चंद्रभागाईची गोधडी (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

सतत कामात असणारी चंद्रभागाई गोधड्याही शिवायची. मजुरीच्या कामाला जायची. माझी आई तर म्हणायची, ‘चंद्रभागाईला हजार हात आहेत.’ आणि ते खरंही असावं! कारण, मजुरीला जाणं, इतरही कामं निपटणं, घर सजवणं...आणि वर परत गोधड्याही शिवणं...एवढा सगळा वेळ तिला कुठून मिळायचा कळायचं नाही.

हिवाळ्याच्या दिवसांत रजई, ब्लँकेट, दुलई अशा तत्सम गरम पांघरुणांचं तुम्हाला फार कौतुक असेल अन्‌ ते असायलाच पाहिजे, यात काही माझं दुमत नाही. मात्र, आमच्या घरी चंद्रभागाईनं शिवलेली गोधडी आहे. तिच्यासमोर तुमची रजई, ब्लँकेट, दुलई अगदी कुचकामी आहे असं मी म्हणणार नाही; मात्र तुमचे हे गरम कपडे निश्चितच कमी उबदार आहेत, असं मात्र मी आत्मविश्वासानं सांगतो.
हे माझं म्हणणं खरं आहे हे मानण्यासाठी जर तुम्हाला एखाद्‌दुसऱ्या साक्षीदाराची आवश्यकता असेल तर त्यासाठीही मी मागं हटणार नाही.

मात्र, तुम्हाला त्यासाठी आमच्या गावी यावं लागेल. सगळं गाव याची साक्ष देईल. चंद्रभागाईच्या गोधडीचं मला एवढं अप्रूप असावं असं तिच्या गोधडीत होतं तरी काय? ती तुम्ही पांघरली असतीत तर मला हे सांगायची आवश्यकता भासली नसती. मला तर असं वाटायचं की चंद्रभागाईनं नुसता सुई-धागा घेऊन ती गोधडी शिवली नाही, तर तिनं चंद्र आणि सूर्यच टाचून टाकलेत गोधडीला! तिच्या गोधडीतून हिवाळ्यात जर सूर्याची ऊब मिळत असेल अन्‌ उन्हाळ्यात चंद्राची शीतळता...तर मग का वाटणार नाही मला असं! तिला जर जगाच्या गोधड्या शिवायचं काम मिळालं असत ना तर चंद्रभागाईनं ते वेळेच्या आधी पूर्ण करून दिलं असतं. तिची गोधडी जगाचं अंथरूण-पांघरूण झाली असती! पण जग खूप मोठं आहे, त्यातूनही माणूस माणसापासून मैलोन्‌मैल दूर. एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत आपल्याला आता विमान सहजी पोचवत असलं तरी माणसाला माणसापर्यंत पोचवण्याचं साधन काही अजून तरी निर्माण झालेलं नाही. मग आमच्या गावच्या चंद्रभागाईची गोधडी तुमच्यापर्यंत कशी पोचणार?
एखाद्या सुगरण बाईच्या हाताला जशी चव असते, जास्तीचा मालमसाला न वापरता, तिनं फक्त मीठ-मिरची टाकून कुठलाही पदार्थ करू दे, तो छानच लागतो, तसंच चंद्रभागाईचंही. तेव्हा, जगभर गोधड्या शिवल्या जात असतील; पण चंद्रभागाईच्या गोधडीसारखी गोधडी निश्चितच शिवली जात नसेल. कारण, ती शिवणारी एकमेव चंद्रभागाई होती अन्‌ ती आमच्या गावात होती. आज जेव्हा हिवडून जाणारं जग मी पाहतो तेव्हा वाटतं की चंद्रभागाईला जर का कळलं असतं तर तिनं तिच्या पदरची गोधडी शिवून दिली असती. ज्याच्या अंगाखाली पांघरूण नाही अन्‌ पांघरायला काही नाही असा माणूस सापडलाच नसता; पण हे चंद्रभागाईपर्यंत कुणी पोचवलंच नाही. भारताचा नकाशा अफाट झूम करून आमचं गाव तुम्हाला दिसलंही असतं; पण ते कागदावर. मातीवरून चालत यायचं ठरवलं असतं तर आमचं गाव तुम्हाला सापडलंच नसतं; मग चंद्रभागाई तर फार दूर राहिली. आमच्या गावाच्या बाहेर मोठं जग आहे हे मलाही कुठं माहीत होतं त्या वयात! नाहीतर तिची गोधडी मीच तुमच्या दारापर्यंत घेऊन आलो नसतो का?

सतत कामात असणारी चंद्रभागाई गोधडी शिवायची. मजुरीच्या कामाला जायची. माझी आई तर म्हणायची की चंद्रभागाईला हजार हात आहेत. आणि ते खरंही असावं! कारण, कामाला जाऊन वर परत गोधडी शिवायची तर तिला तिचं घर सजवायला वेळ कुठून मिळायचा कळायचं नाही. मलाही जेव्हा आता काही लोक भेटतात अन्‌ म्हणतात, ‘वेळंच मिळत नाही, नाहीतर आम्हालाही लिखाणाची फार आवड होती’ तेव्हा अशा लोकांची मला विलक्षण कीव येते. त्यांनी चंद्रभागाईचं काम पाहिलं असतं तर असं म्हणायची त्यांनी हिंमत केली नसती. चंद्रभागाईचं घर मातीचंच, मात्र त्यापुढे सिमेंटचा बंगला फिका. तिच्या घराच्या भिंती पांढऱ्याशुभ्र. चांदण्यात तर मला ते चंद्राचंच घर वाटायचं; इतकं उजळून निघायचं..! ते घर सारवण्या-पोतारण्यासाठी तिला पांढरी चिकणमाती कुठं मिळायची ते कळायचं नाही.

कारण, गावात कुठंच अशा मातीचा मागमूस नव्हता. त्या मातीचा शोध जर का गावाला लागला असता तर ती माती कधीच संपून गेली असती. चंद्रभागाईच्या घरांच्या भिंतींनाही काळीच माती लागली असती. गावात तिचंच घर इतकं देखणं कसं? तिला पांढरी माती मिळते कुठं? यावर एक दिवस संतू म्हणाला :
‘‘चंद्रपुनवंच्या राती, चंद्राच्या उजेडात जी माती पांढरी व्हती ती चंद्रभागाईला ठाऊक हाये. चंद्र जव्हा खळं करत अस्तो तव्हा त्याची काळी माती जिमिनीवर पडते, तीच चंद्रभागाई उचलून आनीते, असं माही बय म्हन्ली!’’ बय म्हणजे संतूची आई.
‘‘आमी काय घाटाखालून आलो व्हय? काई बी भपाऱ्या मारून
ऱ्हायलाय!’’ संतूच्या पाठीत गुद्दा मारत नित्या म्हणाला.
‘‘न्हाई तं काय! हा तं आप्ल्यायला भोपूच समजला. म्हणं, पुनवंच्या राती माती जिमिनीवर पडते, असं कधी अस्तं काय?’’ सित्यालाही चेव आला
‘‘हा नं तं! असं अस्तं तं चंद्रच येऊन नस्ता पडला का खाली?’’ अंत्यानंही त्याचं तर्कशास्त्र जाहीर केलंच.
‘‘आम्हीच भेटलो व्हय तुला पुड्या सोडायला?’’
संतूला असा काही राग आला. त्यानं नित्याचा हात धरला. निबर पिरगळू लागला. नित्या बोंबलायला लागला. हात तसाच हातात धरून नित्याच्या पाठीत कोपर रुतवत संतू म्हणाला :
‘‘म्या खोटं सांगून ऱ्हायलोय?’’
‘‘हा रे. पोरंय व्हो, ह्यो खरं सांगून ऱ्हायलाय!’’

संतूनं आपले बोल कसे खरे आहेत हे नित्याकडून वदवून घेत त्याला सोडलं.
त्या गोष्टीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब झालं. जगासाठी काय सत्य असेल माहीत नाही. मात्र, आमच्यासाठी तेच सत्य. हे सत्य पुढं कितीतरी दिवस टिकलं. पायातला काटा काढण्याचं कसबही तिच्याकडे होतं. तुम्ही म्हणाल, लोकांचा अपघात होऊ शकतो, त्यांना मोठमोठे आजार होऊ शकतात. हे काय नव दुखणं पायात काटे मोडण्याचं? घरात ढिगानं चप्पल-बूट असल्यावर कसे मोडणार पायात काटे! मात्र, आजच्यासारखे चप्पल आणि बूट तेव्हा नसायचे. शिवाय, लोक गावात राहायचे अन्‌ रानावनात हिंडायचे. तेव्हा बाभळीची झाडं खूप असत. त्यांना टोकदार काटे असायचे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पायात काटे खुडायचेच. शेजारच्या काजी सांगवी या गावात होता सरकारी दवाखाना. तिथला डॉक्टरही एखाद्याच्या पायात भरलेल्या काट्यापुढं हार मानायचा. चंद्रभागाई मात्र जिंकायची. लोक
रडत-बोंबलत यायचे. त्यांच्या पायात ठसठसणारं दुखणं चंद्रभागाई उपसून फेकून द्यायची. एखादा तर एवढा विव्हळत अन्‌ कळवत असायचा की शहाणासुरता असूनही लहान पोरासारखा वागायचा. चंद्रभागाईच्या हाती पाय द्यायला तयार व्हायचा नाही. अशा वेळी चंद्रभागाई त्याला म्हणायची
वो माय
ढगात पाह्य
का ये बाय
त्ये पाह्य
त्ये पाह्य
वो माय
दे ठाय..
कावळा उडाला की बाय..
एवढं म्हणेपर्यंत त्याचा पाय चंद्रभागाईच्या हाती जाऊन, काटाही निघालेला असायचा. कळवळणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं. चंद्रभाईच्या ठायी देवानं एवढे गुण कसे देऊन ठेवले म्हणून नवल वाटायचं! त्यात संतूनं पुन्हा एका गोष्टीची भर घातलीच. त्याच्याकडे या गोष्टी कुठून जमा व्हायच्या कळायचं नाही. खरंतर तो स्वत:च्याच मनानं जुळवून सांगायचा अन्‌ त्याच्या बयवर ढकलून द्यायचा.

‘‘यकदा काय झालं, आप्ल्या गावावरून शंकर-पारवतीचं इमान चाल्लं
व्हतं. गबू काळ्याच्या वावरातली पिवळ्याधमक फुलांनी फुललेली बाभूळ पाह्यली पारवतीनं. तिनं केला हट्ट शंकराकडे की माला त्या झाडाची फुलं हावी. शंकरानं आप्लं इमान बाभळीच्या झाडाखाली उतरवलं. इमानातून शंकरानं बाह्यर पाय ठिव्ला नं ठिव्ला तं तोच पायात खुडला नं काटा. पायात कुढं व्हती चप्पल? आन्‌ काट्याला कुढं माह्यती व्हतं की हा देवाचा पाय हाये म्हनून? तो काय गय करीन का? तो मोठा देव असून बी कळवळला. यवढंसं तोंड केलं. पारवतीला पाहवंनात देवाचे हाल. तिला काय करावं उमगंना. चंद्रभागाई निघाली व्हती चंद्राची माती आनाया. पारवतीनं घातली हाक. चंद्रभागाईनं येऊन कहाढला देवाचा काटा. मग देव झाले परसन्न, म्हन्ले, वर माग. चंद्रभागाईनं काईच मागितलं न्हाई. देव तर मग आन्खीच खूश झाले. ‘लोकायचं दुख तू काट्यासारखं दूर करशील!’ असा वर देऊन शंकर-पारवती अंतर्धान पावले..’
संतूच्या बऱ्याच गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवत नव्हतो; मात्र ज्या गोष्टीनं कुणाचाच तोटा होणार नाही तिच्यावर विश्वास ठेवायला काय जातं..! म्हणून ही गोष्टही खरीच वाटली. असं जरी असलं तरी
चंद्रभागाई मला गोधडीसाठीच आठवते. तो कडाक्याच्या थंडीचा हिवाळा होता. एकदा बहीण आईला म्हणाली:
‘‘आई वं, चंद्रभागाईकडून यखांदी गोधडी शिवून घेऊ!’’
‘‘माला बी मस वाटतं; पन कशी शिवनार?’’
‘‘का म्हून?’’
‘‘अगं बाई, त्यासाठी जुनंपानं धांदूक द्यावं लाग्तं.’’
‘‘मग दे की.’’
‘‘कसं देनार? ते द्यायला हाये का घरात? माझ्याकं तं यकच लुगडं. तेच पुन्हा पुन्हा शिवून नेसते मी.’’
मग आमच्या गोधडीचं राहिलंच. गोधडीसाठी जुनं लुगडं, धोतर असं काही द्यावं लागतं. शिवाय, गोधडीच्या आतलं ‘पुरण’ म्हणून जुनेपाने कपडेही द्यावे लागतात, तेही कुठं होते आमच्याकडे?
मी आईला म्हणालो : ‘‘आई, तिला गं कशा यवढ्या भारी गोधड्या शिवता येत्या?’’
‘‘आरं, गोधडीचं काय घेऊन बसला? ती माणसाचं मन शिवून कहाढते?
लई मायाळू, कुनाच्या डोळ्यातला आसू तिला न्हाई सहन व्हत. अडीनडीला लगीच धावून जाते. दगडाच्या डोळ्यात जर पानी अस्तं तं त्याला बी जाऊन तिनं त्याचं दुखनं इच्यारलं अस्तं.’’

एका कडकडून टाकणाऱ्या थंडीत चंद्रभागाई भलीमोठी गोधडी घेऊन आली आमच्या घरी. आईला बोल बोल बोलली. जिव्हाळ्याच्या नात्यानं. गोधडीच्या आतलं पुरण जसं दाखवता येत नाही, तशी काही दु:खंही दाखवता-सांगता येत नाहीत. त्यांची वेगळी गोष्ट आहे, ती मी स्वतंत्रपणे सांगेन. मात्र, चंद्रभागाईनं दिलेल्या गोधडीत आम्ही तिघं भावंडं गुडुप झालो..
आता माझी लेक चंद्रभागाईची गोधडी पटकावून बसली आहे...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com