‘कानसेन’ घडवणारा टेपरेकॉर्डर... (अश्‍विनी म्हैसकर)

ashwini mahiskar
ashwini mahiskar

वडिलांनी घरात आणलेला टेपरेकॉर्डर त्यावेळी अचानक आणल्यामुळे आई सुरवातीला रागावली पण नंतर त्या टेपवरची गाणी आम्ही आवडीनं ऐकू लागलो. टेपरेकॉर्डर बाबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. तो टेपरेकॉर्डर आम्हाला संगीताचा कान तयार करण्यात उपयोगी ठरला. तानसेन नाही तरी आम्ही चांगले ‘कानसेन’ होण्यात त्या टेपरेकॉर्डरचा वाटा खूप मोठा होता.

बाबांना संगीताची खूप आवड होती. अस्सल जातिवंत नाट्यगीते, शास्त्रीय गायन, सिनेगीते ऐकायला त्यांना मनापासून आवडे. मला अजून आठवते संध्याकाळी सातच्या दूरदर्शनच्या बातम्या बाबा बघत असताना ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या निधनाची बातमी बाबांनी ऐकली. त्या दिवशी बाबा बराचवेळ आपल्यातच विचार करत बसलेले मी पाहिले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बाबा दुकानात जाऊन मोठा टेपरेकॉर्डर आणि माणिकताईंच्या कॅसेट्स घेऊन आले. आणि मनसोक्तपणे त्यांनी माणिकताईंची गाणी ऐकली.

माणिकताईंच्या एका चाहत्याची त्यांना ही उस्फुर्त श्रद्धांजली. बाबांना कुठेतरी माणिकताई हयात असताना त्यांची गाणी आपण आवर्जुन ऐकू शकलो नाही,त्याचा मनाजोगा आस्वाद घेऊ शकलो नाही याचे मनापासून वाईट वाटले. याला कारणही तसेच होते. त्या काळात गाणी ऐकायचे प्रमुख माध्यम आमच्या घरी रेडिओच होते. जेंव्हा त्यावर आपले आवडीचे गाणे लागेल तेंव्हाच ते ऐकायला मिळत असे. टेपरेकॉर्डर सरसकट सगळ्यांकडे नसे.आमच्यासाठी ती चैनीचीच गोष्ट होती. या ना त्या कारणाने बाबांचे टेपरेकॉर्डर घेणे राहून गेले होते.

मला अजून आठवते बाबा सकाळी मोठा खोका घेऊन घरी आले. मी आणि अभिजीत (भाऊ) हे नवीन काय बाबांनी आणले बघायला आलो. बाबा आपल्याच नादात होते. त्यांनी घरात ज्या कप्प्याजवळ लाईटचे बटन होते तो कप्पा पूर्ण रिकामा केला. त्यातल्या वस्तू कॉटवर ठेवून टाकल्या. आमच्याकडे ज्या वस्तू कुठे ठेवायच्या याची जागा ठरलेली नसेल तर जो तो त्या कॉटवर टाकून रिकामा होत असे. आई नंतर सगळ्या वस्तूंच्या जागा ठरवून कॉट आवरणे हे अत्यंत अवघड काम रोज नेटाने करत असे. आमच्या छोट्या घरात सर्व वस्तू माववणे आणि घर आवरलेले ठेवणे हे अत्यंत कष्टाचे व कौशल्याचे काम होते. बाबांचा टेपरेकॉर्डर कप्प्यात स्थानापन्न झाला. इकडे अभिजीतने आई ला जाऊन वर्दी दिली. आई कपडे धुवायला खाली गेली होती. ‘‘आई बाबांनी नवीन टेपरेकॉर्डर आणला आहे आणि कॅसेटपण." आई म्हणाली, ‘‘काय? टेपरेकॉर्डर ? ’’

आई कपडे धुवून वर आली. एवढा मोठा खर्च ना सांगताच केल्यामुळे आई जाम भडकली. त्यात तिचा शिवणाचा कप्पा सगळा कॉटवर तिला ना सांगता रिकामा केल्याने आणिच भडकली. टेपरेकॉर्डर चांगला मोठा होता. त्यात एका वेळेस दोन कॅसेट घालून एका कॅसेटचे दुसऱ्या कॅसेटवर कॉपी करायची पण सोय होती. स्पीकर्स पण मोठे होते. तो कप्प्यात अगदी बरोबर बसला होता. एक इंच जास्त नाही की कमी नाही. लांबी, रुंदी, उंची गणित अगदी बरोबर जमले होते. त्यामुळे बाबा खुश होते. आणताना त्यांना थोडी धाकधूक होती की कप्प्यात बसला नाही तर काय करायचे? पण नशीबानं तो नीट बसला होता. इकडे आईचे सुरु झाले. ‘‘ टेपरेकॉर्डर आणलात ठीक आहे पण एवढा मोठा कशाला आणलात? दोन दोन कॅसेट घालून कॉपी वगैरे कुठे लागणार आहे? एखादा छोटा टेपरेकॉर्डर आणला, एखादे गाणे ऐकले, झाले. काय गरज आहे एवढा मोठा टेपरेकॉर्डर आणायची? ’’ पण बाबांचे कुणाकडेच लक्ष नव्हते. ते आपल्याच नादात होते. टेपमध्ये कॅसेट घालून बघणे स्पीकर्स चा आवाज नीट आहे ना बघणे, टेपची सगळी फंक्शन नीट चालतात ना बघणे असे सगळं
त्यांचे चालू होते. एखादी दुर्मिळ कॅसेट समजा कुणाकडे मिळाली तर ती लगेच च्या लगेच आपल्याला कॉपी करून घेता येईल व आपल्या संग्रही राहील अशी दूरदृष्टी ठेवून त्यांनी ही खरेदी केली होती.

दुपारी बारा ही आमची पाण्याची वेळ असल्याने आईने भराभरा कॉट आवरली आणि जास्त काही न बोलता ती पाणी भरायला निघून गेली. त्यानंतर येणाऱ्या दर सुट्टीच्या दिवशी बाबा सकाळी अकराच्या सुमारास पिशवीतून नवीन नवीन कॅसेट आणू लागले. त्यात कुमार गंधर्व होते, पी सावळाराम होते, कवी बी यांचे चाफा बोलेना होते, लता मंगेशकरची हृदयी जागा तू अनुरागा अशी भावगीते होती, आशाताईंचे ज्ञानदेव बाळ माझा होते, आशाताई आणि माणिकताईंची नाट्यगीते होती, आणि बरेच काही. इतके दिवस बाबांची दाबलेली इच्छया, आवड आता पूर्ण करण्यात बाबा कोणतीच हयगय करत नव्हते.

वीणा सहस्रबुद्धेचें शास्त्रीय गायन त्यांना खूप आवडे. त्यांचा राग हंसध्वनी त्यांनी आणला. व त्यातले शेवटचे ‘घट घट में पंछी बोलता’ हे भजन ते तल्लीन होऊन ऐकत. या सारख्या कॅसेट खरेदीने आई जरा वैतागली होती. ‘‘ सगळ्या कॅसेट अगदी लगेच आणून कशाला ऐकायच्या ? पुढच्या महिन्यात थोड्या आणायच्या, पण सांगितले तरी ऐकणार कोण?’’
बाबा नवीन कॅसेट घेऊन आले की अभिजीत लगेच आईला जाऊन सांगायचा, ‘‘आज बाबांनी
चार नवीन कॅसेट आणल्या, आई आज पण.’’ असे चालू असे.
अभिजीत बाबांना म्हणायचा, ‘‘बाबा आपला टेप किती रुपयाचा आहे? ज्या दिवशी तुम्ही आणलेल्या कॅसेट्स ची किंमत आपल्या टेपएवढी होईल त्या दिवशी मी आपल्या टेपला हार घालणार.’’ आणि आम्ही दोघेपण हसायचो.

इतके दिवस दोन, चार कॅसेट आणणे सुरु होते, हळूहळू त्याकडे बाकीच्यांनी दुर्लक्ष करायला सुरवात केली होती. आणि एक दिवस बाबा पुन्हा एक मोठा खोका घेऊन अकराच्या सुमारास आले. मी बाबांना विचारले, ‘‘ या किती कॅसेट्स आहेत? आणि कशाच्या आहेत?’’ बाबा म्हणाले ‘‘ हे गीतरामायण आहे. दहा कॅसेट्सचा सेट आहे.’’ मी म्हणाले, ‘‘ पण एवढ्या सगळ्या कॅसेट्स? कुणाचे आहे? बाबा म्हणाले,‘‘ सुधीर फडकेंची सगळी गाणी आहेत.’’ आईला मी म्हणाले, ‘‘ आई, तुला माहित आहे का गीतरामायण काय आहे ? आई म्हणाली,‘‘ हो, माहित आहे ना. पूर्वी रेडिओ वर लागायचे. आमच्या हरिपुरात एक गुरव होता. तो कृष्णाच्या देवळात कार्यक्रमात ‘सेतू बांधारे गाणे’ चांगले म्हणायचा. मी म्हणाले, ‘‘ आई, बाबांनी सगळा सेट आणला आहे. सगळी गाणी चांगली आहेत का चांगली? आई म्हणाली, ‘‘ सगळी गाणी
कशाला ऐकायला पाहिजेत ? एखाद दुसरी कॅसेट आणावी ऐकावी ते नाही. यांचे सगळे शाही काम ’’

मी बाबांना म्हणाले,‘‘ बाबा, आहो, कशाला एवढा मोठा सेट एकदम आणलात? नक्की चांगला आहे ना? ’’
बाबा म्हणाले, ‘‘ प्रत्येक गाणे उत्तम आहे, तुम्हाला त्यातले गम्य नाही.’’
मी म्हणाले,‘‘ आहो पण सगळी गाणी सुधीर फडके कशी म्हणतील? म्हणजे सीतेचे गाणे पण सुधीर
फडकेंनी गायले आहे?’’
बाबांना अशा बालिश प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज वाटली नाही. वगैरे वगैरे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.
इकडे अभिजीत ने सुरु केले, ‘‘बाबा, तुमच्या गीतरामायणात हनुमानाचे गाणे आहे का ? ’’
बाबा म्हणाले,‘‘ सगळी गाणी आहेत तुम्ही आधी ऐका आणि मग बोला.’’ त्यानंतर हळूहळू रोज जसा वेळ होईल, जेंव्हा त्यांना ऐकायला निवांत वेळ असेल तेंव्हा गीतरामायणातील कॅसेट्स ओळीने लावायला बाबांनी सुरवात केली. आणि आमच्या कानावर गीतरामायण पडू लागले. आम्ही कधी अभ्यास करत असू, कधी जेवत असू, कधी काही करत
असू. हळूहळू गीतरामायण हे काही साधेसुधे काव्य नाही काहीतरी नक्कीच वेगळे आहे अशी पुसटशी जाणीव मला होऊ लागली. गाणी कानावरून जात होती. सीतेचे गाणे, अहिल्येचे गाणे, कौसल्या, कैकयी, भरत अशा नानाविविध पात्रांची गाणी. एखादे गाणे नाजूक तर एखादे क्रोधाने म्हणलेले, एखादे आवेशपूर्ण तर एखादे दुःखी आणि कितीक भाव ती गाणी सांगत होती. बाबूजींच्या संगीतसामर्थ्याची आम्हाला ओळख होऊ लागली होती. आणि एक दिवस रात्री आठच्या सुमारास मी कॉटवर अभ्यास करताना बाबांनी गाणे लावले
दैव ज्यात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

आणि त्या शब्दांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. आणि मी त्या गाण्याकडे अक्षरशः ओढली गेले. शब्दांची जादू म्हणजे काय याचा मला साक्षात्कार होऊ लागला. एकएक शब्द कानावर पडत होता. प्रत्येक कडव्याला गळा भरून येत होता. नवीन वैचारिक सामर्थ्याची मनाला ओळख होत होती. प्रत्येक कडव्यानंतर आहा आणि आता पुढे काय असेल

याची उत्कंठा.
जीवासावे जन्मे मृत्यू
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात
अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा

आणि बरेच काही. मी, आई, अभिजीत, बाबा बसल्याजागी खिळलो होतो. माडगूळकरांच्या शब्दांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले होते. शब्द म्हणजे काय, त्याचे सामर्थ्य काय याचा मला साक्षात्कार झाला तो कायमचाच. आणि पुढील आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा मला नवीन दृष्टिकोन मिळाला. त्या गाण्यानी मी अंतर्बाह्य बदलले. मला हलवून सोडले.
मला आपले नेहेमी वाटते सर्वसामान्य माणसाने गीता वगैरे अभ्यास करण्यापेक्षा माडगूळकरांचे फक्त
दैव ज्यात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

हे गाणे ऐकले तरी बास आहे. गीतेचे सर्व सार माडगूळकर इतक्या सोप्या शब्दात आपल्याला सांगतात जसे कॉलेज च्या वयाचे एखादे अवघड गणित ते एखाद्या शाळकरी मुलाला इतके सोपे करून समजावतात आणि त्याला ते समजते. तसे हे अमृतकाव्य जन्म, मृत्यू, दैव, कर्म,योगायोग, पाप पुण्य अशा अवघड संकल्पना आपल्याला समजावून सांगते. आपण ते संकल्पना समजून घेत माडगूळकरांच्या शब्दांचा अवर्णनीय आनंद लुटायचा.

गीतरामायणातील या गाण्याचा क्षण माझ्या आयुष्यातील बहुमोल क्षणांपैकी एक आहे. एक दिवस अभिजीत घरी येऊन मला म्हणाला,‘‘ आज मी निलेशकडे एक कॅसेट ऐकली. खूप छान विनोदी आहे. खुप हसायला येते. उद्या तू पण ये ऐकायला.’’ मी ऐकल्यावर मला पण खूप आवडले. पु. ल. देशपांडेंचे ‘‘असा मी असा मी’’ होते ते. आम्ही लगेच निलेशची कॅसेट आणून कॉपी करून घेतली. आम्हाला वेळ असेल तेंव्हा आम्ही ते ऐकत असू. माझ्या मैत्रिणी एकदा आल्या होत्या त्यांना पण ती कॅसेट खूप आवडली. त्यासुद्धा कधी त्यांना कुठली गाण्याची कॅसेट कॉपी करायची असेल तर माझ्याकडे कॉपी करायला येत असत. मी आणि बाबा एखादे वेळेस एखाद्या गाण्याचा राग कोणता, त्याचा गर्भितार्थ कसा वेगळा आहे अशी चर्चा करत असू. पण अभिजीत कधी अशा चर्चेत भाग घेत नसे. त्याचा स्वभाव गमत्या होता. तो बाबांना गमतीने म्हणे,‘‘ गीतरामायणातील माझे सर्वात आवडते गाणे जांबुवंताचे आहे. माडगूळकरांनी गीतरामायणात सगळी गाणी लिहिली. अगदी वाली, सुग्रीव यांच्यावर पण गाणी लिहिली. पण जांबुवंतावर काही लिहिले नाही. मग जांबुवंत माडगूळकरांच्या स्वप्नात आला. तो म्हणाला हनुमान, वाली, सुग्रीव सगळ्यांवर तुम्ही लिहिले मग मला का नाही? मला पण एक गाणे पाहिजे. मग माडगूळकर म्हणाले ‘‘ चिडू नको बाबा मी तुझ्यासाठी पण एक गाणे लिहितो.’’ आणि मग त्यांनी जांबुवंताचे गाणे लिहिले. असे तो म्हणल्यावर मी, आई आणि अभिजीत हसत असू.

अभिजीत मोठा झाल्यावर तो त्याच्या आवडीच्या कॅसेट्स आणत असे. तो सर्व इंग्लिश गाणी आणायचा. मायकल जॅक्सन ची गाणी त्याला आवडत. पण बाबांना ती गाणी आवडत नसत. ते म्हणत, ‘‘ ही कसली गाणी नुसता आरडाओरडा. एखादे कुत्र्यामांजराचे केकाटणे जरी यात घातले तरी कळणार नाही.’’ अशी बाबा अभिजीतची टिंगल करत असत.

बाबा नेहेमी नवनवीन गाणी लावत असत. मला एव्हाना जातायेता ऐकून बरीच गाणी शब्दचालींसकट पाठ झाली होती. पण आपल्याला ही गाणी येतात हे मला लक्षात आले नव्हते. आईला कधी निवांत बसून गाणी ऐकायला वेळ नसे. तिला सतत काही ना काही काम असे. पण कामे करताना ती गाणे गुणगुणत असे.
त्या तिथे पलीकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे

हे गाणे प्रथम मी आईचेच ऐकले. तिचा आवाज पण खूप छान आहे. पुढे यथावकाश माझे लग्न ठरले. माझ्या बाबांनी मुलीच्या माहितीत तिच्या गाण्याचा परीक्षा झाल्या आहेत असे लिहिले होते. त्यामुळे लग्नाच्या बैठकीत माझ्या भावी सासऱ्यांनी मला एखादे गाणे म्हणायचा आग्रह केला. मी असे सगळ्यांसमोर कधी गाणे म्हणले नव्हते. त्यामुळे कोणते गाणे म्हणावे मला सुचेना. अजितला (नवरा) वाटले आता काय माहित ही काय गाणे म्हणणार? शास्त्रीय म्हणेल का उगीच कुठले फाल्तु हिंदी गाणे म्हणेल? काय आवड आहे काय माहीत. आप्पांनी (सासरे) उगीचच सगळ्यांसमोर आग्रह केला. मी पटकन सकाळीच ऐकलेले लता मंगेशकरचे ‘‘ह्रदयी जागा तू अनुरागा’ हे गाणे म्हणले. गाणे बरेच चांगले जमले. आणि अजितला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याची आणि माझी आवड सारखीच होती. पुढे आम्ही जेंव्हा भेटत असू, तेंव्हा बऱ्याच गाण्यांवर चर्चा करत असू. अजितला लक्षात आले बरीच चांगली गाणी मला नुसती माहितच नाहीत तर बऱ्यापैकी पाठही आहेत. अजित म्हणाला, ‘‘तुला कशी काय एवढी माहिती?’’ मी म्हणाले ‘‘ आमच्या घरी मोठा टेपरेकॉर्डर आहे ना. त्यावर बाबा लावतात. ऐकून ऐकून पाठ झाले.’’ आज मागे वळून बघताना वाटते जर बाबांनी त्या वेळेस टेपरेकॉर्डर आणला नसता तर खूप मोठ्या सांगीतिक ठेव्याच्या आस्वादास व बौद्धिक प्रगतीस मी नक्कीच मुकले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com