सुटका! (बसवराज हिरेमठ)

basavraj hiremath
basavraj hiremath

त्या दिवशी रस्त्यावर बरीच भटकी कुत्री फिरत होती. गल्लीतल्या कुत्र्यांना एक अनोळखी कुत्रा दिसला. सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा नवखा कुत्रा त्या सगळ्यांना घाबरून पायात शेपूट घालून बचावासाठी धावतच त्या प्लॉटमध्ये शिरला...

माझ्या घराशेजारचा एक प्लॉट एका सुखवस्तू कुटुंबानं कधी
खरेदी करून ठेवला होता माहीत नाही; परंतु त्यांनी तो केवळ गुंतवणूक म्हणून घेतला असावा. तिथं त्यांनी छोटेखानी आउटहाऊस बांधून ठेवलं होतं. मात्र, तिथं कुणी कधी फिरकलेलं दिसलं नाही.
त्या रिकाम्या प्लॉटला तारेचं भरभक्कम कुंपण होतं. मात्र, कॉलनीतली मुलं तारेचं ते कुंपण प्रयत्नपूर्वक वाकवून आत शिरत व त्या प्लॉटचा उपयोग खेळण्यासाठी मैदान म्हणून करत. त्यामुळं प्लॉट तसा रिकामाच असला तरी मुलांच्या वर्दळीमुळे साफ-स्वच्छ होता.
मुलं कुंपण ओलांडून कुंपणाच्या खांबावरून उड्या मारून आत जायची. मनसोक्त खेळायची. हा मुलांचा नित्यक्रमच होता.
एकदा प्लॉटचे मालक कुटुंबीयांसह तिथं सुटीसाठी दोन दिवस राहायला आले. त्यांची-माझी ओळखही झाली. ते मला म्हणाले : ‘‘आमच्या प्लॉटकडं तुमचं लक्ष असू द्या. मी अधूनमधून येत जाईन. मुलांना आत खेळू देऊ नका.’’ त्यानंतर दोनेक दिवसांनी ते निरोप न घेताच निघूनही गेले. मुलांना खेळू देऊ नका, या त्यांच्या सूचनेबाबत मला काही करता आलं नाही. मुलं त्यांच्या स्वभावानुसार वागत राहिली आणि त्या प्लॉटमध्ये जाऊन खेळतच राहिली. मीही फारसं लक्ष दिलं नाही.
***

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ते कुटुंबीय दोन दिवसाच्या सुटीसाठी आलं. त्यांनी दोन दिवस सुटी आनंदात घालवली. त्या दिवशी रस्त्यावर बरीच भटकी कुत्री फिरत होती. गल्लीतल्या कुत्र्यांना अनोळखी; परंतु नुकताच वयात आलेला एक कुत्रा दिसला. सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा नवखा कुत्रा त्या सगळ्यांना घाबरून पायात शेपूट घालून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावतच त्या प्लॉटमध्ये शिरला; परंतु प्लॉटमालकांनी इतर कुत्र्यांना हाकलल्यामुळं हा कुत्रा आऊट हाऊसच्या मागं दडून बसला असावा. सायंकाळी प्लॉटमालक गेट बंद करून नेहमीप्रमाणे निघून गेले; परंतु कुत्रा प्लॉटमध्येच अडकून राहिला हे त्यांच्यापैकी कुणाच्याही लक्षात आलं नाही. आता अंधार पडू लागला होता. अडकून राहिलेल्या कुत्र्यानं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्याला बाहेर जायचा मार्ग सापडेना. आमच्या प्लॉटशेजारच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून जाण्यासाठी त्याची झेप पोचेना. त्यामुळे कुत्रा हतबल झाला. तहान-भुकेमुळे व्याकुळ होऊन केकाटू लागला. रात्रीच्या अंधारात हे माझ्या लक्षात आलं; परंतु मी फारसं लक्ष दिलं नाही. रात्री ११-१२ वाजल्यानंतर त्याचा सुटकेसाठी फारच आकांत सुरू झाला. मी ओळखलं; परंतु मी काहीही करू शकत नव्हतो. रात्रभर कुत्रा भुंकत होता, केकाटत होता, ओरडत होता. त्याला या नवख्या जागेत खूप एकटं वाटत होतं. त्याची ही अगतिकता मला जाणवत असूनही मी त्याला मदत करू शकत नव्हतो. मात्र, त्याच्या ओरडण्यामुळे गल्लीतली इतर सर्व कुत्रीही खूप ओरडत होती. बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न असफल झाल्यानंतर त्या कुत्र्यानं कुंपणाशेजारची जमीन उकरायचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. अखेर
थकून-भागून आऊटहाऊसच्या मागं कोपऱ्यात अंगाचं मुटकुळं करून तो बिचारा झोपी गेला. आता त्याचं आणि इतर कुत्र्यांचंही ओरडणं थांबल्यानं मलाही झोप लागली.
सकाळी सहा वाजता उठून मी प्लॉटकडं नजर टाकली. बाहेर पडण्यासाठीचे कुत्र्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले होते. त्या कुत्र्याची मला खूप दया आली. मी त्याला शिळ्या भाकरीचा तुकडा टाकला; परंतु त्यानं त्या तुकड्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही. त्याच्या नजरेत अगतिकता, तसंच मदतीची, सुटकेची याचना स्पष्टपणे दिसत होती. मी कुंपणाच्या भिंतीजवळ उभा राहून त्याला खुणेनंच माझ्याकडं येण्याचा इशारा केला. त्याला तो कळलाही. मी त्याच्या दृष्टीनं परका असतानाही तो सावधपणे माझ्याकडं वळला. पुढचे दोन्ही पाय भिंतीवर टेकवून शेपूट हलवत ‘माझी सुटका करा’ अशी जणू विनवणीच तो कुत्रा मला करत होतं.
मात्र, सुटकेसाठी त्याला पकडलं तर ते आपल्याला चावलं तर अशी मला भीती वाटत होती.
शिवाय, कुंपणाच्या पलीकडं माझे हातही पोचत नव्हतेच. तथापि, एक प्रयत्न म्हणून मी भिंतीवर चढलो व खाली वाकून त्याच्या दिशेनं माझा हात पुढं केला. कुत्रा हाताच्या दिशेनं झेपावू लागला. मात्र, भीतीपोटी मी माझा हात पुन्हा मागं घेतला. कारण, मी त्याचे पाय धरून त्याला ओढलं असतं तर त्याला इजा झाली असती आणि ते मला नक्कीच चावलं असतं.
मी भिंतीवरून इकडं तिकडं फिरू लागलो, तसं तेही माझ्या बरोबर इकडं तिकडं फिरू लागलं. शेवटी मी धाडसानं त्याचा पुढचा एक पाय पकडला व विजेच्या चपळाईनं त्याला उचलून भिंतीपलीकडून आमच्या प्लॉटमध्ये फेकलं. धपकन्‌ आवाज झाला. कुत्रा क्षणभर केकाटला. काही क्षणांत सावध झाला आणि मागं वळूनही न पाहता त्यानं धूम ठोकली व क्षणार्धात तो आमच्या कॉलनीतून अदृश्‍य झाला.
मी मनातल्या मनात हसत राहिलो. माझ्या डोळ्यांपुढं हे दृश्य दिवसभर येत राहिलं. एका कुत्र्याची एका रात्रीच्या बंदिवासातून सुटका केल्याचं मला खूप समाधान वाटलं. तो कुत्रा कुठून आला होता, कुणाचा होता, पुढं कुठं गेला असेल याचा विचारही मी नंतर सोडून दिला. काही दिवसांनंतर तर मी ही घटना पूर्णपणे विसरूनही गेलो.
***

स्वातंत्र्यदिनी, ता. १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदन समारंभासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मी एके ठिकाणी निमंत्रित होतो. पावसाळ्यामुळे माझी गाडी काही सुरू होईना. गाडीनं जाण्याचा विचार मी सोडून दिला व चालत निघालो. बरंच अंतर चालून गेलो. रिक्षा मिळेल का किंवा ‘लिफ्ट’साठी कुणी ओळखीचं दिसतंय का हे पाहत पाहत मी निघालो होतो.
बरचं अंतर पार केल्यानंतर मला कुत्र्यांची एक झुंड दिसली. ती आपसात खेळत होती. परस्परातल्या प्रेमाचं नातं घट्ट करत होती. इतक्‍यात एक कुत्रा माझ्या दिशेनं झेपावला. गुरगुला नाही की भुंकलाही नाही. मी तर घाबरून गेलो. क्षणार्धात त्यानं माझ्यावर लडिवाळपणे झेप घेतली. चिखलात माखलेला त्याचा तो अवतार शिसारी आणणारा होता. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला; पण तो कुत्रा काही थांबेना. त्याचं माझ्या अंगावरून जमिनीवर व जमिनीवरून माझ्या छातीवर झेपावणं सुरूच होतं. त्याचं ते लडिवाळ वागणं मला आश्‍चर्यचकित करत होतं. एव्हाना, माझा पांढराशुभ्र पोशाख चिखलानं माखून गेला होता. त्या कुत्र्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी तो दूर होत नव्हता. मला काहीच कळेना. मी नंतर त्या कुत्र्याकडं खूप निरखून पाहिलं, आणि...आपण ज्याची सुटका केली तो हाच कुत्रा आहे हे माझ्या लक्षात आलं. विशेषतः त्याच्या डोळ्यामुळं मला ते तीव्रतेनं जाणवलं. त्या दिवशी ज्या डोळ्यांमध्ये मदतीची आर्त याचना होती, त्याच डोळ्यांत आत कृतज्ञतेचा प्रेमभाव होता! एव्हाना, तो कुत्रा आता
चांगलाच तगडा व धष्टपुष्ट झाला होता.
माझ्याशी तो असा का वागतोय ते मी ओळखलं; पण रस्त्यावरच्या येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचं हे वागणं विस्मयचकित करून टाकत होतं.
इतर लोकांनीही त्याला दूर हटवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो कुत्रा काही ऐकत नव्हता. त्याचं माझ्याशी लडिवाळपणे वागणं सुरूच होतं.
तो माझ्या पुढं पुढं पळत होता...परत मागं येत होता...माझ्याकडं झेपावत होता. मी दूर लोटलं तरी जात नव्हता. आता त्याच्या या प्रेमापासून, लडिवाळपणापासून आपण आपली ‘सुटका’ कशी करून घ्यायची हे मला कळेनासं झालं!
या आकस्मिक प्रसंगामुळे माझं कार्यक्रमाला जाणंही कठीण होऊन गेलं. मी मागं वळलो तसा तोही माझ्या मागं पळतच येऊ लागला. मी काहीसा पळू लागलो तसा तेही माझ्या पुढं पळत जाऊन परत अंगावर झेपावू लागला...मला चाटू लागला...लाडीकपणे चावा घेऊ लागला.
आपली सुटका करणारा तो हाच, हे त्यानं ओळखलं होतं. त्या मुक्‍या जिवाचं हे प्रेम मला खूप काही सांगून गेलं. माणसं एक-दुसऱ्याची ओळख विसरतात किंवा ओळखूनही नजर चुकवतात; पण निष्पाप डोळ्यांतून वाहणारा त्या मुक्या प्राण्याचा आनंद मात्र मी आजही विसरू शकत नाही. मी त्या रात्रीच्या बंदिवासातून सुटका केलेला हा कुत्रा माझी एवढी ओळख लक्षात ठेवून होता, याबद्दल विचार करताना मला ‘इसापनीती’तल्या त्या गुलामाची गोष्ट आठवली.
राजानं त्या गुलामाला शिक्षा म्हणून सिंहाच्या पिंजऱ्यात ढकललं; परंतु सिंह गुलामाचे पाय चाटू लागला. त्या सिंहावर त्या गुलामानं पूर्वी कधीतरी केलेल्या उपकारांची जाण ठेवून तो सिंह त्याच्याविषयी कृतज्ञभाव व्यक्त करत होता.
मी थांबलो. त्या कुत्र्याच्या डोक्यावरून, मानेवरून, पाठीवरून हात फिरवला. आता तो माझ्या खूपच जवळ येऊन मला बिलगू लागला. गरगर फिरू लागला. त्याच्या शेपटीनं माझे कपडे आता पूर्णपणे खराब होऊन गेले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा आता मलाही विसर पडला. मग मी त्याच्याशी खेळण्यात बराच वेळ रमून गेलो व नंतर त्याच्या लडिवाळपणापासून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली.
त्या कुत्र्याच्या आठवणी मला दिवसभर सुखावत राहिल्या.
***

मी ज्या ज्या वेळी त्या गल्लीतून जातो त्या त्या वेळी तो कुत्रा कुठं दिसतो का हे मी आवर्जून पाहत असतो; परंतु अलीकडं मला तो कुठंच दिसला नाही.
महापालिकेची ‘डॉग व्हॅन’ जेव्हा जेव्हा मला दिसते तेव्हा तेव्हा वाटतं, की माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा माझा हा अनोळखी (?) मित्र
या गाडीतून गायब तर केला गेला नसेल ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com