‘मुलांना उत्तम नागरिक बनवा’ (अतुल परचुरे)

atul parchure
atul parchure

मी अभिमानानं सांगतो : ‘माझ्या मुलीनं आत्तापर्यंत एकदाही कागदाचा कपटा रस्त्यावर टाकला नसेल, वाहतुकीचे नियम तोडले नसतील, रांग मोडून बाजूला गेली नसेल.’ याबद्दल मी डोळे झाकून विश्वासानं सांगू शकतो. कारण या गोष्टी लहानपणापासून आम्ही तिला शिकवल्या आहेत. बाहेर कुठंही गेलो, तरी आपल्या आई-बाबांना लोक ओळखतात, हे तिला माहीत होतं. त्यामुळं या मूल्यांना अधिक महत्त्व होतं आमच्या दृष्टीनं. सांस्कृतिक क्षेत्रात काम केल्यामुळं कदाचित लोक आपल्याला मान देत असतील; पण तो आपला अधिकार नाही, हे आम्ही लहानपणापासून सखीलला सांगितलं आहे. सेलिब्रिटींची मुलं कशीही वागली तरी चालेल, असं तिला वाटू न देणं खूप महत्त्वाचं होतं.

मी लहानाचा मोठा झालो तो काळ आणि माझी मुलगी मोठी झाली तो काळ यामध्ये खूपच फरक दिसून येतो. त्यावेळी टीव्ही, रेफ्रिजरेटर, इंटरनेट, मोबाईल यासारख्या गोष्टी नव्हत्याच. मात्र, हे प्रत्येकाकडे असतंच असंच आत्ताच्या मुलांना जन्मापासून वाटत असतं. मुंबईत टीव्ही आला, तेव्हा मी पहिल्यांदा टीव्ही पाहिला; पण आपण लगेचच तो घेऊ शकणार नाही, याची जाणीव मनात होती. कारण घरात सर्वसामान्यपणे असणारे मध्यमवर्गीय संस्कार होते. आपण चांगलं शिकावं, किमान पदवीधर व्हावं, चांगली नोकरी करावी असे काळानुसार संस्कार पालकांनी माझ्यावरही केले. मुलानं इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं, असं त्यावेळी बहुतेक पालकांना वाटत असे. माझ्याही पालकांना असंच वाटत होतं; पण सातवी-आठवीत असतानापासूनच मी नाटकात काम करू लागलो. माझी ती नाटकाबद्दलची प्रचंड आवड बघून पालकांचं मतपरिवर्तन झालं. त्यामुळं त्यानंतर डॉक्टर- इंजिनिअर नाही, तर निदान ग्रॕज्युएशन तरी पूर्ण कर, अशी त्यांची इच्छा होती. अर्थात त्यामागं नोकरीची सुरक्षितता हाच दृष्टिकोन होता. नाटकात कामं नाही मिळाली, तर निदान पदवी असली म्हणजे नोकरी तरी मिळेल, असं साधंसं गणित होतं. कारण तो काळ आजच्यासारखा मालिकांचा नव्हताच. तसंच फक्त नाटकावर चरितार्थ चालावा अशीही परिस्थिती नव्हती. किंवा त्या काळात नाटकात काम करणाऱ्यांची जी उदाहरणं होती, तीदेखील फार प्रेरणादायी नव्हती. त्यामुळं मध्यमवर्गीय माणूस यासारख्या गोष्टींना बिचकूनच असायचा. मराठी नाटकात किंवा चित्रपटात काम करून असे किती पैसे मिळणार, ही अनिश्चितता होती. आपण हिंदीतही काम करू शकतो हा विचारही त्यावेळी नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. आता अभिनय क्षेत्रात येणारा मराठी कलाकार एकाच वेळी मराठी नाटक, चित्रपट, मालिका; तसंच हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देऊ शकतो; पण त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळं आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी हा सुरक्षित पर्याय होता.
माझ्या आई-वडिलांचं हेच सांगणं होतं, की नाटकात काम करायचं तर कर; पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. नाटकात काम करू नकोस, असं ते कधीच म्हणाले नाहीत. अकरावीला मी सायन्स घेतलं. डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं, हा उद्देश होता. मला चांगले मार्कही होते; पण बारावीला गेल्यावर माझ्या लक्षात आलं, की या विषयांची मला आवडच नाहीये. त्यावेळी माझ्या पालकांनी मोठ्या मनानं मला कॉमर्सला प्रवेश घ्यायला परवानगी दिली. कदाचित त्यांना माझ्या भविष्याबाबत भीती वाटली असावी; पण त्यांनी माझ्या निर्णयाला नेहमी पाठिंबा दिला.
माझी मुलगी सखील हिला वाढवताना आम्ही कधीही कोणतीही बळजबरी तिच्यावर केली नाही. आमचे विचार, इच्छा कधी तिच्यावर लादल्या नाहीत. शाळेत जाऊन अभ्यास कर, असं आपण प्रत्येक मुलाला सांगतो तसं आम्ही तिला सांगितलं; पण दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेताना तिचा निर्णय तिलाच घेऊ दिला. ती पण हुशार आहे; पण माझ्यासारखीच तिची आवड वेगळी आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण स्कॉलरशिपवर झालं आहे. मला चौथी आणि सातवी दोन्ही स्कॉलरशिप मिळाल्या होत्या; पण म्हणून मला अभ्यासात इंटरेस्ट होता असं नाही. आमचे शिक्षक चांगले शिकवायचे, ते कानावर पडायचे म्हणून चांगले मार्क पडायचे. तशीच सखीलचीसुद्धा आवड वेगळी असल्यामुळं तिनं अगदी वेगळं क्षेत्र निवडलं. आम्ही तिला एकच सांगितलं होतं, की ‘तू काहीही कर; पण पूर्ण मेहनतीनं कर. आपली लाईफस्टाइल काही न करता मेंटेन करता येते आहे- त्यामुळं एवढंच करायचं असं चालणार नाही. तू आम्हाला प्रयत्न करताना दिसली पाहिजेस. मार्क किती पडतात हा मुद्दाच नाहीये; पण मेहनत दिसली पाहिजे.’ तिनं स्वतःच ‘लक्झरी ब्रँड मॕनेजमेंट’ नावाचा कोर्स शोधून काढला. मी तर त्याचं नावही ऐकलं नव्हतं. इटलीमध्ये तो कोर्स होता. पदवीनंतर ती तिकडे गेली. तो कोर्स पूर्ण केला आणि आता मुंबईत काम करत आहे. आम्हाला एकाच गोष्टीचा आनंद आहे, की आम्ही तिला तिच्या मनासारखं शिकू दिलं आणि ती मनासारखी शिकली.

लौकिक शिक्षण मुलं घेतातच; पण मुलांना उत्तम नागरिक बनवणं हे पालकांचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे. आजची सभोवतालची परिस्थिती बघून मला प्रकर्षानं जाणवतं, की मुलांना नागरिकशास्त्र अधिक जास्त प्रमाणात शिकवलं पाहिजे. शाळेत इतर विषय नाही शिकवले तरी चालेल; पण नागरिकशास्त्र मात्र नक्की शिकवलं पाहिजे. इतकी आज सभोवताली वाईट परिस्थिती आहे. आपल्याला रांगेत उभं राहता येत नाही, रस्त्यावरची स्वच्छता पाळता येत नाही, पाहिजे तिथं आपण थुंकतो, कर्कश्श हॉर्न वाजवतो, आपल्याला दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणता येते, स्वतःचे हक्क कळतात; पण कर्तव्य कधीच कळत नाही. याचसाठी समाज म्हणून या गोष्टी शिकण्याची गरज आहे. म्हणजेच नागरिकशास्त्र शिकण्याची गरज आहे, असं मला वाटतं. त्यामुळं आम्ही सखीलला चांगली नागरिक होण्यासाठी, चांगला माणूस होण्यासाठी जे काही शिकवता येईल, आमची जी काही मूल्यं आहेत ती शिकवण्याचा प्रयत्न केला आणि करतो. पु. ल. देशपांडे यांचं एक फार सुंदर वाक्य आहे : ‘आपल्याइतकंच दुसऱ्यालाही निर्वेधपणे जगण्याचा अधिकार आहे, हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही, तोपर्यंत आपली गणना सुसंस्कृत म्हणून होऊच शकत नाही.’ तेच आम्ही सखीलला शिकवण्याचा प्रयत्न करतो. ते अत्यंत गरजेचंही आहे. बाकी आताची पिढी इतकी हुशार आहे, की ती स्वतः त्यांची शिकतील आणि करिअर बनवतील. मात्र, चांगले नागरिक होण्याचं काम त्यांनी प्रथम केलं पाहिजे. मी अभिमानानं सांगतो : ‘माझ्या मुलीनं आत्तापर्यंत एकदाही कागदाचा कपटा रस्त्यावर टाकला नसेल, वाहतुकीचे नियम तोडले नसतील, रांग मोडून बाजूला गेली नसेल.’ याबद्दल मी डोळे झाकून विश्वासानं सांगू शकतो. कारण या गोष्टी लहानपणापासून आम्ही तिला शिकवल्या आहेत. बाहेर कुठंही गेलो, तरी आपल्या आई-बाबांना लोक ओळखतात, हे तिला माहीत होतं. त्यामुळं या मूल्यांना अधिक महत्त्व होतं आमच्या दृष्टीनं. कारण एखाद्या ठिकाणी रांगेत उभे राहिल्यानंतर लोक आम्हाला पुढं जाण्यासाठी मार्ग करून देतात. याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात काम केल्यामुळं कदाचित लोक आपल्याला मान देत असतील; पण तो आपला अधिकार नाही, हे आम्ही लहानपणापासून सखीलला सांगितलं आहे. सेलिब्रिटींची मुलं कशीही वागली तरी चालेल, असं तिला वाटू न देणं खूप महत्त्वाचं होतं. आता ती मोठी झाली आहे, स्वतंत्र काम करते; पण तिच्या व्यावसायिक कामासाठी ती जिथंजिथं जाते, तिथं ती कोणाची मुलगी आहे हे ती कोणाला सांगत नाही. मराठी क्षेत्रात काम करताना काही वेळा तिला विचारलं जातं; पण तिचं काम मराठी वर्तुळात जास्त नसतं. हिंदीतही काही वेळा विचारलं, तर ती सांगत नाही आणि मला ते आवडतं. कारण तू माझी मुलगी आहेस, हे तिनं स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना सांगावं असं मी तिला कधी सांगितलं नाही. शिवाय तिच्या कामासाठी आजवर आम्ही मदत केलीय असंही नाही. ती तिचं काम व्यवस्थित करत आहे, हेच महत्त्वाचं आहे.

सखील कॉलेजला असतानाचा एक किस्सा आठवतो. तिला पहिल्या यादीत प्रवेश मिळाला नाही, तेव्हा तिनं मला लगेच सांगितलं, की ‘बाबा तू कोणाला फोन करायचा नाहीस. मला अॕडमिशन मिळेल तिथं मिळेल, ओळखीनं नको.’ ओळखीनं अॕडमिशनही नको आणि कामही नको, हे तिनं मला फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे. ती आज बाविसाव्या वर्षी इतकी स्थिर मनोवृत्तीची आहे, की मी तिच्याकडं सल्ला मागू शकतो आणि तिनं दिलेला सल्ला उत्तमच असेल, याची मला खात्री आहे. कदाचित एकावेळी पन्नास गोष्टी कराव्यात, असं मला आजही वाटू शकतं; पण तिचे निर्णय अगदी ठाम आणि विचारपूर्वक असतात. तिच्या शिक्षणाच्या, करिअरच्या बाबतीत ती अतिशय सॉर्टेड आहे.

लहानपणी मी सखीलसाठी बराच वेळ देऊ शकत होतो. कारण मी मालिका करायला सुरुवात केली, तेव्हा तिची दहावी झाली होती. त्यामुळं तिच्या लहानपणी महिन्यातून २६-२७ दिवस शूटिंग नसायचं. सर्वांत मोठा फायदा म्हणजे मी एकत्र कुटुंबात राहत होतो. त्यामुळं माझ्या आईकडे ती खूपच आनंदात असायची. आजही तिला माझ्या आईची जास्त ॲटॅचमेंट आहे. मी आजीशी नाही खोटं बोलू शकत, हा प्रेमाचा धाक नक्कीच कुठंतरी असतो. त्यामुळं मी आणि माझी पत्नी सोनिया आम्ही दोघं काम करत असलो, तरी आम्हाला तशी सखीलची काळजी नसायची- कारण आई तिच्यासोबत असायचीच. शिवाय तिची शाळा, कॉलेज दादरलाच जवळ असल्यानं नेणं-आणणं हा प्रकार नव्हता.

सखील आता मोठी झालीये. त्यामुळं गॅजेट्स किती आणि कशी वापरायची हे तिला चांगलं ठाऊक आहे. मात्र, इतर लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर दहावीपर्यंत गॕजेट्स देऊ नयेत असं वाटतं. अर्थात ज्यांचे आई-वडील नोकरी करतात आणि घरात कोणी दुसरं नाही अशा परिस्थितीत फोन अपरिहार्य आहे; पण त्यातही मुलं इंटरनेटचा जास्त वापर करणार नाहीत, याची काळजी पालकांनी घ्यावी. आपण फार काळ मुलांना त्यापासून दूर नाही ठेवू शकत. अन्यथा त्यांच्या मनात मागं पडल्याची भावना निर्माण होऊ शकते. काळानुसार हे बदल स्वीकारावे लागतात. खरं तर पंचवीस वर्षांपूर्वी मोबाइल फोन वा अन्य सुविधा नसतानाही आपण वेळेत एकमेकांना भेटतच होतो. कदाचित त्यावेळी आपण जास्त जागरुक होतो. आता वेगवेगळी साधनं उपलब्ध झाली असल्यामुळं त्यांच्यावर आपण अवलंबून राहू लागलो आहोत. आज मोबाईल, इंटरनेट यांसारख्या गोष्टी अपरिहार्य बनल्या आहेत. त्यामुळं मुलांना तुम्ही किती काळ यापासून दूर ठेवणार? एका क्लिकवर चांगली आणि वाईट दोन्ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत मुलांवर चांगले संस्कार करणं हाच एक पर्याय आहे, असं मला वाटतं. मूलभूत मूल्यं मुलांना सांगितली आणि शिकवली तर गॕजेट्स दिली काय आणि नाही दिली काय, काही बिघडत नाही. शेवटी पालक हा मुलांना सगळ्यांत जास्त समजून घेणारा सर्वांत जवळचा मित्र असावा. आपल्या मुलांना काय हवंय आणि काय नकोय, कशात पुढं जाण्यासाठी पाठिंबा द्यायचा आणि कशात नाही हे ज्याला कळलं तो उत्तम पालक होय. स्वतःच्या कुठल्याही अपूर्ण राहिलेल्या इच्छा पालकांनी मुलांवर लादू नयेत. त्यांना त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. गुरूप्रमाणं त्याला वाट दाखवावी; पण त्याच्यासोबत वाटेवर चालण्याची गरज नाही. प्रवास त्यांचा त्यांनाच करू द्यावा.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com