गुंतवून ठेवणारी ‘पावडर’ (अखिलेश विवेक नेरलेकर)

akhilesh nerlekar
akhilesh nerlekar

‘पावडर’ या वेब सिरीजनं भारतीय नेट विश्वात खऱ्या अर्थानं वेब सिरीजचं वादळ आणलं. पंकज त्रिपाठी आणि मनीष चौधरी या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयानं सजलेली ही सिरीज मुंबईतलं ड्रग माफियांचं विश्व भेदक पद्धतीनं दाखवते. अनेक ट्विस्ट असलेल्या या वेब सिरीजचं चित्रण अगदी वास्तव वाटावं अशा पद्धतीचं आहे. या आगळ्यावेगळ्या वेब सिरीजविषयी...

खरंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्म, वेब कंटेंट हे काही आपल्याला नवीन राहिलेलं नाही आणि या लॉकडाऊनमुळे तर लोक सर्रास या वेब कंटेंटचा आनंद लुटायला शिकले आहेत. आज लोक नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टारवरचा कंटेंट चवीनं बघतायत. यात आणखी भर म्हणून वूट किंवा झी ५ सारख्या दमदार प्लॅटफॉर्मची भर पडली आहे. मॅक्स प्लेयरनं तर फुकटच सिरीज दाखवायचा विडा उचलला आहे. या सगळ्या गोतावळ्यात मला आठवण झाली ती मी पाहिलेल्या सर्वात पहिल्या ‘वेब सिरीज’ची...खरंतर ही वेबसिरीज त्यातली स्टारकास्ट, प्रोड्युसर सगळं ऐकलं तर काही लोकांना आश्चर्याचा धक्काच बसेल! ‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफ्लिक्सची पहिली इंडियन वेब सिरीज म्हणतात; पण ती पहिली इंडियन सिरीज नाही हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याआधी ‘पावडर’ नावाची इंडियन सिरीज नेटफ्लिक्सवर होती. आदित्य चोप्रा निर्मित, वायआरएफ बॅनरखाली बनवली गेलेली ही सिरीज खरी नेटफ्लिक्सवर रिलीज केलेली पहिली भारतीय कलाकृती. तेव्हा हे ओरिजिनल्स वगैरे एवढं फोफावलं नव्हतं, त्यामुळे या सिरीजकडे दुर्लक्ष झालं. खरंतर ‘सेक्रेड गेम’पेक्षा कैक पटीनं दमदार असलेली ही सिरीज फार कमी लोकांनाच ठाऊक आहे. याच्या मुख्य स्टारकास्टमध्ये दोन अत्यंत गुणी अभिनेते आहेत, एक म्हणजे मनीष चौधरी आणि दुसरा चेहरा म्हणजे पंकज त्रिपाठी. बाकी राहुल बग्गा, गीतिक त्यागी, गौरव शर्मा, विकासकुमार (ज्याला आपण नुकतंच ‘आर्या’ सिरीजमध्ये पाहिलं) हे असे नवीन चेहरे या सिरीजमुळेच पुढं आले! मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलं, तेव्हा २०१० ची ही ‘पावडर’ सिरीजच प्रथम बघितली आणि एकंदरच वेब सिरीज ही कन्सेप्ट प्रचंड भावली!

भारतीय ड्रग मार्केटला कंट्रोल करणारा मुंबईतला ड्रग लॉर्ड नावेद अन्सारी, त्यानं वाढवलेलं त्याचं साम्राज्य, त्याची कार्यपद्धती, आणि त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुंबई पोलिस, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, क्राईम ब्राँच, डीआरआय या मुख्य संस्थांचा स्ट्रगल.. शिवाय या संस्थांमध्ये असलेली आपापसांतली दुष्मनी, सरकारी यंत्रणेचं प्रेशर, कस्टम डिपार्टमेंटची त्यांना मिळणारी मदत, राजकारण हे सगळं इतकं बारकाईनं या सिरीजमध्ये दाखवलं आहे, ते क्वचितच कोणत्या भारतीय सिनेमातून किंवा सिरीजमधून दाखवलं असेल. शिवाय या संस्थांची कार्यप्रणाली, त्यांचे प्रोटोकॉल्स, गुन्हेगारांना टॅकल करण्याची त्यांची पद्धत, त्यांचे नियम, एथिक्स हेसुद्धा इतकं डिटेलमध्ये यात दाखवलेलं आहे, की या संस्था अशाच काम करत असणार अशी आपली मनोमन खात्रीच होते. शिवाय नावेद अन्सारी यानं त्याचं उभं केलेलं ड्रग्सचं साम्राज्य, त्याची काम करण्याची पद्धत, शिवाय हे सगळं करताना आपलं नाव आणि चेहरा कुठंही बाहेर येणार नाही यासाठी त्याने घेतलेली खबरदारी, हे सगळं पाहून असं वाटतं, की असा नावेद अन्सारी नामक माणूस कुणीतरी असणारच. या सगळ्या संस्थांना मूर्ख बनवून नावेद ज्या प्रकारे त्याचा धंदा करत असतो त्याची स्टाईल, त्याचा ऑरा, हे सगळं खरंच इतकं रियलिस्टिक घेतलं आहे, की कुठंही त्यात फिल्मीपणा जाणवणार नाही. अर्थात क्राईम थ्रिलर आहे- त्यामुळे याचा शेवट तुम्ही जसा विचार करत आहात तसाच आहे; पण या संपूर्ण प्रवासात बरेच ट्विस्ट येतात. खासकरून या कथेचा शेवट तर अपेक्षित असला, तरी आणखीनच वेगळा भासतो हेच आहे या सिरीजचं वैशिष्ट्य. तब्बल ४५ ते ५० मिनिटांचे २६ एपिसोड असलेली ही सिरीज बघताना तुम्ही त्या मुंबईच्या ड्रॅग माफिया दुनियेत कधी खेचले जाता हे तुमचं तुम्हालाच कळत नाही!

पटकथा, कॅमेरा, म्युझिक, मुंबईतल्या बहुतांश रियल लोकेशन्सवर घेतलेलं शूटिंग हे सगळं त्या सिरीजची मजा आणखीन वाढवतं. खासकरून या सिरीजमधलं कॅरेक्टर डेव्हलपमेंट मला खूप भावतं. भरपूर पात्रं आहेत यात; पण प्रत्येक पात्राची विशिष्ट बॅकग्राउंड, शिवाय पुढील कथानकात त्या पात्राचं योगदान आणि त्याचा शेवट अगदी ठसठशीतपणे मांडला आहे, कोणतंही पात्र असं अर्धवट लिहून सोडलेलं नाही. शिवाय २६ एपिसोड असले, तरी ही सिरीज कुठंच तुमची ग्रिप सोडत नाही. मुळात मुंबईतला ड्रग व्यापार आणि त्याच्याशी लढणाऱ्या या संस्था यांचं इतकं कमाल आणि परफेक्ट चित्रण तुम्हाला कोणत्याही कलाकृतीत पाहायला मिळणं अशक्य आहे. अतुल सब्रवाल यानं या सिरीजचं दिग्दर्शन केलं असून, ती त्याची पहिली सिरीज आहे असं बघून कुणालाही वाटणार नाही, इतकी खुबीनं त्यानं ही सिरीज रंगवली आहे. त्यानंतर हा दिग्दर्शक कुठं गायब झालाय देव जाणे...!

मनीष चौधरी हा माणूस खरंच आपल्या बॉलिवूडनं वाया घालवला असंच म्हणायला हवं. आजवर बऱ्याच सिनेमांत तो दिसला आहे; पण ‘रॉकेट सिंग’मधल्या खडूस; पण महत्वात्त्वाकांक्षी बॉससारख्या भूमिका त्याच्या वाट्याला पुन्हा नाहीच आल्या. ‘पावडर’सुद्धा तशी जुनी सिरीज, तरीही त्याला पुन्हा सिरीज मिळायला ‘आर्या’पर्यंत वाट बघायला लागली...‘पावडर’मधला उस्मान अली तो अक्षरशः जगला आहे. दिलेल्या भूमिकेला न्याय कसा द्यायचा, हे मनीष चौधरीकडून खरंच शिकण्यासारखं आहे. बहुतेक सुरवात ते शेवट प्रत्येक एपिसोडमध्ये उस्मान आहे आणि ते पात्र, त्याच्या विविध छटा मनीष यांनी अगदी खुबीनं रंगवल्या आहेत. पंकज त्रिपाठी म्हणजे हुकमी एक्का आहे. या माणसानं केलेले रोल बघता, हा माणूस रियल लाईफमध्ये इतका साधा असेल, याची कुणीच कल्पना करू शकत नाही. ‘वासेपूर’मधला त्याचा सुलतान नुसता आठवला तरी छातीत धडकी भरते. ‘गुडगाव’मधला त्याचा रोल हा माईलस्टोन होता; पण मी म्हणीन, की पंकज त्रिपाठी जर बघायचा असेल, तर ‘पावडर’मध्ये बघा. ड्रग लॉर्ड उभा करायचा असेल, तर त्यासाठी जरब बसवणारे डोळे आणि बॉडी लँग्वेज पुरून उरते, हे ‘पावडर’मधून स्पष्ट होतं. स्टार्ट टू एन्ड पंकज त्रिपाठीच्या नावेद अन्सारी भोवतीच ही सिरीज फिरते. त्याचा अत्यंत शांत स्क्रीन प्रेझेन्स इतका खतरनाक आहे, की तो स्क्रीनवर असला, तरी याच्यापासून दहा हात लांब असलेलंच बरं असं आपल्याला मनोमन वाटतं. बाकी विकास कुमार आणि इतर बऱ्याच सहकलाकारांचीसुद्धा कामं लाजवाब झाली आहेत. खासकरून यातलं गीतिका त्यागीचं ब्रिन्दा ही एनसीबीमधली लेडी ऑफिसर हे पात्र उत्तमरीत्या लिहिलं गेलं असून, गीतिकानं तिला योग्य न्याय दिला आहे. एकंदरच एका गँगस्टरचा प्रवास आणि त्याचा शेवट इतकीच मर्यादित न राहता ही सिरीज हे ड्रगलॉर्डचं विश्व आणि त्यांना आळा घालणाऱ्या या संस्था कसं जीवाचं रान करतात हेसुद्धा आपल्याला खूप डिटेलमध्ये सांगते. दुर्दैवानं ही सिरीज आता नेटफ्लिक्सवरून काढून टाकली. मध्ये काही दिवस सोनी लिव्हवर ती होती, आता ती तिथंही दिसत नाहीये. यूट्युबवर दोन एपिसोड्स आहेत; पण पुढचे एपिसोड बघायचे असतील, तर ते आपल्या देशातल्या लोकेशनसाठी ऍक्सेसेबल नाही, व्हीपीएनद्वारे तुम्ही यूट्युबवर ही सिरीज बघू शकता. इतर ठिकाणी डाउनलोडसाठी ही सिरीज उपलब्ध नाही. इतकी उत्तम सिरीज जाणूनबुजून बाहेर आणू देत नाहीयेत असं मला तरी वाटतं; पण जर तुम्हाला कुठूनही मिळाली, तर ही सिरीज चुकवू नका. आवर्जून बघा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com