गुलाल (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

भरत्याला जरी लोक वेडा म्हणत असले तरी मला तो बिलकूलही वेडा वाटला नाही; पण समाजाकडे एक तराजू आहे, त्यात शहाणे आणि वेडे तोलले जातात. एखाद्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याचं वेड समजून घेण्याऐवजी समाज त्याला वेडा ठरवून मोकळा होतो.

भरत्याचं गुलालाचं वेड साऱ्या शाळेला ठाऊक होतं. भरत्याच्या दप्तरात हात टाकला की वह्या-पुस्तकांबरोबर गुलाल हमखास हाताला लागायचा. भरत्याचा रिझल्ट जेमतेम. त्याचं त्याला काही सोयर-सुतक नव्हतं. मात्र, वर्गात जो पहिला येणार तो हमखास भरत्याच्या गुलालात माखला जाणार. भरत्याला गुलालाचं वेड का लागलं हे तो सोडून कुणीच सांगू शकत नव्हतं. भरत्यानं तर शेवटपर्यंत कुणालाच काही सांगितलं नाही.

त्याच्यासाठी कुणी गुलालाची पेठ उघडली होती कोण जाणे! त्याच्या जवळचा गुलाल काही केल्या संपता संपत नव्हता. गावात एकामागून एक असे कित्येक दुष्काळ पडले असतील, मात्र भरत्याकडच्या गुलालाला दुष्काळ माहीतच नव्हता. जगात गुलालाची निर्मिती करून विकणारा त्याचा कुणीतरी मालक नक्कीच असेल; पण त्याचा आम्ही काही शोध घेतला नाही. आमच्या दृष्टीनं भरत्याच त्याचा मालक! म्हणजे आम्ही कुठंही गेलो, अगदी दुसऱ्या गावाला गणपतीच्या मिरवणुकीत वगैरे गुलाल पाहिला तरी असं म्हणायचो की ‘तो पाहा, भरत्याचा गुलाल!’ गुलाल आणि भरत्या यांचं समीकरण आमच्या डोक्यात नट-बोल्टसारखं इतकं आवळून फिट्ट बसलं होतं.
भरत्याचं हे गुलालाचं वेड त्याच्यासाठी आनंदाचं कारण असलं तरी त्यामुळे त्याला खूप काही सहन करावं लागायचं. तरी तो त्याचा नाद सोडायला तयार नव्हता. एक दिवस तर भरत्यानं केलं काय, तर स्वत:च्याच अंगावर गुलाल उधळला अन् घरातही. त्याच्या बापाचं डोकं सरकलं. तो गडगडाट करत गरजला भरत्यावर.
‘‘काय रं येड्या, कशापायी उधळला रं गुलाल? तुज्या मायचं लगीन झालं म्हून यवढा आनंद जाला व्हय रं, गाबरा! जव्हा पघावा तव्हा गुलाल उधळत बसतंय, तुज्यायचं ढोपर!’’
‘‘न्हायी तं काय!’’ त्याची आई भाकरी थापता थापता म्हणाली.
‘‘बापू , तुमी तं काय बी बोलून ऱ्हायला.’’
‘‘भानचकेल्या, मग कशापायी उधळून घेतला रं गुलाल?’’
‘‘...........................’’
‘‘आरं, का म्हून दाभड उचकना तुजवालं? तुज्या बापाला लाटरी लाग्ली का तुह्या मामाच्या पोरीचं लगीन झालं!’’
‘‘बापू, काय पण!’’
‘‘नको लाजू. मामा रिकामा न्हाई तुला त्याची पोरगी द्यायाला’’!
‘‘आरं पन कशापायी? काई कारन त असंल न गड्या? का नाहकच!’’
“नाहक गुलाल उधळायला मला का येड लाग्लं का बापू?’’
‘‘तुला कशाला येड लागाया पाह्यजे? तू तं यडाचंय. येड लागायची पाळी तू तं आम्च्यावं आन्लीया.’’
‘‘न्हाई तं काय, गावात कधी काई घडलं का ह्ये माकड उधळीतं गुलाल. जसा साऱ्या गावाच्या आनंदाचा मक्ता यानंच घेत्लाया’’
‘‘आये, मंग आनंद का साजरा करायचा न्हाई का?’’
‘‘हां बरोबरंय. पर मला सांग, आता कशाचा आनंद झालाया तुला?’’
‘‘सखीचं लगीन झालं.’’
‘‘आरं तिच्यामायला, सखीचं लगीन झाल्याचा तुला यवढा आनंद झाला. सखी तुही भैनच लागून गेली का नाय!’’
‘‘बापू, तिच्या माय-बापाला केवढा घोर व्हता. सखी यक तं काळी, त्यामुळं तिचं कुढंच जमत न्हवतं.’’

फक्त सखीच्याच लग्नाचा नाही तर गावाचे कित्येक आनंद भरत्यानं गुलाल उधळून साजरे केले. कुणाला नोकरी लागली, कुणी आजारातून उठला, कुणाला पोरगं झालं, कुणी नवी सायकल आणली...असे सारे आनंद! बरं, ज्यांचे आनंद भरत्यानं साजरे केले, त्यांना ही गोष्ट ठाऊकही नाही. भरत्याचा आनंद मतलबाचा नव्हताच. आजच्या काळात प्रमोशनासाठी म्हणा किंवा काही लाभ पदरात पाडून घ्यायचा असेल तर पार्ट्यांचे बार उडवून दिले जातात. थोडक्यात सांगायचं तर, भरत्याच्या गुलालाचा निखळ आनंद कुणी समजून घेतला नाही. उलट, त्याला वेडंच ठरवलं गेलं.
भरत्याचं गुलालाचं वेड मनःपूर्वक समजून घेतलं ते त्याच्या ताईनं. ताई त्याची थोरली बहीण. ताईच्या पाठीवर अकरा वर्षांनी भरत्या झाला होता. त्यालाही आपली ताई गुलालाइतकीच प्रिय. ताईही आपल्या या भाबड्या अन् निरागस भावाला जपायची. बाहेर कुठं गेली की त्याच्यासाठी गुलालाच्या पुड्या घेऊन यायची!
तो त्याच्या ताईला म्हणाला होता खूश होऊन, ‘‘तायडे, तुह्या लग्नात न भो, म्या सारं गाव गुलालात माखून टाकीन! बघत ऱ्हाय तू.’’
‘‘ठाव हाय माझा भाऊ मला. चंद्र-सूर्य जवळ असते तर त्ये बी माखून टाकले आस्ते त्वा!’’
‘‘तायडे, चंद्र-सूर्य तर माखलेच असतेच, पर जर का आपल्या गावात डोंगर असता ना तं त्यो डोंगर बी म्या गुलालाचा करून टाकला असता!’’
‘‘व्हय रं, माह्या भावा, व्हय’’ त्याला कवटाळत ताई म्हणाली.
‘‘तायडे, पर कधी व्हनार गं तुजं लगीन?’’
‘‘बापू नं घेतलेलं कर्ज फिटलं का व्हईल’’
खरं तर ताईचं लग्नाचं वय निघून गेलं होतं. तिच्या बरोबरीच्या पोरींची केव्हाच लग्न होऊन त्यांची पोरं शाळेतही जायला लागली होती. ताई अजूनही आस धरून आहे की आज ना उद्या बापाचं कर्ज फिटेल अन्‌ आपले हात पिवळे होतील. तिनं कनवाळूपणे भरत्याच्या केसातून हात फिरवला अन् त्याला गुलालाची पुडी दिली.
‘‘तायडे, म्या आता साऱ्या पुड्या तुह्या लग्नासाठी जपून ठीवनारंय.’’
‘‘हां बाबा, ठीव’’ असं म्हणत तिनं डोळे पुसले. तिला तिच्या लग्नापेक्षाही आपल्या भावाची काळजी होती. अशा भाबड्या अन्‌ निरागस माणसांच्या आयुष्याची वाट खूपच खडतर असते. ती सोपी व्हावी एवढंच तिला वाटत होतं.

एकदा संत्याला लहर आली भरत्याची चेष्टा करायची. ती चेष्टा त्याला कोण महागात पडली. त्यानंतर जन्मात कधी संत्या भरत्याच्या न्‌ त्याच्या गुलालाच्या वाट्याला गेला नाही. भरत्यानं त्याला अद्दलच घडवली तशी. संत्यानं केलं काय होतं तर भरत्याच्या दप्तरातून गुलाल काढून घेऊन त्या ठिकाणी माती भरून ठेवली होती. तरी आम्ही संत्याला भरत्याच्या गैरहजेरीत तंबी दिली होती : ‘‘संत्या ह्ये काय करून ऱ्हायलाय? भरत्याला कळलं नं तं तुही काई खैर न्हाई.’’
‘‘संत्या, नगं वाट्याला जाऊ त्याच्या’’ पभ्यानंही माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला.
‘‘जावा, जावा...म्या न्हाई घाबरत. भरत्या काय वाघ हाये का मला खाऊन टाकाया?’’
‘‘पाह्य भो, परत काही झालं तं आम्च्या अंगी न्हाई.’’
‘‘ह्ये पुळके भागूबाई, नको भेवडू मला.’’
भरत्या आला. सारेच चिडचूप झाले. गणिताचा तास सुरू झाला; पण आमचं काही गणितात लक्ष नव्हतं. आमचं लक्ष भरत्यावर. त्यानं का दप्तर खोलून पाहिलं अन्‌ गुलालाच्या जागी माती भरलेली त्याला दिसली तर संत्याची काही खैर नाही. एकामागून एक तास झाले न् एकदाची शाळा सुटल्याचीही बेल झाली. तरीही भरत्यानं दप्तर पाहिलं नव्हतं. आम्ही जरी सुटकेचा नि:श्वास सोडला होता तरी संतू कुठं शांत बसतोय...त्याच्या दृष्टीनं खूप मजा येणार होती; पण त्या दिवशी
मजा अन्‌ फजा कुणालाच पाहायला मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी संतूला आबगी गाठून त्याच्या अंगावर बादलीभर मातीचा गाळ भरत्यानं ओतून दिला. संतूच्या अंगभर चिखल अन्‌ तोंडही चिखलाचं. भरत्याला जरी हेडमास्तरांचा मार बसला असला तरी संतूचं माकड पाहून सगळी शाळा खो खो हसत होती. संतू भरत्याची मजा करायला गेला अन्‌ स्वत:चीच फजा करून बसला!
भरत्याला जरी लोक वेडा म्हणत असले तरी मला तो बिलकूलही वेडा वाटला नाही; पण समाजाकडे एक तराजू आहे, त्यात शहाणे आणि वेडे तोलले जातात. एखाद्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याचं वेड समजून घेण्याऐवजी समाज त्याला वेडा ठरवून मोकळा होतो. सत्ता-संपतीचे डोंगर उभे करून मरून जाणारी माणसं खरं तर ठार वेडी आहेत! पण त्यांना कुणी वेडं म्हणत नाही. मात्र, भरत्यासारख्याला लगेच वेडं ठरवून मोकळे होतात लोक. काहीही असो, भरत्या माझा खूप जवळचा मित्र होता. त्याला कुणी वेडं म्हटलं की माझ्या मनाला लागायचं.

एकदा मी त्याला म्हणालोही :‘‘भरत्या, तुला समदेच गुलालावरून हसत असत्यात. ह्ये येड तू सोडून का देत न्हाई?’’
‘‘तुला बी कविता लिव्हन्यावरून हसत्यातच की लोक. म्हनत्या की ह्ये येडं काईबाई कागदावर खरडीत असतंय.’’
त्यानं वास्तव सांगून माझे तोंड असं काही टाका मारून शिवून टाकलं की बोलायला, काही म्हणायला त्यानं जागाच शिल्लक ठेवली नव्हती.
ताईचं लग्न ठरलं तेव्हा भरत्या कोण आनंदात होता. लग्न दोन दिवसांवर आलं तेव्हा मला मारुतीच्या देवळाजवळ भरत्या भेटला.
‘‘भरत्या, ये ना विटू-दांडूचा डाव मांडू!’’
‘‘न्हायी भो, माह्याकडं का तेवढा यळंय का? लई कामं हायेत मला. आम्च्या ताईचं लगीन जवळ आलंया. मला गुलाल जमा करून ठिवायचाय!’’
ताईच्या लग्नात भरत्यानं मोप गुलाल उधळला होता. आम्हाला प्रश्न पडला की त्यानं एवढा गुलाल कुठून अन्‌ कसा पैदा केला असावा? सारं गाव गुलालाचं झालं होतं. बापाच्या अंगावरही त्यानं गुलाल उधळला. एरवी बापानं त्याला फोडून काढलं असतं. मात्र, त्याचा बापही त्या दिवशी आनंदात होता. वाजंत्रीच काय, भटजीही गुलालानं माखले होते.

कशानं काय झालं कळलं नाही; पण ज्या नवरदेवाची वरात गुलालात माखणार होती ती तशी न माखताच नवरदेव अन्‌ वऱ्हाडी भर मांडवातून लग्न न करताच निघून गेले. अक्षतांनाच जणू कुणाचा नाट लागला. त्या रात्रीच भरत्याच्या ताईनं गळफास घेतला. त्याच्या बापाला लग्नाच्या चिंतेतून अन्‌ कर्जातून तिनं मुक्त केलं..
त्यानंतर भरत्या कुठं गेला कळलं नाही. भरत्याचा खूप शोध घेतला सगळ्यांनी. तो काही केल्या सापडेना..

गेणू परसरामच्या विहिरीवर गुलाल तरंगून आलेला दिसला अन्‌ मग
भरत्यानं विहिरीत जीव दिला आहे हे कुणी कुणाला सांगायची गरजच पडली नाही. दर आनंदात गुलाल उधळणारा भरत्या गुलालाचंच पांघरूण घेऊन मरून गेला. मेल्यानंतर माणूस बरोबर काहीच घेऊन जात नाही असं सगळेच जण सांगत असतात आणि ते खरंही आहे. मात्र, भरत्या त्याच्याबरोबर गुलाल घेऊन गेला असावा याविषयी मी ठाम आहे. त्याला वरती देवबीव भेटले असतील तर तेही त्यानं गुलालात माखून टाकले असतील...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com