चांदण्यातली अमावास्या! (अंकुश गाजरे)

ankush gajare
ankush gajare

तात्याची बायको कधीच देवाघरी गेली होती. तेव्हापासून तो एकटा पडला होता. आयुष्यभर बायकोनं साथ दिली होती. आठवणीतले तेच क्षण आठवत, मनातल्या मनात कुढत-झुरत तात्या आला दिवस मागं टाकत होता. शेवटचा श्‍वास घेण्यासाठी!

गणपा म्हाताऱ्याचं घर आमच्या वस्तीत ऐन मध्यात होतं. म्हाताऱ्याच्या घराशेजारी म्हसोबाचं बारकं देऊळ. तिथं छोट्या
‍खोपटात गणपा राहत होता. म्हाताऱ्याला सारा गाव ‘तात्या’ म्हणायचा. मीही ‘तात्या’ असं आपुलकीनं एकेरीच म्हणायचो.
तात्या जाणता माणूस. सत्तरी पार केलेला. तात्या तरुणपणी अंगापिंडानं तगडा होता. आता साहजिकच म्हातारपणामुळं हाडकला होता. गाल आत गेले होते. डोळे बोट बोट खोल गेले होते. पाच-सहा दात पडलेले, बाकीचे हलायला लागलेले. डोक्‍याचे पांढरे केसंही विरळ विरळ व्हायला लागलेले. तोंडावर म्हातारपणाच्या सुरकुत्या पडलेल्या.
तात्या अलीकडं उदास उदास असायचा. हसणं जणू विसरूनच गेला होता तो.
तात्याची बायको कधीच देवाघरी गेली होती. तेव्हापासून तो एकटा पडला होता. आयुष्यभर बायकोनं साथ दिली होती. आठवणीतले तेच क्षण आठवत, मनातल्या मनात कुढत-झुरत तात्या आला दिवस मागं टाकत होता. शेवटचा श्‍वास घेण्यासाठी!
तात्याला दोन पोरं न् दोन पोरी. दोन्ही पोरी नांदायला पाखरागत उडून गेल्या होत्या. तात्याला बघायला, भेटायला यायला त्यांना त्यांच्या संसारातून कुठला वेळ? पोरंही बायकांत-लेकरांत गुंग होती. त्यांच्या बायकांनी त्यांना वेसण लावून ठेवली होती जणू! ती वेसण सैल होत नव्हती. चुकून झालीच तर पुन्हा ओढली जात होती अन् तात्याच्या पोरांच्या माना बैलागत खाली जात होत्या.

गेल्या महिन्यात मी तात्याच्या घरावरून चाललो होतो. तात्यानं मला हाक मारून बोलावून घेतलं. माझं मन मला म्हणालं : ‘जा लेका, तात्याशी गप्पा मार जरा. तेवढंच त्याचं मन हलकं होईल. तात्याचा तुला आशीर्वाद लागंल. पुण्य लागंल....’
मी तात्याकडं गेलो. तात्या खोपटाच्या दाराशी बसला होता. खोपटाचं दार म्हणजे तरी काय तर बोंदरीचा पडदा! मी बोंदरी बाजूला सारून आत शिरलो. कुडाला टेकून बसलो. इकडं तिकडं चौफेर नजर टाकली. खोपटाची जमीन पार उखणलेली. कधी सारवलं होतं कोण जाणे! छपरातून खोपटाच्या आत ऊन्हही येत होतं. पावसाळ्यात ते गळतही असणार. तात्याला आंथरायला बोंदरी, पांघरायला फाटकी वाकळ. उशाला घ्यायला मळकी उशी. पाणी प्यायला एक
तांब्या-कळशी. कळशीला पार कळा आलेली. जेवायला एक जर्मनचं ताट. कोपऱ्यात केरसुणीचा एक बुडखा. केर लोटण्यासाठी. एवढाच तात्याचा संसार!
तात्याकडं मी बघितलं.
तात्याच्या अंगातलं धोतर मळलेलं. गोळा होऊन वर गुडघ्यापर्यंत गेलेलं. सदरा एका बाजूनं उसवलेला. सदऱ्याची कॉलर फाटत चाललेली. तात्याची दाढी वाढलेली होती. सगळ्या खोपटात कुबट वास येत होता.
मी तात्याकडं बघत म्हटलं :‘‘तात्या, का ओ बोलावलं मला?’’
तात्यानं माझ्याकडं बघितलं. त्याचे डोळे दाटून आले होते. तात्यानं डोळे एकदा मिटून उघडले. टप्‌दिशी दोन थेंब जमिनीवर पडले. मला कसंतरीच झालं. तात्याच्या डोळ्यांत पाणी बघून माझ्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
तात्यानं मोठ्यानं श्‍वास घेऊन सोडला. तोंड उघडलं.

‘‘आरं बाबाऽ ऽ, मला समाजलं की तू पुस्तक लिवतुया म्हून! म्हून घेतलंय बोलवून तुला. आरं, तुह्या पुस्ताकात माझं बी चार सबुद लिव जरा. माझीच गोष्ट लिव तू. लोकांसमुर माझं दुखनं आन जरा. समजू दी लोकान्ला....दोन-चार पोरं सुधारली तर सुधारली! माझ्या मनाला तेवढंच समाधान वाटंल. आरं, मला मस दोन पोरं हायती...पर काय कामाची रं? कुनी बी सांभाळत न्हाय नीटवानी मला. माझी बायकू गेली अन्‌ माझं सारं गेलं. बायकूशिवाय कुनी नसतं बाबा. आरं ही पोटची पोरं मला कधी च्या देत्याती तर कधी देत न्हायती. मनात आलं त्यांच्या तर च्या, न्हायतर न्हाय. माझ्या अर्ध्या भाकरीसाठी ल्योकांनी पाळी लावलीया. म्हैनाभर थोरला दितू....पुढच्या म्हैन्यात धाकला दितू. कधी कधी तर सुना शिळ्या भाकर आणून देत्यात्या. माझं निम्म्याच्या वर दात पडल्यातं....शिळी भाकर चावत आसंल का मला आता? कालवण बी शिळं पाकं-इटल्यालं देत्याती. कधी कधी तर पोरगं गावाला गेलं तर मी उपाशी! दुसरा ल्योक देत न्हाय. ‘या म्हैन्यात माझ्याकडं पाळी न्हाय’ म्हंतो!’’
ते सगळं ऐकून मी निःशब्द झालो. तात्याकडं नुसताच बघत बसलो.
तात्या सांगू लागला : ‘‘माझं काम मला व्हत न्हाय आता. येकेक आजार गाठाया लागलाय मला. गुडघ्यानं उठता येत न्हाय. बसूनच पुढं सरतो. न्हायतर काठीच्या आधारानं हाळू हाळू चालतो. माझं
धोतार-सदरा बी मीच धुतो कसाबसा. रस्त्यावरल्या कुठल्या तरी पोरांकून हापशाचं पानी हापसून घेतो. उन्हाचं हापशावरच आंघूळ उरकून घेतो. मरान येत न्हाय म्हून जगतोय बग कसा तरी...’’
माझं डोकं सुन्न झालं होतं.
‘‘कशासाठी रंऽ ऽ आमचं हाल? कुठं पडलो पोरांसाठी कमी आम्ही? आरं, पोरान्ला मोठं करायसाठी लोकांच्यात चाकऱ्या धरल्या. हाडं कुजवून घेतली. पोरान्ला शाळा शिकवली. त्यांची लग्न केली. त्यान्ला रांकेला लावलं. परपंचाला लावलं. शेवटच्या वक्‍ताला मात्र पोरांनी आमची ही दशा लावलीया. खेळ मांडलाया आमचा. आयुष्याचा तमाशा केला. कुठं फेडत्याली रं ही पोरं....?’’ तात्या सांगतच होता.
तात्याच्या चेहऱ्यावर आता कुठलाच भाव नव्हता.

‘‘देव बी सत्त्व बघतूया माझं. काय उरलंय माझं? कुनासाठी जगायचंय आता? जगून तरी काय करायचंय? देवाला मरान मागितलं तर देव देत न्हाय. काय करावा तेच कळंना झालंय? दिस बी जात न्हाईत...तुझ्यासारका येखांदा पोरगा बी मन मोकळं कराया जवळ येत न्हाय...आमची म्हाताऱ्यांची एवढी घान सुटली हाय व्हय रं? पर येक गोष्ट ध्यानात ठिव तू. आज माझ्यासारख्या म्हाताऱ्यावर ही येळ आलीया. हीच येळ उद्या तुमच्यावर कशावरनं येनार न्हाय? बदला म्हनावं जरा! म्हाताऱ्यांचा श्राप घिऊ नी मानसानं! श्राप लय वाईट असतूया...’’
तात्याच्या डोळ्यात राग उतरला होता.
क्षणभर तात्या गप्प झाला. धोतराच्या सोग्यानं त्यानं डोळे पुसले. मीही जरा सावरलो.
‘‘पोरा, माझी गोष्ट लिवनार नव्हं मंग तुह्या पुस्ताकात?’’
मी आपली मान हालवली. काय बोलावं समजत नव्हतं मला.
तात्या खरं खरं बोलत होता. मला फार वाईट वाटत होतं.
‘‘आरं, मानूस अप्पलपोट्या झालाय बग. पहिल्यासारकी एकत्र कुटुमपद्दत बंद झाली आता. ज्याला त्याला आपली बायकू आन्‌ पोरं ग्वाड हायती. आरं बाबा, मानसानं शान्यासारखं वागावा. नाव कमवावं...बायका कालच्या आसत्यात रं. आम्ही म्हनत न्हाय की त्येन्ला तरास द्या...तुमच्या बायकान्ला बी तुम्ही प्रेम द्या. आधार द्या. त्येंच्याकडं बघत बघत आम्हा म्हाताऱ्यांचा बी थोडा इच्यार करा, येवढंच आम्ही म्हनतुया.’’
तात्याशी बोलताना एक तास सहज होऊन गेला होता.
मी उठलो. तात्याचा निरोप घेतला. दिवस सरत राहिले. वेळ मिळेल तसा मी तात्याकडं येत-जात होतो. जाताना तात्याला चांगलंचुंगलं खायला घेऊन जायचो. तात्या आनंदानं खायचा. आशीर्वाद द्यायचा. चार चांगल्या गोष्टी सांगायचा.
***

परवा मी अन्‌ माझा मित्र राजा, आम्ही दोघं मराठी शाळेच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो. खूप दिवसांतून तो पुण्याहून गावी आला होता. नोकरीसाठी तो पुण्यात असतो. खूप दिवसांच्या साठलेल्या आमच्या गप्पा. मन मोकळं करत होतो. रात्रीचे ११ वाजून गेले होते. आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. पौर्णिमा असावी! टिपूर चांदणं उन्हासारखं पडलं होतं. दिवस असल्यासारखं वाटत होतं. मंद गार वारा सुटला होता. वातावरणानं मन प्रसन्न झालं होतं. त्या आल्हाददायक चांदण्यात राजाच्या अन्‌ माझ्या गप्पा रंगल्या होत्या.
समोरून अचानक गाडीचा आवाज आला. गाडी अगदी जवळ आली आणि आमच्यासमोरच उभी राहिली. तात्याचा थोरला मुलगा बबनराव होता. मी त्यांना नाना म्हणायचो.
‘‘का हो नाना? एवढ्या उशिरा कुठं फिरताय?’’
‘‘आरं, आत्ताच मी कामावरनं घरी आलोया, तर घरी गेल्या गेल्या बायकोनं सांगितलं, ‘सकाळधरनं आपला खंड्या घरी आला न्हाय.’ कुत्रं हाय आमचं ते! लईच लाडकं आमच्या बायकोचं. ‘त्याला शोधून आना’ म्हन्ली. मंग काय, फिरतोय खंड्याला शोधत! तुम्हाला दिसला का कुठं...? काळ्या रंगाचा हाय आमचा खंड्या.’’
‘‘न्हाय ओ नाना’’ आम्ही नकारात्मक माना हलवल्या.
‘‘सांगा दिसलाबिसला तर. चामड्याचा पट्टा बांधलेलाय त्याच्या गळ्यात.’’
‘‘सांगतो दिसला तर...’’
नानांनी गाडीला किक मारली. कुत्र्याला शोधायला गाडी पुढं निघून गेली.
माझं आनंदी मन उदास झालं. टिपूर पडलेलं चांदणं भकास वाटायला लागलं. वातावरण अमावास्येसारखं वाटायला लागलं. मंद गार वाराही आता नकोसा वाटू लागला.
मरायला टेकलेले वडील एकेक दिवस मोजत आहेत...त्यांनी वेळेवर जेवण केलं की नाही, त्यांचं काय दुखतंय-खुपतंय हे पाहायला हा पठ्ठ्या जात नाही अन् कुत्रं शोधायला मात्र फिरतोय गावभर...मला वाटून गेलं.
‘उद्या भेटू या’ असं म्हणत मी राजाचा निरोप घेतला आणि घराकडं निघालो. टिपूर चांदण्यातही मला रस्ता नीट दिसेना. अंधारल्यासारखं वाटू लागलं.
मनात अनेक प्रश्‍न घेऊन मी त्यांची उत्तरं मनातल्या मनातच शोधत चाललो होतो. तेवढ्यात तात्याच्या खोपटाकडनं बायकांचा रडण्याचा आवाज कानावर आदळला...पुन्हा डोक्‍यात गोंधळ उडाला.
पुढं गेलेला राजा माघारी वळला अन्‌ राजा आणि मी तात्याच्या खोपटाकडं ठेचकाळत जोरात धावलो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com