‘गाडी आनावी बुरख्याची...’ (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

मग मी कुणालाच त्यासंदर्भात काही बोललो नाही अन् काही विचारलंही नाही. ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी फक्त मार बसतो, प्रश्न तसाच राहतो, त्या प्रश्नाचं उत्तर कुणाला विचारणार? नाहीतरी असे कितीतरी प्रश्न जाणूनबुजून अनुत्तरितच ठेवले जातात.

रविवारच्या बाजारच्या दिवशी ती तवंगावरच बसलेली असायची. ती आमच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठी होती. तिला कुणी तोंडभरून, मायेनं ‘लंका ऽऽ’ अशी हाक मारली नाही की आम्ही पोरंही तिला कधी ‘लंकाताई’ म्हणालो नाही. लंकीचीही त्यासंदर्भात कुठलीच तक्रार नसावी. कारण, ‘तुमी काय माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्या का, मला लंकी म्हनाया?’ असं काही आम्हाला कधी ती रागानं ओरडून म्हणाली नाही.
तिला लंकी म्हणण्याची मुभा आम्हाला जणू काही एखाद्य अघोषित करारासारखी प्राप्त झाली होती!
...तर सांगत काय होतो की लंकी बाजारच्या दिवशी तवंगावर बसलेली असायची. बाजारला निघालेला माणूस हेरला की लंकी पळतच जायची त्याच्यामागं अन्‌ त्याला हटकून एकच धोशा लावायची :
‘‘तात्या, वो तात्या, ऐका ना’’
‘‘काय गं, काय म्हन्ते, लंके?’’
‘‘बजारा चालला का, बजारा?’’
‘‘हा, लवकर सांग तुह्यासाठी काय आनू?’’
लंकी मग त्या तात्याला तिची मागणी लयीत सांगायची : ‘गाडी आनावी बुरख्याची ऽऽ बुरख्याची दोन चाकी ऽऽ’
‘‘तुह्या नादात यस्टी जायाची निंगून!’’ तात्या कावून म्हणायचा.
‘‘आन्नार नं मंग बुरख्याची गाडी माह्यासाठी? दोन चाकी बरं का, तात्या!’’
‘‘दोन कशाला चांगली चारचाकी घिऊन येतो की...’’
ती पुन्हा तवंगावर जाऊन गालाचा चंबू करून बसायची. मग तात्या तिचा राग काढू पाहायचा.
‘‘काय झालं आम्च्या लंकाबाईला?’’
‘‘कट्टी. आमी न्हाई बोलनार...बुरख्याच्या गाडीला कधी चार चाकं असत्यात का?’’
‘‘बरं बाबा, घिऊन यिईन’’ डोळे टिपता टिपता तात्या म्हणायचा.
कित्येक रविवार गेले असतील...तात्याचं अन्‌ लंकीचं हेच संभाषण. तात्या कधीच कंटाळला नाही. कंटाळेल कसा? तात्याची लेक होती ती. होती मोठ्या भावाची; पण तात्या तिला लेकीसारखाच सांभाळायचा. दरवेळी लंकीविषयीच्या अतीव कणवेनं त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. तो तिचे जमेल तसे छोठे-मोठे हट्ट पुरवायचा. तो तात्या होता म्हणून ठीक, तो जिवाचा होता. मात्र, परक्याला थोडंच तिच्याविषयी असं काही वाटणार? परके लोक तिची चेष्टाच करायचे.
‘‘आवो आत्याबाई, कुढं चालल्यात?’’
‘‘चाल्ले बाई म्हस्नात! येती का?’’
‘‘हे वं काय आत्याबाई, तुमी तं बजारा निंगाल्या नं? खोटं काय सांगून ऱ्हायल्याय मंग? म्या कुढं तुम्च्या मागं लागून येनारंय?’’
‘‘यवढं तं कळतं, मंग कामून इच्यारते गं?’’
‘‘त्याला कारन बी तसंचंय...असं काही इच्यारायला माला का याड लागलंय का?’’
‘‘ते काय बाकी ऱ्हायलंय का?’’ मनातल्या मनात पुटपुटल्यासारखं करत आत्या म्हणायची.
‘‘काय कामंय?’’
‘‘माह्यासाठी यक गोष्ट आनशाल का?’’
‘‘बुरख्याची गाडी’’ असं म्हणून पुन्हा लंकीचं लयीत गाणं सुरू व्हायचं : ‘गाडी आनावी बुरख्याची ऽऽ बुरख्याची दोन चाकी ऽऽ’
‘‘ह्ये मेल्ये पांढरे, असा का वंगाळ नाद! म्हनं, गाडी आनावी भुरक्याची!’’ असं म्हणत आत्याबाई एसटीची गाडी आल्याचा आवाज येताच तरातरा पावलं उचलत एसटीच्या दिशेनं निघून जायची.

बाजारला जाणारे नुसते तात्या आणि आत्याच नव्हते! दुसरेही कितीतरी जण होते. लंकी त्या सगळ्यांना बुरख्याची गाडी आणायचं काम सांगायची. त्या दिवशी ती घरी जायची नाही. ना जेवणखाण, ना काही. संध्याकाळी बाजारहून येणाऱ्या एसटीची ती वाट पाहत राहायची. कारण, तिची बुरख्याची गाडी कुणी ना कुणी घेऊन येणारच असा तिला दाट विश्वास असायचा.
संत्या, हणत्या, नित्या आम्हा पोरांना तरी दुसरा कुठला उद्योग? आम्ही तिची खिल्ली उडवण्यासाठी तवंगावर पोचायचो.
‘‘काय लंके, घरी न्हाई जायाचं का?’’
‘‘म्या कशाला घरी जाऊ? माही बुरख्याची गाडी येनारंय!’’
‘‘तुह्या बुरख्याच्या गाडीत आमाला बसू देशीन का?’’
‘‘वा...वा, भारीच हायेस रं? म्या कशी तुला बसू दिईन?’’
मग कुणीतरी शहाणा माणूस येऊन आम्हाला पिटाळून लावायचा. लंकी मात्र एसटी आल्याशिवाय तवंगावरून हलायची नाही. एसटी येताना दिसली रे दिसली की बुरख्याची गाडी तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागत असणार. एसटीतून आधी जे कुणी उतरंल ते लंकीच्या तावडीत सापडलंच म्हणून समजायचं.
‘‘आन्ली का, आन्ली?’’
‘‘काय!’’ तो जर का गावचा पाहुणा असेल तर अधिकच गांगरून जायचा.
‘‘बुरख्याची गाडी आनायला सांगितली व्हती नं!’’
‘‘न्हाई आन्ली!’’
‘‘कशी न्हाई आन्ली? आनायची नं मंग! हे काय आन्लं बिनकामाचं?’’ असं म्हणत ती पिशवी रस्त्यावरच उभरून द्यायची. आम्ही पोरं तसेही टपूनच बसलेलो असायचो. हीच संधी साधून तिच्यामागं कोंडाळ्याकोंडाळ्यानं जायचो.
‘‘ए लंके, आन्ली बरं का!’’
‘‘काय?’’
‘‘बुरख्याची गाडी!’’
‘‘दाव बरं’’ तिनं असं म्हटल्यावर आम्ही तिला अंगठा दाखवायचो. त्यामुळे ती भलतीच चिडायची अन्‌ आमच्या मागं दगड घेऊन धावायची.
‘‘काय रं, यड्या हो? माही चेष्टा करून ऱ्हायले का? आता का म्हून पळू ऱ्हायले? थांबा, बघंतेच आता तुमच्याकडं.’’
आम्हाला आणखीच चेव यायचा, त्यामुळे आम्ही काही तिच्या दमाला घाबरायचो नाही. ती पळून दमली अन्‌ आमचा नाद सोडून गावाच्या दिशेनं चालू लागली की आम्ही परत म्हणायचो :
‘‘काय गं लंके, तुही गाडी घेऊन जाय नं बुरख्याची!’’
‘‘तुमीच बसा तिच्यात अन्‌ तुम्च्या बायकूला बी बसवा!’’
‘‘लंके, तुहा नवरा बसून आला बग बुरख्याच्या गाडीत!’’
‘‘कुढंय?’’
ती फसली म्हणून आम्ही पोरं पुन्हा फिदीफिदी हसायचो. एका सुरात म्हणायचो :
गाडी आनावी बुरख्याची ऽऽ
बुरख्याची दोन चाकीऽऽ
लंकीही राग विसरून म्हणायची...अन्‌ तिच्या गाण्यात मनसोक्त बुडून जायची. तिला तेव्हा जगाचं भान राहायचं नाही.
लंकीला एवढं वेड लावून जाणाऱ्या त्या गाण्यात असं होतं तरी काय?
***

तेव्हा गावची जत्रा होती. मी जत्रेत माझ्या आवडीची खेळणी घेतली. ती थोरल्या बहिणीला दाखवावीत म्हणून आतल्या खोलीजवळ आलो तर जत्रेच्या निमितानं तिची कॉलेजची मैत्रीण आमच्या घरी आलेली होती. दोघी बोलत होत्या...
‘‘काय गं? यवढी सुंदर मुलगी यडी कशी झाली?’’
‘‘अगं, माह्याच वर्गात व्हती. अभ्यासात बी लई हुशार. सातवीपर्यंत पह्यला नंबर तिनं कधी सोडला न्हवता’’
‘‘मंग हे असं का झालं?’’
‘‘ती मोठीच रामकहाणीय बाई. कुनी कुनी काय काय सांगतं...लईच वावड्या हायेत. कुनी म्हंतं वाऱ्यात सापडली, कुनी म्हंतं बाह्यरचं झालं...’’
‘‘तुहा इस्वास हाये का या गोष्टींवर?’’
‘‘न्हाई बाई!’’
‘‘काय तरी घडलं असंल. असं का यकीयकी यड लागंल?’’
‘‘घडल नं बाई!’’
‘‘काय?’’
‘‘आता जशी भरली नं तशीच गावची जत्रा व्हती. सारं गाव तमाशा बघायला गेलं व्हतं. लंकीच्या घरचे बी. यकायकी मध्यान राती ती घटना घडली न्‌ लंकीला यडाचे झटके आले.
तिची आई म्हन्ली, ‘घात झाला...’ पर काय झालं ते लंकीच्या मनाला ठाऊक. ती कुढं काय सांगते? ती फक्त गानं म्हन्ते...’’
थोरल्या बहिणीनं सांगितलेल्या बाकीच्या सगळ्याच गोष्टी डिलिट होऊन फक्त एकच गोष्ट माझ्या डोक्यात ठळकपणे रुतली : ‘ती घटना.’
अशी कोणती घटना असावी ती? ज्या घटनेमुळे लंकीच्या डोक्यावर परिणाम होऊन ती वेडी झाली? ‘घात झाला’ असं तिची आई का म्हणाली? कुणाला विचारायचं? हणत्याला की नित्याला? नको.
ते आणखीच बभ्रा करतील. त्यापेक्षा थोरल्या बहिणालाच विचारू? ती काही सहजासहजी सांगायची नाही. तिचे डोळे आधीच मोठे आहेत, आणखीच वटारून की मला पिटाळून लावेल. लावेना का...कारण, घटनेचा छडा लावायचा तर मला हे धाडस दाखवणं हाच एक पर्याय होता. मनाचा हिय्या करून मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो.
‘‘काय रं? आमचं बोलनं चोरून ऐकत व्हतास का?’’
तिच्या प्रश्नाला बगल देत मी सरळ माझाच प्रश्न तिच्या पुढ्यात एका दमात ठेवला.
‘‘काय गं ताई, कुढल्या घटनेनं लंकी यडी झाली?’’
‘‘देऊ का तुझ्या यक ठिवून? तुला रं कशाला निसत्या उचापती?’’
‘तू म्हन्ली नं तुह्या मैत्रिनीला?’’
‘‘तू ल्हान हायेस आजून...जा अभ्यास करीत बैस!’’
‘‘जा मंग तिकडं, म्या न्हाई करनार अभ्यास.’’
‘‘तू असा न्हाई आयकायचा...’’ तिनं छमकडी घेऊन मला बडवायला सुरुवात केली. आई आली मध्ये.
‘‘काय गं? का म्हून मारून ऱ्हायली त्याला?’’
‘‘त्यो पाह्य, निसत्या चौकश्या करून ऱ्हायलाय.’’
‘‘कशाच्या चौकश्या केल्या त्यानं?’’
‘‘त्यो इचारतोय, लंकी यडी का म्हून झाली?’’
‘‘तुला रं काय करायचंय यड्या?’’ आईचा रागही माझ्यावरच आदळला.
मग मी कुणालाच त्यासंदर्भात काही बोललो नाही अन् काही विचारलंही नाही. ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी फक्त मार बसतो, प्रश्न तसाच राहतो, त्या प्रश्नाचं उत्तर कुणाला विचारणार? नाहीतरी असे कितीतरी प्रश्न जाणूनबुजून अनुत्तरितच ठेवले जातात.
आयुष्यातली कित्येक वर्षं उलटून गेली. वेड्या लंकेची आठवण तरी कशी राहावी? तिलाच का वेडं म्हणावं? वेड्यात निघण्याच्या कितीतरी गोष्टी जग आपल्या समोर सतत ठेवत आलं आहे. चिकार प्रश्न आपल्या पुढं उभे करून उत्तरांसाठी आपल्याला त्यांत गुंतून ठेवलं गेलं आहे. लंकी तरी मोकळी व्हायची, ‘गाडी आनावी बुरख्याची’ म्हणत. आपल्याला तर तसंही काहीच म्हणता येत नव्हतं. आपलं गाणं आतल्या आत कोंडलं जात होतं.
***

एसटीतून उतरलो तर लंकी आली पळत. माझ्या हातातली पिशवी तिनं हिसकावली.
‘‘आन्ली का, आन्ली नं गाडी बुरख्याची?’’
‘‘होय आणलीय, लंकाताई!’’
लंकाताई थांबली कुठं होती? ती पिशवी घेऊन धूम पळून गेली. जिथं कुठं ती पिशवी उस्तरून पाहील - मला खात्री आहे; भलेही तिची बुरख्याची गाडी मी आणली नसेल; पण त्यातली वस्तू पाहून ती नक्कीच नाराज होणार नाही. खूशच होईल ती..
जे एके काळी लंकीची चेष्टा करायचं त्या माझ्यातल्या लहान मुलाला मी खूप बदडलं. माझ्यातल्या लहान मुलानं माझी माफी मागितली. त्याची चूक त्यानं गुडघे टेकून कबूल केली तेव्हाच त्याला मी सोडलं. लंकाताई, तुझ्याबाबतीत जी घटना घडली, तिचा शोध मला तेव्हाच लागला, जेव्हा मी एका पोरीचा बाप झालो...
नाहीतरी ताई मला म्हणालीच होती ‘तू लहान आहेस अजून!’
पण आता खूप मोठा झालोय गं मी, लंकाताई...म्हणूनच धसका घेतलाय बुरख्याच्या गाडीचा...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com