

घरट्यांचं संरक्षण महत्त्वाचं
सारस पक्षी धान शेतांमध्ये आणि छोट्या, उथळ पाण्याच्या स्रोतांमध्ये (तलाव) आपली घरटी तयार करतात. घरटी वर्षातून एकदा मान्सून काळात तयार केली जातात. सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सारसांच्या या घरट्याचं संरक्षण होणं आणि ती योजना यशस्वी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळीकडंच हे लक्षात घेतलं पाहिजे. याचबरोबर ज्या शेतांमध्ये सारस पक्ष्यांची घरटी असतात ती शेतं आणि सभोवतालची जवळपास २५-३० एकर शेती सेंद्रीय पद्धतीनं करणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेऊन, त्यांना आवश्यक साहित्य, प्रशिक्षण अनुदान घोषित करून योजना राबवल्यास त्यातून उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळेल. सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या तलावांमधल्या जैवविविधतेचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. या तलावांच्या सभोवतालच्या परिसरात जवळपास पन्नास एकर शेती सेंद्रीय शेतीमध्ये रूपांतरीत करायला हवी. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्या योजनेत सामील करून घ्यायला पाहिजे. सेंद्रीय पद्धतीनं शेती झाल्यास, शेतातून कीटकनाशकांचा तलावात होणारा निचरा थांबेल आणि त्यातून तलावांची जैवविविधता जपली जाईल; तसंच ती पुनरुज्जीवित होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल.

सारस पक्षी संपन्नतेचं प्रतीक
सारस पक्षी आणि शेतकरी हे फार जवळचे मित्र आहेत. सारस पक्ष्यांना जैवविविधतेचा मुख्य घटक मानलं जातं. सारस पक्ष्यांमुळे तलाव आणि परिसरातल्या जैवविविधतेचं संवर्धन करण्यास मदत होत आहे. धानाच्या शेतीमध्ये सारस पक्ष्यांचा वावर अधिक असल्यास त्यांच्या वावरण्यामुळं धानाला पोषकत्व मिळतं. त्यामुळं धानाच्या उत्पादनातसुद्धा वाढ होते. त्यामुळंच ‘नांदती सारस ज्या शेतात ती शेती नेहमीच संपन्न होते,’ असं म्हटलं जातं.

‘इतरांनीही आदर्श घ्यावा’
गोंदिया या तलावांच्या जिल्ह्यात सारसांचं नंदनवन फुलत असून, याची पर्यटकांनासुद्धा भुरळ पडत आहे. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटन विकासालासद्धा चालना मिळत असून, रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होत आहे. सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव असून, या पक्ष्यांचं संवर्धन करून भविष्यात जिल्ह्यात सारस पक्ष्यांचं हब तयार व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितलं. ‘‘ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसचं घरटं असेल, त्यांना प्रोत्साहन मानधन देण्याची योजना गोंदिया जिल्ह्यात यशस्वी झाली. अशा प्रकारची योजना माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राबवली तर त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल,’’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.

loading image
go to top