कलाकृतीचा 'आरंभ' (अक्षय दत्त)

अक्षय दत्त
रविवार, 14 जुलै 2019

सर्वसाधारणपणे गाण्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग शूटिंग केलं जातं. इथं मात्र वेगळी परिस्थिती होती. आमचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही बॅकग्राऊंडसाठी ते गाणं वापरणार होतो. ते योग्य पद्धतीनं "जेल' होईल असं मला असं वाटलं होतं; पण त्यातलं एक कडवं असं होतं, की त्याच्यासाठी माझ्याकडं काही मटेरिअलच नव्हतं...

सर्वसाधारणपणे गाण्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग शूटिंग केलं जातं. इथं मात्र वेगळी परिस्थिती होती. आमचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही बॅकग्राऊंडसाठी ते गाणं वापरणार होतो. ते योग्य पद्धतीनं "जेल' होईल असं मला असं वाटलं होतं; पण त्यातलं एक कडवं असं होतं, की त्याच्यासाठी माझ्याकडं काही मटेरिअलच नव्हतं...

"आरंभ' हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. देबू देवधर, सुधीर मोघे, आनंद मोडक, श्रीनिवास भणगे अशा दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी त्यानं मिळवून दिली. मी दिग्दर्शनाचा प्रवास सुरू केला तोही रंजक आहे. "अनफेथफुल' नावाचा एक चित्रपट बघितल्यानंतर तो हिंदीत आला तर उत्तम होऊ शकतो, असं मला जाणवलं होतं. त्यानंतर त्यावर आधारित "मर्डर' आला, तेव्हा तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता. मग लक्षात आलं, की आपल्याला गोष्ट कळतेय. त्यानंतर मी गंभीरपणानं दिग्दर्शनाचा प्रवास सुरू केला. मग मी वाचन सुरू केलं. दरम्यानच्या काळात मी अभिनय करणं थांबवलं, दीडशे-दोनशे चित्रपट बघितले. या चित्रपटाची कथा सुचण्याबाबत एक घटना कारणीभूत ठरली. माझा अवनीश आठवले नावाचा एक मित्र आहे. त्यांच्या घरी पिंकी विरानी यांचं "बिटर चॉकलेट' नावाचं एक पुस्तक होतं. बाल लैंगिक शोषण या विषयावरचं ते उत्तम पुस्तक होतं. मी अवनीशच्या आईच्या परवानगीनं ते घेऊन आलो. मी खूप अस्वस्थ झालो त्या पुस्तकामुळं. त्यात पिंकी यांनी एक मनोगत व्यक्त केलं होतं. चित्रपट माध्यम हे जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे. दिग्गज दिग्दर्शक असूनही कुणालाच या विषयावर चित्रपट करावासा का वाटला नाही, असा सवाल त्यांनी केला होता. मला ते खूप भिडलं. खरं तर त्यातूनच "आरंभ'चा प्रवास सुरू झाला. या चित्रपटाची कथा मी लिहिली. पटकथा आणि संवाद श्रीनिवास भणगे यांनी लिहिले. त्यांच्याबरोबर मी नंतरही पुढं काम केलं.
स्क्रिप्टबाबत बरीच सीटिंग्ज होऊन चित्रपटाचं काम सुरू झालं. हा प्रवास खडतर होता. निर्माता मिळवणं आणि टीम मिळवणं हा भाग अवघड होतं. अनेक जण त्या काळात माझ्या मागं उभे राहिले. राजेश्‍वरी सचदेव यांनी "आरंभ'मध्ये साकारलेली भूमिका आधी नंदिता दास करणार होत्या. देबू देवधर यांच्या ओळखीनं मी त्यांच्यापर्यंत पोचलो होतो. त्यांनी माझी स्क्रिप्ट वाचली आणि चित्रपट हिंदीत का नाही करत असाच पहिला प्रश्‍न त्यांनी विचारला. वडील यशवंत दत्त यांचा पूर्ण प्रवास मराठी चित्रपटसृष्टीत झाला असल्यामुळं मी मराठीत चित्रपट करण्यावर ठाम होतो. नंदिता दास यांनी काम करायला होकार दिली, तरी पुढं अनेक निर्माते तयार झाले नाहीत. सुनेत्रा पाटील या मदतीला धावून आल्या. त्यातल्या सामाजिक विषयामुळं त्यांनी हा चित्रपट करायला होकार दिलं. या सगळ्या धावपळीत तब्बल पाच वर्षं गेली. मग मी पुन्हा नंदिता दास यांच्याकडं गेलो; पण त्यावेळी त्या त्यांच्या "फिराक' या चित्रपटात बिझी होत्या. त्यामुळं माझ्यासाठी थांबू नका असं त्यांनी सांगितलं. अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली. नंदिता यांच्या ताकदीचं मला कुणीच सापडत नव्हतं. एकदा असंच हताशपणे चॅनेल सर्फ करत असताना "आयत्या घरात घरोबा' हा चित्रपट माझ्या बघण्यात आला आणि का कोण जाणे राजेश्‍वरी सचदेव ही भूमिका उत्तम करतील असं मला वाटलं. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी माझा त्यांच्याशी संपर्क करून दिला. मी राजेश्‍वरी यांना मेलनं स्क्रिप्ट पाठवली. त्यांनी सगळी स्क्रिप्ट वाचली. त्यांच्या शंकांचं निरसन झाल्यावर त्यांनी लगेच "कब करनी है फिल्म' असाच प्रश्‍न विचारला. देबू देवधर, आनंद मोडक यांनी चित्रपटासाठी लगेच तयारी दाखवली.
एक गंमत झाली. चित्रपटाला एका गाण्याची गरज होती. ते मी बॅकग्राऊंडसारखं वापरणार होतो. आनंद मोडक यांनी त्याच्या शब्दांसाठी मला सुधीर मोघे यांच्याकडं पाठवलं. सुधीर मोघे यांना मी सगळी सिच्युएशन ऐकवली, माझ्या कल्पना सांगितल्या. त्यांनी गाण्याची गरजच नसल्याचं सांगितलं. मला त्यामुळं खरं तर धक्का बसला. मी मग पुन्हा मोडक यांच्याकडं आलो. ते म्हणाले ः ""ते तुला टेपा लावतायत. तू काय वाटेल ते करून त्यांना कन्व्हिन्स कर.'' मग मी पुन्हा गेलो, तेव्हा आपण सिच्युएशनल गाणीच लिहिणं बंद केल्याचं सुधीर मोघे यांनी सांगितलं. अनेकदा दिग्दर्शक त्याची वाट लावतात असं त्यांचं म्हणणं होतं. मीही गप्प बसलो.

चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस. त्या दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी आनंद मोडक, सुधीर मोघे असे सगळे आले होते. गप्पांच्या ओघात गाण्याची गोष्ट पुन्हा निघाली. मोडक मोघे यांना म्हणाले ः ""तू सिच्युएशनल सॉंग लिहू नको; पण तू त्या कॉन्सेप्टवर भाष्य कर ना.'' मोघे म्हणाले ः ""मला तसं काही सुचत नाही.'' मग मोडक म्हणाले ः ""मग तू नात्यांवर काही तरी लिही.'' मग मात्र मोघे म्हणाले ः ""आता तू माझ्या डोक्‍यात किडा सोडला आहेस.'' गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी मोडक बॅंकेत निघाले असताना त्यांना मोघे यांचा फोन आला. मोघे यांनी ते चार कडव्यांचं पूर्ण गाणं सांगितलं आणि मोडक यांनी ते लिहून घेतलं. चित्रपटाचं नाव "प्रारंभ' असं त्यांनी लिहिलं होतं. तेवढं फक्त "आरंभ' करू का असं मोडक यांनी विचारलं. शूटिंगचं पहिलं शेड्युल संपलं, मग मी मोडक यांच्याकडं गेलो. त्यांनी मला दोन चाली ऐकवल्या. तुला काय हवं ते सांग असं ते म्हणाले. एक वेस्टर्न प्रकारची होती, दुसरी क्‍लासिकल बेस असलेली होती. मला दुसरं आवडल्याचं मी त्याला सांगितलं. मोडक यांनी ते श्रेया घोषाल हिच्याकडून गाऊन घ्यायचंही ठरवून टाकलं होतं. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. चाल खूप अवघड होती. ती ऐकून "ते गाऊ शकशील का' असा प्रश्‍नही तिच्या भावानं विचारला होता. त्यामुळं मग उलट श्रेयानं तडफेनं ते गाण्याचं ठरवलं आणि ते गाणं रेकॉर्ड झालं.

"आरंभ' हा केवळ बारा दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट आहे. पहिल्या दिवशी मी तब्बल नऊ सीन्स केले होते. ते अकरा झाले नाहीत म्हणून मी तोंड पाडून बसलो होतो, तेव्हा आमचे साउंड रेकॉर्डिस्ट प्यारेलाल पालव म्हणाले, की मोठे दिग्दर्शकसुद्धा एका दिवसात दोन-तीन सीन्स करतात आणि तू नऊ सीन्स झाले नाहीत म्हणून चेहरा पाडून बसलायस. तू दमला नसलास तरी बाकीचे दमलेत हे लक्षात घे.

"आरंभ'चा सर्वांत मोठा ऍसेट होता राजेश्‍वरी सचदेव यांचा अभिनय. त्या भूमिकांबाबत अगदी "चूझी' असतात. एवढी मोठी अभिनेत्री असूनसुद्धा सेटवर त्यांचं वावरणं अगदी घरच्यासारखं होतं. चित्रपटाला होकार देताना त्यांनी मला आधीचं कामसुद्धा विचारलं नाही. इतक्‍या "न्यू कमर'वर त्यांनी टाकलेला विश्‍वास मला महत्त्वाचा वाटला. त्यांना त्यावेळी नुकतीच नवीन पाहुण्याची चाहूल लागली होती. त्यामुळं मुंबईत शूटिंग करता येईल का असं त्यांनी विचारलं. मी त्यांना एवढंच सांगितलं ः ""मी काम पुण्यात करणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. गरज पडली तर माझी आईसुद्धा तुमचा डबा घेऊन येईल. एकदा एक गंमत झाली. त्यांना पावभाजी खाण्याची इच्छा झाली होती. त्यांनी सारसबागेतून पावभाजी मागवली होती; पण त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं. त्याच्याकडून ती पावभाजी आली, तेव्हा ती थोडी खराब होती. राजेश्‍वरी यांनी तेवढाच भाग काढून टाकला आणि ती पावभाजी चांगली आहे असं म्हणत खाल्ली. त्यांना एकदा विश्रांतीही गरज होती, तेव्हा त्या अक्षरशः पेट्यांवर झोपल्या. एका नॅशनल ऍवॉर्ड विजेत्या अभिनेत्रीचं हे सगळं डाऊन टू अर्थ वागणं थक्क करणारं होतं.

एक विचित्र योगायोग आहे. बाबा सगळ्यांत शेवटी कॅमेऱ्यासमोर उभे राहिले ते देबू देवधर यांच्यासमोर "सरकारनामा' चित्रपटाच्या वेळी आणि देबूकाकांनी शेवटचा कॅमेरा हातात धरला तो "आरंभ' चित्रपटाच्या वेळी. देबूकाका शेवटपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहिले. कीमोथेरपी सुरू असतानासुद्धा ते काम करत होतं. शरद पोंक्षे, आश्‍विनी एकबोटे अशा लोकांनीही खूप मदत केली.

सर्वसाधारणपणे गाण्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग शूटिंग केलं जातं. इथं मात्र वेगळी परिस्थिती होती. आमचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही बॅकग्राऊंडसाठी ते गाणं वापरणार होतो. ते योग्य पद्धतीनं "जेल' होईल असं मला असं वाटलं होतं; पण त्यातलं एक कडवं असं होतं, की त्याच्यासाठी माझ्याकडं काही मटेरिअलच नव्हतं. मी मोडक यांना विचारलं, की काय करता येईल. ते म्हणाले, की तो आता तुझा कॉल. काय करायचंय ते तू ठरव. ते गाणं इतकं उत्तम झालं होतं, की मला एक कडवं काढणं योग्य वाटलं नाही. राजेश्‍वरी यांना तेव्हा पाचवा महिना सुरू झाला होता. त्यामुळं त्यांनी मुंबईत येता येईल का असं विचारलं. एका तवेरामध्ये हेअर ड्रेसर, मेकअपमॅन, प्रॉडक्‍शन असिस्टंट असे काही मोजके लोक घेऊन आम्ही शूटिंगला गेलो आणि ते कडवं तिथं पूर्ण केलं.

हा चित्रपट पूर्ण झाला, त्याचं खूप कौतुकही झालं; पण आता मला खंत वाटते, की देबू देवधर, आनंद मोडक, सुधीर मोघे, आश्‍विनी एकबोटे अशा लोकांबरोबर मी काम करू शकणार नाही. ती खंत मात्र कायम राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang akshay dutt write song recording article