‘पारदर्शकता महत्त्वाची’ (अश्विनी गिरी)

ashwini giri
ashwini giri

मुलं आपलं किती ऐकतात हा भाग वेगळा, पण पालक म्हणून मी जे करणं अपेक्षित आहे ते तिच्यापर्यंत पोचतं. आता उन्नती पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाईल, तिथली परिस्थिती, अडचणी वेगळ्या असतील, पण आम्ही आता बऱ्यापैकी निश्चिंत आहोत. कारण आता ती स्वतःचं आयुष्य जगायला, स्वतःच्या वाटा चोखाळायला सक्षम आहे, याची आम्हाला खात्री आहे.

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले आणि वाढले. आम्ही पुण्यातल्या कसबा पेठेतल्या वाड्यात राहायचो. तिथं सर्व जातीधर्माची कुटुंबं राहायची. वाडा संस्कृतीमुळे लहानपणापासून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायची, सगळ्यांशी बोलायची सवय झाली. आम्ही राहत असलेल्या वाड्यात नागपंचमी, गणपती, भोंडला असे सगळे सण एकत्रितपणे, उत्साहानं साजरे व्हायचे. त्यामुळे सुरेख आठवणींचा भरभरून साठा माझ्या बालपणात मला सापडतो. वाड्यात कोणत्याही घराची दारं बंद नसायची. साधारण माझ्या वयाची पंधरा-वीस मुलं वाड्यात होती. त्यामुळे अतिशय खेळीमेळीचं आणि सामाजिक वातावरण माझ्या लहानपणी मला मिळालं. घरात आम्ही तीन भावंडं- आमच्यात कडाक्याचं भांडण झालं आहे असं मला कधी आठवत नाही. इतके एकत्रितपणे आम्ही वाढलो, की भांडणं, मारामारी या गोष्टी कॉलेजपर्यंत आम्हाला माहीतच नव्हत्या. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत आणि एसपी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेची चौकट आणि तिथलं वातावरण यांचे खूप चांगले संस्कार झाले आहेत. माझ्या जडणघडणीत माझं शिक्षण, मित्र-मैत्रिणी, वाड्यातलं बालपण या गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात. आमच्या क्षेत्रात काम करताना मला याचा खूप उपयोग होतो.

वाड्यात आमचं घर सगळ्यांत मोठं होतं. माझे वडील खूप हौशी होते. दिवाळीच्या सुटीत घरातल्या मधल्या खोलीत ते मोठा किल्ला बनवायचे. त्यामध्ये विविध खेळणी ठेवून तो सजवायचे आणि वाड्यातल्या सर्व मुलांना बोलवून एखादा गाईड माहिती सांगतो, त्याप्रमाणं निरनिराळ्या गोष्टी सांगून किल्ल्याबद्दल माहिती सांगायचे. ते एकप्रकारे अनौपचारिक शिक्षणच असायचं. तसंच पपा आणि माझा मोठा भाऊ हे आमच्यासाठी लहान मुलांची भरपूर पुस्तकं आणायचे. आम्ही सुट्टीत त्याची लायब्ररी सुरू करून वाड्यातल्या मुलांना ती पुस्तकं वाचायला द्यायचो.

घरात व्रतवैकल्यंदेखील भरपूर व्हायची. आई चैत्रगौरीचं मोठं हळदीकुंकू करायची. वडील सुंदर आरास करायचे. नवरात्रात नऊ कुमारीकांचं पूजन वगैरे उत्साहानं होत असे. आर्थिक परिस्थिती खूप उत्तम नव्हती, तरीही आई-वडील सर्व गोष्टी उत्साहानं करायचे. दर महिन्यात वडील आम्हाला एक नाटक दाखवायचेच. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असणारं साहित्यिक, सामाजिक, आपुलकीचं, प्रेमाचं वातावरण खूप सहजपणे आम्हाला मिळालं. आई गृहिणी होती, ती शिकवण्याही घ्यायची. संसाराला आर्थिक हातभार लावून घराची, मुलांची घडीही व्यवस्थित ठेवताना आम्ही तिला पाहिलं आहे. आई-वडिलांकडून, वाड्याकडून अतिशय चांगल्या गोष्टी आम्हाला नकळत मिळाल्या. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये असणारे घट्ट बंध, खूप पैसा नसला तरी भरपूर समाधान, छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घ्यायला शिकलो. परस्परांत मतभेद असले, तरी ते सामंजस्यानं सोडवण्याची शिकवण मिळली. वडिलांनी कधी आम्हाला मारलं नाही, पण एक शिस्त मात्र असायची, की सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे मध्यमवर्गीय घराची चौकट आम्ही कधी मोडली नाही.

मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझा मित्रपरिवार विस्तारला. मी नाटकांत काम करू लागले, हॉकी खेळू लागले आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत मी खेळले. यामध्ये अभ्यासाकडेही लक्ष होतंच. कारण आई-वडिलांकडून जी चौकट मिळाली होती, ती पुढं तशीच चालू राहिली. पुढं एनएसडीमध्ये गेल्यावर माझ्या कक्षा अजून रूंदावल्या. माणसं ओळखता येऊ लागली, माणसांशी व्यक्त होणं जमायला लागलं. माझ्या आयुष्याचा जोडीदार चित्तरंजन गिरी तिथंच भेटला. ते स्वतः उत्तम कलाकार आहेत. ते स्वतः या क्षेत्रातले असल्यामुळे त्यांना या क्षेत्रातली कामाची पद्धत, टेन्शन्स, प्रेशर माहीत आहेत. त्यामुळे एक चौकटीतली पत्नी म्हणून त्यांनी कधी माझ्याकडे पाहिलं नाही आणि वागवलंही नाही, ही फार महत्त्वाची बाब आहे. मी व्यावसायिक कलाकार आहे, मी काम करणार, यात आमच्यात कुठंही मतभेद नव्हते. उलट त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मला निवडक, पण चांगलं काम करता आलं. मुलगी- उन्नती झाल्यानंतर आमच्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या. कारण आम्हाला तिला चांगल्या पद्धतीनं वाढवायचं होतं. त्यावेळी आम्ही मुंबईत राहत होतो, दोघंही काम करत होतो, स्ट्रगलर होतो, पण उन्नती झाल्यावर तिला एखाद्या बाईकडे सोपवून अथवा पाळणाघरात ठेवून आम्हाला तिला वाढवायचं नव्हतं. म्हणून मी तिच्यासाठी पुण्यात माझ्या आई-वडिलांकडे येण्याचा निर्णय घेतला. चित्तरंजन मुंबईत आणि आम्ही दोघी पुण्यात असे आमचे दोन संसार सुरू झाले. त्यांचं मुंबईत राहणं हे व्यवसायाच्या दृष्टीनं गरजेचं होतं. ते अधूनमधून पुण्यात येत असत. आर्थिक आघाडीही ते सांभाळत होते आणि उन्नतीच्या संगोपनात सहभागीदेखील होत होते. मी पुण्यात आल्यामुळे उन्नतीला आजी-आजोबांचं संस्कार मिळाले, प्रेम मिळालं. मी हळूहळू तिला आईकडे सोडून काम करू लागले. दुसरीकडे तिच्याकडे लक्ष देणंही होत होतं. उन्नतीचं शिक्षण उत्तम झालं पाहिजे, असं आमच्या दोघांचं मत होतं. त्यामुळे तिला डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये घातलं. चौथीपर्यंत मी तिचा सर्व अभ्यास जवळ बसवून घेत होते. अभ्यासाचं, मेहनतीचं महत्त्व पटवून देत होते. पुढे पाचवीपासून आतापर्यंत तिनं स्वतःचा अभ्यास अगदी नेटानं केला. ती आता बीएस्सी झाली आहे आणि तिचं प्रगतिपुस्तक अतिशय उत्तम आहे. आम्ही तिला पुण्याला आणण्याचा घेतलेल्या निर्णयाचं सार्थक झालं असं मला वाटतं.

मी स्वतः हॉकीपटू असल्यानं खेळाचे फायदे मला ठाऊक होते. ग्रुपबरोबर अॕडजस्ट होणं, टीम स्पिरीट, दुसऱ्यांकडून चांगल्या गोष्टी शिकणं, हारणं, जिंकणं आणि ते दोन्ही तितक्याच आनंदानं स्वीकारणं या सगळ्या गोष्टी मला पुढच्या संघर्षाच्या काळात खूप उपयोगाच्या ठरल्या. अभिनय क्षेत्रात काम करताना तुमच्याकडे सतत काम असेलच असं नाही. अशावेळी फायटिंग स्पिरीट खेळातून मिळतं. यामुळे उन्नतीनंही एखादा खेळ खेळावा असं मी ठरवलं होतं. तिला घराजवळच असलेल्या ग्राउंडवर बास्केटबॉल खेळायला पाठवू लागले. पुढे ती राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळली आणि आता आंतरविद्यापीठ स्पर्धांमधून खेळत असते. तिचं व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरलं. अभ्यास, बास्केटबॉल याबरोबर शाळेतल्या सर्व उपक्रमांत ती सहभागी व्हायची आणि त्यासाठी मी मदतही करत होते. त्यामुळे तिचा सर्वांगीण विकास आम्ही दोघांनी मिळून, ठरवून काही अंशी साधण्याचा नक्कीच प्रयत्न केला. उन्नतीनंही त्याचं सोनं केलं आहे.

मुलं मोठी होत असताना विचारानं, वागण्याबोलण्यानं बदलतात, काही गोंधळ त्यांच्या मनात निर्माण होतात. या सगळ्यात चित्तरंजनची भूमिका फार महत्त्वाची वाटते मला. ते म्हणतात, ‘‘मुलं चूकणार, खोटं बोलणार, पण त्यांना समजावून सांगावं लागेल, सतत त्यांच्याशी बोलत राहावं लागेल. ’’ ही त्यांची भूमिका अजूनपर्यंत आहे. आमच्या संसारामध्येसुद्धा जे काही चढ-उतार आले, मतभेद झाले, ते सगळं सांमजस्यानं बोलून त्यांनी दूर करत आणले आहेत, तसंच उन्नतीच्या बाबतीतही त्यांनी तीच भूमिका निभावली. मतभेदावर सतत चर्चा आमच्या घरात सुरू असतात आणि ते मला सर्वांत महत्त्वाचं वाटतं. कौटुंबिक संवाद खूप महत्त्वाचा आहे. हे तत्त्व आम्ही पाळत आलेलो आहोत.

आम्ही दोघं अभिनय क्षेत्रात असल्यामुळे प्रसिद्धीचं वलय आजूबाजूला असतं. मात्र, आम्ही काही गोष्टींचं तत्त्व पाळलं आहे, की कामामुळे आपण आहोत, कामापेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही आणि होऊ नये. तो इगो आपला आपण जागेवर ठेवला पाहिजे. त्यामुळे घरात आमच्या दोघांच्याही कामाचं विश्लेषण केलं जातं. चांगल्याबरोबर आणखी चांगलं होऊ शकतं का? याबद्दल चर्चा होते. ती सवय उन्नतीलाही तिच्या कामाबद्दल लावली आहे. आमच्या क्षेत्रात मद्य आदी व्यसनं बऱ्यापैकी केली जातात. तरुण वयात अशा गोष्टींचं आकर्षण मुलांना असतं. त्यामुळे आमचे अनुभव आम्ही तिच्याशी बोलतो, ते मोह, प्रलोभनं कशी टाळता येतील आणि टाळता नाही आले तर त्याचे परिणाम काय होतील, हे पण तिच्याशी बोलत राहतो. त्याचप्रमाणं दुसऱ्यांबद्दल सहानुभूती, एम्पथी, आदर या गोष्टी आम्ही पाळत असतो. ते तिनं पाळावेत अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही स्वतः मोठ्यांना नमस्कार करणं, वाढदिवसाला केक कापण्याऐवजी औक्षण करणं, एखाद्या संस्थेला देणगी देणं या गोष्टी करतो. समाजाचं ऋण चुकवलं पाहिजे याबद्दलही उन्नतीला जागरूक करत असतो. आम्ही आमच्या क्षेत्रातली चमकधमक, तिचं प्रतिबिंब आमच्या आयुष्यात कधी डोकावू देत नाही.
ज्या गोष्टींची खरंच गरज आहे तीच गोष्ट घ्यायची असंही आमचं तत्त्व आहे. मग त्यामध्ये गॕजेट असो किंवा अन्य कुठली वस्तू असो. तीच सवय उन्नतीलाही आहे. पाचवी-सहावीत असताना इतर मित्रमैत्रिणींकडे बघून तिलाही मोबाइल किंवा तत्सम गॕजेट आपल्याकडे असावं असं वाटत होतं. ती भरपूर हट्ट करायची, पण आम्ही तिला ते काही दिलं नाही. तो एक शिस्तीचाच भाग होता. पुढे नववी-दहावीत क्लासला वगैरे ती एकटी जायला लागली तेव्हा संपर्क साधता येण्यासाठी साधा मोबाइल तिला घेऊन दिला.
माझ्या लहानपणी मला खूप मित्रमैत्रिणी होते, पण आता बहुतेक घरांत एकच मूल असतं. मग त्यांना सोशल अवेअरनेस कधी येणार? मित्र-मैत्रिणींमुळे मानसिक आधार मिळतो. उन्नतीला ती कमतरता भासू नये म्हणून तिच्या मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाला घरी बोलवणं, सुट्टीत दोन-चार दिवसांसाठी घरी राहायला बोलावणं, तिला त्यांच्याकडे राहायला पाठवणं अशा गोष्टी मी करायचे. त्यामुळे मित्र-मैत्रिणी हा मुलांच्या जडणघडणीतला महत्त्वाचा टप्पाही आम्ही सांभाळला आहे.

आपलं मूल हे आपल्यासारखंच असावं असा बऱ्याच पालकांचा हट्ट असतो. मुलांच्या बाबतीत काही वेळा पालक खूप पझेसिव्ह होतात. मात्र, ते मूल वेगळं आहे, वेगळा विचार घेऊन आलेलं असतं, त्याची जडणघडण वेगळी असते, परिस्थिती बदललेली असते, त्यामुळे ते कधीतरी वेगळं वागू शकतं, उलट बोलू शकतं, या गोष्टी पालक म्हणून आपण स्वीकारल्या पाहिजेत. नाहीतर ते मूल एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून बहरत नाही, ते खुजं होतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही सतत उन्नतीशी बोलून तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तिला काय हवं आहे, तिची आवड काय आहे हे जाणून घेतो.

सध्याची परिस्थिती बघता पालकांना मुलींच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटते. पण असं घाबरणं योग्य नाही. कारण आपण घाबरणं हे आपल्या मुलीला कमकुवत बनवू शकतं. मात्र, आम्ही उन्नतीला सजग नक्कीच करतो. समाजात आजूबाजूला काय घडत आहे हे तिला सांगत असतो, जाणीव करून देत असतो. आमच्या हातून घडलेल्या काही चुका असतील तर त्या बोलून दाखवतो. तसंच अलीकडच्या फॕशनबद्दलही बोलतो. कुठं, कधी, काय करावं, याचा निर्णय आपण कसा घ्यायचा, हेदेखील तिच्याशी सतत बोलत राहतो. काही गोष्टी तिला पटतात, काही नाही पटत, पण आमच्यासाठी म्हणून ती ऐकून घेते. तिला बंधनं नाही घातलीयेत, पण ती कुठं, कोणाबरोबर गेली आहे, केव्हा येणार आहे, हे तिनं सांगून जाणं आणि सांगितलेली वेळ पाळणं ही आमची तिच्याकडून मागणी असते. तिच्यासोबत आम्हीही तसेच वागतो. मी पुण्यात असते, तर चित्तरंजन मुंबईत असतात! असं असलं, तरी मी कामासाठी कुठं जात आहे, केव्हा येणार आहे, कुठं आहे, काही अडचण तर नाही ना, या गोष्टी त्यांना माहीत असतात. ही पारदर्शकता खूप महत्त्वाची असते. तेवढी मागणी उन्नतीकडूनही आमची असते. मुलं आपलं किती ऐकतात हा भाग वेगळा, पण पालक म्हणून मी जे करणं अपेक्षित आहे ते तिच्यापर्यंत पोचतं. आता उन्नती पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाईल, तिथली परिस्थिती, अडचणी वेगळ्या असतील, पण आम्ही आता बऱ्यापैकी निश्चिंत आहोत. कारण आता ती स्वतःचं आयुष्य जगायला, स्वतःच्या वाटा चोखाळायला सक्षम आहे, याची आम्हाला खात्री आहे. तसंच जेव्हा तिला आमची आणि आम्हाला तिची गरज असेल तेव्हा आम्ही सगळे एकमेकांसाठी उभे आहोत ही खात्री आम्हाला आणि तिलाही आहे. माझ्या मते ‘सगळे एकमेकांसाठी आहेत, ही सुरक्षित भावना आपल्या मनात असणं’ हीच तर सुखी कुटुंबाची व्याख्या असते. उन्नतीला ते मिळालं आहे अशी मला आशा आहे.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com